प्रभाकर नानावटी -
काही नतद्रष्टांच्या भांडाफोड उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक बुवा-बाबा-महाराज-माँ-देवी इत्यादींना सक्तीने निवृत्त व्हावे लागत आहे. काही जण जेलची हवा खात आहेत. काही जण तोंड दाखवू नये म्हणून कुठे कुठे तरी लपून बसलेले आहेत. बहुतेकांची दुकानदारी बंद झालेले आहेत. अधेमधे लुडबुड करणारे दलाल, बाबा-बुवापर्यंत भक्तांना पोचविणार्या सोई-सुविधांचे सोय करणारे सेवेकरी, जीप-कार्सचे व्यावसायिक, हॉटेलचे मालक इत्यादींचा धंदा बसला आहे. तरीसुद्धा काही अनुभवी बुवा-बाबांना हा धंदा पुन्हा तेजीत येईल व बुवाबाजीला लागलेली उतरती कळा संपून चांगले दिवस येतील, असेही वाटत असेल.
आजकालच्या बेरोजगारीच्या काळात काही जण तरी या धंद्याकडे आकर्षित होतील असे वाटणार्यांमधील एका वृद्ध व अनुभवी बाबाने बुवाबाजी व्यवसायातील होतकरू तरुण-तरुणींसाठी एक पत्र लिहून बुवाबाजी व्यवसायात नेमके काय करावे याचे उपदेशपर मार्गदर्शन केले आहे. त्याच्या पत्रातील मजकूर असा आहे ः
तुम्ही इतर सर्व करिअर सोडून बुवाबाजीचे करिअर निवडल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हृत्पूर्वक अभिनंदन. ही तुमची निवड नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. तुमच्यातील अल्प बुद्धीला व नैतिकतेबद्दल अजिबात काळजी करायचे नाही. या मन:स्थितीला योग्य व त्याबरोबरच बकळ पैसा व प्रसिद्धी मिळवून देणारा हा व्यवसाय असून योग्य पावलं उचलल्यास तुमची नकीच भरभराटी होऊ शकेल.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या करिअरसाठी तुम्ही निवडलेली वेळ नकीच फलदायी ठरणार आहे. त्याबद्दलही मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी झालेले आहेत. सरकारी नोकर्या मिळवणे या जन्मी तरी शक्य होणार नाही. तिकडे अमेरिकेतील ट्रम्प महाशय आपल्या देशातील सायबर कुलींना हाकलून देत आहेत. रिकाम्या हातांना व डोक्यांना फक्त समाजमाध्यमांचा आधार आहे. परंतु त्यातून पोटं भरत नाहीत, याची जाणीव होत आहे. भडकलेली डोकी नको त्या उद्योगात पडत आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्यांचा बुवा-बाबांचा धंदा तेजीत चालण्याची शक्यता भरपूर आहे. कारण, तुम्हीच फक्त तुम्हीच त्यांच्या या दुस्थितीवर फुंकर घालत बेमालूमपणे, त्यांना कळू न देता, आपली पोळी भाजून घेऊ शकता. तुमचे शब्द झेलण्यासाठी लाखो भक्त तयार आहेत. त्यामुळे तुमचा भांडाफोड होईपर्यंत तुम्ही तुमच्या करिअरच्या उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचलेला असाल. नंतर काय होणार आहे, याची काळजी आताच कशाला?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मदतीला व दिमतीला ‘विश्वगुरु’ची साथ सदैव असेल. जरी विश्वगुरूची भाषा अत्याधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली वाटत असली, तरी त्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून समाजातील अंधश्रद्धांना खतपाणीच घालत आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यांच्या या कालखंडात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, याबद्दल दुमत नसावे. त्यांचे देवळात जाणे, लहान-मोठ्या देवळांचे उद्घाटन समारंभ करणे, ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारणे, पवित्र नद्यात-समुद्रात डुबकी मारणे, डुबकी मारताना अंगरक्षक (व व्हिडिओ शूटिंग करणारे) असतील याची खात्री करून घेणे, मोठमोठे धार्मिक समारंभ आयोजित करणे इत्यादीमुळे आमच्यासारख्या बाबा-बुवांची पत परत मिळविणे शक्य होत आहे. त्यांनी आयोजित केलेले कुठलेही समारंभ असो, आमच्यापैकीचे स्वामीजींची फौज कायम पडद्यावर दिसेल, याची ते काळजी घेतात. यावरून बाबा-बुवांना मरण नाही हेच सिद्ध होते.
