-
महाराष्ट्र अंनिसची शासनाकडे मागणी
सांगली:
सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये होणारे तीव्र ध्वनिप्रदूषण तसेच डोळ्यांना घातक ठरणारे लेझर लाईट्स यांवर कायदेशीर निर्बंध आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सांगली शाखेच्या वतीने निवासी जिल्हाधिकार्यांना आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने या विषयाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सण आणि उत्सव साजरे करण्याचा हक्क प्रत्येकाला असला, तरी त्यामुळे इतरांच्या आरोग्याला बाधा पोहोचता कामा नये, सण आणि उत्सव साजरे करण्याचा हक्क प्रत्येकाला असला तरी त्यामुळे इतरांच्या आरोग्याला बाधा पोहोचता कामा नये, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. सद्य:स्थितीत मिरवणुकींमध्ये डीजे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा होणारा अमर्याद वापर आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. तसेच, बीआयएस मानकांचे उल्लंघन करून वापरल्या जाणार्या लेझर लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ध्वनिप्रदूषण नियम २००० नुसार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणार्या आयोजकांवर व ध्वनिवर्धक पुरवठादारांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. बीआयएस कायदा २०१६ नुसार, परवान्याशिवाय साऊंड आणि लेझर सिस्टीमची विक्री, जोडणी व उत्पादन करणार्यांवर जप्ती आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अकोळे, राहुल थोरात, जगदीश काबरे, आशा धनाले, त्रिशला शहा, अमर खोत, वासुदेव गुरव, सुखदेव पावशे, अमित ठकार, दिगंबर कांबळे, कोंडिबा कांबळे, शोभा मधाळे, चंद्रकांत वंजाळे, अविनाश कांबळे यांच्या सह्या आहेत.
डीजेच्या बळी ठरलेल्या शीतल पावशे यांच्या नातेवाइकांची उपस्थिती :
हे निवेदन देताना कवठेएकंद (जि. सांगली) येथील डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन प्राण गमावलेले कै. शीतल पावशे यांचे वडील सुखदेव पावशे उपस्थित होते. “ध्वनिप्रदूषणामुळे आमच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग इतर कोणावरही येऊ नये; डीजे आणि डॉल्बीसारख्या प्राणघातक यंत्रणांवर प्रशासनाने तत्काळ पूर्ण बंदी घालावी”, अशी अत्यंत भावनिक व कळकळीची विनंती सुखदेव पावशे यांच्या कुटुंबीयांनी या वेळी केली.
चाळीसगाव

सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, या स्वातंत्र्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेला बाधा येता कामा नये. सध्या विविधधर्मीय सण-उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर, डीजे व डॉल्बी साउंडचा वापर होत असल्याने ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र अंनिसच्या चाळीसगाव शाखा आणि डॉक्टरांच्या COGS संघटनेच्या वतीने सर्वधर्मीय सण-उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमधील ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करणार्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागणीबाबतचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूरवाड साहेब, आणि पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव यांना देण्यात आले.
वसई

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. दीपक सावंत यांना तसेच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, मीरा भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुकतालय यांना सर्वधर्मीय सण, उत्सवात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन वसई शाखेकडून देण्यात आले. याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सदर निवेदन देण्यासाठी वसई शाखेचे अध्यक्ष संजय चव्हाण, कार्याध्यक्ष अंजना देवकाते, पायस मचाडो व संदेश घोलप उपस्थित होते.
फलटण

महा. अंनिस फलटण शाखा आणि फलटण पोलीस ठाणे आणि मुधोजी हायस्कूल आणि फलटणमधील अन्य शाळांसमवेत ध्वनिप्रदूषण विरोधात पूर्ण शहरात फेरी काढण्यात आली. आयोजक पोलीस निरीक्षक बल्लाळ सर व त्यांचे पोलीस कर्मचारी, अधिकारी, उपस्थित शिक्षक, आणि प्राचार्य, शेंडगे सर व मुले-मुली व फलटण अंनिसचे डॉ. प्रदीप शेंडे सर, आरती काकडे, भुजबळ सर व मंदाकिनी गायकवाड, रॅलीसमवेत समविचारी संघटना ‘डीजे, डॉल्बी बंद करा, प्रदूषण टाळा’ यांसारख्या घोषणा देऊन शहरात प्रबोधन करण्यात आले
पुणे
सण-उत्सवांच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तथाकथित चमत्कार व उपचारांचे दावे यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता या दोन महत्त्वाच्या विषयांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

म.अंनिसच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन ध्वनिप्रदूषणासंदर्भातील निवेदन दिले. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांची भेट घेऊन सोशल मीडिया माध्यमातून तथाकथित चमत्कार व अलौकिक शक्तींचे दावे करणार्या व्यक्तींच्या संदर्भात चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी, डीजे अथवा ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी दिलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्यांनी अधूनमधून गस्त घालून प्रत्यक्ष ध्वनिपातळीची पाहणी करावी, अशीही मागणी करण्यात आली.
पुणे शहर व परिसरात फेसबुक, यू ट्यूब, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांवर तथाकथित चमत्कार, अंगात येणे, दैवी अथवा अलौकिक शक्ती, बाधा काढणे, भूतबाधा दूर करणे, चमत्कारिक उपचार, भविष्यवाणी किंवा रोग बरे करण्याच्या शक्तीचे दावे करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असल्याचे समितीने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. अशा दाव्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक, आर्थिक किंवा मानसिक शोषण, भीती निर्माण करणे अथवा वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करणे होत आहे का, याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. म. अंनिसने पोलिसांना संबंधित सोशल मीडियावरचे व्हिडिओ, स्क्रीनशॉट, लिंक्स व अन्य डिजिटल पुरावे उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शविली. या दोन्ही विषयांवर प्रशासन आणि पोलिसांनी दखल घेऊन आवश्यक निर्देश देत प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली.
या वेळी मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. विद्या बुरांडे, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. दोन्ही अधिकार्यांना निवेदनासोबत संत साहित्याच्या पुस्तकांचे संच सप्रेम भेट देण्यात आले.
सोलापूर

सर्वधर्मीय सण आणि उत्सवांमध्ये वापरल्या जाणार्या उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सण आणि उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, सोलापूर येथे सर्वधर्मीय सण-उत्सवांमध्ये होणार्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणावे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या सोलापूर शहर शाखेने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरे करून सामाजिक सलोखा आणि आरोग्य जपले पाहिजे, अशी भूमिका अंनिस शाखेचे आर. डी. गायकवाड, व्ही. डी. गायकवाड, दीपक पांडगळे, निनाद शहा, सुजित हावळे, उषा शहा, शकुंतला सूर्यवंशी, सुनीता गायकवाड, अस्मिता बालगावकर यांनी मांडली आहे.
