‘ख्रिश्चन धर्मांतील समाजसुधारकांची धर्मचिकित्सा’

अ‍ॅड. अतुल अल्मेडा -

ज्याप्रमाणे हिंदू धर्माची चिकित्सा भारतात व विशेष करून महाराष्ट्रात झालेली/केलेली आहे, त्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्माची चिकित्सा भारतात झालेली माझ्या वाचनात आलेली नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा चिकित्सा करण्याचा प्रयत्न संत फ्रान्सिस ऑफ अ‍ॅसिसी यांनी तेराव्या शतकात, तर संत इग्नेसियस लोयला यांनी सोळाव्या शतकात दुसर्‍यांदा केलेला आहे. फ्रान्सिस अ‍ॅसिसी व इग्नेसियस लोयला या दोघांनी राजेशाही/सम्राटशाहीत गुंतलेल्या ख्रिश्चन धर्माला, गरिबांचा कैवार घेणारा, दया व क्षमा यावर पुनरुत्थीत करण्याचा प्रयत्न केला.

एक ख्रिस्ती व्यती या भाविक किंवा श्रद्धावंत म्हणून आजपर्यंत ख्रिश्चन धर्मातील समाजसुधारकांनी, ख्रिस्ती धर्मांची केलेली चिकित्सा, या विषयावर मला अनेक धर्मांत आतापर्यंत झालेल्या चिकित्सा यास अनुसरून लिहिल्या जाणार्‍या परिसंवादात लेख लिहिण्याच्या विनंतीवरून हा लेख लिहिला आहे.

मी, एक व्यक्ती, जन्माने ख्रिस्ती श्रद्धावंत, रहिवासी म्हणून भारतीय नागरिक, तर धारणेने मानवतावाद मानणारा या पृथ्वीचा रहिवासी आहे.

एखाद्या धर्माची, संस्थेची किंवा व्यतीच्या कार्याची चिकित्सा होण्याअगोदर, त्यांचा उगम व जडणघडण/पार्श्वभूमी याची दखल घेणे आवश्यक ठरते. त्यानुसार  धर्माचा उगम का झाला? कसा झाला? व मान्यताप्राप्त होउन, विकसित मानवाच्या मानगुटीवर कसा बसला त्याचे सविस्तर नाही, पण ओझरते उल्लेख आवश्यक ठरतात.

आज विज्ञानाद्वारे हे स्पष्ट झालेले आहे की, आज जो मानवी समाज या पृथ्वीतलावर आहे, तो साठ हजार वर्षांपूर्वीच उत्क्रांतीतून विकसित झालेला आहे. या मानवाला बारा हजार वर्षांपूर्वी स्त्रीच्या माध्यमातून शेतीचा शोध लागला. या दृष्टिकोनातून विचार करता मानवाच्या उत्पत्तीत किंवा उगमाबद्दल देव नव्हता, हे स्पष्ट आहे. याचे कारण देव आधारित किंवा देवाशिवाय उदयास आलेले किंवा स्थापना झालेल्या किंवा उदयास आलेल्या संस्कृत्या पाच हजार वर्षांच्या अलीकडील आहेत. हे आस्तिक व नास्तिक अशा दोन्ही प्रवृत्तीला मान्य होते. कारण ते संशोधनातून काढलेलेच अनुमान किंवा निष्कर्ष आहेत.

आग/विस्तवाचा शोध लागेपर्यंत धर्म कल्पना आलीच नव्हती. मात्र शेतीचा शोध लागल्यावर धर्माची कल्पना सुचली असावी. बी मातीत पडून मरतं/ नष्ट होते, पण पाणी मिळाल्यानंतर नवीन रोप उगवते, त्याप्रमाणेच मनुष्य मेल्यावर मातीत पुरल्यानंतर पुन्हा उठेल, जिवंत होईल. त्याचाच परिणाम म्हणून प्राचीन काळी इजिप्तमध्ये भव्य पिरॅमिड्स बांधले गेले. धर्म कल्पना येण्यास हे एक कारण असेल.

