वाघेश साळुंखे -
जानेवारी २०२२. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र सरकारने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा ‘ऑफलाइन’ घेण्याचे ठरवले होते. या विरोधात ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला. “विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला आहे, तर परीक्षा ऑफलाइन का?” असा सवाल करत त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. ३१ जानेवारी २०२२ रोजी हिंदुस्थानी भाऊच्या या व्हिडिओमुळे मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे हजारो अल्पवयीन विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण लागले. नागपूरमध्ये संतप्त जमावाने बसेस आणि गाड्यांच्या काचा फोडल्या. मुंबईत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला. धारावी पोलिसांनी १ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंदुस्थानी भाऊला अटक केली. त्याच्यावर दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि कोविड नियमांचे उल्लंघन करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा लोकांवर किती प्रभाव असू शकतो हे दाखवणारी ही घटना आहे. ही काही एकमेव घटना नाही. अशा अनेक घटना जगभरात घडल्या आहेत. दिनचर्येत बदल करण्यापासून आयुष्यातील मोठे निर्णय घेण्यापर्यंत अनेक गोष्टी या इन्फ्लुएन्सर्सच्या सांगण्यानुसार करणारे लोक आहेत. एके काळी समाजावर केवळ सेलिब्रिटी लोकांचा प्रभाव असायचा. त्यात आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भर पडली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपेक्षा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव जास्त आहे. कारण, हे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. म्हणून आता बॉलीवूड किंवा इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय राहायला सुरुवात केली आहे. आता ते सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स झाले आहेत. जनमानसावर इतका प्रभाव असणार्या इन्फ्लुएन्सर्सचा जाहिरातींसाठी फायदा घेतला गेला नाही तरच नवल! उद्योग जगताने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या लोकांचा पद्धतशीरपणे उपयोग करून घ्यायला सुरुवात केली. प्रस्थापित सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिराती या थेटपणे ‘जाहिरात’ या प्रकारात मोडतात. लोकांना ती जाहिरात आहे, हे समजते. पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी केलेल्या बहुतांश जाहिराती या जाहिराती आहेत हे समजतच नाही. उदा. आर्थिक विषयांची माहिती देणारा इन्फ्लुएन्सर एखाद्या म्युच्युअल फंड किंवा शेअरची महती सांगतो; तेव्हा ती जाहिरात असेल असे कोणाला वाटतही नाही. लोक त्याला त्याचे खरे विश्लेषणच मानतात. इथेच खरा धोका आहे. अनेकदा ‘पेनी स्टॉक्स’ (कमी किमतीचे शेअर्स) मध्ये इन्फ्लुएन्सरने सांगितल्यामुळे हजारो लोकांनी पैसे गुंतवले आणि नंतर त्यांचे नुकसान झाले, अशीही उदाहरणे आहेत. (याला ‘पंप अँड डंप’ असे म्हटले जाते.) एखादा इन्फ्लुएन्सर एखाद्या हॉटेलमध्ये उतरतो आणि तिथले जेवण अतिशय छान आहे असे त्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो, हे योगायोगाने घडलेले नसते. ती पेड अॅडव्हर्टाइजमेंट असते. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन तेथील अॅक्टिव्हिटीजचा व्हिडिओ बनवणे हे सुद्धा पेड प्रमोशन असू शकते. इन्फ्लुएन्सरने ठरावीक ब्रँडचे कपडे घालून व्हिडिओ बनवणे हे सुद्धा पेड प्रमोशन असते. पण लोकांना मात्र या गोष्टी सहज झाल्या आहेत असे वाटते. आणि मग ते इन्फ्लुएन्सरचे अनुकरण करू लागतात. तो सांगेल ते ऐकतात, तो सांगेल तसे करतात.
