संदेश घोलप -

२४ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान वसई-विरार अंनिस येथील चार महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसई शाखा, पालघर जिल्हा राष्ट्र सेवा दल, निर्भय मंच व प्रा. स. गो. वर्टी मेमोरियल ट्रस्ट वसई यांच्या सहकार्याने. मनवेल तुस्कानो अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ आणि ‘परिवर्तन संस्था’ निर्मित जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विवेकाची कसोटी हे चित्र, शिल्प, पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला समाजातील विविध स्तरातून भरघोस प्रतिसाद लाभला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरानी केलेल्या चळवळी, यात्रा, आंदोलने, लेखन, संघटन, भाषणे, प्रात्यक्षिके, कायदा आदी माध्यमातून चाळीसहून आधिक वर्षे केलेले कार्य विद्यार्थी, नागरिक, महिला यांना अवगत व्हावे व त्यांनी त्यापासून स्फूर्ती घ्यावी यासाठी सर्व समविचारी संघटनांनी मिळून हे प्रदर्शन पालघर जिल्ह्यात आयोजित केले होते.
संत जोसेफ शाळा व ज्युनियर कॉलेज, नंदाखाल
दि. २५ डिसेंबर २०२४ ते २९ डिसेंबर २०२४ सकाळी ८ ते सायं. ७.०० वाजेपर्यंत संत जोसेफ शाळा व ज्युनिअर कॉलेज नंदाखाल, विरार (प.) येथे संपन्न झाले. नंदाखाल चर्चचे फादर सालोमन यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यांनी उदघाटन करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर आज आपल्यात नाहीत; परंतु त्यांचे विचार आपण सर्वांनी स्वतः दाभोलकर समजून पुढे नेले पाहिजे, असे सांगितले व कला शिल्प प्रदर्शनाला सदिच्छा दिल्या. कॉलेजचे प्राचार्य ज्यो अल्मेडा यांनी हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यास नक्की मदत करेल, असे उद्गार काढले.
महा. अंनिस पालघर जिल्हा कार्याध्यक्ष संदेश घोलप, वसई अंनिस कार्याध्यक्षा प्रीता पाटील, जॉन परेरा, पायस मचाडो यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नाताळची सुट्टी असतानाही अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
संत जोसेफ कला वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा
दि.१ ते ३ जानेवारी २०२५ ला सकाळी ८ ते सायं. ५.३० वाजेपर्यंत संत जोसेफ कला, वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे संपन्न झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन सीनियर शिक्षक फ्रान्सिस अल्मेडा सरांनी केले. आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी विवेकशील विचारांचा अंगीकार करण्याचे महत्त्व पटवून दिले, यासाठी कॉलेजमध्ये विवेकवाहिनी सुरू करण्याची त्यांनी सूचना केली. ज्यामध्ये विद्यार्थी दर आठवड्याला एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकतील, अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापलिकडे असलेल्या विचारविश्वाची ओळख होईल, असे त्यांनी नमूद केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुणांनी विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने पाऊले उचलावीत, हा संदेश त्यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून दिला. यावेळी वरिष्ठ वकील अतुल अल्मेडा यांनी ‘विवेकी का व्हावे?’ याबदल मार्गदर्शन केले. त्यावेळी विवेकी जागर मंचचे डॅनियल मस्करणीस, कॉलेजच्या प्राचार्या कविता अल्मेडा यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
संत गोंसलो ग्रासिया महाविद्यालय, वसई
७ ते ९ जानेवारी २०२५ रोजी संत गोंसलो ग्रासिया महाविद्यालय, वसई गाव येथे पार पडलेल्या प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध लेखिका वीणाताई गवाणकर यांनी केले. आपल्या भाषणात डॉ. दाभोलकरांच्या कार्यक्रमाची आठवण सांगितली, “राष्ट्रसेवा दलाने वसईत डॉ. दाभोलकरांचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस नरेंद्र महाराज व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यामध्ये अंधश्रद्धा, बुवाबाजी या विषयावर झालेला वादविवाद गाजत होता. त्यावेळी नरेंद्र महाराजांच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला विरोध करत सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता; पण डॉ. दाभोलकरानी ती परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळली. त्यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शशी पाटील यांनी ‘हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही’ ही सुरेश भटांची गझल ऐकून दाखवली. त्यानंतर विरोध करणारे लोक निघून गेले व कार्यक्रम शांततेत पार पडला.”

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसीन कँथलिक बँकेचे चेअरमन डायस हे उपस्थित होते. त्यांनी अंनिसच्या विविध उपक्रमास आम्ही नेहमी आर्थिक मदत करू असे सांगून प्रदर्शन भरवल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तसेच कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ विभुते सरांनी कार्यक्रमास सदिच्छा देऊन अंनिसचे विविध उपक्रम कॉलेजमध्ये घेण्याचे जाहीर निमंत्रण दिले. यावेळी प्रमुख पाहुण्या वीणाताई गवाणकर यांना संदेश घोलप यांच्या हस्ते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ विभुते यांना जॉन परेरा यांच्या हस्ते वार्षिक विशेषांक २०२४ देण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉन परेरा, पायस मचाडो, शशी पाटील, प्रिता पाटील, संदेश घोलप, अंकुश मोरे, गौतम कांबळे, सुनील महामुनी, दयानंद सांमत, दयानंद वर्तक व संत जोसेफ काँलेज छडड चे विद्यार्थी साक्षी मोरे, प्रथमेश गोरीवले, सार्थक नाईक यांनी अंनिसचे विविध विषय, लढे यांची माहिती मुलांना समजावून सांगत मोलाचे योगदान दिले. वरील प्रदर्शनाला अंनिसचे हितचिंतक वसईतील नामवंत वकील अॅड. नोव्हेल डाबरे सरांच्या सर्व वकील टीमने भेट दिली व प्रदर्शनाची माहिती घेऊन डॉ. दाभोलकरांना अभिवादन केले.

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई
१३ ते १५ जानेवारी २०२५ रोजी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई येथे हे प्रदर्शन पार पडले.या प्रदर्शनास अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद उबाळे, NSS प्रमुख फड, संविधान बचाव वसईचे मँकेनझी डाबरे, दत्ता धुळे, प्रकाश कांबळे, मॅक्सवेल रॉस पथनाट्य प्रमुख व अंनिस पालघर जिल्हाध्यक्ष दीपक भाते यांच्यासह त्यांचे परिवार भेट देऊन गेले.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या प्रदर्शनाला वसईतील चारीही महाविद्यालयांतील प्राचार्य, कर्मचारी, NSS विद्यार्थी, पत्रकार मित्र, तसेच बॅसीन कॅथलिक को. ऑप. बँक वसई, सारस्वत सहकारी बँक, कल्पतरू बिगर शेती सहकारी पतसंस्था, प्रा. स. गो. वर्टी मेमोरियल ट्रस्ट, राष्ट्र सेवा दल, वसईच्या जयश्रीताई सामंत, मनवेल तुस्कानो, कुमार राऊत यांनी सहकार्य केले.
अंनिसचे अण्णा कडलास्कर, जगदीश राऊत, सुहास जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
– संदेश घोलप, वसई