व्यसनमुक्ती आणि महात्मा फुले

अनिल चव्हाण -

आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या बहुसंख्य सामाजिक चळवळीची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांनी केली आहे. किमान त्या विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे.

दारूबंदी आंदोलन त्याला अपवाद नाही. १८५२ साली सातार्‍यातील लोकांनी दारूच्या भट्ट्या आणि गुत्ते नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे अर्ज केला होता.

सी. डब्ल्यू. बेल या सरकारी अधिकार्‍यांनी १८६९ साली मुंबई सरकारच्या अबकारी धोरणासंबंधी सरकारला एक पत्र सादर केले होते. त्यांनी असे म्हटले होते की, “पेशव्यांच्या राजवटीतील शेवटच्या काळात दारूचे व्यसन वाढले होते. त्यापासून उत्पन्न होणारा करही चढता होता. त्यासंबंधी गुन्हेगाराला कडक शिक्षा ठेवल्या होत्या”.

ब्रिटिशपूर्व भारतात दारूला प्रतिष्ठा नव्हती. दोन-चार गावांमध्ये मिळून एखादी व्यक्ती दारू गाळत असे. त्याला ‘कलाल’ असे म्हणत.

पुराण ग्रंथांमध्ये  दारूचा उल्लेख आहे. दारूला अनेक पर्यायी शब्द आहेत. म्हणजे प्राचीन काळापासून दारूची माहिती भारतीयांना आहे. 

ब्रिटिशांनी त्याला प्रतिष्ठा दिली आणि दारूची दुकाने उघडण्यास प्रोत्साहन दिले. पुणे शहरात १८७६-७७ पर्यंत दारूचे चार गुत्ते होते. १८७७-७८ पासून सहा दारूगुत्ते वाढविल्यामुळे त्यांची संख्या १० झाली. दरवर्षी वाढत्या किमतीला गुत्याचा  लिलाव काढला जाई. त्यामुळे दारू दुकानदारही दारूच्या प्रचारासाठी झटत असत.

१८८० साली दारूचा प्रसार वाढवण्या विरोधात महात्मा जोतिबा फुले यांनी पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी सखोल विचार मांडले आहेत.

१) लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी नगरपालिका खास कर्मचारी नेमून प्रयत्न करते.

दारूगुत्त्यामुळे या प्रयत्नाला बाधा येते. लोक व्यसनी बनले तर आरोग्य सांभाळलं जाणार नाही.

२) दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे. दारूमुळे अनेक कुटुंबांचा नाश झाला आहे.

३) दारूमुळे जी हानी होते ती भरून काढण्यासाठी गुत्त्यावर नगरपालिकेने कर बसवावा.

महात्मा फुलेंनी पाठवलेले, मद्यपानगृहांच्या वाढीस विरोध दर्शविणारे पत्र पुढीलप्रमाणे आहे.

“नगरपालिकेने बराच पैसा खर्च करून लोकांचे आरोग्य सांभाळण्याच्या उद्देशाने बराच मोठा नोकरवर्ग नेमला आहे. लोकांचे आरोग्य सांभाळण्याचे दृष्टीने तसे एक खातेसुद्धा ती चालवीत आहे. तथापि, ज्या पुणे शहराला दारूचे गुत्ते परिचित नव्हते, त्यात आता भरवस्तीत दारूचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अधःपाताची सर्व बिजे पेरली जात आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे, हा जो नगरपालिकेचा एक उद्देश आहे. त्याला बाधा येत आहे.”

दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे; एवढेच नव्हे, तर त्यांच्या आरोग्यालाही अतिशय अपायकारक आहे, हे माझे म्हणणे बहुतेक लोक आपखुषीने मान्य करतील. दारूचे गुत्ते शहरात उघडल्यापासून दारूबाजी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की, त्यामुळे अनेक कुटुंबांचा संपूर्ण नाश झाला आहे. आणि ह्या दुर्गुणाला आता शहरात सराईतपणा आला आहे.

“या व्यसनाच्या प्रसाराला काही प्रमाणात तरी आळा बसावा म्हणून मी नगरपालिकेला अशी सूचना करतो की, नगरपालिकेने या दारूगुत्त्यांवर, ते ज्या प्रमाणात हानी करतात, त्या प्रमाणात कर बसवावा. मला असे कळते की, कुठल्याही नगरपालिकेने अशा गुत्त्यांवर कर बसविलेला नाही; मात्र त्यांच्यावर मध्यवर्ती सरकारचा कर असतो. या बाबतीत आवश्यक तर नगरपालिकेने चौकशी करावी. माझा हा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्यास मी आपला आभारी होईन.”

धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा जोतिराव फुले यांच्या चरित्र ग्रंथांमध्ये वरील पत्र पाहायला मिळते.

या महत्त्वाच्या विषयाला हात घातल्यामुळे शहरात सर्वत्र महात्मा फुलेंची प्रशंसा झाली.

मूळ पत्र नगरपालिकेचे अध्यक्ष रिचे यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी ते अभिप्रायासाठी हेन्री डिसन या अबकारी अधिकार्‍याकडे पाठवले. त्यांनी दारू गुत्ते वाढवण्याचे कारण चोरट्या दारूचा सुळसुळाट हे दिले आहे. “चोरटी दारू आरोग्याला अपायकारक आहे. तिला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी नवे परवाने दिले आहेत. सोयीच्या  ठिकाणी दारूचे गुत्ते उघडून दारू जेवढी उघडपणे खपेल, तेवढी चोरटी गावठी दारू, अशुद्ध दारू, संपेल.”

दारू दुकानावर कर वाढवण्याचा अधिकार नगरपालिकेला नाही. पण या निमित्ताने वाढत्या व्यसनाचा प्रश्न चर्चेत आला. पुढच्या काळातील सर्व देशभक्तांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दारूबंदीचा पुरस्कार केला आहे.

लोकमान्य टिळक यांच्या काळात दारू दुकानासमोर पिकेटिंग करण्यात येत असे. शांतपणे पिकेटिंग करणार्‍या सत्याग्रहींवर ब्रिटिश पोलीस लाठ्या चालवत, सत्याग्रहींवर खोट्या केसेस घालत.

महात्मा गांधींनी नशाबंदी आंदोलन चालवले. महात्मा गांधींची शपथ घालून अनेकांची दारू सोडवली जाई.

१९२२ साली उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे सत्याग्रहींनी, पोलीस चौकी जाळल्यामुळे महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन मागे घेतले. तो रात्री निघालेला शांततापूर्ण मोर्चा दारू दुकानावर होता. पोलिसांनी त्यावर अमानुष लाठीमार केल्यामुळे चिडलेल्या सत्याग्रहींनी २२  पोलिसांना जिवंत जाळले.

स्वातंत्र्य चळवळीत दारूबंदीला विशेष महत्त्व होते.

ब्रिटिश दारूचा प्रचार का करतात याचे कारण सर्व देशभक्त मंडळींनी दिलेले आहे. १) दारू विक्रीतून शासनाला प्रचंड अबकारी कर मिळतो.

२) दुसरे अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे, नागरिकांना व्यसनाधीन बनवल्यामुळे ते अन्यायाविरोधात आवाज उठवत नाहीत. त्यांच्यावर राज्य करणे सोपे असते.

आजही दारूमुळे लाखो संसार उद्ध्वस्त होतात; लहान मुलांचे भविष्य अंधारात जाते. रोग, आजार आणि अपघात यात हजारो लोक जायबंदी होतात, मरतात. खून, मारामार्‍या, बलात्कार, असे गुन्हे करणारे बहुसंख्य गुन्हेगार दारूच्या नशेत असतात. तरीही सरकार दारू दुकानांना परवानगी देते. त्याच्या मागे पूर्वीचीच दोन कारणे आहेत.

१) सरकारला प्रचंड अबकारी कर मिळतो. २) आणि महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पोलिसी राज्य अशा समस्यांच्या विरोधात लोक उठत नाहीत.

अंधश्रद्धा, जातीय आणि धार्मिक दंगली, यांच्याबरोबरच व्यसन हे सुद्धा सत्ताधार्‍यांचे राज्य करण्याचे हत्यार आहे. जनप्रबोधन हाच त्यावरचा उपाय!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व्यसनमुक्ती आंदोलन चालवते. ३१ डिसेंबर रोजी “चला व्यसनाला बदनाम करू या” असे म्हणत दारूच्या बाटलीला जाहीरपणे चप्पल मारण्याचा कार्यक्रम घेते. “दारू नको, दूध प्या” असा संदेश देण्यासाठी, ३१ डिसेंबर रोजी प्रतीकात्मक दूध वाटप केले जाते. महात्मा फुलेंच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे.

-अनिल चव्हाण
संपर्क : ९७६४१४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]