एवढे सगळे असताना अंधश्रद्धा आणि अध्यात्माचा धंदा करणारे लोक तरी कसे मागे राहतील? त्यांनीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा पुरेपूर वापर सुरू केला आहे. अनेक देवस्थानांच्या व्यवस्थापनांनी अशा इन्फ्लुएन्सर्सना आपल्या देवस्थानाला भेट देण्यासाठी निमंत्रित करून त्यांच्याकडून आपल्या देवस्थानाची जाहिरात करून घेतली आहे. त्या भेटीचे फोटो, व्हिडिओ, रील्स, व्लॉग्ज (vlogs) यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन देवस्थानाची जाहिरात केली जाते. ते इन्फ्लुएन्सर्स सुद्धा देवस्थानामधील आरती, ध्यानधारणा किंवा आश्रमातील शांतता यांचे अतिशय सुंदर, सिनेमॅटिक व्हिडिओ (Cinematic Reels) बनवतात. यामुळे तरुणांना वाटते की तिथे जाणे म्हणजे एक ‘लक्झरी’ किंवा ‘पीसफुल’ अनुभव आहे. याचा परिणाम म्हणजे संबंधित देवस्थानांवर पर्यटकांची भरपूर गर्दी वाढली. गर्दी वाढवण्याचा हा फॉर्म्युला सर्वच धर्माच्या देवस्थानांनी वापरलेला दिसून येतो. यात देवस्थानांबरोबर बाबा-बुवांचे आश्रमही आघाडीवर आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनचे देता येईल. त्यांचे सोशल मीडिया मार्केटिंग इतके जबरदस्त आहे की, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. सध्या आपण त्यांच्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगबद्दल बोलू. विल स्मिथ, ट्रेव्हर नोआ, लोगन पॉल, माईक टायसन, मॅथ्यू हेडन, जो रोगन इत्यादी मोठ्या इन्फ्लुएन्सर्सनी जग्गी वासुदेव यांच्या लोकप्रियतेत भर घालण्यास मदत केली आहे. इन्फ्लुएन्सर्सना मुलाखती देणे (पॉडकास्टबाबतचा ‘अंनिवा’च्या मे २०२६ च्या अंकातील लेख जरूर वाचा), त्यांच्या भेटी घेणे, त्यांना भेटायला बोलावणे, त्यांना आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि या सगळ्यांचे फोटो, व्हिडिओ यांना अमाप प्रसिद्धी देणे यांतून त्यांनी स्वतःला ‘ग्लोबल गुरु’ बनवले आहे. याशिवाय रणवीर अल्लाहबादिया, तन्मय भट, कामिया जानी, निखिल शर्मा, प्राजक्ता कोळी अशा भारतीय इन्फ्लुएन्सर्सचा पण पुरेपूर वापर करून घेतला आहे. ईशा फाउंडेशनमध्ये ‘Ishangam’ नावाची एक विशेष टीम आहे, ज्यांचे कामच मुळात नवीन ट्रेंडिंग इन्फ्लुएन्सर्स शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आश्रमात बोलावणे हे आहे. याच पद्धतीने श्री. श्री. रविशंकर, प्रेमानंद महाराज, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, बी. के. शिवानी (प्रजापिता ब्रह्माकुमारी) अशा अनेकांनी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा उपयोग केलेला आहे. या मोठमोठ्या देवस्थान आणि बाबा-बुवांचाच कित्ता छोटी-छोटी देवस्थाने आणि बाबा-बुवा गिरवतात. या देवस्थानांवर आणि बाबा-बुवांच्या आश्रमातील वाढती गर्दी हा मार्केटिंगचा परिणाम आहे. आध्यात्मिक शक्तीचा नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स केवळ देवस्थाने आणि बाबा-बुवांचेच मार्केटिंग करतात असे नव्हे; तर अंधश्रद्धेच्या इतर अनेक प्रकारांचेही मार्केटिंग ते करतात. ज्योतिष अॅप्स, ऑनलाइन पूजा अॅप्स, वास्तुशास्त्री, धार्मिक सोहळे अशा अनेक गोष्टींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिराती हे लोक पैसे घेऊन करत असतात. Sponsor Radar या पोर्टलने अशा ज्योतिष, पूजा आणि चढावा अॅप्सनी इन्फ्लुएन्सर्ससोबत केलेल्या स्पॉन्सरशिपचा डेटाच दिला आहे.
इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमध्ये प्रत्येक वेळी पैसेच दिले जातात असे नाही. काही वेळा ते कोलॅबोरेशन सुद्धा असते. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही माझा धंदा वाढवून द्या, मी तुमचा धंदा वाढवून देतो, असा हा व्यवहार असतो. माझे फॉलोअर्स तुम्हाला फॉलो करतील आणि तुमचे फॉलोअर्स मला फॉलो करतील. अशा पद्धतीने दोघांचेही फॉलोअर्स आणि धंदा वाढेल, असा हा अलिखित करार असतो. मोबदला देण्याच्या याशिवायही इतर अनेक पद्धती असतात.
एवढे सगळे वाचून झाल्यानंतर एका प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे अशक्य ते शक्य करण्याचा दावा करणार्या एका बाबाचे कौतुक करणारे सेलिब्रिटी अचानक कसे वाढले असतील?
– वाघेश साळुंखे
