उत्तम जोगदंड -
गेल्या वर्षी भव्य प्रमाणात साजर्या केलेल्या त्रिदशकपूर्ती महोत्सवाच्या स्मृती अजून ताज्या असतानाच ‘महाराष्ट्र अंनिस’चा 31 वा वर्धापनदिन येऊन ठेपला. संपूर्ण जग ‘कोविड-19’च्या भयानक संकटात सापडलेले असताना आणि त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचे कडक निर्बंध जारी असल्याने सर्वांनी प्रत्यक्ष एकत्र येऊन वर्धापनदिन साजरा करणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन दरम्यान ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. हे महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने राज्याच्या वाटचालीत अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी ‘महा. अंनिस’ने केलेल्या योगदानाचा लेखाजोखा घेणे महत्त्वाचे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रख्यात साहित्यिक आणि ‘महाराष्ट्र अंनिस’चे उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधक आणि विज्ञानलेखक सत्यजित रथ, ज्येष्ठ लेखक, पत्रकार, विचारवंत प्रा. जयदेव डोळे आणि प्रख्यात मानसशास्त्रज्ञ ‘महाराष्ट्र अंनिस’चे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर यांनी आपले विचार मांडले.
‘महाराष्ट्र अंनिस’चे तरुण कार्यकर्ते आणि राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी सूत्रसंचालन ओघवत्या आणि रसाळ शैलीत केले. प्रमुख मान्यवर वक्त्यांचा परिचय राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर यांनी वक्त्यांच्या भाषणांपूर्वी थोडक्यात; परंतु मान्यवरांची योग्य ती सर्व माहिती देऊन केला.
कार्यकर्ते ‘फेसबुक पेज’वर जोडले जात असतानाच संविधान गौरवगीत आणि ‘विज्ञानाची पहाट’ ही सुरेल आणि अर्थपूर्ण गीते पार्श्वभूमीवर वाजत होती. ‘आम्ही प्रकाश बीजे…’ या चळवळीच्या स्फूर्तिदायक, सदाबहार गीताने कार्यक्रमाचा आरंभ झाला. त्यानंतर ज्यांनी ‘महाराष्ट्र अंनिस’चे बीज पेरले आणि वाढविले, त्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्मरण अभिवादन गीताद्वारे जागविले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी सांगितले की, 31 वर्षांपूर्वी मूठभर कार्यकर्त्यांना आपल्यासमवेत घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘महाराष्ट्र अंनिस’ची स्थापना केली. त्यांच्यानंतर अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादाने आणि केलेल्या मेहनतीमुळे ही संघटना वाढली, बहरली आणि विस्तारली. आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांतील 364 शाखांमार्फत ‘महाराष्ट्र अंनिस’चे काम जोमाने सुरू आहे. गेल्या वर्षी त्रिदशकपूर्ती महोत्सवात यशस्वीपणे आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत; तसेच दोन दिवसीय राज्य परिषदेत संघटनेच्या 30 वर्षांत केलेल्या डोंगराएवढ्या कामाचा आढावा घेतला गेला, याचा अभिमान एकीकडे वाटत असतानाच दुसरीकडे, आपला नेता गेल्याचे आणि तपास यंत्रणा त्यांचे मारेकरी आणि सूत्रधारापर्यंत पोचू शकल्या नाहीत, याचे दुःख होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या अधिवेशनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांनी प्रास्ताविक संपविले.
‘महाराष्ट्र अंनिस’ची भूमिका सांगताना राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपल्या भाषणात प्रथम सर्वांना वर्धापनदिनाच्या सदिच्छा देऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे अध्वर्यु, ज्यांच्यामुळे आज हे कार्य राज्य, जिल्हा, तालुका, गावपातळीपर्यंत पोचले आहे, त्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अन्य दिवंगत सहकार्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षनिमित्त एक बांधिलकी म्हणून राज्यनिर्मितीचा आढावा घेणे, घटनाक्रम-प्रेरणादायी इतिहासाची उजळणी करणे, कष्टकरी, दलित, श्रमिक, महिला, विविध संस्थांची प्रेरणा, हुतात्म्यांचे स्मरण हे सर्व नव्या पिढीला सांगणे आवश्यक आहे. तसेच अस्मितांची प्रचिती, तिचा विधायक आणि कृतिशील हस्तक्षेप समाजपरिवर्तनासाठी करून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आवाहन केले की, या तीन दशकांत आपले योगदान काय आहे, मानवजातीला आपण जे-जे काही दिले, मानवी जीवनाचे प्रश्न, त्यांचे निराकरण यासाठी आपण काय केले, यांचा आढावा घेतला गेला पाहिजे. पुरोगामी विचारांना संघटित आणि प्रभावशील करण्याची आणि त्यासाठी समविचारींशी संवाद साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘अंनिस’ची तीन दशकांची वाटचाल त्यांनी तीन टप्प्यांत विभाजित करून सांगितली. 