३१ डिसेंबरच्या रात्री अंनिसच्या वतीने राज्यभर ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा उपक्रम

राहुल थोरात -

सातारा शहर

सातारा शहर शाखा व परिवर्तन संस्था, सातारा यांच्या संयुक्त आयोजनातून गेली सतत २० वर्षांहून अधिक पासून वर्षाअखेरीस व्यसन विरोधी मोहीम राबवत आहे. या वर्षीही शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करून शहराच्या केंद्रस्थानी गोळबाग, राजवाडा येथे ‘नो चेअर नो बियर ओन्ली हॅपी न्यू इयर,’ ‘दारू नको दूध प्या,’ ‘व्यसनात रंगला, संसार भंगला’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत दूध वाटप केले गेले.

सदर कार्यक्रमात वारकरी परंपरेचे गायकवाड व त्यांचे सहकारी, परिवर्तनचे उदय चव्हाण व त्यांचे सहकारी, अंनिसचे पदाधिकारी वंदना माने, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, प्रकाश खटावकर, दशरथ रणदिवे, हौसेराव धुमाळ, विजय पवार, वर्षा पवार, दत्ता जाधव, श्रीनिवास जांभळे आणि नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

रहिमतपूर

रहिमतपूर शाखेतर्फे नवीन वर्षाचे आगमन हे ‘दारू न पिता दूध पिऊन करावे,’ असा उपक्रम गेली पंधरा वर्षे राबवला जातो. यावेळी हा उपक्रम शिवम् प्रतिष्ठान आणि रहिमतपूर शाखा असा एकत्रित राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि उपाध्यक्ष इमरान शेख यांच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष इमरान शेख आणि रहिमतपूर नगरीचे पोलीस पाटील दीपक नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. दीपक नाईक यांनी या कार्यक्रमासाठी मोठे योगदान दिले. यावेळी रहिमतपूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना अंनिसचे कौतुक करत “समाजाने नवीन वर्षाचे आगमन हे शांततेत आणि कसलेही व्यसन न करता करावे,” असे सांगितले आणि तरुण पिढीच्या वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली. रहिमतपूर नगरीचे ज्येष्ठ नागरिक माननीय अनंत माने अण्णा व आदर्श शाळा रहिमतपूरचे मुख्याध्यापक अनिल बोधे सर यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी अ‍ॅड. अमर माने, प्रवीण माने, विजय जाधव, राजू सय्यद सर, शिवाजी शिंदे, शंकर कणसे, मधुकर माने, प्रकाश बोधे, नाना राऊत सर, सीताराम माने, मोहसीन शेख आणि गावातील इतर कार्यकर्ते हजर होते.

फलटण

३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचं स्वागत ‘दारू पिऊन नाही तर दूध पिऊन करा, चला व्यसनाला बदनाम करू’ हा उपक्रम मुधोजी कॉलेजच्या प्रांगणात ‘दारू नको दूध प्या,’ ‘मुलांना मुलींना दूध वाटप करू, चला व्यसनाला बदनाम करू’ अशा घोषणा देत विद्यार्थी, विद्यार्थिनींचे व्यसनविरोधी प्रबोधन केले. तसेच त्याचवेळी मअंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य कदम, प्राध्यापक प्रभाकर पवार, सचिन काकडे, आत्माराम बोराटे, आनंद देशमुख, मोहिनी भोंगळे, आरती काकडे, मंदाकिनी गायकवाड, देशमुख, यांची सभासद नोंदणी केली.

