प्रभाकर नानावटी -

अध्यात्माच्या व मनःशांतीच्या नावाखाली अनेक बुवा-बाबा उच्च वर्गातीलच नव्हे, तर मध्यमवर्गालाही फसवत आहेत. सत्संगाच्या प्रवचनातील गर्दी अशाच वर्गातील भक्तांनी भरलेली दिसेल. एक मात्र खरे की, बुवाबाजीचा हा अखंड स्रोत कितीही कमी झाल्यासारखा वाटत असला तरी, तो कुठे ना कुठे तरी डोके वर काढत आहे, याची प्रचिती या सदरातील लेख वाचताना वाचकांच्या लक्षात येईल. महर्षी महेश योगी, आसाराम बापू, सत्य साईबाबा, चंद्रास्वामी, बाबा रामदेव, श्रीश्री रवीशंकर, मोरारी बापू, सद्गुरुजग्गी वासुदेव, भय्यू महाराज, निर्मलादेवी, अमृतानंदमयी माँ यांच्यानंतरची बाबा-बुवांची पिढी कार्यरत होत आहे.
या सदरात फादर अंकुर (योसेफ) नरुलावरील लेखाप्रमाणे बाबा भोलेनाथ, काश्मीरचे गुलाम रसूल, नित्यानंद, वीरेंद्र देव दीक्षित इत्यादी अलीकडील ‘गुरुं’च्या बद्दलचे लेख दरमहा प्रसिद्ध केले जातील. त्याच प्रमाणे पंजाबमधील डेरा, केरळमधील मारियन श्राइन याबद्दलही माहिती दिली जाईल. आपल्या कार्यकर्त्यांना व वाचकांना या सदरातील लेख नक्कीच आवडतील.
पंजाबमधील जालंधर येथील नेहमीची रविवारची घाई-गडबड नसलेली सकाळची वेळ. भुरभुर पाऊसही होता, काही सरी पडून गेल्या होत्या. हळूहळू ढगातून सूर्य डोकावत होता. निसर्गाच्या विविध छटांचे दर्शन घडत होते; परंतु तेथून फक्त २३ मिनिटांचे ड्राइव्ह केल्यानंतरच्या गावात मात्र एखाद्या लग्नसमारंभासारखा माहोल होता. कारण त्या छोट्याशा गावात एशिया खंडातच सर्वात मोठे व अत्यंत वेगाने वाढत असलेल्या ख्रिश्चन धार्मिक समुदायाचे चर्च होते. पंजाबमधील इतर ठिकाणी ख्रिश्चन अनुयायी व त्यांचे चर्च असले तरी, ते विखुरलेले व बोटावर मोजता येईल एवढेच चर्चला जाणारे असतात. येथे मात्र चर्चच्या व्हरांड्यात मोठ्या प्रमाणात या धार्मिकांची गर्दी जमली होती. सर्व परिसर लाउडस्पीकरवरील कर्कश आवाजातील येशू ख्रिस्तांच्या प्रार्थनेने व्यापला होता. अधून मधून जमलेले भक्त त्या स्पीकरच्या आवाजात आपले आवाजही मिसळत होते. आवाज वाढतच होता व उपस्थित भक्तगणात ऊर्जा संचारल्यासारखे वातावरण धुंद झाले होते.
नाकोदर रस्त्यावरील या गावात शीख धार्मिकांसाठी गुरुद्वार होते व हिंदू धार्मिकांसाठी देवळंही तेथे होते. परंतु त्या दिवशी मात्र सर्व रस्ते खांब्रा चर्चकडेच जात होते व हे चर्च म्हणजे भक्तिमार्गाचे अंतिम उद्दिष्ट असावे असे वाटत होते.
