वाघेश साळुंखे -
असे समजा की, तुम्ही एक सजग, चिकित्सक आणि विवेकी सोशल मीडिया वापरकर्ता आहात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आलेल्या कोणत्याही संदेशावर पटकन विश्वास ठेवत नाही. संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी तो सत्य असल्याची खात्री करून घेता. तुमच्या पडताळणीत तो संदेश खोटा आढळला तर तो तुम्ही कधीच फॉरवर्ड करत नाही. पण एवढे केल्याने खोट्या संदेशांचा प्रसार थांबेल का? तुम्ही एखादा संदेश फॉरवर्ड केला नाही म्हणून इतर लोक तो फॉरवर्ड करणे थांबवणार आहेत का? तो संदेश तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी अनेक ठिकाणी पसरलेला असू शकतो. तुम्ही तुमच्यापर्यंत आलेली फॉरवर्डस्ची एक साखळी मध्येच तोडली. पण समाजमाध्यमांत अशा अनेक साखळ्या आहेत. त्यांचे काय करायचे? इतर लोकांनीही खोटे संदेश फॉरवर्ड करू नयेत यासाठी काय करावे? आणि जे संदेश आधीच व्हायरल झालेले आहेत त्यांबाबत काय करावे? सजग नेटिझन्स आणि कार्यकर्ते म्हणून आपल्याला हे माहीत असायला हवे की, एका क्लिकने अंधश्रद्धा पसरते; पण योग्य ठिकाणी केलेल्या दुसर्या क्लिकने तिचा प्रसार रोखताही येतो. त्यासाठी forward बटणाबरोबर report बटणही माहीत असायला हवे किंवा ग्रुपमधील तुमचा एक मेसेजही इतरांना खोटा मेसेज फॉरवर्ड करण्यापासून परावृत्त करू शकतो, याची जाणीवही असायला हवी. अशा अनेक करण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यांमुळे आपण खोट्या संदेशांचा प्रसार रोखू शकतो. त्यांची चर्चा या लेखामध्ये केली आहे.
पाठवणार्याला वैयक्तिकरित्या सांगणे
ग्रुपमध्ये एखादा मेसेज आला तर संदेश पाठवणार्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या संबंधित संदेश खोटा असल्याचे योग्य भाषेत सांगणे आवश्यक आहे. तसेच तो संदेश डिलीट करण्याचीही विनंती करावी. ही विनंती शक्यतो फोन करून करावी, जेणेकरून लवकरात लवकर तो संदेश डिलीट केला जाईल. जितका उशीर होईल तितका तो संदेश फॉरवर्ड होण्याची शक्यता जास्त आहे. ग्रुपमध्येच त्या संदेशाची खिल्ली उडवणे टाळावे. त्या व्यक्तीने संदेश डिलीट केला नाही; तर मात्र आपण ग्रुपमध्येच सदर संदेश खोटा आहे, असे स्पष्टपणे सांगावे. त्याबरोबर फॅक्ट-चेकचा रिपोर्टही तिथे पोस्ट करावा. संबंधित संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहनही करावे. फॅक्ट-चेकचा रिपोर्ट खूप चांगला परिणाम करतो. याने संभाव्य फॉरवर्ड करणारे खूप कमी होतात. या ठिकाणी आणखी एक आवाहन करता येईल- ‘ज्यांनी कोणी हा संदेश फॉरवर्ड केला आहे, त्यांनी तो तिथून डिलीट करावा’, हे सांगणे खूप महत्त्वाचे आहे. लोकांना काही गोष्टी स्वतःहून सुचत नाहीत. पण त्यांना त्या सुचवल्या तर ते कृती करतात.
खोटा संदेश स्वतःहून डिलीट करण्याचा पायंडा पाडणे
कल्पना करा, मी यापूर्वी पाठवलेला संदेश चुकीचा/खोटा होता, असे तथ्य-पडताळणीत समोर आले आहे. ‘कृपया तो पुढे पाठवू नये’, असा मेसेज एखाद्याने ग्रुपमध्ये टाकला आणि त्याने टाकलेला आधीचा खोटा संदेश डिलीट केला, तर ग्रुपमध्ये त्या व्यक्तीबद्दल काय भावना निर्माण होईल? स्वतःची चूक मान्य करण्याची ग्रुपमधील अन्य व्यक्तींमध्ये सुद्धा मानसिकता तयार होईल. याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करू शकतो. आपल्याकडूनही कधी ना कधी एखादा चुकीचा/खोटा संदेश ग्रुपमध्ये पाठवला जाऊ शकतो. पण ते लक्षात आल्यावर ‘आपण पाठवलेला संदेश खोटा होता’ हे प्रांजळपणे मान्य करणारा एक संदेश ग्रुपमध्ये जाणीवपूर्वक टाकावा.