आज आपल्या भारतीय संस्कृतीत रुजलेला धर्म ज्याला आपण सामान्यपणे हिंदू धर्म  म्हणतो. काही लोक त्यालाच वैदिक (वेदावर आधारलेला अथवा ब्राह्मणिक) म्हणतात. याचा उगम पाच हजार वर्षांपलीकडे जात नाही. त्याचबरोबर यहुदी/ज्यू किंवा अब्राह्मामिक धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जुना नाही. याच धर्मातून अडीच हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म उदयास आला, तर दोन हजार वर्षांपूर्वीच मुस्लीम/ इस्लामिक धर्म उत्पन्न झाला आहे. ज्यू धर्माच्या काही काळानंतर झरतुष्ट्र नामक संस्थापकामार्फत झेरोस्टरीयन (पारशी) धर्माची स्थापना झाली होती. तसेच ख्रिस्तापूर्वी चौथ्या/पाचव्या शतकात चीनमध्ये कन्फ्युशियस या माणसाने कन्फ्युशियस धर्माची मुहूर्तमेढ रोवली, त्याच दरम्यान आपल्या भारतात, बुद्ध व महावीर धर्म पुढे आले. याशिवाय त्वाईजम, सिन्टो असेही धर्म उदयास आलेले आहेत. एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, भारतात वैदिक धर्माचा प्रवेश होण्याअगोदर पासून ‘लोकायत/चार्वाक दर्शन’ या नावाने बृहस्पती या प्रवर्तकांनी देव, स्वर्ग, नरक या कल्पना नाकारून इहलोकी जीवन हेच सर्वस्व एकमेव जीवन सांगणारे तत्त्वज्ञान मांडले. यापैकी ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम व झेरोस्टरीयन हे धर्म देव मानतात, तर चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर, कन्फ्युशियस, देव नाकारणारे धर्म आहेत. भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माचा कोणीच एक संस्थापक देव नाहीच, पण अनेक देव आहेत. वैदिक आर्य लोकायत जनाचा उल्लेख ‘आसुरी संपत्ती’चे पुरस्कर्ते  असा करतात. विश्वातील सर्व घटना निसर्गनियमांनीच घडतात, त्यांच्या मागे ईश्वरीय सत्ता मानण्याचे कारण नाही. हे चार्वाक तत्त्वज्ञानाचे सार आहे.

दैवी शती, देवी किंवा देव या मनुष्याला सुचलेल्या कल्पना आहेत. मनुष्य निसर्गनिर्मित आहे तर देव कल्पनाच मनुष्यनिर्मित आहे. अज्ञानाची किंवा मृत्यूची भीती यातून धर्म कल्पना उगम पावली आहे. पृथ्वीवरील मानव विविध संस्कृतीकडे वाटचाल करत असताना काळाचे आकलन होण्यासाठी मनुष्य आकाशात पहात असे. आकाशातील घडामोडींबाबत आणि आजूबाजूच्या वातावरणातील बदलाचे निरीक्षण तो करत होता. त्याला लागणारा पाऊस आकाशातून मिळत असे. रात्रीचे आकाशी वैभव त्याला भुलवित असे. रात्रीचा काळोख/अंधार नष्ट करून प्रकाश देणारा सूर्य आकाशातून उगवत असे. वीज आकाशात चमकत असे. म्हणून या विश्वचक्राचे नियमन करणारी अचाट शक्ती म्हणजेच ईश्वर अशी कल्पना बहुतांश संस्कृतीत निर्माण झाली. याबाबत संशोधनात्मक इतिहास काय आहे? थोडक्यात पाहू या. १९०२ साली बॅबिलोनच्या ऐतिहासिक शोधासाठी उत्खनन सुरू होते. त्या वेळी हमुराबीचा प्रसिद्ध कायदा कोरलेला एक प्राचीन स्तंभ सापडला. हा हमुराबी इ.स. पूर्व १७९२ मध्ये राज्याच्या गादीवर आला आणि वैभवशाली राज्य करून इ.स.पू. १७५० मध्ये वारला. या शिलालेखात पुढीलप्रमाणे नोंद आहे. “मानवासाठी सूर्यदेवाने हा कायदा निर्माण केला आहे. सूर्यदेवाने हा कायदा हमुराबीच्या स्वाधीन केला आहे. हमुराबी तो कायदा जाहीरही करत आहे आणि सर्वांना लागूही करत आहे. हा कायदा ईश्वरीय आहे, म्हणून तो पवित्र व पूज्य असून शिवाय निर्दोष व अपरिवर्तनीय आहे, अशी भूमिका, हमुराबीने मांडली.” आज जगात अस्तित्वात असलेल्या सर्व (नास्तिक सोडून) धर्मियांची हीच श्रद्धा आहे.

ख्रिश्चन धर्मातील धर्म चिकित्सा :

वास्तव हे आहे की, ख्रिस्ताने  यहुदी/ ज्यू धर्माची चिकित्सा करताना जी शिकवण दिली, त्यांतूनच ख्रिश्चन धर्माचा उगम झालेला आहे. ज्यू धर्म देवाने मोझेसला  दिलेल्या दहा आज्ञांवर रचलेला आहे. त्या म्हणजे, हे करू नको, ते करू नको, अशा नकारात्मक आहेत.  त्या आज्ञाचा भंग केला तर पाप, म्हणून शिक्षा हे सार आहे. म्हणजेच त्या धर्माला नियम आहेत. मात्र, ते नियम न मोडता, ख्रिस्ताने, एका व्यभिचारी स्त्रीची शिक्षेशिवाय मुतता केली. तो प्रसंग असा.

