डॉ. नरेंद्र दाभोलकर -
प्रिय तरुण मित्र-मैत्रिणींनो,
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ याच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात.
शरद ऋतूच्या मध्यावर आश्विन आणि कार्तिक यांच्या संधिकाली दशदिशा उजळून टाकणारी दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. सुमारे २५०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाशाचा, आनंदाचा, समाधानाचा, समृद्धीचा उत्सव म्हणजे दीपावली.
अशी ही दिवाळी म्हणजे, फटाक्यांचा उत्सव कशी झाली? जे चालू आहे ते बरोबर का चूक?
प्रश्न ऐकून बाजूला दिवाळीत अॅटमबॉम्ब फुटावा आणि दचकावे, तसे दचकलात ना? स्वाभाविकच आहे. कारण, दिवाळी हा आज प्रामुख्याने धडामधूम आवाजाचा उत्सव झाला आहे. वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत पाच-सहा दिवस चालणारा हा सण. पण त्या उजळाव्यात, आकाशकंदील बांधावेत, नवे कपडे घ्यावेत, मित्रांच्या समवेत फराळाचा आनंद लुटावा, घरापुढे रांगोळ्या काढाव्यात, शुभेच्छापत्रांनी सर्वांना आपले शुभचिंतन पोहोचवावेत; या आनंदी सोहळ्याचे नाव दीपावली. धन, आरोग्य, शांती मिळवण्यासाठी प्रकाशदेवतेची पूजा करण्याचा हा सण.
या सर्वांत फटाक्यांनी पुढे कधीतरी घुसखोरी केली आणि कानाचे पडदे फाडून टाकणार्या आवाजाचा हा आनंद (!), ही आता काही दिवाळीचीच मक्तेदारी राहिलेली नाही. लक्षावधी लग्नांत आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने होणार्या निवडणूक अथवा सामान्यांना निकालात फटाक्यांची ‘दे दणादण’ आता अपरिहार्य झाली आहे.
एकट्या पुण्यात दिवाळीत दहा कोटींचे फटाके उडवले जातात. भारतात केवळ दिवाळीचा विचार केला, तर हा आकडा पाचशे कोटींपर्यंत जातो आणि लग्ने, निवडणुका यांतील आवाजी आनंद लक्षात घेतला, तर अकलेचा धूर आणि पैशाची शब्दश: राख करणारा हा आनंद (!) प्रदर्शनाचा मार्ग काही हजार कोटींच्यात पोहोचतो.
दिवाळीच्या दारूकामात विविध प्रकार असतात. त्यांतील अनेक मन मोहून टाकणारे असतात, तरीही थोडीबहुत हानीच करणारे असतात. मात्र, फटाके आणि अॅटमबॉम्ब यांची गोष्टच वेगळी. त्यांच्यामुळे फक्त तोट्यांची मालिकाच उभी राहते. आवाजाची पातळी साठ डेसिबलच्या वर गेली की माणसाला त्रास होतो. सुतळी बॉम्ब, डांबरी माळा यांचीदेखील पातळी नेहमीच शंभरच्या वर असते.
या ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चिडचिड, मानसिक ताण, श्रवणदोष इत्यादी दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडालेल्या फटाक्यांनी निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध रुग्ण यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. अनेक पशुपक्षी घाबरून सैरावैरा पळताना मृत्युमुखी पडतात. वाहन चालवणारी माणसे दचकून अपघात होतात.
फटाक्यांतील रसायनांमुळे कार्बन मोनोक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, मॅग्नेशियम पेंटाक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड इत्यादी विषारी वायू व मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फरस, कार्बन ट्रायनायट्रोटोल्यून इत्यादींच्या धनकणिका वातावरणात मिसळतात. त्यामुळे व विषारी वायूंमुळे दमा, खोकला, अॅलर्जी, डोकेदुखी, दृष्टी मंदावणे, त्वचारोग, कर्करोग, वाढता रक्तदाब, मतिमंदत्व, मज्जातंतूंवर परिणाम यांपैकी काहीही होऊ शकते. तात्पुरता क्षणिक आनंद मिळवण्यासाठी जाणूनबुजून आजारांना निमंत्रण दिले जाते.