पुणे

रास्ता पेठ

३१ डिसेंबर! सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याऐवजी दूध पिऊन करा हा संदेश देण्यासाठी पुणे शाखेने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी ‘द दुधाचा, द दारूचा नाही’ हा उपक्रम राबविला. यावर्षी हा उपक्रम पुण्यात रास्ता पेठ व हडपसर या दोन ठिकाणी घेण्यात आला. ही दोन्ही ठिकाणे पुण्याच्या पूर्व भागात असून तेथे व्यसनांचे प्रमाण अधिक आहे म्हणून ही दोन ठिकाणे आम्ही या उपक्रमासाठी निश्चित केली होती. रास्ता पेठेत दूध वाटपाचा उपक्रम चालू असताना एका ज्येष्ठ महिलेने असे उपक्रम दारूच्या दुकानांजवळ करण्याची गरज अगदी कळकळीने बोलून दाखविली. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी दारूच्या दुकानात दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते ही वस्तुस्थिती आहे.

रास्ता पेठेत दूधवाटपाचा उपक्रम चालू असताना एका व्यापार्‍याने तेथे येऊन अं. नि. स.च्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वर्षी त्यांच्या दुकानाजवळ असा उपक्रम आयोजित करावा त्यास मी सवर्तोपरी मदत करीन, असे मोठ्या आनंदाने सांगितले. हे या वर्षीच्या उपक्रमाचे विशेष म्हणता येईल.

रास्ता पेठ येथील उपक्रमात वसंत कदम, नागेश कवडे, मुक्ता कवडे, श्रीपाल ललवाणी, अ‍ॅड. राम धुमाळ, आनंद कांबळे, डॉ नितीन हांडे, विवेक सांबरे, मंगेश शहा व अनिल वेल्हाळ यांचा सहभाग होता.

हडपसर

हडपसर येथे प्रथमच हा उपक्रम घेण्यात आला. तो यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय जाधव, इंद्रजित देसाई, श्रेया देसाई, नंदिनी जाधव, संजय, मालती, कमलाकर, साधना शिंदे व संतोष मदने यांनी विशेष श्रम घेतले.

वरील दोन्ही ठिकाणी मिळून ३० लिटर दुधाचे वाटप या दिवशी करण्यात आले. ‘नको गुटखा नको बियर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर,’ ‘नको व्हिस्की नको बियर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर,’ ‘खाणार नाही गुटखा पिणार नाही बियर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर’ इत्यादी घोषणा देऊन येणार्‍या-जाणार्‍या लोकांचे लक्ष वेधण्यात येत होते. दोन्ही ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

चाकण

चाकण शाखा आणि मानस मैत्री फाउंडेशन, चाकण यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २०२४ वर्षाला निरोप देत ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ हा उपक्रम राबवला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी लोक दारूचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात व त्यामुळे अपघातही होतात. अशा विविध गोष्टींना आळा बसण्यासाठी चाकण शाखेचे सर्व सभासद व परिसरातील सर्व कार्यकर्ते मिळून हा उपक्रम गेली दहा वर्ष राबवत आहेत.

महात्मा फुले चौक चाकण या ठिकाणी प्रत्येक जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना दुधाचे वाटप करत ‘दारू पिऊ नका, व्यसन करू नका, आपले कुटुंब हीच आपली जबाबदारी, आपण आहोत तर कुटुंब आहे,’ असे सांगितले.

या उपक्रमाला उपस्थित प्राचार्या प्रमिला गोरे मॅडम, विजयकुमार तांबे सर, श्यामभाऊ राक्षे, मनोहर बापू शेवकरी, राजेंद्र खेडकर, उद्योजक निलेश गोरे, नगरसेवक महेशशेठ शेवकरी, चाकण नागरी पतसंस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ कांडगे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण बापू वाघ, चाकण विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजूशेठ खेडकर, बिपीनशेठ रासकर, अ‍ॅड. धनश्री गोरे, वैष्णवी गोरे, मयूर शेवकरी, मधुसुदन शेवकरी, गणेश काळे सर, अरविंद खेडकर, विशाल बारवकर, माधव शेवकरी, मेघराज शेवकरी हे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी मिळून दुधाचे वाटप केले.