व्यभिचार करणार्‍या बाईला धर्मशास्त्रानुसार दगडमार करून ठार मारण्याची सजा सांगितली आहे. तशीच शिक्षा तिला दिलीच पाहिजे, अशी धार्मिक लोकांची मागणी होती. ख्रिस्त म्हणाला, “तुमची मागणी रास्त आहे. पण तुमच्यापैकी ज्या कोणी कधीच पाप केले नसेल त्यांनी पहिला दगड उचलून मारावा.” तक्रार करणारे व शिक्षा देणारे हळूहळू नाहीसे झाले. अशाच प्रकारची अनेक उदाहरण देऊन ख्रिस्ताने ‘धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही’, हे तत्त्व शिकविले. शिवाय एक मूलभूत आज्ञा दिली, ‘जसे स्वतःवर प्रेम करता, तसेच इतरांवर करा.’ ज्यू धर्माची चिकित्सा केल्याने ख्रिश्चन धर्म स्थापन झाला. ख्रिस्ताची शिकवणूक त्रिसूत्री आहे-प्रेम, दया व क्षमा, परंतु संत आगुस्तीने ती त्रिसूत्री बदलून बाप, पुत्र व पवित्र आत्मा अशी दैववादी त्रिसूत्री रचली. इ. स. ३१३ मध्ये कॉन्स्टंटाईन राजा सत्ताधीश झाला. त्याच्या आईच्या सांगण्यावरून, राजाने येशूची प्रार्थना केली. त्यामुळे राजाला लढाईत विजय मिळाला. शांतीचा प्रचारक युद्धाला प्रोत्साहन देणारा देव ठरविला गेला. राजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. या कॉन्स्टंटाईनच्या राजाच्या काळात, इ.स. ३२५ मध्ये निकाई येथे एक धर्म परिषद भरली होती. वादाचा मुद्दा ‘ख्रिस्त’ दैवी का मानवी?या परिषदेत ‘ख्रिस्त म्हणजेच पिता +पुत्र  + पवित्र आत्मा असे तीन अंश आहेत, या तिघांची एक मूर्ती म्हणजेच ख्रिस्त’, असे जाहीर करण्यात आले. राजाश्रय मिळाल्यामुळे ख्रिस्त राजा झाला. त्यानुसार गरिबांचा उद्धार, दया, क्षमा व शांती या ख्रिस्ताच्या मूळ शिकवणुकीला व तत्त्वाला तिलांजली दिली गेली. त्याचाच परिणाम धर्मयुद्धे झाली.

गौतम बुद्ध यांची धर्म शिकवण म्हणजेच तत्कालीन वैदिक धर्माची चिकित्सा आहे. याही धर्माला राजा अशोकामुळे राजाश्रय मिळाल्यानंतर हा धर्म विस्तारित झाला. पुढे सातव्या शतकात वैदिक धर्माची मांडणी करून  बौद्ध धर्मावर गदा आणण्यात आली.

ज्याप्रमाणे हिंदू धर्माची चिकित्सा भारतात व विशेष करून महाराष्ट्रात झालेली/केलेली आहे, त्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्माची चिकित्सा भारतात झालेली माझ्या वाचनात आलेली नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा चिकित्सा करण्याचा प्रयत्न संत फ्रान्सिस ऑफ अ‍ॅसिसी यांनी तेराव्या शतकात, तर संत इग्नेसियस लोयला यांनी सोळाव्या शतकात दुसर्‍यांदा केलेला आहे. फ्रान्सिस अ‍ॅसिसी व इग्नेसियस लोयला या दोघांनी राजेशाही/सम्राटशाहीत गुंतलेल्या ख्रिश्चन धर्माला, गरिबांचा कैवार घेणारा, दया व क्षमा यावर पुनरुत्थीत करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सम्राटशाही व राजेशाहीतून खरा ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिस्ताच्या  शिकवणीनुसार, धर्म माणसासाठी आहे. माणूस धर्मासाठी नाही, ही श्रद्धा घेऊन, आपले कर्म मानवतावादी स्वीकारले. मात्र, यांची चिकित्सा वेगळा धर्म निर्माण व्हावा एवढ्या बंडाची नव्हती. उलट संत फ्रान्सिसने पोपच्या परवानगीने आपले गरिबांच्या उद्धाराचे, सेवापंथ कर्म चालू ठेवले. सुरुवातीला फक्त दोनच अनुयायी असलेल्या या सेवापंथाचे तीन वर्षांत बाराजण झाले. फ्रान्सिस आपल्या सहकार्‍यांसह पोपला भेटण्यास गेला. त्याचे कार्य पाहून पोप विरघळला व त्यांना म्हणाला, “ख्रिस्ताला आवडणारे हे तुमचे सेवेचे कार्य असेच चालू ठेवा. चर्च विरुद्ध बंड नका करू.” फ्रान्सिस अ‍ॅसिसीच्या मृत्यूनंतर त्याच्या पंथाचे नांव, ‘फ्रान्सिसकन’ संघ म्हणून जगभर कार्य करत आहे. तर इग्नेसियस लोयोलाने गरिबाची सेवा करण्यास, श्रीमंतीचा त्याग करून, ख्रिस्ताच्याच शिकवणीनुसार कार्य करणारा पंथ उदयास आणला. इ.स. १५४४ मध्ये पोपबरोबर  समझोता करून आपल्या येशूसंघीय/जेसुइट संस्थेची स्थापना इग्नेसियसने केली. फ्रान्सिसकन व जेसुइट या दोन्ही संघाचे कार्य आपल्याच तुकाराम महाराजांच्या भाषेत,

जे कां रंजले गांजले! त्यांस म्हणे जो आपुले,

तोचि साधु ओळखावा! देव तेथेंच जाणावा’

ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार खरे कार्य हे दोन पंथ करत आहेत. ही चिकित्सा धर्मात बंड होईल किंवा दुफळी घडविल एवढ्या सामर्थ्यवान नव्हतीच, परंतु ख्रिश्चन धर्मातील इतर कुठल्याही पंथांपेक्षा या दोन्ही पंथांचे कार्य ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार आहे, हे जगन्मान्य आहे.

