महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्ताने…

-

१७ मार्चला अशोक खरात या स्वत:ला अंकशास्त्रात तज्ज्ञ असल्याचा दावा करत निसर्ग, माणूस, प्राणी यांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली अघोरी कर्मकांडे करण्याला भाग पाडत स्त्रियांचे लैंगिक शोषण करणार्‍या ज्योतिषी बाबाचे बिंग फुटले. त्याला पोलिसांनी अटक केली आणि इराण अमेरिका युद्ध, गॅस टंचाई वगैरे सारे विषय मागे पडले. जणू काही ही घटना आपल्या देशात पहिल्यांदाच घडत आहे, अपवादात्मक आहे अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर गेले १५ दिवस प्रचंड खळबळ माजली. अर्थात या बाबाची कार्यशैली इतर अशीच कृत्ये करणार्‍या शेकडो बाबांच्यापेक्षा काही वेगळी नव्हती. अगदी पूर्वीपासून पुण्याचा वाघमारे बाबा, राम रहीम, आसाराम यांच्यापर्यंत चालत आलेली. तेच ते भविष्य कथनाचे अवैज्ञानिक दैवी शक्तीचे दावे, यज्ञ, प्रार्थना, पूजाअर्चा, अघोरी कर्मकांडे यातून स्त्री पुरुष भक्तांना आपल्या विळख्यात घेऊन त्याचे लैंगिक, आर्थिक शोषण!   

हे बाबा लोक जी कार्यशैली भक्तांच्या शोषणाचे साधन म्हणून वापरतात त्या कार्यशैलीला सत्ताधार्‍यांनी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे, शैक्षणिक धोरणात घुसवलेली आहे. राजकीय आधार दिलेला आहे. कारण त्यांच्या सत्तेचा आधार हीच बुवाबाबांची कार्यशैली आहे. आज त्यांनी  या बुवाच्या  विरोधात बडगा उचलेला आहे त्याला कारणही त्यांचा राजकीय स्वार्थ हाच आहे. अर्थात त्यामुळे एका भोंदू ज्योतिषी बुवाचे पितळ उघडे पडले, चर्चेची घुसळण झाली आणि सत्ताधारी, धनदांडगे, प्रशासकीय अधिकारी आणि हे बुवाबाबा यांच्या संगनमताने चालत असलेले भक्त स्त्री पुरूषांचे भयानक शोषणाचे  कारस्थान जनतेपुढे आले. या घटनेने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज व जबाबदारी अधोरेखित केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या जबाबदारीचे भान ठेवत कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला न जुमानता आपली जबाबदारी नक्कीच पार पाडेल यात काहीही शंका नाही.

या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिराव फुले यांचे २०० वे जयंती वर्ष ११ एप्रिल पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही या वर्षीचा एप्रिलचा अंक महात्मा फुले २०० वे जयंती वर्ष विशेषांक काढत आहोत. खरात प्रकरणासारखी प्रकरणे हेच दर्शवीत आहे की, आज दोनशे वर्षानंतरही महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची किती गरज आहे. त्यामुळेच या अंकात आम्ही महात्मा फुल्यांच्या विचारांचा आजच्या परिस्थितीच्या संदर्भात वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अंकातील पहिलाच लेख अंधश्रद्धा निर्मूलन समितीने. फेबु्रवारी १९९७ साली प्रकाशित केलेल्या स. मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या ‘समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या पुस्तकातील प्रा. भा. ल. भोळे यांचा ‘महात्मा फुले आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा लेख  संपादित स्वरुपात आम्ही पुर्नप्रकाशित करत आहोत. या लेखात बुवाबाजी, फलज्योतिष, मिथके, निरर्थक कर्मकांडे, प्रारब्ध, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या अंधश्रद्धांबाबत महात्मा फुलेंनी केलेल्या मांडणीचा ऊहापोह केलेला आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ४० वर्षे महात्मा फुल्यांचा वैचारिक आणि कृतीशील वारसा कशा पद्धतीने चालवत आहे या बद्दल लिहित आहेत डॉ. हमीद दाभोलकर. महात्मा फुल्यांच्या गुलामगिरी, शेतकर्‍यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातील लिखाणातून त्यांचे विचारविश्व कसे उलगडत जाते याचा वेध प्रा. सचिन गरुड यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनातून उपस्थित केलेले मुद्दे आज दोनशे वर्षानंतरही आजच्या शिक्षणव्यस्थेला कसे ग्रासून आहेत याचे विवेचन प्रा. सुधाकर शेलार यांनी आपल्या लेखात केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पोवाड्यातून महात्मा फुले यांनी महाराज कसे उभे केले आहेत, यावर अनिल चव्हाण यांनी लिहिले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेचा शोध अंनिसच्या कार्यकर्त्यासमवेत कसा घेतला याची कहाणी पत्रकार कामिल पारखे यांनी सांगितली आहे. यंदा दि.२० मार्च २०२६ पासून महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत व मानव मुक्तीच्या संग्रामात, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे मोठे महत्व आहे. याबद्दल सुबोध मोरे यांनी लिहिले आहे. या सर्व लेखातून दोनशे वर्षानंतर आजच्या परिस्थितीतही  महात्मा फुल्यांच्या विचारांचे किती महत्व आहे याची जाणीव वाचकांना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना नक्कीच होईल.

‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वार्षिक वर्गणीमध्ये अल्पशी वाढ
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक गेली ३५ वर्षे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू आहे.
            मासिकाच्या वितरणासाठी पोस्टाची सवलत असल्यामुळे पोस्टिंगचा खर्च मर्यादित होता, परंतु डिसेंबर २०२६ नंतर पोस्टाने सवलतीच्या दरात अंक पाठवण्याची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे पोस्टिंगचा खर्च खूपच वाढणार आहे. त्यातच कागद आणि छपाईचा खर्चही वाढला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सातारा येथे झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये वार्तापत्राची वार्षिक वर्गणी रुपये ३०० वरून रुपये ४०० करायची ठरली आहे.
            एप्रिल २०२६ पासून आपण वार्तापत्राची वार्षिक वर्गणी (रु.४००) चारशे रुपये करत आहोत. कृपया वाचकांनी सहकार्य करून ही अल्पशी वाढ स्वीकारावी अशी विनंती आहे.
– संपादक मंडळ,
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]