-
वास्तुशास्त्र फसवे विज्ञान आहे. तुम्ही कधी फसलात का? तुमचे मित्र, कुटुंबीय फसलेत का? असे असेल तर अनुभव लिहा. या वार्तापत्राच्या आवाहनावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातील निवडक अनुभव वाचकांसाठी देत आहोत.
या अनुभवातून आपण धडा घेऊन फसव्या वास्तुशास्त्रापासून दूर व्हाल, अशी आशा आहे.
– संपादक मंडळ
घर, इंजिनिअर आणि वास्तुशास्त्र!
साहेब, मी नुकतेच साधारण १००० चौ. फूट घर बांधत आहे. काम एका इंजिनिअरकडे दिले. माणूस अतिशय चांगला, अभ्यासू आणि परदेशातही जाऊन आलेला. पण एक गोष्ट मात्र भारी,तो प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्र आणि पंचांगाप्रमाणेच झाली पाहिजे, यावर ठाम!
माझा मात्र वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नाही. दिशा, मुहूर्त आणि अशा गोष्टींनी घराचे सुखदुःख ठरते, हे मला पटत नाही. पण इंजिनिअर आणि माझी बायको दोघेही एका बाजूला, आणि मी एकटा दुसर्या बाजूला! माझे काय झाले असेल विचार करा.
एक प्रसंग तर कमालच झाला. संडासचे भांडे बसवताना तो म्हणाला, “हे अमुक दिशेलाच असले पाहिजे. आणि बसताना तोंडही अमुक दिशेलाच असले पाहिजे, तेव्हाच वास्तूप्रमाणे होईल.”
मी हसत म्हणालो, “अहो, संडासला कोणत्या दिशेला तोंड करून बसलो म्हणून तो काय सोन्याचा होणार नाही! माझ्या सोयीने बसवू या.”
हे ऐकून त्याने माझ्याकडे अशी नजर टाकली की जणू मी जगातला सर्वांत मोठा मूर्ख. शेवटी म्हणाला, “ठीक आहे, पण तुमच्या रिस्कवर बांधतो.”
मला नेहमी वाटायचे की अशा गोष्टी फक्त अंधश्रद्धाळू लोक मानतात. पण प्रत्यक्षात अनेक सुशिक्षित, पांढरपेशे लोक त्यावर अधिक ठाम विश्वास ठेवतात आणि नकळत तो इतरांवरही लादतात.
असो, अजून घराचे काम सुरू आहे. पुढे अजून कोणते ‘वास्तूचे नियम’ ऐकायला मिळतात ते पाहू. एक मात्र खरंमाणूस म्हणून तो खूप चांगला आहे. त्यामुळे राग येत नाही, फक्त गंमत वाटते!
-दीपक किल्लेदार, कोल्हापूर
वास्तुशास्त्राच्या नावाने फसवणूक
काही वर्षांपूर्वीचा हा अनुभव आजही माझ्या मनात ताजा आहे. माझा एक जिवलग मित्र आणि त्याचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे होते. कुटुंबातील सर्व सदस्य नियमितपणे एका आध्यात्मिक केंद्रात जात असत. लग्नानंतर त्याची पत्नीही त्या वातावरणाचा भाग झाली. काही वर्षे सर्व काही सुरळीत चालले; मात्र नंतर मित्राची आई आणि पत्नी यांच्यात छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले.
आई पारंपरिक विचारांची, तर सून उच्चशिक्षित आणि आधुनिक विचारांची होती. स्वभावातील आणि विचारांतील फरकामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनले. मित्राची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. आईची बाजू घेतली तर पत्नी नाराज, पत्नीची बाजू घेतली तर आई दुखावायची.
अखेर कुटुंबातील ज्येष्ठांनी ही समस्या त्यांच्या श्रद्धास्थानातील काही व्यक्तींसमोर मांडली. त्यांनी घराची पाहणी करून ठाम निष्कर्ष दिला,”घरात वास्तुदोष आहे. तो दूर करण्यासाठी स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि इतर काही बांधकामांमध्ये बदल करा.”