मात्र सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथर यांनी केलेल्या प्रचंड टीकेमुळे ख्रिश्चन धर्मात दोन संप्रदाय निर्माण  झाले. एक – पोपचे अधिपत्य मानणार रोमन कॅथलिक पंथ तर दुसरा – पोपचे अधिपत्य नाकारणारा, प्रोटेस्टंट.  ती घटना अशी :

रोममधील संत पीटरच्या देवळाचे नूतनीकरण करण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी पोपने क्षमापत्रे द्यावयाचे ठरविले. जो कोणी ही क्षमापत्रे विकत घेऊन देवळाच्या नूतनीकरणास मदत करणार त्याची पापे माफ होऊन त्याच्या मृत्यूनंतर त्यांना स्वर्गराज्य प्रवेश मिळणार, असे जाहीर करण्यात आले. धार्मिक फतवा म्हणजेच देवाची आज्ञा असे मानून श्रद्धावंत ऐपत असो-नसो, क्षमापत्रे विकत घेत.

१५५७ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेला या क्षमापत्राला निषेध करणारी पत्रके, मार्टिन ल्यूथरने, चर्चच्या दारावर लावली. “मनुष्यांनी केलेल्या पापाच्या बाबतीत देवाची जी काही इच्छा असेल तिच्यात ढवळाढवळ करण्याची शती पोपला नाही. पोपचा असा हेतू असणे शक्य नाही. पोपकडून असली क्षमापत्रे घेण्यापेक्षा काही खरीखुरी सत्कर्मे करून ईश्वरीय लक्ष वेधणे संभव आहे. गरीब, श्रद्धाळू लोकांकडून पैसे उकळून त्या पैशाने चर्च बांधण्यापेक्षा पोपने ते आपल्याच पैशाने बांधावे, कारण पोप कुबेराचाही कुबेर आहे.” मार्टिन ल्यूथरने जाहीर केले की, ‘चर्चच्या अधिकार्‍यांनी केवळ ईश्वराचे सेवक होउन भागणार नाही, तर त्यांनी जनतेचेही सेवक झाले पाहिजे.’ लोकांना त्याने उपदेश केला की, “सामान्य लोकांप्रमाणे राहा, विवाह करा, आपली वागणूक सुधारा, लोकांमध्येच राहून प्रेमाने जगा, इतरांपासून वेगळे आहोत असे वर्तन करू नका.” ल्यूथरला केवळ सामान्य लोकांचीच साथ मिळाली असं नव्हे, तर त्याला वैचारिक सुधारणावादी लोकांचं पाठबळ लाभले, शिवाय ‘फ्रेडरिक द वाईज’ या रोमच्या राजाने  ल्यूथरला पाठिंबा  दिला. या सर्व घडामोडींनी प्रोटेस्टंट पंथ रोमन कॅथलिक चर्चला समांतर म्हणून विकसित झाला. मात्र, आजही हे दोन मुख्य पंथ व त्यामधील निर्माण झालेले उपपंथ, अपवाद वगळता, ख्रिस्ताच्या सत्य  शिकवणीपासून दूरच आहेत, हे पुढील काही संदर्भातून लक्षात येईल.

डॉ. आब्राहम कोवूर, भारतातील  केरळ राज्यात, थोम्मा कॅथनार नावाच्या सिरियल धर्मोपदेशकाचा हा मुलगा. कालांतराने श्रीलंकेचे रहिवाशी झाले. त्यांनी १९७६ मध्ये “Begone Godmen” हे पुस्तक लिहून देव मानणार्‍या सर्व धर्मांची टर उडविली आहे. देव, आत्मा, मृत्यूनंतरचे जीवन, स्वर्ग, नरक या सर्व  कल्पना त्यांना विवेकी मीमांसा करून नाकारून खोट्या ठरविल्या आहेत. बायबलची चिकित्सा करताना त्यांनी बायबलमधील अनेक विसंगती दाखवून विविध प्रसंगांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी सर्व धर्मांतील कर्मकांडांवर टीका करून, विवेकी, प्रेमळ, न्याय व मानवतावादी जीवन जगणे म्हणजेच धार्मिक जीवन आहे, असे म्हटले आहे.