1980 च्या दशकात दुःख, दैन्य आणि मानवी विकासात अडथळा आणणार्या अंधश्रद्धा दूर करण्यावर आणि बुवा-बाबांचा भांडाफोड करण्यावर भर देणे, यापासून ‘महा. अंनिस’ने व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे केलेल्या वाटचालीची माहिती दिली. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरा, सण, उत्सव यांना आपण कालसुसंगत पर्याय दिले. तसेच महाराष्ट्राला दोन कायदे दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद झाल्यानंतरही प्रभावी पाठपुरावा करून जादूटोणाविरोधी कायदा पास करून घेतला. त्या अंतर्गत अनेक प्रकरणे दाखल झालेली आहेत आणि काही प्रकरणांत शिक्षासुद्धा झाली आहे. यानंतर अन्य राज्यात सुद्धा असा कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. आफ्रिका खंडातील युगांडा या देशात नरबळीविरोधी कायदा करण्यासाठी सुद्धा मदत करण्यात आली आहे. दूसरा क्रांतिकारी कायदा आहे, सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा. जातव्यवस्थेतल्या जातपंचायतींद्वारा केले जाणारे शोषण, अन्याय दूर करण्यासाठी चार वर्षेसतत प्रयत्न करून हा कायदा पारित करून घेतला. आपल्या कार्याने आपण जगाला एक रोल मॉडेल दिले आहे, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या मोहिमा, उपक्रम यांद्वारे सरकारी धोरणे आणि कल्याणकरी योजना यात कृतिशील हस्तक्षेप केला गेला आहे आणि काही सरकारी धोरणांत आपले उपक्रम प्रतिबिंबीत झालेले दिसत आहेत. या समाजसुधारणेच्या कामात गती कमी पडत असली, तरी आपण आपले विचार मांडत राहणे आवश्यक आहे, असे विचार त्यांनी मांडले.
प्रा. जयदेव डोळे : प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख, विविध वृत्तपत्रांमधून अभ्यासपूर्ण लेखन करणारे, काही काळ साधना साप्ताहिकाचे संपादक, ज्यांच्या ‘विरुद्ध’ या पुस्तकास मराठवाडा साहित्य परिषदेचा 2014 चा नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशा प्रा. जयदेव डोळे यांनी आपले विचार पुढीलप्रमाणे मांडले.
महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवात आयोजित बैठक महत्त्वाची आहे, हे सांगत ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र स्थापनेला ज्या तीन तत्कालीन नेत्यांचा विरोध होता, ज्यांची राजकीय विचारसारणी वेगवेगळी होती. पहिले नेते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना ही भाषावार प्रांतरचना भावनेच्या आधारावर होत असल्याचे वाटत होते. दुसरे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की, त्या-त्या प्रांतात ज्या भाषा बोलल्या जातात, त्या जातीतील लोक प्रभावी ठरतील आणि म्हणून दलितांना वाईट दिवस येतील. तिसरे, रा. स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांचे मत होते की, हिंदू राष्ट्राच्या निर्मितीआड ही भाषावार प्रांतरचना येईल. परंतु सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन संघर्ष केला आणि त्यातून 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. भावना विरुद्ध तर्क असे राजकरणाचे बाळकडू महाराष्ट्राला मिळाले, हे सांगत त्यांनी प्रतिपादन केले की, भाषावार प्रांत हा भावनिक मुद्दा नसून लोकशाहीनुसार राज्यातल्या बहुसंख्याकांची कारभाराची, कायद्याची, शिक्षणाची भाषा एक असावी, असा प्रामाणिक आग्रह धरून, त्यातून उठाव करून, भावनेवर तर्काने, युक्तिवादने मात करून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आहे. महाराष्ट्राला आध्यात्मिक, धार्मिक, सशस्त्र क्रांतिकारकांचा, पूर्ण लोकशाहीवाद्यांचा वारसा लाभलेला आहे, म्हणूनच आजही वेगवेगळ्या विचारधारांचे संघर्ष इथे चालतात. परंतु आज 60 वर्षांनतर भावनांवर राजकारण करणारे पक्ष सत्तेवर येत आहेत, ज्यांचा जादूटोणाविरोधी कायद्याला विविध कारणांमुळे विरोध होता. 2013 साली दाभोलकर मारले गेले, नंतर हा कायदा आला. ते पुढे म्हणाले की, आपण कायद्याचे राज्य म्हणताना एक गोष्ट नजरेआड करतो, ती म्हणजे कायद्याचे राज्य हे लोकशाहीचे राज्य असते. हे राजकारणातूनच येत असते. त्यासाठी राजकीय पक्षांची आवश्यकता असते. राजकीय पक्ष विचारांवर चालतात. भावना विरुद्ध विचार यामध्ये आपण कोणत्या बाजूचे आहोत, याचा विचार केला पाहिजे. तरुण पिढीला भावना आणि विचार यापासून दूर करून ते वेगवेगळे कसे आहेत, हे शिकवले पाहिजे. राजकारणापासून आपण दूर जाऊ नये, असे सुचविले. महाराष्ट्र हा तर्कनिष्ठ मानला जातो. कारण आपल्या पूर्वजांनी फारशा अंधश्रद्धा जोपासल्या नाहीत. विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज; तसेच गणेशासारखी बुद्धीची देवता असलेला देव, असे सगळे आपल्यापाशी असताना अचानक भावनांचे राजकारण पुढे आले आहे. 