मित्राची आर्थिक परिस्थिती साधारण होती. घराची पडझड करून मोठा खर्च करणे त्याला शक्य नव्हते.
त्याने ही अडचण मला सांगितली आणि माझी मदत मागितली. त्या काळात मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत होतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होतो. त्याचं संपूर्ण कुटुंबीय धार्मिक, पूजापाठ करणारे व आध्यात्मिक केंद्रात जाणारे होते, तरीसुद्धा मी अंनिस चळवळीत करत असलेल्या कामावर त्याचा विश्वास होता.
मी घरी जाऊन सासू आणि सुनेशी संवाद साधला. दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला; पण दोघीही एकमेकींच्याच चुका सांगत होत्या. शेवटी मित्राच्या आईनेच मला संबंधित वास्तुतज्ज्ञाला भेटून येण्याची विनंती केली. आम्ही घराचा नकाशा घेऊन त्या व्यक्तीकडे गेलो. तिथे अनेक लोक आपल्या अडचणी आणि घरांचे नकाशे घेऊन रांगेत उभे होते. प्रत्येकाला वेगवेगळे वास्तुदोष सांगितले जात होते. हे पाहून आम्ही एक प्रयोग करण्याचे ठरवले. आमच्या घराच्या नकाशात जाणीवपूर्वक बदल केला. प्रत्यक्षात उजव्या बाजूला असलेले स्वयंपाकघर डावीकडे दाखवले, डावीकडील स्वच्छतागृह उजवीकडे दाखवले आणि इतर मांडणीतही बदल केला.
आमचा नंबर आला. त्या व्यक्तीने नकाशा पाहिला आणि लगेच आम्हाला सुनावले, ही रचना पूर्णपणे चुकीची आहे. त्यानंतर त्यांनी ज्या सुधारणा लिहून दिल्या, त्या वाचून आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. कारण, त्यांनी सांगितलेली योग्य रचना ही प्रत्यक्षात आमच्या घराची मूळ रचनाच होती! त्यांनी सुचवलेला एकमेव प्रत्यक्ष बदल म्हणजे गळती लागलेली जुनी पाण्याची टाकी काढून टाकणे.
घरी परतल्यावर आम्ही तसेच सांगितले. दुसर्या दिवशी ती टाकी काढून टाकण्यात आली. त्यानंतर मात्र आश्चर्यकारक बदल दिसू लागला. मित्राच्या आईची खात्री झाली की वास्तुदोष दूर झाला आहे. तिचे वर्तन बदलले. सासू-सुनेतील वाद कमी झाले. संवाद वाढला आणि घरातील वातावरण पुन्हा आनंदी झाले.
या अनुभवातून मला एक महत्त्वाचा धडा मिळाला. घराच्या भिंती, खोल्या किंवा दिशांमध्ये दोष नव्हता. दोष होता, तो मनातील गैरसमज, संवादाचा अभाव आणि पूर्वग्रहांमध्ये. बदल घरात झाला नव्हता, तर मानसिकतेत झाला होता.
आजही हा प्रसंग आठवला की एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते,वास्तूमध्ये दोष नसतो; दोष माणसांच्या विचारांत, संवादात आणि मानसिकतेत असतो. तो ओळखून दूर केला, तर अनेक कौटुंबिक समस्या सहज सुटू शकतात. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि संवाद हाच खर्या अर्थाने सुखी कुटुंबाचा पाया आहे.