सी. सी. जॅकोब यांनी “बॅप्टिझम, अ स्टडी” हे पुस्तक २००६ मध्ये प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात त्यांनी असे मत व्यक्त केले होते की, ‘प्रत्येक व्यतीस सज्ञान झाल्यावर आपला धर्म (फेथ) स्वीकारण्याचा हक आहे/असावा. त्याकरताच बालकांना बॅप्टिझम देऊन त्यांच्यावर धर्म लादणे बरोबर नाही.’ या त्यांच्या धर्म चिकित्सेमुळे, चर्चने त्यांना धर्म बहिष्कृत केले. २०१३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, चर्चच्या दफनभूमीत त्याचे दफन चर्चने नाकारले. झालेल्या मनस्तापामुळे त्यांच्या पत्नी मेरी यांनी न्यायालयात दावा दाखल करून झालेल्या मनस्तापाबद्दल चर्चकडून नुकसानभरपाईची मागणी केली. कोची, त्रिचूर येथील न्यायालयाने चर्चचे बिशप व संबंधित चर्च यांना रु. ९.९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि जाहीर केले की व्यतीचे हक कायद्याने ठरतात. व्यक्ती केवळ चर्चच्या श्रद्धेविरुद्ध मत व्यक्त करते, म्हणून त्याचा हक नाकारू शकत नाही.

स. ना. सूर्यवंशी यांनी त्यांच्या ‘अगा जे कल्पिले नाही’ या आत्मचरित्रात केलेल्या ख्रिश्चन धर्माच्या चिकित्सेमुळे वादळ निर्माण झाले होते. सूर्यवंशी नाशिकमधून ‘आपण’ नावाचे एक झुंजार साप्ताहिक चालवत होते. ‘सत्य तेच निर्भयपणे सांगेन’ हीच ‘आपण’ची धारणा होती.

‘ख्रिस्ती महार’ या बाळासाहेब गायकवाड, आत्मकथनात, ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांचा भरपूर  समाचार घेतला आहे. त्याप्रमाणेच इसादास भडके यांचे ‘बाप्तिस्मा ते धर्मांतर’ ख्रिश्चन धर्मांची सखोल चिकित्सा करते. एवढी की, ते ख्रिश्चन धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारतात.

फादर जो. मा. पिठेकर  यांचे ‘समाज स्पंदने’ हे वैचारिक लेखांचे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. ‘धर्मापलीकडचा धर्म’ या लेखात सांगतात, ‘आमच्या  सर्व श्रद्धा इमारतीवरील, पुतळ्याभोवती, मूर्तीभोवती गुंतल्या आहेत. या बाह्यांगांना इजा झाली की, आमच्या अंतरंगांना इजा होते. आम्ही पेटून उठतो. सलोखा, समेट, प्रेम, क्षमा, शांती ही सर्व मूल्ये विसरतो. नवीन शिकण्यासाठी पडदे फाडावे लागतात. ही हिंमत सहजासहजी सामान्य माणसाला होत नाही. जोपर्यंत माणूस असुरक्षित राहील तोपर्यंत अंधश्रद्धा कायम राहील.’

फादर हिलरी फर्नांडिस, ‘प्रेमाचा महामंत्र’ हा लेखसंग्रह म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनांचा संग्रह आहे. या पुस्तकात जवळजवळ सर्व धर्मांच्या बाबतीत चिकित्सक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धर्म जरी विविध असले, तरी त्याचा उगम मनुष्य कल्याण हा एकमेव  हेतू व उद्देश आहे. मात्र, कर्मकांडांत अडकल्याने मनुष्य कल्याण बाजूला सारून सत्ता मिळवण्याचा मार्ग  धर्म झालेला आहे. धर्माची चिकित्सा होत राहिली तरच तो मनुष्यासाठी कल्याणकारी होऊ शकेल. फादर हिलरी म्हणतात, ‘तथाकथित धर्मांनी जर मानवतेचे भयंकर असे काही नुकसान केले असेल तर ते हे की, मानवाला त्यांनी खर्‍या धर्माचा शोध घ्यायला प्रतिबंध केला आहे. या सर्व धर्मांनी आमचाच धर्म खरा धर्म आहे असा खोटा दावा केला आहे. जगातील सर्वच धर्मांनी मनुष्याच्या मनाला त्यांच्या बालपणापासून असे ठामपणे शिकविले आहे, ज्या धर्मात तुम्ही जन्मला आहात, तोच धर्म सत्य धर्म आहे, दुसरे सर्व धर्म खोटे आहेत. हा केवळ बकवास आहे.”

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा ‘परिवर्तनासाठी धर्म’ हा वैचारिक लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर वि. वा. शिरवाडकर म्हणतात, ‘ख्रिस्ती समाजाने अलिप्ततेच्या कोशात न राहता समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट व्हायला हवे. ही त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. धर्मावरील निष्ठा समाजाच्या सांस्कृतिक एकतेच्या आणि विकासाच्या आड येता कामा नये, हा त्यांचा आग्रह लेखनापुरता वा व्यासपीठाला मर्यादित राहिला नाही…