नागपूर

‘द दारूचा नव्हे, द दुधाचा,’ ‘नको वाईन नको बियर, हॅपी न्यू इअर, हॅपी न्यू इअर,’ अशा घोषणा देत, महाअंनिस उत्तर नागपूर शाखेचे कार्यकर्ते

व्यसनाचे तोटे सुगतनगर चौक पोलीस चौकी समोरच्या प्रांगणात एकत्रित जमलेल्या जनतेला तळमळीने सांगत होते. कामगार, कष्टकरी, रिक्षावाले व इतर असे गर्दीतून पुढे येत व दुधाचा ग्लास घेत “मी कधीच दारूला हात लावणार नाही म्हणत, स्वतःला सांभाळत दूध प्राशन करत होते. एक बाई पुढे आली व माझ्या या नवर्‍याला दारू सोडवायचे उपाय सांगा म्हणू लागली. बाई व नवरर्‍याचे समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता सांगितला.

३१ डिसेंबर रोजी अनेक जण दारूचा पहिला प्याला हातात घेतात आणि नंतर व्यसनाच्या विळख्यात अडकतात. ते टाळण्यासाठी ‘पहिला दारूचा प्याला हातात घेऊ नका, त्या ऐवजी दूध प्या,’ असा संदेश महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात आला. सुगत बुद्ध विहार समितीचे सचिव कांता प्रसाद रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गंगाधर डेकाटे उपस्थित होते. या प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी दारूचे दुष्परिणाम सांगत, दारूमुळे घरं बरबाद होऊन कुटुंबे कशी उघड्यावर पडतात याचे समुपदेशन केले. कार्यक्रमात दारूविरोधी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद बडगे व चित्तरंजन चौरे यांनी संयुक्तपणे केले तर आभार कोषाध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आनंद मेश्राम यांनी दारू सोडवण्याविषयी स्वरचित कवितेचे वाचन केले. तर पूर्वी दारू पिणार्‍या; पण आता व्यसनमुक्त झालेल्या लोकांनी उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाला आनंद मेश्राम, वर्षा शहारे, प्रिया गजभिये, मनोरमा रामटेके, मीनाताई, अशोक राउत, सुधीर सोनटक्के, यशवंत वानखेडे, गणेश मेश्राम विजयकांत पाणबुडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड

पेण

३१ डिसेंबर रोजी अनेक जण दारूचा पहिला प्याला हातात घेतात आणि नंतर व्यसनाच्या विळख्यात अडकतात. ते टाळण्यासाठी ‘पहिला दारूचा पेला हातात घेऊ नका, त्या ऐवजी दूध प्या,’ असा संदेश देणारा ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम नगरपालिका इमारतीसमोर पेण, जि. रायगड येथे घेण्यात आला. त्यावेळी व्यसनविरोधी घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी एका कार्यकर्त्याने दारू सोडवण्याविषयी स्वरचित कवितेचे वाचन केले. तर पूर्वी दारू पिणार्‍या; पण आता व्यसनमुक्त झालेल्या निवृत्त पोलीस शिपायाने आपले अनुभव सांगितले.

पेण शाखेतर्फे संकल्प व संदेश गायकवाड, मीना मोरे, गीता भानुशाली, प्रा. सतीश पोरे, जगदीश डांगर, एन. जे. पाटील, आदेश पाटील, हेमंत पाटील, मोहिनी गोरे, चंद्रहास पाटील, सूर्यकांत पाटील, सावनी गोडबोले, हे कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही व्यसनविरोधी मोहीम दरवर्षी रोहा शाखा राबवते. या मोहिमेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२४ रोजी अर्थात थर्टी फर्स्टला रोहा शाखेने ‘ ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा’ हा प्रबोधनात्मक उपक्रम रोहा नगर परिषदेसमोर राबवला. रोहेकरांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. दुधाचे वाटप करून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. फरीद चिमावकर यांच्या हस्ते रायगड अंनिसचे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दारूचे पॅक रिचवतच अनेक जण सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र या व्यसनांपासून व दारूपासून लोकांनी प्रामुख्याने तरुणांनी दूर राहावे आणि ‘ना फटाका, ना गुटखा, ना बिअर हॅपी हॅपी न्यू इयर’ म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

याप्रसंगी विजया चव्हाण नागोठणे शाखा कार्याध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. रोहा शाखा कार्याध्यक्ष नंदकिशोर राक्षे यांनी स्वागत तर प्रधान सचिव दिनेश शिर्के यांनी सूत्रसंचालन करून सर्वांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली.