5 ऑगस्टपासून ‘नवभारत’ सुरू झालाय, असे ते बोलू लागले आहेत. याचा साकल्याने विचार करून जुन्या अंधश्रद्धांबरोबरच नव्या अंधश्रद्धा कशा येऊ लागल्या आहेत, त्यासाठी कोणते नवे कायदे करणे गरजेचे आहे, नागरिक म्हणून तरुण पिढीला कसे घडवले पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी पक्षच असला पाहिजे, असे काही हे सांगताना त्यांनी मेधा पाटकर यांचे विकासाचे, पुरोगामी विचारांचे राजकारण निदर्शनास आणले. प्रबोधनाचे आणि मतपरिवर्तनाचे, मनपरिवर्तनाचे राजकारण हे पक्षविरहित असते, असे मत त्यांनी मांडले. पूर्वी नियतकालिकांत भुतांच्या, अंधश्रद्धांच्या, चमत्कारांच्या गोष्टी असायच्या. त्यामुळे आपल्याला पुरोगामी वारसा असतानासुद्धा लहान मुलांवर असे संस्कार होत होते. आता भुता-खेतांच्या गोष्टी कोणतेही साप्ताहिक छापत नाही; पण राशिभविष्य छापतात. भुतांच्या गोष्टी, भानामतीच्या गोष्टी जवळपास नाहीशा झाल्यात, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन पक्का होईल, अशी बाजू वर्तमानपत्रातून येत नाही. ती बाजू मांडायचे काम आपण केले पाहिजे. सत्तेतील दोन मोठे पक्ष भावनांचे राजकारण करतात आणि एका पक्षाला तर उघडपणे भारताला ‘धर्मराष्ट्र’ बनवायचे आहे. त्यामुळे विचारांच्या आणि राजकीय दृष्टीनेही तो मुख्य शत्रू आहे, लोकशाहीचा, संविधनाचा शत्रू आहे! असा मुद्दा त्यांनी मांडला.
दुसरा मुद्दा मांडताना 1992 साली जागतिकीकरण झाल्यावर आपल्याकडे आलेल्या ‘डिजिटलायझेशन’ आणि तंत्रज्ञान याचा उल्लेख केला. याने Debate, Discussion आणि Dialogue वर चालणार्या लोकशाहीचे, संवादाचे ‘डिजिटलायझेशन’ केले आहे. तंत्रज्ञानातील विविध धोक्यांमुळे आपण परावलंबी होतोय, हे त्यांनी निदर्शनास आणले. म्हणून संगणक आणि तंत्रज्ञान यावर उभी राहिलेली लोकशाही ही नवी अंधश्रद्धा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘डिजिटलायझेशन’च्या मागे संगणक आहे. ‘तंत्रज्ञान’ हा सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा मार्ग नव्हे; ती नवी अंधश्रद्धा निर्माण होते आहे. तिच्या आहारी बरीचशी तरुण पिढी चाललेली आहे. त्यापासून दूर जाऊ नये; पण त्यावर पूर्णपणे विसंबूनही राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
दुसर्या प्रकारच्या अंधश्रद्धा या अर्थशास्त्रीय चौकटीत बसवल्या आहेत, म्हणजे बाजार सार्वभौम असतो, बाजार ठरवेल, बाजारात विकले जाईल, तेच खरे. बाजारात जे सर्वाधिक लोकांपर्यंत पोचेल ते सत्य! हा विकृत, विपर्यस्त अर्थ काढला गेला आहे. त्यातून हे सत्य विकृत स्वरुपात ते मांडत आहेत. अशा नव्या अंधश्रद्धा बाजारात येत आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.
तिसरी अंधश्रद्धा आहे – राज्यकर्त्यांकडून एक नेता, एक देश, एक धर्म, एक राज्य, एक भाषा एकत्व या एकांगी, एकतर्फी, एकसुरी बाबींची. ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’, ‘यूजीसी’तर्फे एकाच प्रकारचा अभ्यासक्रम, वर्ग सांगून ‘एकतावादा’चा पुकारा केला जातोय. भारतासारख्या बहुविविधता असलेल्या देशात ही नवी अंधश्रद्धा रुजवली जात आहे. सत्ता लोकशाहीच्या मार्गाने त्यांच्याकडे सोपवली गेलेली असल्याने ते सांगतील ते लोक स्वीकारतील. पण सगळेच एक म्हटल्यावर, मग बाकीचे धर्म, पंथ, उपपंथ, विरोधी विचार याचे काय करायचे? अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे काय करायचे, याचा विचार न करता एकत्वाची भावना जोरकसपणे थोपवली जाते आहे. या नव्या अंधश्रद्धेविरुद्ध बोलले पाहिजे. संवैधानिक संस्था गेल्या पाच वर्षांपासून सरकार दुबळ्या करीत आले आहे. ऊशलरींश, ऊळीर्लीीीळेप, ऊळरश्रेर्सीश वर आधारित लोकशाही दुबळी होत आहे. राजकारण दुबळे होते आहे. माध्यमे एकांगी, एकतर्फी, एकसुरी बातम्या देत आहेत. सत्ताधारी पक्षाला धक्का पोचेल, अशा बातम्या देतच नाहीत. ते स्वतः आणि डावे, समाजवादी, तटस्थ लोक टेलिव्हिजन चर्चांमधून गेल्या दोन वर्षांपासून गायब झाले आहेत. अशा परिस्थितीत लोकशाहीचे मूल चित्र, धर्मधारणा वाचविण्याचे काम आपण केले पाहिजे.