दर महिन्याला, शेकडो लोक- मुख्यतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील दलित तसेच पगडीधारी शीख- चर्चमध्ये बाप्तिस्मा घेण्यासाठी जमतात. आजकाल तर यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध आहे. घरी बसल्या बसल्या एका क्लिकमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारता येते. ही संस्था ख्रिश्चन विवाहेच्छुकांसाठी विवाह मंडळही चालवते. परदेशी जाणार्या धर्मांतरित तरुण-तरुणींना विसा-पासपोर्ट हवे असल्यास हे काम करणार्या खासगी दलालामार्फत मिळवून देण्यासही जबरदस्त फी आकारून मदत करते.
१०० एकर परिसरात पसरलेले हे ‘चर्च ऑफ साइन्स अँड वंडर्स’ काही वर्षांपूर्वीपासून भरपूर प्रसिद्धीस आले. एका बिगर-ख्रिश्चन पंजाबी खत्री कुटुंबात जन्मलेला अंकुर नरुला, हा या चर्चचा पास्टर होतो व या चर्चचा मुख्य सूत्रधारही होतो. जालंधर-स्थित एका व्यावसायिकाचा मुलगा, जीवन नरुला, उर्फ अंकुर (योसेफ) नरुला (वय वर्षे ४०) हा मुळात संगणक अभियंता होता. त्याने २००४ मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्याच्या या धर्मांतर करण्याच्या निर्णयावर एका पाद्रीचा प्रभाव पडला होता म्हणे. या पाद्रीने त्याला ड्रग्स आणि नैराश्यापासून मुक्त होण्यास भरपूर मदत केली. आता हाच पाद्री होऊन प्रार्थनेद्वारे आणि हस्तस्पर्शाद्वारे भक्त गणांवर आध्यात्मिक उपचार प्रदान करतो.
एका मोठ्या स्टेजवर चर्चचा बँड येशूची स्तुती करणारी गाणी वाजवत होता. तेथील एक अनाउन्सर अधून मधून माइकवरून जमलेल्या भाविकांना ‘एक साथ हात वर करून, डोळे मिटून प्रार्थना म्हणण्या’ची सूचना देत होता. गर्दीच्या चारी बाजूला मोठ मोठे व्हिडिओ स्क्रीन्स आणि प्रोजेक्टर्समधून येशूच्या चमत्कारांचे व त्या चमत्कारामुळे रोगमुक्त झालेल्यांचे चित्रण सतत दाखविले जात होते. बरेच लोक गाण्याचे ताल धरून हातवारे करत नाचत होते. स्टेज समोरची मोकळी जागा गच्च, खचाखच भरलेली होती. बरेच लोक ‘आत्मा ढवळून निघणार्या’ येशूच्या भजनांना प्रतिसाद देत धुंदीत नाचत होते. सर्व वातावरण येशू भक्तीने भारलेले होते. तितक्यात तेथे अंकुरची पत्नी, सोनिया योसेफ नरुला, स्टेजवर आल्यानंतर सगळीकडचा गोंगाट थांबला. तिने माइकचा ताबा घेतला. ती बायबलमधील वचने वाचून दाखवू लागली. चर्चच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करण्यास उपस्थितांना आवाहन करू लागली. ‘येशूला पूर्णपणे शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ यावर तिचा जोर होता. “केवळ तोच (येशू) तुमच्या शरीरातील दुष्ट आत्म्यांना बाहेर काढू शकतो, तुमचे जुनाट आजार, औषधाविना बरे करू शकतो, तुमच्यातील ताण कमी करू शकतो, आर्थिक समस्यापासून मुक्त करू शकतो. हे सर्व करण्याचे सामर्थ्य फक्त त्याच्याकडे आहे…” असे ती सांगत होती.
तिचे हे प्रवचन संपल्यानंतर ती मागच्या रांगेतील एका खुर्चीवर जाऊन बसली. काही मिनिटांनंतर अत्यंत नाट्यमय रीतीने नरुला पाद्रीने स्टेजवर प्रवेश केला. बँडवाले जोर जोराने गाणे ऐकवू लागले. गर्दीत स्फोट झाला की काय असे वाटू लागले. बेहोश झाल्यासारखे गर्दी मोठमोठ्यांदा घोषणा देऊ लागली. ‘पप्पाजीं’च्या स्वागताची ही पद्धत होती.