खंडन करण्यासाठी मूळ संदेश शेअर न करणे
खोटेपणा उघड करण्याच्या उद्देशानेही मूळ पोस्ट share किंवा quote करणे धोकादायक असते. त्यामुळे त्या पोस्टची पोहोच (reach) वाढते. फेसबुकवर असे अनेक लोक आहेत जे ‘ही पोस्ट खोटी आहे’ हे सांगण्यासाठी दुसर्याची पोस्ट शेअर करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. दुसर्याची पोस्ट शेअर करणे म्हणजे त्या पोस्टची पोहोच वाढवणे आहे. त्याऐवजी संबंधित पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट करून ‘सदर पोस्ट खोटी आहे’, असे सांगणे जास्त चांगले. स्क्रीन शॉटवर ‘खोटे’, ‘भ्रामक’ असे ठळक लाल अक्षरांत लिहिल्यास जास्तच चांगले. सोबत विश्वासार्ह पुरावा जोडावा. स्क्रीन शॉटमध्ये अकाउंटचे नाव, प्रोफाइल फोटो, मोबाईल नंबर, संशयास्पद लिंक किंवा इतर काही संवेदनशील माहिती असेल तर ती लपवावी.
सार्वजनिक (public) पोस्टवर प्रतिक्रिया देणे टाळा
फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यू ट्यूब किंवा अशाच अल्गोरिदमवर चालणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील खोट्या पोस्टवर कमेंट करणे किंवा प्रतिक्रिया देणे पूर्णपणे टाळावे. चमत्काराचा दावा करणार्या एखाद्या पोस्टवर तुम्ही साधी ‘लोकांना मूर्ख बनवू नका’ अशी कमेंट जरी केली तरी ती कमेंट त्या पोस्टला आणखी रीच (reach) मिळवून देते. किंवा नुसती हसण्याची प्रतिक्रिया दिली तरी त्यामुळे पोस्ट आणखी जास्त लोकांपर्यंत पोचते. कमेंट करणे, प्रतिक्रिया देणे किंवा इतरांना टॅग करणे या कृती पोस्टमधील एंगेजमेंट वाढवणार्या गोष्टी आहेत. कमेंट सेक्शनमध्ये वाद घालत तर अजिबात बसू नये. तुमची कृती पोस्टच्या समर्थनाची असो की विरोधाची, ती पोस्टचा रीच वाढवणारीच आहे. त्यामुळे खोट्या किंवा अंधश्रद्धा पसरवणार्या पोस्टबाबत या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. या कृती सत्य, चांगल्या, जनजागृती करणार्या पोस्टच्या बाबतीत मात्र भरपूर कराव्यात. आपण चांगल्या, प्रबोधनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया द्यायला कंटाळा करतो, ही फार मोठी चूक आहे.
(इथे एक फरक जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवा, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक (किंवा इतर अल्गोरिदमवर चालणार्या प्लॅटफॉर्म्स) मध्ये एक फरक आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्ही कितीही प्रतिक्रिया दिली किंवा चर्चा केली तरी त्यामुळे ती पोस्ट जास्त लोकांपर्यंत पसरण्याचा धोका नसतो. पण फेसबुकवर मात्र या गोष्टी एंगेजमेंट वाढवतात आणि ती पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते.)
Report बटण वापरा
खोट्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा ती रिपोर्ट करणे जास्त योग्य आहे. रिपोर्ट करणे म्हणजे तक्रार करणे. एखाद्या पोस्टबाबत आपण संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तक्रार नोंदवू शकतो. पोस्टच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला तीन ठिपके असतात. त्यांवर क्लिक केल्यानंतर Report बटण दिसते. कोणतीही पोस्ट रिपोर्ट करताना योग्य कारण निवडावे लागते. तिथे कारणांची यादीच असते. प्लॅटफॉर्मनुसार या यादीमध्ये फरक असू शकतो. त्या यादीतील जे कारण तुम्हाला संबंधित पोस्टबाबत जवळचे वाटते ते कारण निवडावे. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी एखाद्या पोस्टबाबत प्राप्त झाल्या तर प्लॅटफॉर्म त्या तक्रारींची तपासणी करतो. तक्रारीत तथ्य आढळले तर ती पोस्ट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली जाते. सजग नागरिकांनी खोट्या किंवा अंधश्रद्धा पसरवणार्या पोस्ट्स रिपोर्ट करण्याला प्राधान्य द्यायला हवे. मात्र प्रत्येक अंधश्रद्धामूलक पोस्ट प्लॅटफॉर्मच्या नियमांचे उल्लंघन करतेच असे नाही. उदाहरणार्थ, केवळ राशीभविष्य सांगणारी पोस्ट खोटी वाटली तरी ती काढून टाकली जाईलच असे नाही. परंतु ‘हा उपाय केल्यास कॅन्सर बरा होईल’ किंवा ‘पैसे दिल्यास संकट टळेल’ असा दावा आरोग्यविषयक हानी किंवा फसवणुकीत मोडू शकतो. अशा पोस्ट्स काढून टाकल्या जाण्याची शक्यता खूप आहे.