शेवटी करिअर म्हणून हा दैवी उद्योग स्वीकारल्यानंतर खाली उल्लेख केलेले काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचे करिअर लवकरात लवकर फळं देत राहील याबद्दल शंका नसावी. या करिअरची एक खासियत आहे. ती म्हणजे, यासाठी तुम्हाला NEET, JEE, CET असली कुठलीही प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका लीक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे. या पूर्वीचे सर्व बाबा-बुवा आपापल्या ठिकाणी हेच करत आलेले आहेत व बहुतेक सर्वांनी अजिबात विचार न करता माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, हा एकमेव मंत्र घोकत आलेले आहेत. (ते तुमचे भक्त झालेत याचाच अर्थ ते डोक्याने बधिर आहेत यात शंका नसावी.)
तुम्हालासुद्धा आपले ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी काही बझवर्डस् व काही वाक्यं, तुमचाच असा वाटणारा व सगळ्यांचे लक्ष वेधणारा रंग व पोषाख यावर लक्ष केंद्रित करावा लागेल. या करिअरमधील उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सामान्यांच्या मनामध्ये तुमचीच अशी एक अनोखी प्रतिमा उभी करावी लागेल. बुवाबाजीसुद्धा एक उद्योग असून इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे समाजात पाय रोवून उभे राहण्यासाठी सुरुवातीच्या काही काळासाठी तरी तुमच्या ब्रँडसाठी तुम्हाला प्रयत्नशील रहावे लागेल. एकदा तुमचा ब्रँड प्रस्थापित झाल्यानंतर तुम्हाला (दुसरा/दुसरी तुमच्यावर कुरघोडी करेपर्यंत) काळजी करण्याचे कारण नाही.
तुमच्या बोलण्याला व वागण्याला काही अर्थ असावा अशी अपेक्षाच कधी करू नये. जितकी निरर्थक बडबड वा हातवारे तितकी तुमच्या उद्योगाची चलती. अविवेकीपणावर श्रद्धा हेच तुमचे उद्दिष्ट. त्या श्रद्धेस तडा जाऊ नये असे कुठलेही भाष्य करू नये याची काळजी घ्यावी. गंभीर चेहर्याने मनाला येईल तसे बडबड करत राहणे वा असंबद्ध बोलणे याची भरपूर प्रॅटिस करावी. गंमत अशी आहे की असे काही करत राहिल्यास आमच्यासारखे वृद्ध बुवा-बाबासुद्धा तुमच्या या अफाट कर्तृत्वावर खूश राहतील व तुमचा हा (फसवणुकीचा) धंदा बिनधास्त चालू राहील. जर कुणी कुत्सितपणे तुमच्या या धंद्यात आड येत असल्यास साम-दाम-दंड-भेद वापरून त्याचा नायनाट करणे हे तुमच्या हातात असेल.
जितके जास्त वेळा तुम्ही सत्संगाचे प्रवचन करू शकाल तितकी तुमची प्रसिद्धी होत राहील. सम (अ) विचारी लोकांत मिसळणे तुमच्या प्रकृतीला नेहमीच चांगले. सत्संग हा आपलेपणाला बढावा देतो, त्यातून बिरादरी वाढते. तुमच्या भक्तांची चांगली ओळख होते व यानंतर तुम्हाला काय करावे याची दिशा मिळते. धीरगंभीर आवाज यासाठी कामी येईल. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व गुण नसले तरी चालतील, वतृत्व कला आत्मसात करा.
