प्रकाश भोईटे -

नेसरी तालुका गडहिंग्लज येथील उद्योजक नामदेव सुतार हे पुण्यामध्ये मॉड्युलर ऑफिस फर्निचर कंपनी चालवतात. पुण्यातील नामवंत आयटी कंपन्यांचे ऑफिसचे फर्निचर व इतर इंटेरियर डिझाईनचे काम या कंपनीतर्फे केले जाते. अत्यंत हलाखीतून कष्ट करून ही कंपनी त्यांनी उभी केली आहे. या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून उमेश सुतार काम करतात. त्यांचे लहान बंधू समीर हेही याच कंपनीमध्ये काम करतात. समीरची पत्नी प्रियांका (वय वर्ष ३०) यांना दोन वर्षांपासून जट तयार झाली होती. या जटेमुळे त्यांना खूप त्रास होत होता. उद्योजक नामदेव सुतार हे जरी मालक असले तरी, त्यांचे संबंध केवळ नोकर-मालक असे नव्हते. त्यांचे उमेश व समीर यांच्याशी चांगले कौटुंबिक संबंधही होते. त्यामुळे उद्योजक नामदेव सुतार यांच्याशी बोलताना समीरने आपली पत्नी प्रियांकाच्या जटेबद्दल आणि त्यातून होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले.
प्रियांका सुतार यांना दोन वर्षांपासून जटेमुळे खूप त्रास होत होता. सरळ झोपता येत नव्हते. जटेच्या भारामुळे शारीरिक त्रास होत होता. पुण्यासारख्या शहरात वावरताना तसेच मुलांच्या शाळेत पालक मिटींगला जाणेसुद्धा लाजिरवाणे वाटत होते. त्यामुळे त्याही जटा काढून घ्यावयाच्या मानसिकतेत आल्या होत्या; पण एकीकडे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला एक प्रकारचे दडपण जाणवत होते आणि दुसरीकडे आपल्या पत्नीला होत असलेला त्रासही त्यांना जाणवत होता; पण यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना सुचत नव्हते; पण नामदेव सुतार यांच्याशी चर्चा केल्यानंतर नामदेव सुतार यांनी त्यांना मार्ग सुचविला.
नामदेव सुतार यांचे मूळ गाव नेसरी आणि त्यांची आपल्या गावाशी नाळ असल्यामुळे नेसरी येथे त्यांचे जाणे येणे असते. तसेच गडहिंग्लज भागातले असल्यामुळे जटेच्या प्रश्नाबद्दल जाणही होती. तसेच त्यांनी यापूर्वी नेसरी वाचन मंदिरामध्ये अनेक महिलांच्या जटा निर्मूलन केल्याचे ऐकले होते. त्यामुळे त्यांनी नेसरी येथील लोकमतचे पत्रकार रवींद्र हिडदुगी यांच्याशी संपर्क केला. यापूर्वी त्यांनी नेसरी वाचन मंदिरात अनेक महिलांचे जटा निर्मूलन केले होते. उद्योजक नामदेव सुतार यांनी रवींद्र हिडदुगी यांना प्रियांका सुतार यांच्या जटेबद्दल माहिती दिली. रवींद्र यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे व प्राध्यापक सुभाष कोरे यांच्याशी संपर्क केला. भोईटे व कोरे यांनी सर्व माहिती घेऊन व प्रियांका सुतार यांची व त्यांच्या कुटुंबीयांची संमती आहे याची खात्री झाल्यावर जटा निर्मूलन करण्याचा निर्णय घेतला. उद्योजक नामदेव सुतार यांनी प्रियांका सुतार यांच्या कुटुंबासह नेसरी येथील वाचन मंदिर गाढले.
तेथे प्रा. प्रकाश भोईटे व प्रा. सुभाष कोरे यांची प्रियांकाची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांचे प्रबोधन करून त्यांना कोणताही त्रास होणार नसल्याची ग्वाही देत त्याचे दडपण कमी केले. त्यानंतर माजी प्राचार्य सुरेश मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक भोईटे व प्राध्यापक कोरे यांनी त्यांच्या जटा कापून त्यांना जटामुक्त केले. जटा निर्मूलन केल्यानंतर प्रियांका सुतार यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “मला आता खूप चांगले वाटते आहे, माझ्या डोक्यावरील फार मोठे ओझे हलके झाले आहे असे वाटते आहे.” प्रियांका यांचा शिवलीला रवींद्र हिडदुगी, निर्मला सुतार, शीतल शिंदे यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार झाला. यावेळी नेसरी वाचन मंदिराचे कार्यवाहक वसंतराव पाटील आणि नेसरी शाखेचे अध्यक्ष सूर्यकांत देसाई, पा.ल.करंबळकर गुरुजी, अशोकराव मोहिते, टी.बी.कांबळे, एम.डी. रेडेकर, अमोल बागडी, चंद्रकांत संकपाळ, आप्पासाहेब कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
– प्रकाश भोईटे, गडहिंग्लज