अजून एक नवी अंधश्रद्धा ही आहे की, महिलांना त्रास सोसावा लागतोय, बलात्कार प्रचंड वाढले आहेत आणि ही नवी अंधश्रद्धा बनत आहे. बलात्कार झाला म्हणजे शीलभंग, चारित्र्यभंग झाला. ती स्त्री कायमची समाजाबाहेर, वाळीत टाकली जाते, चारित्र्यहनन झाले, असे म्हणतात. बलात्कार हा एक प्रकारचा अपघात असतो, जबरी अत्याचार असतो. यास शीलभंग, चारित्र्यहनन कलंक असे मानू नये, हे सांगून त्यांनी या विषयावर राम मनोहर लोहिया यांचे विचार सांगितले. त्यापलिकडे स्त्रीला फक्त योनीपुरतेच बघायची हिंदू, भारतीय संस्कृती, पुरुषी वर्चस्ववादी संस्कृती हटवली पाहिजे.
आत्महत्या, नैराश्य याबद्दल देखील उपचार होतोय. मानसशास्त्रीय अंधश्रद्धांवरही संघटनेने काम केले पाहिजे. केवळ धर्म आणि अंधश्रद्धा यापलिकडे तंत्रज्ञानात्मक, अर्थशास्त्रात्मक, मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा नव्या अंधश्रद्धा जन्माला येत आहेत, जाणीवपूर्वक जन्माला घातल्या जात आहेत. यावर त्यांनी ‘राष्ट्रवाद’ हे उदाहरण दिले. आंबेडकर, नेहरू, गांधी हे राष्ट्रवादी नव्हते, तर देशभक्त होते. रवींद्रनाथ टागोरांनी तीन मोठे निबंध लिहून राष्ट्रवादाचा धोका स्वातंत्र्याआधी सांगितलेला आहे, हे निदर्शनास आणून, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यामध्ये असणारा फरक त्यांनी लक्षात आणून दिला. काही पक्ष उघडपणे ‘हिंदू राष्ट्र’च्या मागे लागले आहेत, त्यात भाजप अग्रेसर आहे आणि शिवसेना त्यामागे आहे. आपले शत्रू कोणते, एवढा विवेक ठेवला पाहिजे, म्हणजे आपली लढाई सुकर होईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
डॉ. सत्यजित रथ हे व्यावसायिक डॉक्टर. एम. डी. पॅथॉलॉजी. हाफकिन इन्स्टिट्यूट, लंडन स्कूल ऑफ हायजिन, अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटी येथे शोधकार्य. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, दिल्ली येथे संशोधक म्हणून काम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) येथे ते मानद प्राध्यापक. अनेक वैज्ञानिक संशोधन बोर्डात सदस्य. त्यांचे 32 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध. ‘ई-लाईफ’ जर्नलचे वरिष्ठ संपादक. त्यांनी ‘महाराष्ट्र अंनिस’च्या सहकार्यांना वर्धापनदिनी सदिच्छा दिल्या आणि अविनाश पाटील यांनी सांगितलेला अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून कुरघोडी करणारी अस्मिता आणि विवेकवादी समावेशक अस्मिता म्हणजे काय, याचे विश्लेषण केले. हे करताना त्यांनी माधवराव पटवर्धन (माधव ज्युलियन) यांच्या काव्यपंक्ती, कुरघोडी करणार्या अस्मितेचे उदाहरण म्हणून; तर विवेकवादी समावेशक अस्मितेचे उदाहरण म्हणून कवयित्री शांताबाई शेळके यांनी संत ज्ञानेश्वर यांना उद्देशून लिहिलेल्या काव्यपंक्ती म्हणून दाखविल्या:
प्रफुल्ल बिडवई स्मृती सन्मान पुरस्कार ‘महाराष्ट्र अंनिस’ला मिळाला. त्याची आठवण काढून प्रफुल्ल बिडवई यांची विचारवंत म्हणून परिप्रेक्ष्याशी, ‘अंनिस’च्या कामाची नाळ कशी जोडली गेली आहे, याचा संदर्भ दिला. वर्धापनदिन हा खरे तर शुभेच्छा द्यायचा दिवस आहे. परंतु ऑगस्ट महिना काही चांगल्या आठवणींचा महिना नव्हे, हे सांगताना त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, नागासाकीच्या ‘नकारोत्सवा’चा दिवस याची आठवण काढली. अयोध्या येथील भूमिपूजनाचा अप्रत्यक्ष उल्लेख करून त्यांनी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील पुढील ओळी सांगितल्या –
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम!
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम!
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणार्यांना सलाम!
रिकाम्या हातातून उदी काढणार्या बुवाला सलाम!
हवेतून अंगठी काढणार्या बडे बुवाला सलाम!
शनीला सलाम, मंगळाला सलाम!
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम!