– मधुकर अनाप
(जिल्हा कार्याध्यक्ष, अहिल्यानगर)
मो. ९८५०१४४७०९
वास्तुशास्त्राच्या नादी लागून मनःस्ताप
‘हे किचन ईशान्येला घ्या, जिना पूर्वेला घ्या म्हणजे पैसा टिकेल…’ अशा भूलथापांना बळी पडून मी आणि माझ्या कुटुंबाने सोसलेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसान आज मी या पत्राद्वारे मांडत आहे. जेणेकरून इतर सुजाण नागरिक अशा भोंदूगिरीला बळी पडणार नाहीत.
दोन वर्षांपूर्वी मी माझ्या हकाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक जुना फ्लॅट खरेदी केला. आयुष्यभराची पुंजी आणि बँकेचे मोठे कर्ज काढून हे घर घेतले होते. घर जुने असल्यामुळे काही अंतर्गत बदल (रिनोव्हेशन) करणे गरजेचे होते. बांधकाम सुरू असतानाच, आमच्या एका नातेवाइकांच्या आग्रहाखातर आम्ही एका ‘प्रसिद्ध’ वास्तुतज्ज्ञाला घर दाखवण्याचे ठरवले. सुरुवातीला माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण ‘घरात सुख-शांती लाभेल, पैसा टिकेल’ या कुटुंबाच्या आग्रहापुढे माझे काही चालले नाही.
ते वास्तुतज्ज्ञ घरात आले, त्यांनी हातातील होकायंत्र (Compass) फिरवले आणि गंभीर चेहरा करून म्हणाले, “तुमच्या घराचा मुख्य दोष म्हणजे, स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला आहे आणि जिना चुकीच्या बाजूला आहे. यामुळे घरात कधीच पैसा टिकणार नाही, आजारपण येईल आणि प्रगती थांबेल.” त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, जे स्वयंपाकघर अगदी सुव्यवस्थित होते, ते तोडून ईशान्येला नेण्यास सांगितले आणि जिन्याची दिशा बदलण्याचा अट्टाहास धरला.
त्यांच्या या भीती घालणार्या वतव्यामुळे माझ्या घरातील सर्व जण प्रचंड घाबरले. आधीच कर्जाच्या बोजाखाली असताना, केवळ ‘वास्तुदोषा’च्या भीतीपोटी आम्ही पुन्हा एकदा कर्ज काढून घरतोड सुरू केली. चांगल्या भिंती पाडल्या गेल्या, नवीन पाईपलाईन आणि तोडफोडीत लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला. त्या वास्तुतज्ज्ञाने त्याच्या सल्ल्याची फी म्हणून हजारो रुपये उकळलेच, सोबतीला ‘वास्तू दोष निवारण’ म्हणून काही महागडे खडे, यंत्र आणि पिरॅमिड खरेदी करायला लावले.
परिणाम काय झाला?
घरतोड करून नवीन रचनेनुसार आम्ही राहायला गेलो. पण सुख-शांती मिळण्याऐवजी आमची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली. तोडफोडीच्या अतिरिक्त खर्चामुळे डोक्यावरचे कर्ज वाढले होते, त्याचे हप्ते फेडताना नाकी नऊ आले. सगळ्यात धकादायक बाब म्हणजे, ईशान्येला स्वयंपाकघर केल्यामुळे तिथे व्हेंटिलेशनची मोठी समस्या निर्माण झाली. घरात कोंदट वातावरण राहू लागले, ज्यामुळे आईचे आजारपण कमी होण्याऐवजी उलट वाढले.
तेव्हा माझ्या लक्षात आले की, पैसा टिकण्याचा किंवा सुख-शांतीचा संबंध घराच्या दिशांशी नसून आपल्या आर्थिक नियोजनाशी आणि आरोग्याची काळजी घेण्याशी असतो. वास्तूच्या नावाखाली केवळ भीतीचा व्यापार केला जातो. विज्ञानाची कोणतीही जोड नसलेले हे शास्त्र केवळ लोकांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी वापरले जाते, हा कटू अनुभव मला आला.
