अॅड. अजित चव्हाण -
स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी तारा
स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी तारा, म्हणजे कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील
नाना पाटील म्हटलं की आठवते ते प्रतिसरकार! सावकारांना आणि देशद्रोह्यांना पत्री मारल्यामुळे ते पत्री सरकार म्हणून प्रसिद्ध झालं! भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास क्रांती सिंहाच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या शौर्याच्या, धैर्याच्या, धाडसाच्या, आणि युक्तीच्या अनेक कथा, गावोगाव ऐकायला मिळत होत्या! देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून पुन्हा आंदोलने सुरू केली. ते शेतकर्यांचे मोठे नेते बनले! खासदार बनले! लोकसभेमध्ये जाऊन मराठी भाषण करणारे ते पहिले खासदार होते! कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी बनले! त्यांच्या चरित्राचे असे अनेक पैलू आजपर्यंतच्या चरित्र लेखकांनी मांडलेले आहेत; पण आपल्याला ठाऊक आहे का, ते राजकीय नेत्याप्रमाणेच सामाजिक क्रांतिकारक होते! व्यसनमुक्ती, स्त्री मुक्ती, जातिभेद निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, अशा सर्व चळवळींना त्यांनी गती दिली आहे. त्यांचे कार्य आणि विचार शब्दबद्ध केले आहेत अॅडव्होकेट सुभाष पाटील यांनी.
एखादी व्यक्ती एका क्षेत्रात खूप पुढे गेली तर त्या क्षेत्राबद्दल चर्चा खूप होते आणि इतर क्षेत्रासंबंधी त्यांची मते काय आहेत, कार्य काय आहे, ते विस्मृतीत जाते. कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बाबतीत सुद्धा असेच झालेले आहे! राजकीय कार्यकर्ते नेते म्हणून ते इतके मोठे झाले की त्यांचे सामाजिक विचार कोणी विचारात घेत नाही. त्यांच्या बहुतेक चरित्रकारांनी त्यांच्या राजकीय चळवळीबद्दल त्यांच्या क्रांतिकारक विचाराबद्दल लिखाण केले आहे. पण ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्यकर्ते होते, हे त्यात झाकून जाते. त्यांच्या नेमक्या या कार्याबद्दल लेखकाने या पुस्तिकेत माहिती दिली आहे.
अॅड. सुभाष पाटील
अॅड. सुभाष पाटील यांनी सामाजिक विचार जोपासलेला आहे. हा वारसा त्यांना त्यांच्या आजोबांच्या कडून मिळालेला आहे, वडिलांच्या कडून मिळालेला आहे. क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील व क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील यांचे ते चिरंजीव. हौसाताई पाटील म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कन्या.
आपले विचार त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून प्रासंगिक लेखन करून सांगितले आहेत. पुस्तके लिहिली आहेत. ग्रंथांचे संपादन केले आहे आणि दुष्काळी जनतेला न्याय मिळावा तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून रस्त्यावरच्या संघर्षातही उतरले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते जात निर्मूलनापर्यंत आढावा
अंधश्रद्धा निर्मूलक क्रांतिसिंह नाना पाटील या पुस्तकात लेखकाने नाना पाटलांच्या अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते जात निर्मूलनापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. नाना पाटील हे केवळ बोलके सुधारक नव्हते; तर कर्ते सुधारक होते. याची अनेक उदाहरणे लेखकाने दिली आहेत. नाना पाटलांनी स्वतःचे लग्न कोणत्याही पुरोहिताच्या मध्यस्थीशिवाय स्वतः लावून घेतले. स्वतःच्या लग्नात नवरा मुलगा मंगलाष्टके म्हणतोय, ही घटना भारताच्या इतिहासात एकमेव असावी. त्यांनी स्वतःचे लग्न स्वतः मंगलाष्टका म्हणून साध्या पद्धतीने आणि हुंडा न घेता केले. पण त्याशिवाय अशी साधेपणाने लग्न लावण्याची चळवळ सुरू केली. त्याला त्यांनी गांधी लग्न पद्धती नाव दिले.