या भीतीच्या ठेकेदारांविरुद्ध डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ‘महाराष्ट्र अंनिस’ने गेली 31 वर्षेरान उठविले. या भीतीतून निर्माण होणारे अंधश्रद्धेचे अनेक पैलू आणि त्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन गब्बर बनणारे नाना प्रकारचे आर्थिक, सामाजिकच नव्हे, तर राजकीय दृष्टीने गब्बर होणारे भीतीचे अनेक ठेकेदार यांच्याविरुद्ध अन्य पुरोगामी गटांना सोबत घेऊन अनेक पदरी आंदोलन उभारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे आयुष्य, जागतिक साथ यावर ‘अंनिस’ची काही भूमिका हवी आणि ती असणं समितीच्या नव्हे, तर समाजाच्या दृष्टीने गरजेचे आहे. प्रा. डोळे यांनी सांगितलेल्या नाना प्रकारच्या अंधश्रद्धा आणि आतापर्यंतच्या अंधश्रद्धा या दोन्हींची सांगड घालणार्या अंधश्रद्धा या ‘कोविड-19’ने उभ्या केल्या आहेत. त्यांचे स्वरूप सांगून, त्याला भिडले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
आपण ज्याला कोरोना म्हणतो, ते खरे म्हणजे ‘व्हायरस’चे एक मोठे कुटुंब आहे. ‘सार्स’, ‘मर्स’ असे अनेक त्यातील सदस्य आहेत. आताचा आहे तो‘ कोविड-19’, म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज, जो 2019 साली आला. हा रोग ही कोणाची व्यक्तिगत समस्या नव्हे. ही साथ आपल्याला, स्वतःला धोकादायक नाही; पण आपल्याला समष्टि म्हणून धोकादायक आहे, असे प्रतिपादन करून ते पुढे म्हणाले, यास व्यक्तिगत धोका म्हणून घाबरून राहणे संयुक्तिक असले, तरी एक टक्क्यापेक्षा कमी मृत्युदर असणारा हा रोग आपल्यासाठी स्वतःला मोठा धोका नाही. परंतु हा विषाणू आणि रोग नवा आहे. त्याची लागण होऊन, त्याचा प्रसार होऊन कोट्यवधी लोक बाधित होऊ शकतात. त्यांच्यासाठी पुरेशी आरोग्य व्यवस्था नाही. म्हणून हा समष्टिचा धोका टाळण्यासाठी शारीरिक विलगीकरण, अंतर ठेवणे, मुखपट्ट्या, जमेल तिथपर्यंत हात धुणे, याचे पालन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लॉकडाऊन उठल्यावर लोक या सूचनांचे पालन करत नाहीत, हे त्यांनी उदाहरणांसह निदर्शनास आणून दिले. ‘मास्क’ हा हनुवटीचा दागिना म्हणून वापरला जातोय; तसेच आपण सॅनिटायझर, ‘इम्युनिटी बूस्टर’ घेऊन आत्मकेंद्री होत आहोत. ‘इम्युनिटी बूस्टर’च्या बाबतीत अंधश्रद्धा पाळली जाते, तेही त्यांनी दाखवून दिले. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता ही एककल्ली प्रतिकारशक्ती नव्हे, तर ती नानाविध प्रवाहांनी बनलेली आहे. त्यास तशाच बहुपेडी, बहुआयामी प्रतिकारशक्तीची गरज आहे, हे सांगून बूस्टर नक्की कोणता प्रवाह ‘बूस्ट’ करणार, असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या प्रतिकारक्षमता, या काहीही न करता शांत असतात. बाहेरून सूक्ष्म जंतू आल्यावर त्या उत्तेजित होतात. बूस्टर घेऊन गरज नसताना त्या उत्तेजित करून आपण शरीराला इजा पोचवतो आहोत, म्हणून ही एक मोठी अंधश्रद्धा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. प्रदीप पाटकर हे नामवंत मनोविकार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, ‘महाराष्ट्र अंनिस’चे स्थापनेपासून काम करीत आहेत. ‘कवडसे’ आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते काही काळ संपादक, ‘अंनिस’च्या ‘शोध भुताचा-बोध मनाचा’ या मोहिमेचे नेतृत्व. भूतबाधा व मनोविकार अशा विविध पुस्तकांचे लेखन. त्यापैकी ‘चिंता ः स्वरूप व उपाय’ या पुस्तकाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार. बालमानसशास्त्रात विशेष संशोधन. त्यांचे भाषण –
1986 पासून आपण या चळवळीच्या दोन्ही प्रवाहांचे आपण साक्षीदार आहोत, हे सांगून डॉ. पाटकर यांनी जयदेव डोळे आणि सत्यजित रथ यांची भाषणे आवडल्याची पावती दिली. ‘महाराष्ट्र अंनिस’चे जसजसे वय वाढते आहे, तशी चळवळ तरुण होत चालली आहे, त्याच वेळी परिपक्व होत चाललेली आहे, असे डॉ. पाटकर म्हणाले. जग ओळखताना वस्तुनिष्ठता असावी, मानवतावाद हा जगाकडे पाहण्याचा महत्त्वाचा दृष्टीकोन आहे. जग झपाट्याने बदलते आहे, हे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे आज ‘डिजिटल’ आणि ‘व्हर्च्युअल’ (आभासात्मक) काम करावे लागत आहे. मरणे-जगणे, विरह-विलगीकरण असे बदल झालेत. ‘मास्क’ हा काही प्रॉब्लेम नाही. कारण समाज अदृश्य ‘मास्क’ घालून पूर्वीपासून वावरतो आहे आणि त्या ‘मास्क’मागचा माणूस ओळखायला आपल्याला विचार करावा लागतो आहे. घराबाहेर जाण्यासाठी जीव आसुसतो आहे, घरात जवळीक आहे, तसाच काही घरात अंतर्विरोधही आहे. काही ठिकाणी संवेदनशीलता बोथट झाली आहे, तर घराघरांत ती वाढली देखील आहे. असंघटित विस्थापित कामगार, कष्टकरी यांचे हाल होताना संवेदनशीलता जागी आहे, असे दिसले. 