अनिल चव्हाण -
मुलांना कल्पनाशक्तीच्या भन्नाट जगामध्ये वावरायला आवडतं आणि ‘अस्संच का?’ या प्रश्नाचं तर्कबुद्धीला पटेल असं उत्तर मिळालेलं देखील आवडतं. त्यांच्या या दोन्ही गरजा पूर्ण करणारं साहित्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये चेटूकमाऊ, कलिंगासुर, वीरा द विनर, अशोक आणि अमिन, राशीभविष्याची ऐशीतैशी ही पाच रंगीत चित्रमय पुस्तके प्रकाशित केली आहेत.
मुलांनी सकस साहित्य भरपूर प्रमाणात वाचावं असं प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला वाटतं! म्हणूनच शोधक बुद्धीला चालना देणारं बालसाहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून करीत आहोत. मुलांच्या सोबतीनं पालक आणि शिक्षकदेखील या पुस्तकांच्या गोष्टींमध्ये रमतील.
ही पुस्तके वैज्ञानिक दृष्टिकोनाचा रुजवा करून निर्भय, विवेकी माणसं घडविण्याच्या प्रक्रियेला हातभार लावेल अशी आम्हाला आशा आहे.
अंनिसच्या बालसाहित्याची ही पाच पुस्तके जास्तीत जास्त मुलांच्या हातात जातील यासाठी आपण शक्य ते सर्व करावे अशी विनंती आहे.
या पाच पुस्तकांमध्ये काय आहे हे जाणून घेऊयात…
चेटुकमाऊ-
माधव गवाणकर यांच्या ‘चेटूकमाऊ’ या पुस्तकात तीन कथा आहेत. काळ्या मांजरासंबंधी गैरसमज दूर करणारी चेटूकमाऊ ही कथा आहे. काळ्या रंगावरून मांजरीला सर्वजण दूर लोटतात. पण एक छोटी मुलगी तिला जवळ करते. संकटाच्या वेळेला तीच काळी मांजर त्या मुलीला वाचवते असे या कथेतून सांगितले आहे.
घुबड या पक्षासंबंधीच्या अंधश्रद्धा दूर करणारी ‘ग्रेट गडबड गुंडीची गोष्ट’ ही कथा घुबड दगड उगळते आजारी पाडते, अशुभ असते इत्यादी अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न या कथेमधून केला आहे.
काल्पनिक अघोरी शक्तीची भीती ‘कापसू आणि मंतरमियाँव’ या कथेमधून दूर केली आहे. कापसू हा धांदरट वेडपट आणि इतरांच्या बोलण्यावर विचार न करता विश्वास ठेवणारा ससा आहे. तो अंधश्रद्धेला बळी पडतो. पण बुद्धिमान हत्ती त्याला वाचवतो आणि शहाणे करतो.
कलिंगासूर –
या पुस्तकात सुधीर जोगळेकर यांच्या तीन कथा आहेत. कलिंगासूर या कथेमध्ये दृष्टिभ्रमामुळे निर्माण होणारी अंधश्रद्धा दाखवली आहे. कलिंगडाबद्दल माहिती नसल्याने त्याला असुर समजून गावकरी घाबरतात. अज्ञानातून अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि ज्ञानाच्या प्रकाशाने अंधश्रद्धा दूर होतात; हा अनुभव कथेत मांडलेला आहे.
‘अपशकुनी’ या कथेत मांजराबद्दलच्या गैरसमजुती दाखवल्या आहेत. व्यवहारातील घटनांचा एकमेकांशी बादरायण संबंध जोडला जातो; याची उदाहरणे या कथेमध्ये आहेत.
‘खेळखंडोबा’ ही कथा चेटूक, भानामती यावर भाष्य करते. लहान मुलांच्या भांडणात लक्ष घालणारे दोन शेजारी चेटूक, करणी करणार्या मांत्रिकांच्या नादी लागतात. पण कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी समंजसपणा दाखवला तर भांडणे आणि अंधश्रद्धाही थांबू शकतात, हे या कथेतून कळते.
वीरा द विनर –
या पुस्तकामध्ये अनिल चव्हाण यांच्या ‘मिडब्रेन एक्टिवेशन,’ ‘मॅग्नेट थेरपी’ आणि ‘तीन- तेरा- तेविस’ अशा तीन कथांचा समावेश आहे.
देवधर्म, अध्यात्म, आत्मा- परमात्मा भूत, स्वर्ग नरक, करणी अशा अंधश्रद्धा आणि त्यावरील बुवाबाजी आपल्याला परिचित आहे; पण यातील काहीही न वापरता, विज्ञानाची भाषा वापरून, विज्ञानातील माहिती वापरून सुद्धा लोकांना फसवता येते; याला सूडो सायन्स किंवा फसवे विज्ञान म्हणतात. अंधश्रद्धा ही धार्मिकच असते असे नाही. विज्ञानासंबंधी सुद्धा अंधश्रद्धा असतात, म्हणून विज्ञानाची माहितीही तपासली पाहिजे. चिकित्सा करूनच स्वीकारली पाहिजे, हे या कथा सांगतात.