चर्चच्या अनुयायांमध्ये सर्व वयाचे व जातीचे लोक होते. काहीजण व्हीलचेअरध्ये बसून दुखणे सहन करत होते. काही महिला मुला-बाळांना घेऊन आल्या होत्या. पप्पाजीने त्यांना आशीर्वाद द्यावे, ही त्यांची अपेक्षा होती. सर्व जण सकाळी सकाळीच येथे येऊन पोचले होते. काही जण रात्रीच्या मुक्कामाला आले होते. सगळे जण एका घाईघाईने ठोकलेल्या कामचलाऊ तंबूच्या सावलीत कसेबसे बसले होते. ऊन वाढत होते. पन्नासेक कूलर्समधून थंड हवा येत होती. तेवढ्यावर सर्व अनुयायी खूश होते.
सुमारे पाच हजार तरी सेवादार (स्वयंसेवक/स्वयंसेविका) तेथे असावेत. पांढर्या गणवेशात वावरणार्या या सेवादारांच्या छातीवर या चर्चची खूण असलेले बिल्ले होते. इकडून तिकडे व तिकडून इकडे हिंडणारे हे सेवादार परगावाहून आलेल्या भक्तांची काळजी घेत होते. स्टेजजवळील रांगेत ठेवलेल्या पांढर्या प्लास्टिक खुर्च्या विशेष अतिथींसाठी राखीव होत्या. ७० वर्षे वयाचे नरुलाचे वडील, जीवन नरुला व आई पुष्पा स्टेजजवळील खुर्चीवर मुदडून बसलेले होते.
ठिकठिकाणी बॅरिकेड्स व CCTV कॅमेरांचे जाळे यामुळे सुरक्षा व्यवस्थेत कुठलीही कमतरता नसेल याची काळजी घेतली जात होती. कुठल्याही प्रकारच्या माध्यमाला तेथे प्रवेश नव्हता. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मोबाइल्स यांच्यावर संपूर्ण बंदी. चर्चच्या आवारातील बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांची नजर चुकवून काहीही बाहेर कळणे शक्य नव्हते. कदाचित चर्चचीच स्वतंत्र अशी स्वयंसेवकांची सीआयडी टीम्स्ही तेथे असतील. गेटच्या येथील मेटल डिटेक्टर वापरून प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. संशय घेण्यासारखे काहीही आढळले तर सळो की पळो केले जात होते. नरुलाची ही कडक सुरक्षाव्यवस्था त्याच्या भोवतीच्या वलयाला रेखांकित करत होती. भेटीस आलेल्या भक्तांना नरुलानी स्वतःभोवती विणलेल्या सुरक्षाचक्राने त्याचे महत्त्व आश्चर्यचकित करत होते.
प्रवचन सुरू होता क्षणी गर्दी शांत झाली. तरीही अधून मधून गर्दीतून ‘अमेन’ असा आवाज ऐकू येत होता.
संपूर्ण अंगभर पांढरे शुभ्र कपडे घातलेला व हातात पोर्टेबल माइक घेतलेला पाद्री नरुलाची उपस्थितीच गर्दीला भावनावश होण्यास पुरेसे होते. सर्व अनुयायी हाताची घडी करून, डोळे मिटवून उभे होते. बायबलच्या वचनाच्या/गाण्याच्या ठेक्याबरोबर महिला भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अश्रूद्वारे त्यांच्या हृदयात असलेला दुष्ट आत्मा व होणार्या वेदना, दुःख निघून जात असावेत.