स्वार्थाचा चक्रव्यूह भेदून बाहेर येण्यासाठी शेजारधर्म हे अस्त्रच प्रभावी ठरत असते. तसेच ‘गोरगरिबांच्या’ उभे राहण्याची ख्रिस्ताची भूमिका व प्रतिज्ञा आहे. परंतु ख्रिस्ती धर्माचा आढावा घेताना काय आढळते? अगदी नजीकच्या भूतकाळातही चर्चने धनवानांशी हातमिळवणी करून त्यांचेच हित जपण्यातचे प्रयत्न केले आहेत. ही त्यांची विधाने ख्रिस्ती समाजातील प्रखर वास्तव समोर आणतात. ‘राईट और राँग,’ ‘इट्स माय कंट्री,’ ‘धर्म आणि राजकारण,’ ‘चर्चमधील भारतीयकरण चळवळ,’ ‘चर्च आणि रा. स्व. संघ,’ ‘ख्रिस्ताचे प्रेतवस्त्र,’ ‘असली की नकली?’ अशा विविध लेखांमधून धर्म आणि परिवर्तन या संदर्भात पुरोगामी विचार फादर दिब्रिटो यांनी मांडले आहेत. ‘सुबोध बायबल’ ही निर्मिती एक अभ्यासपूर्ण टीका आहे. दर्जेदार व विश्वासार्ह चिकित्सक ग्रंथ आहे, असे बिशप थॉमस डाबरे यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. याच ग्रंथात असे नमूद केले आहे की, बायबलमधील विश्वनिर्मिती आणि मानवनिर्मित संबंधित केलेले लेखन रुपकात्मक आहे म्हणून कोणी त्याचा शब्दश: अर्थ लावू नये किंवा त्या विधानाचा आधार घेऊन उत्क्रांतीविरोधी भूमिका घेऊ नये. शिवाय असे नमूद केले आहे की, देवराज्य अथवा स्वर्गराज्य हा भौगोलिक प्रदेश नसून ती आध्यात्मिक प्रकृती आहे.” मात्र मेलेल्या व्यतीला स्वर्ग राज्य मिळावे म्हणून तेच उपासनेत रोज अशी प्रार्थना करत. ही विसंगती आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या परिवर्तनशील आणि चिकित्सक विचार मांडणी बरोबरच,  ते बोलते सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. म्हणूनच त्याच्या मांडणीला वजन प्राप्त होते. नव्वदच्या दशकात वसईत भूमाफिया व गुंडगिरीने हैदोस घातला होता. त्या परिस्थितीत ते चर्च सोडून रस्त्यावर उतरले व ख्रिस्ती श्रद्धावंत व इतर नागरिकांना आवाहन करून हरित वसई वाचविण्यासाठी, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हरित वसई  संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. धर्मगुरू असून केवळ चर्चमधील बंदिस्त पूजाअर्चा नव्हे, तर लोकांच्या सामाजिक व नागरिक समस्या सोडविण्याकरिता ते लोकांमध्ये राहून चळवळीला ऊर्जा पुरविली. याची दखल तत्कालीन ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांनी घेऊन संपादकीय लिहिले. थोडक्यात, शब्दाने नाही तर कृतिशील परिवर्तनात बनले. अशा धर्मगुरू व पुजार्‍याची आज आपल्या समाजाला गरज आहे.

बिशप थॉमस डाबरे यांचे ‘सुंदर ते ध्यान’ हे पुस्तक म्हणजे ‘सुसंवादी धर्मचिंतन’ असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनीच प्रस्तावनेत म्हटले आहे. आजचे आपले आदर्शतापूर्वक धार्मिक जीवन जगताना अन्य धर्मीय लोकांचाही विचार करणे आवश्यक झाले आहे. परंतु प्रत्यक्षात मूलतत्त्ववादी उठाव मिळत असल्याची खंत व्यक्त करतात. आजच्या आधुनिक जगात केवळ वैचारिक स्वतंत्र हेच निर्णायक मूल्ये मानले जात आहेत. नेमकी हीच भूमिका सुसंगत राहिली नाही, कारण निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती यासाठीच सुस्पष्ट वैचारिक भूमिकेची आवश्यकता सांगितली आहे.

आर्च बिशप फेलीक्स मच्याडो यांनी ‘ज्ञानेश्वरी : पाथ टू लिबरेशन’ हा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये मुती, मोक्ष, लिबरेशन म्हणजेच शहाणपण wisdom असे नमूद केलेले आहे. मुती म्हणजे अहंकार नाहीसा होणे, मीपणा गळून पडणे म्हणजेच मोक्ष. मात्र, असे ग्रंथात लिहिले असले तरी मिस्साची प्रार्थना करतानाच मेल्यावर स्वर्गात जगण्यासाठी प्रार्थना तेही करतात, ही विसंगती आहे.