नांदेड

बिलोली

बिलोली तालुक्यातच नाही, तर संपूर्ण देशात ३१ डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अंनिसमार्फत ‘चला व्यसनाला बदनाम करू या!’ या मोहिमेअंतर्गत ‘दारू नको, दूध प्या!’ हा उपक्रम बिलोली येथे शाखेतर्फे राबवण्यात आला. ३१ डिसेंबरला ‘दारू नको दूध प्या’ या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उपस्थित नागरिकांना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख, पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते दुधाचे मोफत वाटपदेखील करण्यात आले. तसेच ३१ डिसेंबर रोजी, तहसील कार्यालय बिलोली या ठिकाणी व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावादेखील आयोजित करण्यात आली. नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन व्यसनविरोधी कार्यक्रमात मोहन जाधव, बालाजी एलगंद्रे, गौतम भालेराव, अभिनंदन शेरे, सायलू कारमोड, पत्रकार भीमराव बडूरकर, राजेंद्र कांबळे, शेषराव जेठे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.

जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे, तालुकाध्यक्ष शंकर महाजन यांनी पत्रकारांसमोर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस ३१ डिसेंबरच्या आठवड्यात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहीम राबवते. सध्या समाजात व्यसनाचे उदात्तीकरण होताना दिसते आहे. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असताना महाराष्ट्र शासन मात्र महसूल वाढवण्यासाठी समाजात व्यसन वाढवण्याला प्रोत्साहन देताना दिसते. मद्य विक्री वाढवून शासनाचा महसूल वाढवण्याचे शासनाने नुकतेच सूतोवाच केले आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि भावाला मात्र व्यसनाच्या तोंडी द्यायचे, असे हे धोरण आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसनविरोधी नीती जाहीर करावी, यासाठीदेखील या सप्ताहादरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे,”

नांदेड शहर व लोहा

दीडशे वर्षांची परंपरा असलेली व भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील यात्रा १० दिवस चालते. घोडे, उंट, गधे, कुत्रे अशा प्राण्यांच्या तसेच घोंगडी तर टरपोलीन इत्यादी वस्तूंच्या व्यापारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. देश विदेशातून व्यापारी पर्यटक, भाविक व हौशी लोक यात्रेला येत असतात. या यात्रेत ३१ डिसेंबर रोजी नांदेड शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ हा कार्यक्रम घेतला.

या वर्षी माळेगाव यात्रेत ‘व्यसनमुक्ती’ तसेच ‘दारू नको दूध प्या’ हे दोन उपक्रम राबवून ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये व्यसनाची कारणे, व्यसनाचे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीचे उपाय तसेच दूध व दारू याचे फायदे तोटे सांगितले. या दोन्ही उपक्रमास यात्रेकरूंनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला.

या उपक्रमास नांदेड व लोहा शाखेचे अंनिसचे कार्यकर्ते सम्राट हटकर, अर्जुन पवार, श्यामराव पवार, श्रेयश तसेच भरतकुमार कानिंदे यांनी सहभाग नोंदविला.