याच गर्दीत कुठेतरी ४० वर्षे वयाचा संदीप कुमार होता. दलित समाजातील हा युवक मृत जनावरांची कातडी सोलण्याचा उद्योग करत होता. पक्का दारुड्या असलेल्या या युवकाने काही वर्षांपूर्वी त्याच्या गावातील या पाद्रीचे चमत्कारावरील पोस्टर्स बघून तो नरुलाला भेटला. नरुलाच्या चमत्कारामुळे शेकडो जुनाट रोग असलेले रुग्ण पूर्ण बरे झाले होते. हे सर्व ऐकून त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. “येथील चर्चला आल्यापासून मी पूर्णपणे दारू सोडली. गेली दहा वर्षे दर रविवारी न चुकता आर्यनगरहून ४० किलोमीटर्स सायकलीवरून खाम्ब्रा गावी प्रार्थनेसाठी मी येतो. मी दारूपासून मुक्त झालो. माझे भाऊ व त्यांचे कुटुंब गावातच आहेत. त्यांनी धर्मांतर केले नाही. ती शिकलेली. त्यांचा ख्रिश्चन धर्माच्या शक्तीवर विश्वास नाही. नुकसान त्यांचेच होणार.”
तेथेच जवळपास दोन चर्च आहेत- एक चर्च धर्मांतरित झालेला हरियानाचा जाट व स्वतःला ईश्वरप्रेषित म्हणवून घेणारा बजिंदर सिंग याचे चर्च आहेत. त्याची उपचार पद्धतीसुद्धा चमत्कारसदृशच आहे, असे त्याच्या अनुयायांना वाटते. तो अस्खलित पंजाबी बोलतो व कॅमेराच्या उपस्थितीत उपचार करतो. शेकडो लोकांच्या समुदायासाठी प्रार्थना व सत्संग प्रवचन आयोजित करतो. २०१६ पासून त्याचे हे पेंटाकोस्टल चर्च असून चर्च ऑफ विजडम अँड ग्लोरी या नावाने ते ओळखले जाते.
या चर्चच्या जवळच्या खोजेगाव (कपुर्थळा जिल्हा) या खेड्यात जाट शीख कुटुंबात जन्मलेल्या हरप्रीत देवल या पाद्रीचे चर्च असून त्याच्या अनुयायांची संख्यासुद्धा कमी नाही. त्याचेही उपचार चमत्काराच्या सदरात मोडतात. त्याचे बहुतेक अनुयायी पंजाबमधील दलित व गरीब कुटुंबातले आहेत. परंतु धर्मोपदेशक नरुला वा पाद्री बजिंदर सिंग यांच्यापेक्षा हरप्रीत देवल याला मुक्तद्वार चर्चचा (Open-door Church) वारसा मिळाला आहे. देवलचे वडीलही धर्मोपदेशक होते व त्यांना ऑस्ट्रेलियन पाद्रीने शिक्षित केले होते.
या सगळ्या धर्मोपदेशकांच्याबद्दल काहीना काही अफरातफरीच्या, भानगडीच्या कथा ऐकीवात असल्या तरी, त्यांचा इतिहास त्यांचे भक्त उगळत बसत नाही. त्यामुळे त्यांच्या अपार श्रद्धेला तडा जात नाही व भक्तांची संख्याही कमी होत नाही. दलित व शीखधर्मीयांचे ख्रिश्चन धर्मांतरित होणे हे आता पंजाबमध्ये शिळा विषय झाला आहे. अधूनमधून बहुजन समाज क्षीण आवाजाने आरडा-ओरडा करत असला तरी, त्याचा काही उपयोग होत नाही.
फादर नरुलाची गोष्टच वेगळी आहे. त्याची कीर्ती भारतातच नव्हे तर, जगभर पसरलेली असून ती कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. शहरा-शहरामध्ये, हायवेवर ठिकठिकाणी राजकीय पुढार्यांच्या व मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीच्या बॅनर्सपेक्षा नरुलाचेच बॅनर्स जास्त संख्येत असावेत. त्याचे स्वतःचे सातही दिवस २४ तास चालणारे टीव्ही चॅनेल्स आहेत. यूट्यूबसारख्या समाजमध्यामावर त्याचा उदोउदोे २४ तास चाललेला असतो. या चर्चद्वारे खांब्रासारख्या खेड्यात IAS, IPS चे कोचिंग कॉलेजही सुरू आहे.