धर्मगुरू वेन्सी डिमेलो यांचा ‘देव, देश अन्  धर्मासाठी’ हा वैचारिक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाला बी. जी. वाघ या तत्त्वचिंतकाची प्रस्तावना आहे. ते म्हणतात, देशभक्तीचे हे राष्ट्र चिंतन आहे. तो सत्याचा आणि खर्‍या धर्माचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे… हे पुस्तक संवेदनशील मनाचे आक्रंदन आहे… खरा धार्मिक माणूस हा परंपरेचा नव्हे तर, मानवतावादाचा वाहक असतो. फादर वेन्सी डिमेलो यांच्या या ग्रंथातून त्याच्या मानवतावादी सकारात्मक विचारांचे प्रत्यंतर येते. महात्मा गांधींविषयी भाष्य करून ते सांगतात, “भारतीय हिंदूंना खर्‍या हिंदूंची ओळख करून घ्यायची असेल, तर तो एकमेव खरा हिंदू आहे- मोहनदास करमचंद गांधी! इतर धर्मांची घृणा न करता गांधीजींना भारत घडवण्याचा होता. एका लेखात ‘A priest cannot become a prophet’ जो वृत्तीने पुरोहित आहे तो केव्हाही प्रेषित होऊ शकणार नाही, असे धाडसाचे विधान केले आहे.

डॅनियल मस्करणीस यांचे ‘मंच’ हे पुस्तक साधना ट्रस्ट तर्फे प्रकाशित केले आहे. हे पुस्तक धर्माकडे बघण्याची डोळस दृष्टी देते. प्रार्थनेला चर्चमधून प्रोत्साहन देत असताना अंधश्रद्धा आणि मनोविकार वाढताहेत की काय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे. वाचन आणि विचार करणार्‍या बाईने, उत्पत्ती संबंधाच्या कालबाह्य गोष्टी डिलीट  करण्याविषयी भरसभेत प्रश्न विचारून बिशप महोदयांना निरुत्तर करणे, अपंगाच्या मेळाव्यासाठी चर्चेचे प्रांगण नाकारणे, प्रागतिक विचारांच्या धर्मगुरूच्या एका विधानाने पडलेली ठिणगी अशा ज्वलंत प्रश्नावर या पुस्तकात बोट ठेवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकवादी विचारसरणीने प्रभावित हा तरुण, त्यांच्या हत्येने व्यथित होतो, आपल्यापरीने त्याच्या विचारांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करतो, स्वत: आचरणात आणतो, हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा विजय आहे.

फादर प्रशांत ओलालेकर यांचे ‘स्त्री कर्माची धर्म कहाणी’ हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. हे पुस्तक ‘बायबल’मधील महिलाच्या स्थानावर तात्त्विक पातळीवर करून लिहलेले आहे. अत्यंत निकोप दृष्टीने अंत:करणपूर्वक  येशूच्या खर्‍या शिकवणुकीचा शोध घेण्याचा प्रयत्न यात आहे. ख्रिस्त शिकवणुकीची अतिशय सखोल चिकित्सा करून फादरांनी धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले आहे. ‘ख्रिस्ती धर्मातील इरस्मस आणि मार्टिन ल्यूथर यांचा वारसा प्रशांत चालवतात, असे म्हणायला हरकत नाही,’ असे ज्योती म्हापसा यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. फादर मनोगतात म्हणतात, ‘अनिष्ट रूढींविरुद्ध जागृती करीत असताना स्त्रियांची अमानुष पिळवणूक कशी होते, हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. स्त्रियांची न्याय्य बाजू घेऊन पवित्र शास्त्र व ख्रिस्ती परंपरा याचा पुनर्विचार व्हायला हवा. ही त्यांची भूमिका आहे.’

सुधीर शर्मा, ‘ज्ञानोदय’ या मासिकाचे अनेक वर्षे संपादक होते. धार्मिक स्वरूपाचे लेखन करताना ‘बायबल’चे संदर्भ देत त्याचे विश्लेषण ते करीत असत. ख्रिस्ती अस्मिता  जागृत ठेवण्याबरोबरच कठोर आत्मपरीक्षणाची गरज ते प्रतिपादन करतात. चमत्कारासंदर्भातील संपादकीय मत मांडताना ते लिहितात, ‘कथित चमत्कारावर विश्वास म्हणजे ख्रिस्तावरील विश्वास नव्हे. सामान्य ख्रिस्ती माणसे त्या सर्वांचा स्वीकार करत नाहीत. खरे तर सामान्य ख्रिस्ती माणसे असामान्य विचार मांडू शकतात. लिबरेशन थिऑलॉजीचा जन्म लॅटिन अमेरिकेतील ख्रिस्ती आचार्य नसलेल्या गावातील लोकांनी, गटाने एक येऊन ‘पवित्र बायबल’चे वाचन करून अर्थ, आपल्या जीवनातील  समस्यांशी कशा निगडित आहेत, यावर मनन-चिंतन केल्यावर उलगडला हे नमूद  केले आहे. धर्म मंदिरात नसून लोकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे व लोकांच्या वर्तणुकीतून तो दिसला पाहिजे, असे त्याचे प्रतिपादन असे.