सोलापूर शहर शाखा

नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यासाठी युवक युवतींमध्ये, नागरिकांमध्ये तसेच मित्रमंडळींमध्ये स्पर्धा सुरू असते. त्यासाठी दारू, बियरसारख्या पेयांचा वारेमाप वापर केला जातो. या काळात व्यसनाधीनता वाढत जाते, ती व्यसनाधीनता समाजाला घातक आहे, ती रोखण्यासाठी सोलापूर शहर शाखेच्या वतीने ‘चला व्यसनांना बदनाम करू या, ‘द दारूचा नाही द दुधाचा’ हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

अंनिसने पार्क चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक केतनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘द दारूचा नाही तर द दुधाचा, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर नो वाईन नो बियर’ अशा घोषणा देत अंनिसच्या वतीने नागरिकांना सुमारे २०० दुधाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते प्रा शंकर खलसोडे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ. अस्मिता बालगावकर, लालनाथ चव्हाण, उषा शहा, मधुरा सलवारू, निशा भोसले, आर. डी. गायकवाड, विकास क्षिरसागर तुळजापूर, लता ढेरे, शकुंतला सूर्यवंशी, डॉ निलेश गुरव, निनाद शहा, सुनीता साठे, सूर्यकांत शिवशरण, डी. वाय. पांडगळे, साहित्यिक डॉ. जगदीशचंद्र कुलकर्णी, प्रमुख उपस्थिती पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीलजी राठोडसाहेब, चानकोटीसाहेब आणि दक्षिण सोलापूर कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंगजी बनसोडे इ. मान्यवर उपस्थित होते.

निंबोणी, ता.मंगळवेढा

लोकनियुक्त सरपंच मा.बिरुदेव घोगरे मित्रपरिवार, एम.डी.स्पोर्ट्स व जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ, निंबोणी. ता. मंगळवेढा यांच्यासह निंबोणी शाखेने दारू पिणारा फक्त दारूच पीत नाही तर तो आईचा आनंद, पत्नीच्या इच्छा-आकांक्षा, मुलांचं स्वप्न आणि वडिलांची प्रतिष्ठा एका घोटात संपवतो. त्यामुळे ‘नवीन वर्षाचा संकल्प करू या… दारू नको, दूध पिऊ या,’ असे सांगत प्रबोधन केले.

बार्शी

श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी व शाखा बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी दूध वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात नेचर डिलाईट डेअरी मुक्काम पोस्ट कळस, ता. इंदापूर जि. पुणे यांच्या सहकार्याने ६०० दूध पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. ए. बी. शेख, नेचर डिलाईट डेअरीचे मॅनेजर पटेलसाहेब व प्रतिनिधी खालील शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दूध वाटपाचा कार्यक्रम श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी व परिसरात करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय पी. टी. पाटील सर, खजिनदार सन्माननीय जयकुमार शितोळे (बापू) प्रा. डॉ. आर आर कोठावळे यांच्या हस्ते दूध वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

सदर दूध वाटपाच्या कार्यक्रमास राज्य सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक हेमंत शिंदे सर, बार्शी शाखा कार्याध्यक्ष उन्मेष पोतदार, सचिव सुरेश जगदाळे अंनिस जिल्हा उपाध्यक्ष एम एस शेळके, सोलापूर जिल्हा महिला विभागाच्या सचिव जाधव मॅडम, डॉ. राहुल पालके सर, घोळवे मॅडम, पोतदार मॅडम, बाळकृष्ण लोंढे हे उपस्थित होते.

गोंदिया

गेल्या काही वर्षात ३१ डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली खास करून तरूण पिढीत मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी या दिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस आणि एम. जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ यावर जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. किशोर पर्वते यांनी हिरवी झेंडी दाखवून व दारूच्या प्रतिकात्मक राक्षसाला चप्पल मारून केली. ही रॅली एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजपासून मुर्री चौकी, चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर होत परत कॉलेजला येऊन तेथे दारूच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले. रॅली दरम्यान प्रत्येक चौकात नागरिकांना दुधाचे मोफत वाटपदेखील करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतादरम्यान तरूणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र काही तरुण दारू प्राशन करून धिंगाणा घालतात. यामुळे वाद-विवाद होऊन गावातील व परिसरातील वातावरण कलुषित होते. त्यामुळेच अशा दारूविरोधी प्रबोधन मोहिमांची गरज असल्याचे मत रॅलीच्या दरम्यान व्यक्त केले गेले.

