डॉ. वृषाली मंडपे -
आपण कसे घडलो याचा मागोवा घेताना आपल्या लक्षात येते की, आपल्या घडण्यात अनेक प्रसंग, अनुभव, आपल्या अपेक्षा, आपण कळत नकळत केलेले इतरांचे अनुकरण, सभोवतीचा समाज, आपण घेतलेले निर्णय, त्याला समाजाचा मिळणारा प्रतिसाद याचबरोबर त्या निर्णयाला खंबीरपणे आपल्या पाठीशी असणारे अनेक हात या सारख्या असंख्य गोष्टींचा समावेश होत असतो. माझा वाटचालीचा प्रवास हा देखील असाच आहे.
माझा जन्म झाला तेव्हा माझी आई (प्राचार्या प्रमोदिनी मंडपे) आणि वडील (कुमार मंडपे) दोघेही सातार्याला रयत शिक्षण संस्थेत शिक्षकी पेशात होते. आई जिजामाता अध्यापिका विद्यालय या डी. एड. कॉलेजवर विज्ञानाची प्राध्यापिका, तर वडील अण्णासाहेब कल्याणी विद्यालय येथे गणित आणि विज्ञानाचे शिक्षक. त्यामुळे घरात मुळातच विज्ञानवादी वातावरण होते. माझ्या जन्माच्या वेळेची ही गोष्ट मी अनेकदा आईच्या तोंडून ऐकली आहे. आईला सहावा महिना असेल, त्यावेळेस सूर्यग्रहण होते. त्यामुळे कॉलेजच्या तिच्या सहकारी प्राध्यापिकांपासून विद्यार्थिनीपर्यंत सर्वांनी तिला उद्या सूर्यग्रहण आहे, रजा घ्या, शिकवू नका, घरीच थांबा, कारण ग्रहणात खडू मोडला तरी मुलीची बोटे मोडू शकतात, घरी थांबल्यावर देखील कोणतेही काम करू नका.. इत्यादी इत्यादी अनेक सूचना दिल्या होत्या. आईला अर्थातच विनाकारण रजा काढून घरात बसणे पटणारे नव्हतेच. तिने संपूर्ण ग्रहण काळात कॉलेजमध्ये शिकवले. घरी येऊन स्वयंपाक केला. अर्थातच त्यात भाजी निवडणे, चिरणे, पोळ्या लाटणे इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश होता. मी जन्मले तेव्हा मला बघायला हॉस्पिटलमध्ये तिच्या सहकारी आणि विद्यार्थिनी आल्या, सगळ्याजणी बाळाच्या अंगावरचे पांघरून काढून बघत होत्या. त्यांच्या मनात भीती होती की मुलगी अपंग असेल, डाग असू शकतील, तिच्या हातापायाची बोटे वाकडी असू शकतील, ओठ चिरलेला असेल कारण ग्रहण काळात करू नये त्या सर्व गोष्टी त्यांच्या बाईंनी केल्या होत्या ना! अर्थातच पूर्णपणे निरोगी बाळ बघून त्यांच्या मनातील हा गैरसमज दूर झाला असावा.
ही गोष्ट ऐकत ऐकतच मी मोठी झाले. घरातील वातावरण हे असे मोकळे आणि बंडखोर होते. आमच्या घरात प्रश्न विचारणे हा चौकसपणा समजला जायचा. आम्ही घराचे नावही त्यामुळे ‘जिज्ञासा’ असेच ठेवले आहे.
माझ्या आणि भावाच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांची निवड केली. तेथे आमच्यावर श्रमाला महत्त्व देणारे संस्कार झाले. जातीपातीचे संस्कार, भेदभाव कधी झाला नाही. तिथे बहुतांश मुले शेतकरी कुटुंबातील होती ते आमचे मित्र मैत्रीण झाले. माझे लहानपण चाळीत गेले. पोवई नाक्यावर तेव्हा आठ घरांची चाळ होती. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, बेंदूर, नागपंचमी असे सण तेथे जल्लोषात साजरे केले जायचे. चाळीचे घरमालक मुस्लिम होते. त्यामुळे सोबतच ईदही जोरात व्हायची. ईदला त्यांचा शीरखुर्मा, बिर्याणी आम्ही खात असू तर दिवाळीला आमच्या फराळाचे डबे त्यांच्याकडे जात. दारासमोर सुंदर रांगोळ्या रेखल्या जात. माझ्या आईची रांगोळी पाहायला आख्खी चाळ जमा व्हायची. सगळ्यांच्याकडे गणपतीच्या आरत्या म्हणायला आम्ही सर्व मुले जात असू. त्यामुळे आमच्यासारख्याच घरमालकांच्या मुलांच्याही सर्व आरत्या तोंडपाठ होत्या. मला वाटते सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सलोखा आम्ही तेथून शिकलो. लहान असताना माझ्या आग्रहाखातर घरी गणपती बसवला गेला. वडिलांनी शाडूचा गणपती स्वतः हाताने बनविला. बाकीच्यांचे गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे होते, त्यामुळे साहजिकच ते खूप देखणे होते. मला फार वाईट वाटलं. विसर्जनाला वडील मला सोबत घेऊन गेले. दोन दिवसांनी आम्ही परत एक चक्कर नदीवर मारली, मला तेव्हा रंग आणि प्लास्टरने होणारे पाण्याचे प्रदूषण वडिलांनी दाखवून दिले. पुढे मी गणपती दान करा या मोहिमेचा भाग झाले ते यामुळेच!