“आमच्या भारत व भारताबाहेर मिळून १२५ शाखा आहेत. दर रविवारी दीड ते दोन लाख अनुयायी न चुकता प्रार्थनेला येतात.” जतिंद्र मसीहा गौरव सांगत होता. हा नरुलाचा अगदी जवळचा भक्त. श्रद्धेच्या दबावाखाली वा उपचार करून एकही धर्मांतर झालेले नाही व होत नाही असा दावा तो करतो. त्याच्या मते येथे सर्व काही पारदर्शक व कायदे-कानून पाळून काम केले जाते.
खेत मझदूर संघटनेच्या तरसीम पीटर या दलित-ख्रिश्चनच्या मते पंजाबच्या सुपीक प्रदेशातील जालंधरच्या जवळपास सुमारे २५-२६ तरी चर्च असतील. ख्रिश्चन मिशनरीने चालविलेल्या चर्चपेक्षा हे चर्च अत्यंत वेगळे आहेत. या चर्चचे अनुयायी प्रामुख्याने दलित समाजातून आलेले असतात व त्यांना त्यांच्या आरोग्य व आर्थिक समस्यांवरील उपायांची अपेक्षा असल्यामुळे ते पाद्रीच्या (खोट्या) आश्वासनाना बळी पडतात. येथे धर्माचा, धार्मिक तत्त्वांचा काही संबंध नसून निव्वळ दादागिरी करणारे धर्मोपदेशकच त्यांना हवे असतात. यातील काही चर्चच्या जाहिरातीवरील खर्चच पंजाब प्रशासनाच्या जाहिरातीवरील खर्चापेक्षा जास्त असावा. हे सर्व कुठून येते हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
पंजाबमध्ये शीख, हिंदू दलित वा दलित शीख यांचे वेगवेगळे डेरा असतात. गंमत अशी आहे की, या चर्चचे व्यवस्थापन उच्चवर्णीय धर्मांतरित ख्रिश्चनांच्या हातातच असते. खालच्या जातीचा म्हणून अन्यायग्रस्त असलेले, हाताला काही तरी उद्योग मिळेल या आशेने डेराला दर आठवड्याला ते भेट देत असतात. काही दलितांच्या शेतीच्या समस्या असतात; काहींची शेतजमीन हडपलेली असते; काहींच्या कौटुंबिक समस्या असतात; काही जण आजारी पडलेले असतात अशा अनेक प्रकारच्या समस्यांवर काही तरी उपाय सापडेल म्हणून ही अगतिक मंडळी प्रार्थनेच्या निमित्ताने जमत असतात.
पीटरच्या मते २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाने चर्चच्या उद्योगाला उत्कर्षावस्थेत पोचविले आहे. मोबाइल, इंटरनेट, वाट्सअॅप, यूट्यूबसारख्या समाजमाध्यमांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमविणे, सत्संगांचे आयोजन करणे, संवादशैलीतून गर्दीला प्रभावित करणे शक्य होत आहे. दिवसेंदिवस यांच्या पंथा(cult)चा प्रसार होत आहे. चर्च व गुरुद्वाराला भेट देणारे आपापल्या समस्येला तात्कालिक उपाय शोधण्यासाठी येतात. गंमत अशी आहे की, हे चर्च वा गुरुद्वाराचे व्यवस्थापन अजूनही उच्चवर्णीयांच्या हातातच असून दलित ख्रिश्चनांचा तेथे सहभाग नसतो.
गेल्या वर्षी आयकर विभागाने जालंधर, अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांतील पास्टर नरुला आणि इतर २५ चर्चवर विदेशी निधीची अफरातफर आणि देणग्यांबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी छापे टाकले होते.