वीरा ही बालवयाची मुलगी आपल्या भावंडे आणि सवंगड्यांच्या सहाय्याने सूडो सायन्सची फसवा फसवी उघड करते. मेंदूचे दोन भाग आहेत; उजवा आणि डावा. दोन्हीच्या मधल्या भागाला मिड ब्रेन म्हणतात. तो अॅक्टिव्हेट बुद्धी स्मरणशक्ती वाढवता येते असे काही मंडळी म्हणतात. प्रत्यक्षात केवळ हातचलाखी करून ते कसे फसवत असतात हे ‘मिड ब्रेन अॅक्टिवेशन’ या कथेत सांगितले आहे.
लोहचुंबकाकडे लोखंड आकर्षिले जाते आणि रक्तात लोहकण असतात, या गुणधर्मांचा वापर आजार बरा करण्यासाठी करता येतो, या चुकीच्या कल्पनेवर चुंबक चिकित्सा केली जाते. लाखो कोट्यवधीचा धंदा या कल्पनेवर उभा आहे! प्रत्यक्षात रक्तामधील लोहकण संयुगाच्या स्वरूपात असतात. त्यांच्यावर लोहचुंबकाचा परिणाम होत नाही. हे ‘मॅग्नेट थेरपी’ या कथेत दाखवले आहे.
‘तीन- तेरा- तेवीस’ ही कथा संख्याशास्त्राच्या (न्यूमरोलॉजीच्या) फसव्या विज्ञानावर प्रहार करते. शुभ अशुभ अंक ही एक नवी अंधश्रद्धा वाढते आहे, तिला या कथेतून पायबंद बसेल.
अशोक आणि अमिन –
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक राजीव तांबे यांनी लिहिलेली ‘अशोक आणि अमिन’ या दोन मुलांची ही कथा आहे. मुंबईमधील एका वस्तीत विविध जाती-धर्माची माणसे राहतात. जीवनाच्या संघर्षात त्यांना एकत्र यावे लागते. त्यातून मैत्री, प्रेम, बंधुभाव तयार होतो. संकटकाळात एकमेकांना आधार देतात, संकटाशी एकदिलाने दोन हात करतात; आणि जिंकतातही. मग ते संकट नैसर्गिक असो की मानवनिर्मित. बंधुभाव देशप्रेम अशा प्रेरणा लहान मुलांनाही मोठी कामे करायला ऊर्जा देतात. प्रेमाने प्रेम वाढते. मार्ग चुकलेल्याना योग्य दिशा मिळू शकते. याच मार्गाने आपला देश पुढे जाऊ शकतो; हे या कथेमधून सांगितले आहे.
राशिभविष्याची ऐशी तैशी –
या पुस्तकामध्ये तीन लेखकांच्या तीन वेगवेगळ्या कथा आहेत. विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर यांच्या ‘राशिभविष्याची ऐशीतैशी’ या कथेमध्ये ‘प्रवास टाळावा’ असे आपल्या सिंह राशीतील भविष्य वाचून प्रतीक सहलीला जायचे टाळतो. शेवटी त्याला आपली चूक कळते. राशिभविष्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही हे विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर यांनी या कथेतून पटवून दिले आहे.
ग्रामीण कथाकार रघुराज मेटकरी यांच्या ‘देवरसी विठ्ठलबापू’ या कथेमधून अंनिसचे कार्यकर्ते भोंदूबाबांचा पर्दाफाश करताना दाखवले आहेत. एका शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे सप्रयोग व्याख्यान दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी विचार करू लागतात. असे विद्यार्थी शिक्षकांच्याकडे आपल्या गावातील भोंदूबाबाची तक्रार घेऊन येतात. विद्यार्थी, शिक्षक आणि अंनिस कार्यकर्ते एकत्र येऊन भोंदूबाबाचा भांडाफोड कसे करतात हे वाचायला तुम्हाला नक्की आवडेल.
प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांनी लिहिलेल्या ‘ग्रहणाची भीती’ या कथेमधून गरोदर महिलांमध्ये ग्रहणाविषयी असलेले गैरसमज दूर केले आहेत. ‘ग्रहण काळात काही खाऊ पिऊ नये; नाहीतर मूल व्यंग घेऊन जन्मते!’ या अंधश्रद्धेला बळी पडून शुभदा ही गरोदर तरुणी काहीही न खाता-पिता आठ नऊ तास उपाशी राहते! परिणामी डिहायड्रेशन होऊन तिला हॉस्पिटलला न्यावे लागते. या घटनेमुळे ग्रहणासंबंधीच्या अंधश्रद्धांवर महिलांमध्ये जी चर्चा होते ती या कथेत छानपणे सांगितली आहे!
विद्यार्थी युवकांसाठी सकस साहित्य निर्मिती झाली तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील म्हणून, किशोरवयीन मुले आणि युवक नजरेसमोर ठेवून या पाच पुस्तकांचे संपादन करण्यात आले आहे!
विद्यार्थ्यांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल याची खात्री आहे. कुमार वयाला योग्य अशी सोपी भाषा या सर्व कथांमध्ये वापरली आहे. मुलांच्या सोबत पालकांच्याही ज्ञानामध्ये भर घालणार्या अशा या कथा आहेत. बालवाचक या पाच पुस्तकांचे नक्की स्वागत करतील असा विश्वास आहे.
प्रकाशक- अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र
पाच पुस्तकांच्या एका संचाची किंमत रु.५५०/-
सवलतीत रुपये ३००/-
पुस्तकासाठी संपर्क : सुहास -९९७०१७४६२८