या अनुभवातून मी आणि माझ्या कुटुंबाने मोठा धडा घेतला आहे. वास्तुशास्त्र ही केवळ एक फसवणूक आहे आणि अशा भोंदू लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःचे कष्टाचे पैसे पाण्यात घालू नका, हेच मला या अनुभवातून सर्वांना सांगायचे आहे.
– एक सजग नागरिक
वास्तुशास्त्राचा मुखवटा आणि फसवणुकीचा सापळा : एक अनुभव
आज तंत्रज्ञानाच्या युगातही विज्ञानाचा आधार घेण्याऐवजी, घराच्या बांधकामात वास्तुदोष आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपली फसवणूक करून घेणार्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. माझ्या नातेवाइकांच्या अनुभवाने या फसवणुकीचा एक भयावह चेहरा समोर आला होता. माझ्या काकांच्या नवीन घराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असताना एका तथाकथित वास्तुतज्ज्ञाचा प्रवेश झाला. त्या व्यक्तीने घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेवर बोट ठेवून, हे दिशाभूल करणारे प्रवेशद्वार तातडीने न बदलल्यास व्यवसायात मोठे नुकसान आणि कुटुंबावर आजारपण ओढवेल, अशी भीती घातली. भीतीपोटी काकूंचा अंधविश्वास जागा झाला आणि काका दडपणाखाली आले.
परिणामी, तयार असलेला मुख्य दरवाजा तोडून पुन्हा दुसर्या भिंतीवर बसवण्यात आला. इतकेच नव्हे, तर घराच्या कोपर्यात विशिष्ट धातूचे यंत्रे आणि काळे खडे पुरण्यास सांगून त्या भोंदूगिरीसाठी ५५ हजार रुपये उकळले गेले. दोन महिन्यांनंतर, या अवाजवी तोडफोडीमुळे घराचा मूळ आराखडाच बिघडला.
फर्निचरच्या मांडणीत अडथळे आले आणि राहणे गैरसोयीचे झाले. व्यवसायातही कोणताही चमत्कारिक सकारात्मक बदल झाला नाही. उलट, जेव्हा काकांनी पुन्हा संपर्क साधला, तेव्हा त्या भोंदूने पुन्हा तोडफोडीचा सल्ला देऊन फसवणूक सुरूच ठेवली. तेव्हाच काकांना समजले की, हा वास्तुदोष नसून केवळ आर्थिक लूट करणारा एक जाणीवपूर्वक रचलेला सापळा आहे.
या प्रसंगातून भोंदू वास्तुतज्ज्ञ नेहमीच कुटुंबातील सदस्यांच्या मनातील भीतीचा आणि असुरक्षिततेचा फायदा घेतात. अमुक करा, अन्यथा अनर्थ घडेल ही त्यांची नेहमीची कार्यपद्धती असते. अशा अंधश्रद्धेमुळे केवळ पैशांचे नुकसान होत नाही, तर घराची वास्तुकला बिघडल्यामुळे मानसिक शांतताही भंग पावते.
घर हे आपल्या राहण्यासाठी सुखद आणि सोयीचे असावे. तोडफोड करून, यंत्रे पुरून नशीब बदलत नाही, तर घराची मांडणी करताना हवा, प्रकाश आणि आपली दैनंदिन सोय यांचा विचार करणे म्हणजे खर्या अर्थाने वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्राच्या नावाखाली चालणारी ही लूट थांबवण्यासाठी समाजाने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. अशा भोंदू लोकांपासून शंभर हात लांब राहणे आणि विज्ञानाची कास धरणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. घराला शांततेचे मंदिर बनवा, अंधश्रद्धेचा अड्डा नको.