ते महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पाईक होते. महात्मा फुले यांनी समाजातील दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, पिळवणूक, अन्याय, पाहिले. यावरचा उपायही शोधला. तो म्हणजे लोकांना शहाणं करणे. लोकांना शहाण करण्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, लेख लिहिले, पुस्तके ग्रंथ लिहिले, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, खर्या धर्माचा रस्ता दाखवला. त्यांच्या मते बहुजन समाजाचे दोन शत्रू आहेत; एक शेठजी आणि दुसरा भटजी. याच दोन शत्रूंच्या विरोधात नाना पाटलांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सत्यशोधक जलसे, समाज प्रबोधनाचे काम करीत. यामध्ये कासेगाव, काले, भिलवडी, अंकलखोप येथील जलसे प्रसिद्ध होते. क्रांतिसिंह नाना पाटील गावोगावी फिरवून या सत्यशोधक जलशांच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असत.
जातीभेदाचे चटके आजसुद्धा गावातील सर्वसामान्य दलितापासून ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या राष्ट्रपती व्यक्तीपर्यंत सर्वांना बसत आहेत. १०० वर्षांपूर्वीपर्यंत तर परिस्थिती भयानकच होती. नाना पाटलांनी त्या काळात जातीभेद निर्मूलनाचे प्रयत्न केले. या माणसांना नाना पाटील आपल्याबरोबर पंगतीला घेत, आणि सर्वांसाठी वापरलेल्या ताटवाट्यातंच त्यांना जेवायला वाढत.
स्त्रियांनी शिकावं म्हणून त्यांनी अनेक गावांमध्ये रात्रीच्या प्रौढ शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या; पण त्याबरोबर पहिल्यांदा आपल्या पत्नीला साक्षर केले. त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले पण त्यांनी त्याकाळच्या प्रथेप्रमाणे दुसरे लग्न करायला नकार दिला. त्यांच्या जीवनातील अंकलखोपच्या म्हसोबाचे डोळे काढण्याची घटना प्रसिद्ध आहे. लोकांच्या मधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी असे क्रांतीकारक प्रयत्न त्यांनी केले. समाज व्यसनमुक्त व्हावा म्हणूनही नाना पाटलांनी प्रयत्न केले. दारू, अफू, गांजा, जुगार, या व्यसनाबरोबरच चहा, मिश्री, तंबाखू, दातवन, तपकीर अशा व्यसनाविरोधात सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून प्रचार केला.
अशा अनेक घटनांची तपशीलवार माहिती लेखकांनी या पुस्तकात दिलेली आहे. त्यातून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. बहुजन समाजाचा हा वारसा जपून ठेवायचा असेल तर नाना पाटलांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अशी पुस्तके पुन्हा पुन्हा छापली पाहिजेत आणि वाचकापर्यंत पोहोचवली पाहिजेत. नाहीतर हे धन काळाच्या पडद्याआड नाहीसे होण्याचा धोका आहे.
हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशनाची निवड केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हा अंक गेली ३५ वर्षे यशस्वीपणे चालवत आहे. पण त्याबरोबर संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन संबंधित विचार, सामाजिक कार्यकर्त्यांचे, राजकीय कार्यकर्त्यांचे, साहित्यिकांचे, अंधश्रद्धा निर्मूलन संबंधीचे विचार, छोट्या छोट्या पुस्तकांच्या स्वरूपात प्रसिद्ध करत आहेत. किशोरवयीन मुलासाठीही त्यांनी पुस्तके प्रसिद्ध केली.
अशा विविध मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार ती लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत. या फुलांच्या हारामध्ये आता हे एक नवीन फुल त्यांनी गुंफले आहे.
उत्कृष्ट छपाई आणि सुयोग्य मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केवळ पन्नास रुपयांत उपलब्ध करून दिले आहे.
आता ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपले आहे! ते आपण करूया!
–अॅड. अजित चव्हाण, कोल्हापूर
संपर्क : ९८२२८ ४९५५४