या कार्यक्रमाला समाजसेविका सविताताई बेदरकर, वरिष्ठ पत्रकार श्री. जयंत शुक्ला, संविधान बचाव मंचचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष श्री. अतुल सतदेवे व महिला अत्याचारांबाबत मार्गदर्शन करणार्‍या समाजसेविका श्रीमती रजनी रामटेके हे उपस्थित होते. या कार्यक्रमात नागरिकांना दारूमुळे उद्भवणारे दुष्परिणाम सांगून दारूऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेंतर्गत कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजसेविका सविताताई बेदरकर यांनी सांगीतले की, “कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसन हे वाईटच असते. एम. जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असून प्रशिक्षण घेतलेले युवक-युवती समाजात व्यसनविरोधी पोस्टर प्रदर्शन, परिसरात व्यसनविरोधी प्रभातफेरीचे आयोजन, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसन विरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्सवर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच सोशल मीडियामध्ये व्यसनविरोधी संदेश प्रसारित करणे, असे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य श्रीमती अनसूया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललित डबले, प्रा. छाया राणा, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. आरती चैधरी, प्रा. मनीष चौधरी, प्रा. गायत्री बावनकर, श्री. राजू रहांगडाले, श्री. सौरभ बघेले, श्री. राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच या प्रसंगी एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी स्वयंशासन कार्यक्रमात सहभागी झाले व इतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाचे संचालन शिवानी बघेले यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य अनसूया लिल्हारे यांनी केले.

३१ डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी शासन देते. हे व्यसनाला बढावा देणारे धोरण शासनाने थांबवावे, असे कार्यक्रमाचा माध्यमातून शासनाला आवाहन करण्यात आले.

सांगली

शाखाजाडर बोबलाद, ता. जत

आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, याला कोठेतरी आळा घालावा. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नशेत झिंगून न करता विधायक कार्यक्रम-उपक्रम साजरे करून करावे या उद्देशाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे ‘द दारूचा नव्हे तर, द दुधाचा’ हा कृतिशील उपक्रम शाखेने राबविला. यावेळी सर्वांना दूध वाटण्यात आले. व्यसनाचे तोटे यावर संतोष गेजगे यांनी प्रबोधन केले.

यावेळी सांगली जिल्हा अंनिस सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष गेजगे, युवकांचा बुलंद आवाज सदाशिव गेजगे, सचिन ऐवळे, किशोर काटे, गजानन होंकळे, परशुराम केंगार, मांतेश कांबळे, रूपेश कांबळे, परशुराम गेजगे, विशाल कांबळे, नागेश ऐवळे, किरण ऐवळे, अर्जुन ऐवळे, मंजुनाथ गेजगे, अमर कांबळे, शिंदे, विनोद कदम, हेमंत गेजगे, समर्थ कांबळे उपस्थित होते. मेसाप्पा काटे व सदाशिव गेजगे यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी संजय कांबळे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते व समस्त गावकरी उपस्थित होते.

जालना

दरवर्षी नव्या वर्षाची सुरुवात कोणी ना कोणी व्यसनापासून सुरू करते आणि आयुष्यभरासाठी व्यसन जडते. समाजात दारू, बियर, गुटखा यांचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळते. यातूनच अनेक युवक गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळत आहेत. त्यांच्या आयुष्याची धूळधाण होत आहे. अनेक तरुण-तरुणी थर्टीफर्स्टला पहिल्यांदा व्यसनाचा अनुभव घेतात आणि नेहमीसाठी व्यसनाधीन होतात. हे सर्व स्वच्छ दिसत असूनही शासन महसूल वाढविण्यासाठी दारूच्या दुकानांना प्रोत्साहन देत आहे. शासनाची ही नीती योग्य नाही.