शब्दांकन : प्रा. डॉ. महेश मोटे, मुरूम
वास्तुशास्त्रामुळे नुकसान
आम्ही विटा येथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी ‘सिद्धी होम्स’ या अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅट खरेदी केला. सुरुवातीला आम्ही जेव्हा हा फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलो, तेव्हा त्याची रचना, आकार, दिशा, कलर, अंतर्गत सुविधा, हवा, प्रकाश, पाणी, शेजारी, घरातील जागा व शेवटी किंमत अशा सर्व बाजूंनी विचार केला. पडताळून पाहिल्या, तेव्हा सर्व ठीकठाक असल्याने आम्ही ती जागा फायनल केली व आमचे २५ वर्षांचे स्वतःचा निश्चित असा निवारा व मालकी असलेले ठिकाण असावे, हे स्वप्न पूर्ण झाले.
या अगोदर चार वेगवेगळी गावे व सात भाड्याची घरे बदलून झाली होती. भाड्याच्या घरांचा काय त्रास असतो, याचा आम्हाला बरा-वाईट अनुभव आलेला होता, म्हणून अनेक तजवीज, उपाय, शकल लढवून शेवटी हकाचे घर घेण्याचा निर्णय अंतिम केला.
घर खरेदी झाली, कागदपत्रे तयार झाली, नगरपालिकेत नोंदणीही केली तोपर्यंत कोणतीही अडचण नव्हती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष गृहप्रवेशाची वेळ आली, तेव्हा मात्र माझे धार्मिक विचारांचे वडील म्हणाले की, पूर्व- पश्चिम असलेले शौचालय हे धार्मिकदृष्ट्या योग्य नाही. ते आपणास उत्तर – दक्षिण करून घेतले पाहिजे. कारण सध्याची दिशा ही अशुभ, अयोग्य आहे. असाच थोडा वाद झाल्यानंतर मी त्यांना विज्ञान व भूगोल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी गोल असते, ती सूर्याभोवती तसेच स्वतःभोवती फिरत राहते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व दिशा सतत बदलत असतात. त्या कधीच निश्चित राहात नाहीत. परंतु माझ्या धार्मिक व तर्कशुद्ध विचार नसणार्या वडिलांना हे पटले नाही. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘मी या घरी राहायला येणार नाही’, असा निर्वाणीचा इशारा दिला, त्यात आईने पण भर टाकली. त्यामुळे माझ्या पत्नीने व मुलाने थोडा नरमाईची भूमिका घेतली. जर वडील इथे राहायला येणार नसतील तर जाणार कुठे? असा प्रश्न उपस्थित करून, शौचालयाची दिशा बदलण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. मीही वाद, भांडणतंटा व मतभेद नको, म्हणून आई-वडिलांच्या इच्छेखातर, वैचारिक तडजोड केली. एका आठवड्यात मी प्लंबर बोलावून शौचालयाची तोडफोड केली. ते करताना झालल्या आवाजामुळे शेजारी, इमारतीचा मालक यांचाही रोष पत्करावा लागला. तेव्हा शेवटी कशीबशी सर्वांची मनधरणी करून २५०००/- खर्च करून हे शौचालयाची दिशा बदलण्याचे काम पूर्ण केले. तेव्हा कुठे वडिलांनी खर्या अर्थाने गृहप्रवेश केला.
त्यांचे धार्मिकदृष्ट्या समाधान झाले, तरीही पुढील समस्या अधिक वाढत गेल्या. शौचालयाचे काम घाईगडबडीत केल्याने पाणी निघून जाण्यात अडचण निर्माण झाली, पूर्वीचे इंडियन टॉयलेट बदलून कमोड बसवले, त्यास ड्रेनेजची पाईप फिट न झाल्याने चोकप वाढले. पूर्वीचे शौचालय फोडताना भिंतीला तडे गेले, तसेच खालच्या मजल्यावर असलेल्या भाडेकरूच्या बाथरूममध्ये थोडे लिक झाले व पाणी ठिपकू लागले, त्यामुळे त्यांची रोज ओरड सुरू झाली. संबंध दुरावले.