17 व्या शतकापासून ते 19 व्या शतकापर्यंतची प्रगती, वैज्ञानिक दृष्टिकोनाची ओळख, ज्ञानचिकित्सेचा जन्म, कार्यकारणभाव आणि नंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये, त्यांचा प्रचार, प्रसार आणि मानवतावादाचा आविष्कार यांचा आढावा त्यांनी घेतला. याकडे आपण निराशावादी दृष्टिकोनातून न पाहता, या गोष्टी आपल्याला खूप काही चांगले शिकवून जात आहेत, म्हणून आशावाद ठेवला पाहिजे. हे चळवळीबाबत सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. हॅन्स रोजलिंग याचे, ‘मी ptimistic नाही, serious possibilist आहे,’ हे कथन सांगून, तसाच आपला आशावाद आहे, असे मत मांडले. कारण आपला समाज शिकत आहे, प्रगती करीत आहे, आरोग्य व्यवस्थेत गोंधळ असला तरीही सजगता येत आहे. धर्मचिकित्सा म्हणजे व्यवहारचिकित्सा हे सांगून कार्यकारणभावाकडे गेल्या कित्येक वर्षांत बरेच दुर्लक्ष झाले आहे. तसेच ‘कन्व्हेंशनल विजडम’च्या नावाखाली अवास्तव, जादुई, अशास्त्रीय विचार, शोषण दिसते आहे. जादू, चमत्कार, गुरू, प्रारब्ध, दैवदुर्विलास, मंत्र-तंत्र, असे शब्द स्वीकारायला सोपे जातात, खरे वाटतात आणि भाषेचा भाग होतात. परंतु आजचे प्रयत्न म्हणजे उद्याचे नशीब, ही लोकांना प्रयत्नवादाकडे नेणारी व्याख्या नको असते, हे सांगून त्यांनी याची काही उदाहरणे दिली. समाजाचा, शोषितांचा ‘मानसमित्र’ म्हणूनही आपल्याला काम करावे लागते. ‘मानसमित्र’ संकल्पना केवळ मानसिक आरोग्यपूर्ती नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बीजभूमिका ठरेल, असे ते म्हणाले. विवेकाची पालखी आम्ही डोक्यावरून वाहतो, विवेकाचा वारसा आम्ही गेल्या तीस वर्षांपासून निर्माण केला, असे म्हणतो, हे म्हणणे पटत नाही. कारण तो गेल्या सहस्त्र वर्षांत निर्माण झाला आणि तो आपण डोक्यावरून वाहत नाही, तर डोक्यात ठेवतो. त्यास आपण एक व्यवहारवादी आकार दिला, कृतिशील चळवळ दिली, ज्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’चे उपक्रम, कार्यक्रम मोहिमा, त्यातील त्यांचा स्वतःचा सहभाग यांची अनेक उदाहरणे दिली. आपण काढलेली नियतकालिके, प्रकाशित केलेली पुस्तके, दाभोलकरांच्या पुस्तकांचे केलेले हिंदी, इंग्रजी भाषांतर, साहित्य संमेलने भरवली. यासाठी झटणार्या काही सहकार्यांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. 1993 च्या भूकंपाच्या वेळी काढलेल्या विविध मोहिमा, विविध उपक्रम सांगून ‘महाराष्ट्र अंनिस’चे विशाल कार्य डोळ्यांसमोर उभे केले. विवेकी समाज निर्माण करण्यासाठी यापुढेही आपला वाटा उचलला पाहिजे, हे आवाहन त्यांनी केले. पुरावा आधारित आकडेवारी बघितल्यास समाजाला, जगाला सुधारणे आणि प्रगतिशील होणे, यापासून कोणी थांबवू शकणार नाही. अविवेकी शक्ती हळूहळू लय पावतील, त्यांचा प्रभाव कमी होईल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी आपले भाषण संपविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे हे साहित्य आणि पत्रकारितेतील मान्यवर नाव! ठाणे येथे आयोजित 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘महाराष्ट्र अंनिस’ स्थापनेच्या आधीपासून या क्षेत्रात कार्यरत, ‘महाराष्ट्र अंनिस’चे उपाध्यक्ष, त्यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही आत्मकथने खूप गाजली. ‘आई समजून…’ हे पुस्तक ब्रेल लिपीत प्रकाशित. त्याचा इंग्रजी आणि कानडी अनुवाद प्रकाशित झाला आहे; तसेच गुलबर्गा विद्यापीठात अभ्यासक्रमाचा भाग आहेत. ‘वाट तुडवताना’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद. मुंबई आणि नांदेड विश्वविद्यालयातल्या अभ्यासक्रमात समाविष्ट. कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा, देवदासी आणि नग्नपूजा, अंधश्रद्धा या ग्रंथांनी चळवळीला मिळालेलेे पाठबळ! विषयाची प्रभावी मांडणी करणारे वक्ते, लेखक. त्यांनी आपले विचार पुढीलप्रमाणे मांडले.