अकाउंट रिपोर्ट करणे
रिपोर्ट बटण केवळ एखाद्या पोस्टसाठीच वापरता येते असे नाही; तर ते पूर्ण अकाउंटसाठी पण वापरता येते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कितीतरी अकाउंट्स, पेजेस, चॅनेल्स अशी असतात की, जी केवळ खोट्या पोस्टच पाठवत असतात. अशा अकाउंट किंवा पेज/चॅनेलवरील काही पोस्ट्स आधी रिपोर्ट कराव्यात. नंतर पूर्ण अकाउंटच रिपोर्ट करावे. यामुळे ते अकाउंट लगेच बंद पडेल असे नाही. परंतु त्यातील काही पोस्ट्स काढून टाकल्या जाऊ शकतात, अकाउंटचा रिच कमी केला जाऊ शकतो किंवा त्यावर काही निर्बंध लावले जाऊ शकतात. गरज पडल्यास पूर्ण अकाउंटच बंद केले जाऊ शकते. यातील काहीही झाले तरी त्यामुळे फेक पोस्ट्सना आळा बसणार आहे. एखाद्या प्लॅटफॉर्मवरच्या अकाउंटला रिपोर्ट कसे करावे याबाबतची माहिती यू ट्यूबवर सहज मिळून जाईल.
जाहिराती सुद्धा रिपोर्ट कराव्यात
केवळ पोस्टच नाही, तर सोशल मीडियावर पैसे देऊन केल्या जाण्यार्या जाहिराती सुद्धा रिपोर्ट करता येतात. रिपोर्ट प्राप्त झाल्यावर प्लॅटफॉर्म्स त्यांच्या advertising standards, community standards आणि स्थानिक कायद्यांनुसार जाहिरातीची तपासणी करतात आणि त्यांच्या नियमांनुसार पुढील कार्यवाही करतात. त्यामुळे अंधश्रद्धा पसरवणार्या किंवा खोटे दावे करणार्या जाहिराती सुद्धा रिपोर्ट कराव्यात.
स्वतंत्र पोस्ट लिहून खंडन करा
एखादी पोस्ट खोटी आहे हे नवीन गोष्ट सप्रमाण लिहून सांगायला हवे. ही पोस्ट त्याच ग्रुपमध्ये स्वतंत्रपणे टाकावी. ज्यांनी आधीची पोस्ट वाचली असण्याची शक्यता आहे, त्यांना ती स्वतंत्रपणे पाठवावी. तसेच संबंधित पोस्ट जास्तच व्हायरल झालेली असल्यास खंडनाची पोस्ट इतर ग्रुप्समध्येही पाठवावी.
अॅडमिनची जबाबदारी
जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे अॅडमिन असाल तर तुम्ही याबाबतीत खूप चांगली जबाबदारी निभावू शकता. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिन्सना ग्रुप मधील कोणतीही पोस्ट डिलीट करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर ग्रुपमध्ये वारंवार खोट्या पोस्ट टाकणार्या लोकांना एक-दोनदा इशारा देऊन नंतर ग्रुपमधून काढून टाकता येते. तसेच आवश्यकता भासल्यास ग्रुपमध्ये केवळ अॅडमिनलाच संदेश पाठवता येतील अशी ग्रुपची सेटिंग करता येते. फेसबुक ग्रुपच्या अॅडमिनला तर यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने ग्रुप हाताळता येतो. तिथे अॅडमिन Post Approval, Keyword Alerts आणि Admin Assist सारखी साधने वापरू शकतात.
कायदेशीर तक्रार करणे
अंधश्रद्धा पसरवणार्या अनेक पोस्ट्सना जादूटोणा विरोधी कायदा लागू होतो. त्याचबरोबर इतर अनेक कायद्यांखाली संबंधित पोस्ट्सवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. खोट्या पोस्ट्स अनेक वेळा आरोग्यविषयक, स्त्री विषयक, आर्थिक गुन्हेविषयक, जाहिरात विषयक कायद्यांचे उल्लंघन करणार्या असतात. तिथे कोणता कायदा लागू होतो याची माहिती घेऊन अशा पोस्ट्स टाकणार्या व्यक्तींवर पोलिसात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. काही पोस्ट्सबाबत (उदाहरणार्थ, धमकीच्या पोस्ट्स, अघोरी उपचार वगैरे) पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करणेही शक्य आहे. अशा तक्रारी होत आहेत, हे लक्षात येताच असे मेसेज पाठवणारे स्वतःहूनच सावध होतील.
एक प्रसिद्ध वचन आहे- ‘जगातील समस्या वाईट लोकांच्या वाईट कृत्यांमुळे कमी आणि चांगल्या लोकांच्या निष्क्रियतेमुळे जास्त निर्माण झालेल्या आहेत.’ वाईट लोक अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरवणारे मेसेज प्रसारित करत राहणारच. पण त्यांचा प्रतिकार करण्यासाठी चांगल्या, सत्यनिष्ठ लोकांनी प्रयत्न करायलाच हवेत. स्वतःहून फॅक्ट-चेक करायला हवे, त्यानंतर त्याबाबतची सत्यता सांगणारे लेख आणि व्हिडिओ तयार करायला हवेत. सत्य सांगणारे साहित्य सतत निर्माण आणि प्रसारित करत राहिले पाहिजे.
-वाघेश साळुंखे