आता हे कधीच दुरुस्त न होणारे व न भरून निघणारे नुकसान झाले. आता तीन-चार वर्षांनंतर वडिलांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा व केलेल्या विचारांचा पश्चात्ताप होत आहे.
आता त्याचा काहीच उपयोग नाही. कारण ‘बैल गेला अन् झोपा केला.’
-मुनीर शिकलगार, विटा, सांगली
वास्तुशास्त्राच्या नावे फसवणूक व थोतांड
मी मागील २० ते २५ वर्षांपासून ‘हेवी फॅब्रिकेशन’ क्षेत्रात एक उद्योजक म्हणून कार्यरत आहे. माझे बालपण शिरोळ तालुक्यातील लाट या गावी गेले आणि माझे शिक्षण सांगलीत झाले. व्यवसायाच्या निमित्ताने माझा अनेक क्षेत्रांतील लोकांशी संपर्क येतो. या प्रवासात मी व्यवसायातील अनेक चढ-उतार पाहिले, पण ‘कष्टाला आणि प्रामाणिकपणाला कोणताही पर्याय नाही’ या तत्त्वावर माझा ठाम विश्वास आहे.
गेल्या ८-१० वर्षांत समाजात तथाकथित ‘वास्तुशास्त्र’ आणि ते सांगणार्या भोंदू, ठग लोकांचे पेव फुटले आहे. हे मी खूप जवळून अनुभवले आहे. ही लोकं अशा गर्भश्रीमंत आणि व्यावसायिक आसामींच्या शोधात असतात, जे स्वतःच्या प्रगतीसाठी, अपयशाच्या भीतीपोटी किंवा कुटुंबाच्या सुखासाठी कोणताही खर्च करायला तयार होतात. एकदा का असे ‘सावज’ सापडले की हे भोंदू आपले जाळे फेकण्यास सुरुवात करतात.
माझा स्वतःचा एक अनुभव या संदर्भात सांगण्यासारखा आहे. माझ्या करिअरची सुरुवात झाली होती, तेव्हा मी इकडून-तिकडून हातउसनवार करून रकम गोळा केली आणि माधवनगर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सन २००८ मध्ये व्यवसायासाठी एक भूखंड खरेदी केला. आमच्या सहकार्यांमधील एक ओळखीचा वास्तुशास्त्र सांगणारा माणूस माझी पाठच सोडत नव्हता. “हा प्लॉट वास्तुशास्त्रानुसार नाही, तो तुम्हाला लाभदायक ठरणार नाही”, असे तो सतत सांगायचा. माझ्यावर माझे वडील (जे शिक्षक होते) त्यांच्या विचारांचा पगडा होता, तसेच लाटमधील आदरणीय जोखे सरांचे विचारही कानावर पडत असत. त्यामुळे मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
दरम्यानच्या काळात एक दुर्दैवी घटना घडली; माझ्या वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या जाण्याने मी खचलो असताना या वास्तुशास्त्राने पुन्हा उचल खाल्ली आणि तो मला मानसिक डोस देऊ लागला. “प्लॉटच्या दोषामुळेच हे घडले”, असे भासवू लागला. त्या कठीण काळात माझे काका, जे बी.ई. (इंजिनिअर) होते, त्यांनी मला मोठा धीर दिला. ती सांगणारी व्यक्ती कशी चुकीची आहे आणि वडिलांच्या मृत्यूमागील वैद्यकीय व वैज्ञानिक कारण काय होते, हे मला व्यवस्थित समजावून सांगितले. त्यांनी मला तो भूखंड विकण्यापासून परावृत्त केले.
