डॉ. प्रसन्न दाभोलकर -
पुढच्या बुधवारी वर्गात उत्साहाचे आणि कुतुहलाचे वातावरण होते. ‘मुक्त प्रश्न’ म्हणजे काय हे अजून आम्हाला नीट समजले नव्हते. आणि प्रश्न विचारायला एवढे महत्त्व तरी कशाला द्यायचे, हाच मुळात एक मोठा प्रश्न आमच्यासमोर होता.
देशमुख सर वर्गात आले आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. आमच्याकडे बघत ते म्हणाले, “हं, विचारा प्रश्न.” स्थिर नजरेने आमच्याकडे बघत ते गप्प बसून राहिले. वर्गात शांतता.
शेवटी आमचा मॉनिटर सर्वेश याने विचारले, “सर, आमच्या नीट लक्षात येत नाही की ‘मुक्त प्रश्न’ म्हणजे काय? ते का विचारायचे?”
त्याच्याकडे कौतुकाने बघत सर म्हणाले, “छान. मुक्त प्रश्न म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न तू विचारलास. ‘मुक्त प्रश्ना’च्या तासात आपण नेमकं काय करणार, मुक्त प्रश्न कशासाठी हे आपण एकमेकांना प्रश्न विचारून समजावून घेऊ. चालेल?”
“हो सर, चालेल काय पळेल.” खोडकर मिहीर म्हणाला.
“प्रश्न म्हणजे काय हे आपण परवा थोडक्यात बघितलं होतं. ते आज सविस्तर समजावून घेऊ. ‘मुक्त प्रश्न’ म्हणजे काय?” सर स्वतःशीच बोलत आहेत असे वाटत होते.
किंचित थांबून सर पुढे बोलू लागले. “मुक्त प्रश्न म्हणजे, आपल्या मनात येतो तो कोणताही प्रश्न. तो बिनधास्त विचारायचा. मागच्या वेळी मृदुला म्हणाली की तिला प्रश्न विचारायला लाज वाटते. आपण सगळे अनेक कारणांनी प्रश्न विचारायला घाबरतो. आपलं अज्ञान उघडं पडेल, समोरचा आपल्याला हसेल अशी अनेक कारणे असतातच; पण आपल्याला नेमके प्रश्नच पडत नाहीत हेच सर्वांत महत्त्वाचं कारण असतं. त्यासाठीच हा मुक्त प्रश्नांचा तास. जे आपल्याला विचारावं असं वाटतं ते विचारायचं, न घाबरता. मनाला सतत प्रश्न पडण्याची सवय लावायची.”
“पण सर, तुम्ही विज्ञान शिकवणार आहात. विज्ञानाचा आणि प्रश्न विचारण्याचा काय संबंध?” अभ्यासू असल्याने इतर गोष्टीत अजिबात लक्ष न घालणार्या सुबुद्धीने विचारले.
त्याच्यावर अजिबात न रागावता सर म्हणाले, “अगदी बरोबर. असंच आपल्याला जे वाटतं ते मोकळेपणानं विचारायचं. कोणतंही दडपण मनावर येऊ न देता.
प्रश्नांचा आणि विज्ञानाचा अगदी घट्ट संबंध आहे. कोणतेही दडपण न घेता प्रश्न विचारण्यातूनच विज्ञानाची सुरुवात होते आणि विज्ञानाचा विकास होतो. पूर्वीच्या काळी जहाजातून युरोपला जात असताना रामन यांना ‘आकाशाचा रंग निळा का असा’ प्रश्न पडला? आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी केलेल्या संशोधनातून पुढे त्यांना जगप्रसिद्ध नोबेल प्राईज मिळाले.”
“सर एक विचारू?” असे विचारून न थांबताच आमच्या वर्गातील इतिहासप्रेमी अशोक याने बिनधास्त विचारले, “सर, मला विज्ञान आवडत नाही. मी इतिहासात रमतो. प्रश्न विचारण्याचा मला काय उपयोग? इतिहास तर आधीच घडून गेला असतो.”
“शाब्बास!” सर आनंदाने उद्गारले. “असेच प्रश्न पडले पाहिजेत. मी किंवा इतर कोणी सांगितलं म्हणून कोणतीही गोष्ट मानायची नाही. प्रश्न विचारून, तपास करून मगच ती योग्य वाटली तर स्वीकारायची. अरे, इतिहासात तर अनेक प्रश्न असतात. आपल्या ओळखीचे प्रश्न म्हणजे, शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख कोणती? तसंच शिवाजी महाराजांचं मोठेपण नेमकं कशात आहे?”
सर पुढे बोलू लागले, “मुक्त प्रश्न विचारायची सवय मनाला लावली की असे अनेक नवनवीन प्रश्न आपल्या मनाला सतावतात. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपलं मन धडपडू लागतं. त्यातूनच सर्व विषयांचं ज्ञान वाढतं.”
“तरी पण सर, मराठी भाषेचा आणि अशा प्रश्नांचा काय संबंध?” मराठीप्रेमी मेधाने विचारलेच.