तुम्हाला गर्दीची भाषा कळायला हवी. गर्दीचे एक मानसशास्त्र असते. ज्या गोष्टी एकट्या-दुकट्याने करण्यास घाबरतात तेच गर्दीत असताना बिनधास्त करतात. त्यामुळे तुम्ही गर्दीकडून काय करून घेता येईल याचा अंदाज घेत आपला कार्यभाग उरकून घ्यावे.
तुमची भरपूर प्रसिद्धी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावे. सत्संगाच्या वेळी भरपूर फ्लडलाइट्स, उंचावरील आकर्षक सिंहासन, भोवती तरुण/(सुंदर) तरुणींचा गराडा, सतत व्हिडिओ कॅमेर्याची तुमच्यावर झोत इत्यादी गोष्टीमुळे झुंडीच्या झुंडी भक्तगण येत राहतील व तुमची प्रसिद्धी होत राहील.
सत्संगांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सर्व संबंधितांपर्यंत पोचविण्याची स्वतंत्र यंत्रणा तुमच्याकडे हवी. क्रेन्स वापरून रेकॉर्डिंग करणार्यांना नेमावे. गर्दीला हे सर्व हवे असते. टीव्ही चॅनेल्सवर तुमचे सत्संग (रोजच्या रोज) प्रसारित होत राहतील याची काळजी घ्यावी.
स्थानिक पातळीवरील प्रसारमाध्यमांशी, नोकरशाहीशी व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवणे हितावह ठरेल. गर्दीची गरज तुम्हाला जितकी हवी तेवढी या (मतांसाठी हपापलेल्या) राजकीय नेत्यांना व (टीआरपीच्या मागे धावणार्या) प्रसारमाध्यमांनाही हवी असते. त्यामुळे तुमचे लागेबांधे असल्यास अडचणीच्या वेळी त्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो.
चमत्कार व भीती हे दोन्ही चांगल्यापैकी विकाऊ आहेत हे लक्षात असू दे. भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडणार हे गाजर कायम दाखवत रहावे. मग ते गाजर मोक्षप्राप्तीची असो की मनःशांतीची असो की, एखादी दुःखद घटना विसरण्याची असो. त्याचप्रमाणे भीतीच्या टांगत्या तलवारीचीसुद्धा भक्तांना कल्पना देत रहावे. ‘मी सांगतो त्याप्रमाणे न केल्यास काही तरी वाईट घडेल’, असे कायम घोकत रहावे. त्यामुळे काही तरी वाईट घडल्यास आपलेच काही तरी चुकले असावे. म्हणून ते स्वतःला दोष देत राहतील व चांगले काही तरी झाल्यास त्याचे क्रेडिट तुम्हाला मिळेल.
अति सामान्य (गरीब, वंचित इ.इ.) जनतेच्या खिजगणतीत आपण असता कामा नये. पहिल्यांदा तुमचे जे काही आहे ते सर्व श्रीमंत भक्तांसाठी असू दे. बाकीचे नंतर आपोआप तुमच्यामागे येतील. श्रीमंत भक्त तुमच्यासाठी राजमहालवजा आश्रम बांधून देतील. दर्शनासाठी वेगळा हॉल त्यात असेल. (यातूनच त्यांचा सामाजिक स्तर उंचावेल.) त्यांच्याच मर्सीडिज वा BMW मधूनच जास्तीत जास्त प्रवास करणे उचित ठरेल. एकदा तुमच्याकडे बकळ पैसा आल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची असल्याच प्रकारची गाडी घेऊ शकता. श्रीमंतांनाच तुम्हाला मोठी देणगी द्यावीशी वाटेल. कारण करचुकवेगिरी केलेला हरामाचाच पैसा ते तुम्हाला देतात. त्यामुळे यात कुठलीही नीतिमूल्यांचा प्रश्न येत नाही.
अजून भरपूर काही मला सांगायचे आहे. पुन्हा केव्हा तरी (गरज भासल्यास) मी सांगेन.
तुमच्या करिअरसाठी शुभकामनायें…