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली एक विचारधारा घेऊन सुरू केलेल्या प्रवासासाठी आणि पुढील प्रवासासाठी त्यांनी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना सदिच्छा दिल्या. महाराष्ट्राची 60 वर्षांची वाटचाल सुरू असताना 1970 च्या दशकाच्या सुमारास आणि नंतर प्रबोधनाचा प्रवाह रोडावला होता, प्रश्न किंवा जाब विचारणारे कोणी नव्हते, एक पोकळी निर्माण झाली होती. अशा वेळी ‘महाराष्ट्र अंनिस’चा जन्म झाला. सौंदत्तीच्या मोठ्या डोंगरावर डॉ. दाभोलकर, बाबा आढाव आले होते, तेव्हा एक मोठी घोषणा (कानडीमध्ये) केली होती की, ‘देवाला मुली सोडू नका आणि हे आम्ही बंद पाडू.’ समाजाला कुरतडणार्या व देवदासी प्रथेच्या विरोधातली ही चळवळ पुढे वाढली, नवीन कायदा झाला, जुना दुरुस्त झाला. कर्नाटकात सुद्धा कायदा दुरुस्त झाला. त्या वेळच्या घोषणेचे नंतर रूपांतर झाले – ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ या घोषणेत या चळवळीने स्वतः आपल्या भोवतालच्या प्रागतिक, पुरोगामी चळवळींना मदतीला घेतले, त्यांच्याकडून ऊर्जा घेतली, त्यांना ऊर्जा दिली. दुभंगलेले चेहरे, जातीय दंगली, श्रमिकांवर, महिलांवर अन्याय होतात, तरीही आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणत होतो. कारण पुरोगामी वाटणार्या काही गोष्टी राजकारणातून वगैरे घडत होत्या. त्यात आपण एक विचारांची भूमिका घेऊन सुरुवातीला ‘बुवा हटाव’ मोहीम चालवून, पुढे मुळात बुवा जन्माला का येतो, हा विचार केला. त्या अनुषंगाने लेखन, प्रयोग, सभा-संमेलने, कायद्याचा आधार घेत आपण एक सामाजिक परिवर्तन, प्रबोधन करीत आलो आहोत. ही चळवळ व्यापक करण्याकडे आणि अशा वळणाकडे नेत आहोत. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या प्रबोधनाचा कोणी इतिहास लिहिला तर त्यातली 30 वर्षे‘महाराष्ट्र अंनिस’च्या नावाने असायला पाहिजेत, इतके मोठे काम संघटनेने केले आहे. काही असे कायदे केले जे भारताच्या समाज-इतिहासामध्ये झालेले नव्हते.
आपल्या आणि अन्य काही मंडळींच्या चळवळी चालू आहेत. काही चांगले रिझल्ट आहेत; पण आपल्याला आव्हान देणार्या शत्रूंची संख्यासुद्धा या काळात वाढलेली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 1998-2008 या काळामध्ये सर्वाधिक जातीय दंगली महाराष्ट्रात झाल्या आहेत आणि सर्वाधिक 1199 माणसे मारली गेली आहेत. हे प्रमाण गेल्या पाच वर्षांत नंतर वाढत गेले आहे. जिथे-जिथे उजव्या शक्ती सत्तेवर आलेल्या आहेत; केंद्रात आणि केंद्राबाहेर, तिथे-तिथे सामाजिक आणि जातीय संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. ज्यांना याचेच राजकारण, धर्मकारण करायचे आहे, आणि याचेच राष्ट्र बनवायचे आहे, अशा शक्तीसुद्धा अधिक आक्रमक, अधिक विस्तारलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून नजीकच्या काळात आपली भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याच्या विरोधात अनेक शत्रू तयार होतात. ते शत्रू भांडवलशाही, धर्मवाद, धर्मांध शक्ती, मूलतत्त्ववादी, निरक्षर, अडाणी लोक आहेत. त्यामुळे नव्या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन देणार, म्हणजे त्याची नेमकी उपकरणे, त्याची आयुधे काय वापरणार, याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे.
गेल्या दोन-चार महिन्यांपासून कोरोनानंतरचे जग कसे असेल, याचा विचार करता त्यातील काही महत्त्वाचे आणि धक्कादायकही आहे. दुर्दैवाने, विज्ञान आणि शिक्षण हे भांडवलशाहीने ‘हायजॅक’ केले आहे. हे कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी भांडवलशाहीने विचार करून जादूसारख्या गोष्टीत लोकांना खिळवून ठेवले आहे. धर्म, अंधश्रद्धा ‘प्रमोट’ करायला सुरुवात केली आहे. ‘चांदोबा’तून भूत गेले; पण पन्नास चॅनलमधून ते आले. ही चॅनल्स भांडवलशाहीची आहेत. शिक्षणामध्ये हा जो मोठा ‘ड्रॉप आऊट’ तयार होणार आहे, त्याचा पण विचार केला पाहिजे. कारण माणूस शिकलाच नाही, तर त्याला दृष्टिकोन, विवेक कसा देणार? हे सगळे प्रश्न कधी ना कधी आपल्याला भिडणार आहेत. कारण समाजाच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. आपण त्यांचे ‘आधार कार्ड’ झालो आहोत.