फटाके उडवणे म्हणजे आगीशी खेळच असतो. फटाक्यांमुळे आग लागणे, भाजणे आणि मालमत्तेची व जीविताची हानी होणे या सर्व गोष्टी प्रतिवर्षी वाढत्या प्रमाणावर होत आहेत. फटाके करण्यासाठी कागद वापरतात, त्यासाठी हजारो झाडे तोडली जातात. फटाके फोडल्यावर कागदाच्या चिंध्या होतात, तो जळतो. म्हणजेच हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाची हानी होते.
फटाक्यांच्या निर्मितीमागील करुण कहाणी आपण समजून घेतली, तर वातीला उदबत्ती लावताना तुम्ही बहुसंख्य तरुण मंडळी दहा वेळा विचार कराल. तुमच्या कथित आनंदासाठी बहुसंख्य बालकामगार फटाक्यांच्या कारखान्यात राबत असतात. छोट्या कोंदट खोल्या, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी विजेचा वापरच रद्द. वीज नसल्याने मशीन नाहीच; तर पंखा कुठला? सूर्योदयाला यायचे, सूर्यास्ताला जायचे. एकमेकांशी न बोलता बारा ते चौदा तास मुकाट काम करायचे. एवढ्या वेळात एक हजार फटाक्यांच्या १५-१७ माळा होतात. एका माळेची मजुरी रुपये तीन. दिवसाला अवघे ४०-५० रुपये.
लवंगीसारख्या छोट्या फटाक्यांच्या लडी तयार करण्यास लहान नाजूक हातांची गरज; म्हणून मुले अगदी कोवळ्या वयातील. रजा, सवलती, सुरक्षिततेचे नियम कशाचाच पत्ता नाही. जेवायची वेळ काम झाल्यावर. तरुण मित्रांनो, बालकामगार कायद्याने हा सर्व गुन्हा आहे. देशाची घटना सांगते, या मुलांना सर्व ती मदत देऊन शाळेत पाठवा; पण प्रत्यक्षात आपली दिवाळी रंगीबेरंगी आतषबाजीची आणि मोठ्यातल्या मोठ्या धुमधडाक्याची व्हावी यासाठी आपण या वास्तवाकडे साफ डोळेझाकच करत आहोत. नव्हे, त्याला हातभार लावत आहोत.
फटाक्यांच्या कानठळ्या बसवणार्या आवाजाला कितीतरी पर्याय आहेत. मात्र, आपण स्वतःही समजून घ्यायला हवे. आपल्या मित्रांना, घरातल्या भावंडांना पटवून द्यायला हवे. फटाके न फोडल्याने वाचलेल्या पैशातून छान छान असे खूप काही करता येईल. धैर्य, चतुरपणा, हुशारी, प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी गोष्टींची पुस्तके घेता येतील. विज्ञानाचे खेळ घेता येतील. चमत्कार शिकता येतील.
मुलांना खूप छान कागद, पेन्सिल, रंग देऊन आकाशकंदिलापासून ओरिगामीपर्यंत बरेच काही करता येईल. किल्ले बांधता येतील, सहल काढता येईल आणि हो, याचबरोबर तुमच्यातील कळवळ्याचा माणूस जर जिवंत असेल ना, तर ज्यांच्या जीवनात ही छान छान दिवाळी कधी येतच नाही. ते बूटपॉलिश करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, कागद, भंगार गोळा करणारे, दुर्दैवाने मूकबधिर, अपंग, निराधार बनलेले तुमचे छोटे-छोटे भाऊ-बहीण कोठेही भेटतीलच. त्यांच्याही जीवनात दिवाळी उजळावी म्हणून फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून काही करू शकलात ना, तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.
तुमचा विवेकसाथी – नरेंद्र दाभोलकर