या पार्श्वभूमीवर थर्टीफर्स्टला अंबड चौफुली जालना येथे महिला, नागरिक आणि तरुणांना दुधाचे वाटप करण्यात आले. नव्या वर्षाची सुरुवात पौष्टिक दुधाने करावी, वाईट व्यसनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांनी केले. याप्रसंगी अंबड चौफुली बस स्टॅन्ड येथे उपस्थित महिला, युवक व नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, शंकर बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संजय हेरकर, मनोहर सरोदे, जिल्हा कायदा सल्लागार अ‍ॅड. संजय गव्हाणे, जिल्हा पदाधिकारी गणेश गव्हाणे, सुभाष पारे, बंडू ननवरे, स्मितेश गायकवाड, हरिचंद्र ढगे प्रा. राजेंद्र मोरे यांच्यासह महिला, नागरिक व तरुण उपस्थित होते.

कोल्हापूर

कोल्हापुरात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेअंतर्गत डॉ. आंबेडकर विद्यालय, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, कला मंदिर, पापाची तिकटी, प्रबुद्ध भारत हायस्कूल इत्यादी ठिकाणी व्याख्याने, बाटलीच्या प्रतिमेस चप्पल मारणे, दूधवाटप हे कार्यक्रम घेण्यात आले. कोल्हापुरातील शिवाजी पेठेच्या उभा मारुती चौकामध्ये अनिल चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात दारूचा इतिहास कथन करताना सांगितले, “शिवकालात दारूला प्रतिष्ठा नव्हती. दोन चार गावात मिळून एखादी व्यक्ती दारू गाळत असे. त्याला कलाल असे म्हणत. ब्रिटिशांनी दारूला प्रतिष्ठा दिली आणि प्रत्येक पेठेमध्ये दारूचे दुकान उघडले. लिलाव पद्धतीने दरवर्षी दारूची विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जात असे; या विरोधात पहिला अर्ज महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये देशभक्त दारूच्या दुकानासमोर पीकेटिंग करत. त्यांच्यावर पोलीस लाठीमार करत आणि खोट्या केसेस घालत. महात्मा गांधींनी नशाबंदी चळवळ चालवली आणि स्वातंत्र्यलढ्याशी जोडली. ब्रिटिशांच्या व्यसन वाढवण्याच्या धोरणामागे दोन कारणे होती, असे देशभक्त सांगत. पहिले कारण प्रचंड प्रमाणात मिळणारा अबकारी कर. तर दुसरे कारण होते लोकांना व्यसनी बनवा, म्हणजे ते स्वातंत्र्याची मागणी करणार नाहीत. आजही स्वतंत्र भारतामध्ये याच दोन कारणांसाठी व्यसने वाढवण्याचे प्रयत्न शासन करते. महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत पब उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. आजही शासनाला दारू विक्रीतून प्रचंड प्रमाणात अबकारी कर मिळतो आणि वाढत्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अत्याचार या विरोधात व्यसनी लोक आवाज उठवण्यास अक्षम असतात.”

कॉ. चंद्रकांत यादव यांनी व्यसनांचे धोके सांगितले “दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादीमुळे लोकांना कॅन्सरसारखे असाध्य रोग होतात. अपघात घडतात. हाणामारी, खून असे अपराध घडतात. म.फुले, छत्रपती शाहू, डॉक्टर आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील असे सर्व समाजसेवक कडवे व्यसनविरोधी राहिले आहेत. आपणही स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य सांभाळले पाहिजे.” संभाजी पाटील यांनी आपली वाहतूक चालक मालक संघटना व्यसनापासून दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक संजय अर्धाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिल चव्हाण यांचे व्यसनमुक्तीवर व्याख्यान झाले. त्यानंतर रमेश वडणगेकर यांच्या हस्ते दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. जगदाळे सर यांनी विद्यार्थ्याकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा म्हणून घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये अनिल चव्हाण यांचे व्याख्यान झाले. कला मंदिरमध्ये हसूरकर आणि किरण गवळी यांनी व्यसनमुक्तीची माहिती दिली.

‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून आनंदराव चौगुले, जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, अ‍ॅड. अजित चव्हाण, प्रा छाया पोवार, अमर जाधव, खुशी बांदेकर, ऋषी मिठारी, तानाजी इंदुलकर, नम्रता आयरे, सारिका कोळी, सुरेश जत्राटकर इत्यादींनी परिश्रम घेतले.

वर्धा

वर्धा शाखा प्रत्येक वर्षी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी ‘द दारू चा नाही, तर द दुधाचा,’ कार्यक्रम दूध वाटून संपन्न करतात. या वर्षीसुद्धा देवळी रोड दयालनगर वर्धा येथील कामगार चौकात ३१ डिसेंबर २०२४ रोजी कामगारांचे व्यसनविरोधात प्रबोधन केले. दारूचे शारीरिक दुष्परिणाम, दारूमुळे सामाजिक व आर्थिक कौटुंबिक दुष्परिणाम, कौटुंबिक कलह या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रवीण धाकटे, प्रमुख अतिथी राहुल गायकवाड अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, डॉ. नरेंद्रकुमार कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा, डॉ. मयूर नागमोते, महेश दुबे प्रधान सचिव सेवाग्राम शाखा, जानराव नागमोते, ज्योत्स्ना वासनिक जिल्हा उपाध्यक्ष मा. अनीस, सुरेश रंगारी जिल्हा कार्याध्यक्ष, उषा कांबळे महिला विभाग प्रमुख, चंद्रप्रकाश बनसोड, प्रधन्या दुपट्टे, राजेश वाघमारे, विलास नागदेवते, शीतल बनसोड कार्याध्यक्ष वर्धा तालुका, इत्यादी प्रमुख अतिथी या प्रसंगी उपस्थित होते, या प्रसंगी उपस्थितांना डॉ. प्रवीण धाकटे, महेश दुबे, राहुल गायकवाड अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा वर्धा आणि डॉ नरेंद्रकुमार कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जानराव नागमोते यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना वासनिक यांनी केले, तर आभार उषाताई कांबळे यांनी मानले. प्रमुख अतिथींचा परिचय राजेश वाघमारे यांनी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दशरथ गवळी, प्रियदर्शना भेले, राहुल खनडाळकर, अनिल भोंगाडे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी उपस्थितांना दूध वाटून कार्यक्रम संपन्न केला व ‘पिणार नाही दारू, पिणार नाही बियर हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर,’ असे घोषवाक्य उद्गारून कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी सुमारे अडीचशेच्या वर नागरिकांनी व कामगारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

डोंबिवली

नववर्षाचे स्वागत मद्यपान करूनच साजरे केले पाहिजे का? असा संतप्त सवाल डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते रोहित सामंत यांनी केला. डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘द दारूचा नव्हे द दुधाचा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘दारू नव्हे दूध प्या’ असा संदेश देत सर्वांना दुधाचे वाटप करण्यात आले. डोंबिवली स्टेशन जवळील राजाजी पथ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेही व्यसन हे समाजासाठी अतिशय घातक असतं, त्यातच मद्यपानासह नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली विविध प्रकारच्या मादक द्रव्यांचं सेवन केलं जातं, याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. कुठल्याही सणाचे निमित्त करून दारू पिणे हा जणू काही नियमच झालेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिण्याला उधाण आलेलं असतं. येणार्‍या पिढ्यांकरिता हे अतिशय घातक आहे, याबाबत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली.

‘नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करू नका, त्याऐवजी दूध प्या,’ असा संदेश देणारा उपक्रम या निमित्ताने डोंबिवली शाखेतर्फे राबवण्यात आला. या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुशील सामंत, विद्याधर राणे, कॉम्रेड काळू-कोमास्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदू धुळे मालवणकर, बामसेफचे जिल्हा संघटक गौतम वाघचौरे, केणेथ बेबे, बापू राऊत हे कार्यकर्ते व डोंबिवली शहरातील मान्यवर उपस्थित होते.

-राहुल थोरात


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]