कोरोनाच्या चार महिन्यांच्या काळात दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे 60 ते 70 नव्या देवदेवतांची निर्मिती झाली आहे, असे दिसते. आश्चर्य वाटावेत, असे त्यांचे पूजाविधी, नवस-सायास तयार झाले आहेत, जे विज्ञानाला चॅलेंज देतात. माणसांना फसवणारे, शिकार बनवणारे असे अंधश्रद्धांचे जाळे आपल्याभोवती तयार झालेले आहे. या सगळ्यांनी विज्ञानाचा आधार घेतला आहे. त्यामुळे कोरोनानंतरचा माणूस असा आहे, जो अगोदरच खचून गेलेला आहे. अगोदरच भांडवलशाहीने आणि अन्य व्यवस्थेने त्याला कधी नव्हे, एवढे भयग्रस्त केले आहे. कारण माणूस भयग्रस्त झाला की, तो भांडवलशाहीला शरण जातो. धर्माने भयग्रस्तता तयार केलेल्या आहेत. चित्र-विचित्र प्रथा आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. उत्तर भारतात जवळजवळ शंभरेक शहरांमध्ये रोज रात्री ‘काऊ यूरीन’ पार्ट्या होतात. पार्ट्यांचा मोसम एवढ्या जोरात चालू आहे की, गायीच्या दुधापेक्षा तिचे मूत्र आता महाग झाले आहे. ते पिण्यासाठी ‘कॉमन’ माणूस आहे, ज्याला बाकी काही औषध मिळत नाही. इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी, माणसांचं भावविश्व, सगळेच बदलणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला बदलावे लागणार आहे आणि एक नवा माणूस, तो कसा असणार आहे, याचा पण आपण अभ्यास करायचा आहे. कारण चार महिन्यांनी तोच आपल्यासमोर येणार आहे. जुना आणि परिस्थितीने केलेला हा नवा माणूस, अशी आपली कामे आता वाढणार आहेत. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या वयोगटांसाठी, भाषकांसाठी, सोशल मीडियातून एक सिस्टिम ठरवून संवाद साधला पाहिजे. तरुणांसाठी महिन्यातून, पंधरा दिवसांतून त्यांनीच तयार केलेल्या किंवा आपण तयार केलेल्या ‘फेसबुक’वरून हा संवाद साधला पाहिजे. ‘अंनिस’चा प्रत्येक कार्यकर्ता वाचतो, विचार करतो, चिंतन करतो, ‘रिअॅक्ट’ होतो, वेळ देतो, त्याग करतो. हे सगळ्यात मोठे ‘अॅसेट’ ‘अंनिस’कडे आहे. आता अधिक बदलाच्या चळवळीजवळ जाणे आणि ज्या बदलाच्या चळवळी चालू आहेत, त्यांच्याशी ठोसपणे एक नाते पण सांगणे, हे आपणास करावे लागणार आहे. आपण संयुक्त राष्ट्र संघाशी सुद्धा जोडून घ्यायचे आहे. त्यांना पण अशा संस्थांची गरज आहे. आपण भारतभर, जगभर फिरायला पाहिजे आणि जिथे-जिथे पिळला जाणारा माणूस, स्त्री, पुरुष कोणीही असेल, तिथे आपली उपस्थिती असायला पाहिजे. असे एक ‘महा-स्ट्रक्चर’ करायचे स्वप्नसुद्धा याप्रसंगी बाळगले पाहिजे. तीस वर्षेही आपण अशा काळात काढली आहेत की, आपले शत्रू प्रचंड वाढलेले आहेत आणि व्यवस्थाही बदललेल्या आहेत. आपल्याला ही सगळी परंपरा घेऊन पुढे जायचे आहे. त्यासाठी मी माझ्यासह सगळ्यांना सदिच्छा देतो. कारण मी तुमचाच एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. जे लढणारे कार्यकर्तेआहेत, त्यांनी समजून घ्यावे की, आपण अशा संघटनेमध्ये काम करीत आहोत, जिथे काही मिळण्याची शक्यता नाही. आपण समाजबदलाचा एक संकल्प घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी राबत आहोत. तो संकल्प आपण असाच पुढे कायम ठेवून चालत राहू, या सदिच्छा व्यक्त करून त्यांनी आपले भाषण पूर्ण केले.
त्यानंतर विनायक सावळे यांनी सगळ्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला.
आभार प्रदर्शन राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले. चांगली मांडणी केल्याबद्दल सर्व वक्त्यांचे, सूत्रसंचालक विनायक सावळे, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुरेखा भापकर, सोशल मीडिया विभाग, अवधूत कांबळे, नंदकिशोर तळाशीलकर, नितीन राऊत, कार्यकारी समिती पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते, श्रोते, पडद्यामागील सर्वांचे आभार मानले.
‘हम होंगे कामयाब’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.