आज त्याच वास्तुशास्त्रानुसार ‘शापित’ ठरवलेल्या भूखंडावर माझे एक अत्याधुनिक वर्कशॉप उभे आहे! एवढेच नव्हे, तर ती जागा कमी पडू लागल्याने मी लगतचा भूखंडही खरेदी केला आहे. पुढे जेव्हा मी प्रशस्त राहण्यासाठी २०१८ साली दुसरी जागा घेतली, तेव्हाही पाया खोदताना “येथील पाया हार्ड (घट्ट) नाही” अशा चुकीच्या संकल्पना मांडून मला विचलित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, मी वास्तुविशारद आणि इंजिनियर्सवर भरवसा ठेवून काम पूर्ण केले. आज माझ्या घरात पूर्ण सुख, शांती आणि समाधान नांदत आहे. काही लोक घरात आल्यावर आजही सांगतात की, “किचनमध्ये दोन खिडक्या आहेत, त्या लाभदायक नाहीत.” परंतु, मला त्या दोन खिडक्यांमुळे किचनमध्ये उत्तम (हवेशीरपणा) मिळते, हेच माझे सुख आहे!
“तुमच्या घराची किंवा कारखान्याची दिशा चुकीची आहे”, “ईशान्य कोपर्यात दोष आहे”, “अमकी भिंत पाडा, तमकी वस्तू बदला”, अशी भीती घालून हे भोंदू घरमालकाला किंवा कुटुंबप्रमुखाला एका प्रकारे संमोहित करतात. आजकालच्या सुशिक्षित आणि नवीन पिढीतील तरुण मुलांना हे साफ चुकीचे आहे आणि यात केवळ फसवणूक होत आहे, हे स्पष्ट समजत असते. परंतु, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या कुटुंबप्रमुखाला समोर जाऊन ठामपणे सांगायची घरातील कोणाची प्राज्ञा नसते. परिणामी, घरात विनाकारण मोडतोड केली जाते, लाखो रुपयांची उधळपट्टी होते आणि घरात नाहक मानसिक ताण निर्माण होतो.
काही काळाने जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा लक्षात येते की, आपण पूर्णपणे फसले गेलो आहोत. तोपर्यंत आर्थिक आणि मानसिक स्तरावर मोठे नुकसान झालेले असते. या सर्व प्रकारातून मला एक साधा विचार प्रकर्षाने जाणवला की, “जे आपण पेरू, तेच उगवणार” जर आपण कष्ट, नियोजन आणि प्रामाणिकपणा पेरला, तर यश नकीच मिळते; त्यासाठी कोणत्याही तथाकथित वास्तुशास्त्राची गरज नसते. आज जे करोडपती किंवा यशस्वी उद्योजक आहेत, ते त्यांच्या कष्टांमुळे आणि व्यावसायिक कौशल्यांमुळे पुढे आले आहेत, वास्तुशास्त्रामुळे नाही.
मला अशा भोंदू लोकांना एकच रोकडा सवाल विचारावासा वाटतो, जो वास्तुशास्त्रज्ञ इतरांना करोडपती बनवण्याचे, उद्योग वाढवण्याचे किंवा संकटे दूर करण्याचे दावे करतो, तो स्वतःच्या घरात आधी बदल करून स्वतः अब्जाधीश का बनत नाही? तो स्वतः श्रीमंत न होता, पोटापाण्यासाठी आणि दक्षिणेसाठी दारोदारी वास्तुशास्त्र सांगत का फिरत आहे? स्वतःचे भविष्य न बदलू शकणारे हे लोक इतरांचे भविष्य बदलण्याच्या थापा मारतात, हेच मोठे आश्चर्य आहे!
वास्तुशास्त्राच्या नावाखाली चालणारा हा सर्व प्रकार निव्वळ तोतयागिरी, ढोंगीपणा आणि मानसिक शोषण करणारे थोतांड आहे. निसर्गाचे नियम आणि विज्ञानाची कास धरून आपण अशा भोंदूंच्या थापांना बळी पडू नये, हेच मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे आणि समाजालाही हेच सांगू इच्छितो.
– मनोज भरमू शेडबाळे
उद्योजक (हेवी फॅब्रिकेशन)
इचलकरंजी, लाट (ता. शिरोळ)