पेंटेकोस्टल चर्चने युनायटेड पंजाब पार्टी नावाची एक राजकीय संघटनाची स्थापना केली व त्या द्वारे आपले राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश न आल्यामुळे या चर्चने आम आदमी पार्टीचे उमेदवार सुशील कुमार रिंकू यांना पाठिंबा दिला. नंतर रिंकू भारतीय जनता पक्षा(भाजप) मध्ये सामील झाल्यामुळे चर्चचे स्वप्न अधूरेच राहिले. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा दलित चेहरा असलेला चरणजित सिंग चन्नी यांच्याकडून रिंकूचा पराभव झाला.
पंजाबचे प्रशासन चर्चच्या कुठल्याही व्यवहाराची दखल घेत नाही. काही वर्षांपूर्वी संशयास्पदरीत्या एका कॅन्सर रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचे धागेदोरे चर्चपर्यंत पोचलेले असल्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. “प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे,” असे म्हणत हे प्रकरण मिटविले गेले.
“आम्ही या चर्चबरोबर अजिबात संबंध ठेवत नाही. पंजाबमधील आमचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. आमचा चमत्कारावर, फेथहीलिंगवर वा प्रार्थनेच्या जाहिरातबाजीवर विश्वास नाही. सरकारला जे योग्य वाटते ते करू शकते. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही.” बिशप ऍग्नेलो रुफिनो ग्रेसियास असे ठामपणाने आपली बाजू मांडत होते.
झारखंडमधून आलेली सुनीतादेवी खोजेवाला येथील चर्चला नियमितपणे भेट देत होती. “मी जालंधरला माझे पती व मुलाबरोबर आले. माझ्या मुलाला बरे करण्यासाठी आले. माझा मुलगा लहानपणापासून बोलत नाही. आम्ही भरपूर ठिकाणी त्याला दाखविले, भरपूर पैसे खर्च केले. शेवटी आम्ही येथे आलो. जीससच्या आशीर्वादामुळे माझा मुलगा चंगा (चांगला) होईल.” सुनीतादेवी सांगत होती.
बालंदा खेड्यातील पास्टर सुरिंदर मसीहाने अगदी लहानपणीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याच्या मते हिंदू व शीख समाजातील जातीपातीतील भेदामुळे व खालच्या जातींना देत असलेल्या वाईट वागणुकीमुळे ते स्वतःचे धर्म नाकारत असून स्वतःहूनच ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. हिंदू दलितांनी धर्म बदलला तरी नाव बदलत नाहीत व कागदोपत्री ते मागासवर्गीयच असतात. आरक्षणाचे लाभही उठवतात. “माझ्यासारखे मोजकेच ख्रिश्चन कागदावरील नोंदी बदलतात. माझ्या मुलांची नावेसुद्धा ख्रिश्चनसारखी असून कागदोपत्रीसुद्धा ते ख्रिश्चनच आहेत.”
पंजाब ख्रिश्चन आंदोलनाचे प्रमुख, हमिद मसीहा यांच्या मते हिंदू व शीख समाज ख्रिश्चन समाजाला काही तरी निमित्त शोधून बदनाम करत असतात. त्या समाजाला दहशत माजविणारे म्हणून आरोप करतात. “आम्हाला राजकीय आवाज नसल्यामुळे आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही. ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरासाठी पैसे देतात हे साफ खोटे आहे. सुरेश सेठी हे लेखक पंजाब राज्याने दहशतवादाचा भेसूर चेहरा बघितला आहे. परंतु ड्रग्स, स्थलांतर, धर्मांतर व बाजारीकरण इत्यादींच्या विळख्यात आजचा पंजाब सापडला आहे. ही एक नवीन ट्रेंड विकसित होत आहे.” असे म्हणाले.
या राज्यासाठी भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे आपण सांगू शकत नाही, परंतु अंकुर नरुला सारख्यांनी मात्र जालंदरला धर्मांतराची राजधानी करून ठेवलेले आहे, हे आपण नाकारू शकत नाही.
– प्रभाकर नानावटी
संदर्भ : आउटलूक