“असं बघ मेधा, मराठी भाषा नेमकी कशी निर्माण झाली, तिच्यात नवनवीन शब्द कोणत्या भाषेतून आले, त्यांचे अर्थ कसे बदलत गेले, मराठी भाषेचे व्याकरण आणि शुद्धलेखन यांचे नियम कसे ठरवायचे, मराठीच्या बोलीभाषा कोणत्या असे असंख्य प्रश्न आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. मराठी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता द्यायची की नाही, कोकणी ही मराठीची बोलीभाषा आहे की स्वतंत्र भाषा आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मराठीच्या अभ्यासकालाही स्वतःलाच खूप प्रश्न विचारावे लागतात आणि त्यांची उत्तरं शोधावी लागतात.”
आमच्या वर्गातील चित्रकार चैत्रालीने कधी नव्हे ते धीटपणे उभे राहून विचारले, “मी ड्रॉइंगच्या टीचरना विचारले, ‘चित्र काढताना आणि रंगवताना ‘वरून खाली’ आणि ‘डावीकडून उजवीकडे’ असंच का करायचं’? त्यांनी उत्तरच दिलं नाही. उलट ते मलाच रागावले. सांगितलं तसं करायचं म्हणाले.”
“ए, काहीतरीच काय विचारतेस?” शेजारच्या मुलीने तिला दाबले.
पण देशमुख सर उत्साहाने म्हणाले, “हा तर फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट आपण अमुक पद्धतीनंच का करतो, दुसर्या पद्धतीनं ती का करायची नाही हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ‘आपण ज्या पद्धतीनं वागतो तसंच का वागायचं’ असे प्रश्न विचारूनच मानवी संस्कृतीची प्रगती होत गेली. बरं मला सांगा, चैत्रालीच्या प्रश्नाचं उत्तर कोणाला येतं का? मला तर चित्रकलेतलं काही येत नाही.”
कल्पेश उभा राहून म्हणाला, “मलाही हा प्रश्न पडला होता. मी शोधलं त्याचं उत्तर. मी सरळ एक चित्र ‘खालून वर आणि उजवीकडून डावीकडे’ असं उलट्या पद्धतीनं काढलं आणि रंगवलं. मग माझ्या लक्षात आलं, असं केलं तर चित्र नीट काढता येत नाही. ते आपल्याच हातानं फिसकटून जायची शक्यता असते.”
त्याला मनापासून शाबासकी देत सर म्हणाले, “वा! छान! आपण अनेक गोष्टी करीत असतो. त्या तशाच का करायच्या असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्या मागची कारणं देखील आपल्याला शोधता आली पाहिजेत. करण्याच्या पद्धतीत काही बदल आवश्यक असेल तर तोही करता आला पाहिजे.”
सगळ्या वर्गाकडे एक नजर टाकून ते म्हणाले, “सुरुवातीला तुम्ही मला विचारलं की मुक्त प्रश्न का विचारायचे? त्याचं उत्तर इथं आहे. आपल्या ज्ञानात, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या कौशल्यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सतत प्रश्न पडले पाहिजेत. तुम्ही इतिहासात शिकला आहात की अंधार युगामध्ये युरोप जगाच्या मागे होता. धर्मग्रंथांविरुद्ध असलेले कोणतेही विचार करायला बंदी होती. त्याला विरोध करून तिथल्या शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारायला आणि प्रयोग करायला सुरुवात केली आणि मग युरोप जगाच्या पुढे गेला.”
इतिहासप्रेमी अशोक उत्स्फूर्तपणे बोलू लागला, “हो सर, ब्रुनो यांनी ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ असं सांगितल्यामुळं त्यांना जिवंत जाळण्यात आलं.”
“ते एक दुःखद सत्य आहे. ऐतिहासिक काळात अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रश्न विचारण्याचं, विचार करण्याचं, समाजाच्या वागण्यात योग्य ते बदल करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं. ते आपल्याला फुकट मिळालं असल्यामुळं आपल्याला त्याची किंमत कळत नाही. मोकळेपणानं विचार करण्याचं महत्त्व तुम्हाला कळावं हा देखील मुक्त प्रश्नांच्या तासाचा एक उद्देश आहे, बरं का.”
वेळ संपत आली होती. तासाचा समारोप करीत सर म्हणाले, “थोडक्यात काय, मुक्त प्रश्न म्हणजे कोणतंही दडपण न ठेवता मोकळेपणाने विचारायचे प्रश्न. त्यासाठी आपले दैनंदिन जीवन, आपला अभ्यास, आपलं वागणं, आपला समाज यांच्याकडं जागरूकतेनं बघत रहायचं. मग आपल्या मनात यांबाबत ‘का, कसे, कशासाठी’ असे प्रश्न येऊ लागतील. ते प्रश्न दडपून टाकायचे नाहीत. स्वतःला विचारायचे, इतरांना विचारायचे, त्यांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करायचा, आपल्याला बरोबर वाटणारं उत्तर बरोबर आहे की नाही यावरही विचार करायचा.
या तासाला काही बरोबर नाही, काही चूक नाही. कोणी शहाणा नाही, कोणी मूर्ख नाही. आपण सारेच विद्यार्थी आणि आपण सारेच शिक्षक. सगळ्यांनी मिळून प्रश्नांवर विचार करायचा, उत्तरं मिळवायचा प्रयत्न करायचा. असं करण्यातील आनंद घ्यायला आपण सर्वांनी शिकायचं आहे.”
डॉ. प्रसन्न दाभोलकर
लेखक संपर्क : prasannadabholkarpri@gmail.com