जगदीश परदेशी -
छ.संभांजीनगर येथे सातारा परिसरातील एका घरात बाबा उपचाराच्या नावाखाली गोरखधंदा करीत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जगदीश परदेशी यांच्याकडे आली होती. याबाबत काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, भंडारा व पाणी देऊन अनेक रोग बरे करण्याचा दावा करणारा बाबा हा सामान्यांना गंडवत असल्याचे लक्षात आले. तक्रारीनंतर साईनगर गल्ली नंबर ३ येथील गौतम पतंगे (बाबा) यांच्या घरावर रविवारी सकाळी सातारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी याबाबत काही भाविकांना विचारले असता, अनेकांनी सांगितले की, आम्ही दारू सोडवण्यासाठी, डायलिसिस झालेल्या रुग्णाने तर भंडारा देण्यासाठी आल्याचे सांगितले. बाबा आमच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेत नाहीत. पोलिसांच्या कारवाईनंतर बाबाचे हे उपचार तूर्त बंद करण्यात आले असून याप्रकरणी सातारा पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. अनेक लोक हे दारू सोडवण्यासाठी येत असतात.
ज्यांना नोकरी लागत नाही. लग्न होत नाही, दूर्धर आजार असलेल्या नागरिकांवर उपचार केले जातात याची प्रसिद्धी करून एक बाब अंधश्रद्धा पसरवत असल्याचे समजले. नारळ, पाणी वगैरे आणून देऊन, तसेच काही फिस घेतली जाते. आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक होण्याची शक्यता आहे. डॉक्टर नसताना रुग्णांना तपासले जाते. दारू सोडवण्याच्या नावाने केमिकलयुक्त पाणी दिले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सर्व प्रकरणाचा तपास व्हावा म्हणून आम्ही या संदर्भात अंनिसच्या वतीने सातारा पोलीस स्टेशन येथे एक निवेदन दिले होते. त्यानुसार आजची कारवाई झाली.
– जगदीश परदेशी, अंनिस छ.संभाजीनगर