अतुल आल्मेडा यांचं ‘अंधारातील वाटा’ हे वैचारिक लेखांचे पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला फादर जो. मा. पिठेकर प्रस्तावना लिहिताना म्हणतात,

‘त्यांची मते, माझ्या श्रद्धेविरुद्ध नव्हे, तर धर्मगुरू या नात्याने माझ्या अनुभवाविरुद्ध जातात’ तरीही या धर्मगुरूंनी दोन कारणांसाठी होकार दिला. ती दोन कारणे म्हणजे, रवींद्रनाथ टागोर आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘जिथं विचाराचा शुद्ध ओघ, अंधश्रद्धेच्या नि रूढींच्या विराट वाळवंटात लुप्त होत नाही… त्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात प्रभो! माझा देश जगात दे.’ दुसरे कारण त्यांनी जी. के. चेस्टरटन यांचे दिले आहे की, ‘एखादी गोष्ट लोकांसमोर मांडण्याची गरज असेल म्हणूनच ते मोडलेले का असेना लोकांसमोर मांडावेत.’ म्हणूनच अतुल आल्मेडा यांच्या लिखाणाला वजन येते. मनोगतात लेखक म्हणतात, ‘श्रद्धावंत ख्रिस्ती लोक ज्याच्या येण्याची वाट पहात आहेत तो ख्रिस्त वरील व्यक्ती (चार्वाक, सॉक्रेटिस, गौतम बुद्ध) अंतरा-अंतराने, भारतात व इतरत्र जागतिक शहाण्या माणसाप्रमाणे येतच राहिला आहे,’ खरं तर हिंदू धर्मग्रंथांना अत्यंत जवळची ही विचारसरणी आहे. ख्रिस्ताचा प्रकाश जसा लिओ टॉलस्टॉय, मार्टिन ल्यूथर, म. गांधी, बाबा आमटे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना दिसला तसा माझ्यासारख्या सर्वसामान्यांना दिसावा हा एकमेव हेतू हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे आहे. असा हेतूच त्यांनी मनोगतात व्यक्त केला आहे. “ईश्वर कल्पना नुसती तर्क विसंगतच नाही तर ती अनीतीला कारणीभूत होणारी आहे. कारण माणसाला ती दुर्बल बनविते व बाहेरून मदतीची याचना करण्यास शिकविते.” स्वामी विवेकानंद यांचे विचार लेखक मांडतात. दैवी शती किंवा देव ही मानवाला सुचलेली संकल्पना आहे. खरं सांगायचे तर देव हा मनुष्य निर्मित आहे आणि मनुष्य हा निसर्गनिर्मित आहे. “मनुष्याला जो विचार माणूस बनवतो तोच खरा धर्म” ही स्वामी विवेकानंदांची धर्माची व्याख्या मानवतावादी धर्माचे सारं आहे, असे त्याचे सांगणे आहे. धार्मिक असणे म्हणजेच नैतिकतेचे जीवन जगणे. समाजाची धारणा करणारा धर्म पाळणे म्हणजेच धार्मिक  होणे आहे. नैतिक माणूस धार्मिक असू शकतो, पण धार्मिक माणूस नैतिक असेलच असे नाही. नीती हे मूल्य तर धर्म ही त्या नीतीवर आधारित समाजव्यवस्था असावयास हवी. आजचे सर्व धर्म, नीती नियम न पाळता, हवी ती कर्मकांडे करण्यात धर्म मानतात. ही विवेकाची आणि धर्माची शोकांतिकाच आहे.

आल्मेडांनी ख्रिस्ती धर्मातील  स्वर्ग, पाप, पुण्य, मेरीचा पवित्र गर्भसंभव, ख्रिस्ताचे व मेरीचे स्वर्ग गमन नाकारले आहे. ख्रिस्त हा सॉके्रटिस व गौतम बुद्ध यांच्या सारखाच एक शहाणा महामानव होता. परंतु ज्या लोकांना त्याचे शिष्य होण्यास अवघड जाणवले त्यांनी त्यालाच ‘देव’ बनविले. एवढेच नाही तर त्याच्याच नावाने अंधश्रद्धेची असंख्य कर्मकांडे रचली. आज बहुसंख्य ख्रिस्ती श्रद्धावंत ख्रिस्ताचा खरा प्रेमाचा धर्म पाळण्याऐवजी चर्चचा कर्मकांड धर्म अनुसरून आहेत. बुद्धी उपजत असते तर श्रद्धा ही उपजत नसून रुजवलेली असते. म्हणूनच जन्मास येणार्‍या माणसात कुटुंबाची श्रद्धा रुजविली व तो ती श्रद्धा कुठलीच शंका उपस्थित न करता अंगीकृत करतो. त्याच्या नकळत त्याला धर्माच्या गुलामगिरीत बांधले जाते. ही विवेकाची शोकांतिकाच आहे.

जे मानवतेविरुद्ध आहे, त्याविरुद्ध, धर्म, जातपात, पक्ष, राष्ट्रीयत्व, संघटना (हे भेद संपवून) यातून बाहेर येऊन प्रत्येक व्यतीने आपले मत निर्भयपणे मांडले नाही तर मानव समाजाचा नाश काही मूठभर राजकीय व धार्मिक नेते करू शकतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. धर्म अशा वेळी मी काय करणार? विचार  करू या. can’t teach you anything but for think’ said Plato.

- अ‍ॅड. अतुल अल्मेडा, वसई

(लेखक हे विवेकवादी कार्यकर्ते असून मुंबई हायकोर्टामध्ये वकीली करतात.)
संपर्क : ९६७३८ ८१९८२

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]