आजही माझ्या घरी मी सर्व सण समारंभ साजरे करते. सणांचा सकारात्मक फायदा म्हणजेच नेहमीच्या दैनंदिन रुटीनपासून सुटका, आनंद, मजा, कुटुंबाने एकत्र येणे, खाण्यापिण्याची रेलचेल .. अशा सर्व गोष्टी आम्ही करतो पण व्रतवैकल्ये, कर्मकांडे यांना फाटा देऊन.
घरात कधीच हे बरोबर, हे चूक असे सांगितले गेले नाही. आई-वडिलांनी निधर्मिकतेच्या बाबतीतील त्यांची मते आमच्यावर लादली नाहीत. पण, स्वतंत्र विचार करायला चालना देणारे पोषक वातावरण मात्र नेहमीच उपलब्ध करून दिले.
घरात नेहमी सर्व गोष्टींवर खुल्या चर्चा होत. तू लहान आहेस तुला काय कळतंय? असा अविर्भाव कधीच नसे. उलट प्रत्येकाने मत मांडावे असा आग्रह असे. आसपास घडणार्या दैनंदिन घटना, राजकारण इथपासून भारताचा इतिहास, राज्यघटना, राज्यक्रांती, वैज्ञानिक शोध, विश्व निर्मितीचा सिद्धांत यासारख्या विषयावर भरभरून चर्चा व्हायच्या. उत्क्रांती, म्यूटेशन यावर नुसत्या चर्चाच व्हायच्या नाहीत तर झाडे लावून सदाफुली, गुलमोहरच्या फुलात झालेले म्यूटेशन वडील समजावून सांगायचे.. पावसाळ्याच्या दिवसात घरात बल्बपासून बनवलेल्या चंबूत डबक्यातले बेडूक मासे पकडून बेडूक बनण्यापर्यंत त्यांचे जीवनचक्र आम्ही बघायचो. सुरवंटाचे फुलपाखरू बनणे, डासाच्या अळीपासून डास बनणे अशी विविध जीवन चक्रे वडील करून दाखवत असत. आपल्या मुलांना निसर्गाचं बारीक ज्ञान असावं असा त्यांचा अट्टाहास होता. बर्याचदा मोळाच्या ओढ्याला सायकल थांबवून वडील तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दाखवायचे. तेथे बगळे, कावळे, टकाचोर, तांबट, खाटीक, वेडा राघू, शिंपी, कोतवाल, सातभाई असे असंख्य पक्षी असायचे. कधी मुंग्यांची वारूळं बघायला जायचो, वारुळाची वैशिष्ट्ये वडील सांगायचे.. आसपासची झाडं, त्यांच्यातील औषधी तत्व वडील समजावून सांगायचे. पालीविषयीचा गैरसमजही वडिलांनीच दूर केलेला.. आज माझ्या घरात आम्ही एकही पाल मारत नाही. पाल हा पेस्ट कंट्रोल करणारा उत्तम प्राणी आहे. त्यामुळे आम्हाला कधीच झुरळांना मारण्यासाठी वेगळा काही उपाय करावा लागत नाही
१९८५ -८६ च्या सुमाराला रूपाली आर्डे आणि मी दोघी कल्याणी हायस्कूलला एकाच वर्गात शिकत असल्याने मैत्रिणी झालो. मग कधी ती माझ्या घरी येई, कधी मी तिच्या घरी जाई.. त्यामुळे आर्डे सर आणि वडिलांची मैत्री झाली. साहजिकच त्यांच्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या संपर्कात आई वडील आले.
त्याच दरम्यान आईने बालभारतीसाठी एक प्रकल्प हाती घेतला होता. प्रकल्पाचा विषय होता, ‘विद्यार्थ्यात असलेल्या अंधश्रद्धा, त्यांचे स्वरूप, परिणाम आणि चिकित्सा.’ सर्वे झाला; रिझल्ट फार वेगळा होता. जी मुले रिमांड होमसारख्या ठिकाणी होती, कुटुंबापासून दूर होती, त्यांच्यात अंधश्रद्धा कमी आढळल्या. या उलट, पालकांसोबत कुटुंबात राहणार्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आढळून आल्या. शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आढळून आल्या. पालकांच्या आणि शिक्षकांच्या अंधश्रद्धा दूर व्हायला हव्यात, विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यासाठी वाचनसाहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे; या विषयावर आई-बाबांची डॉक्टरांशी वेळोवेळी चर्चा व्हायची. पुढे सुरू झालेल्या वैज्ञानिक जाणीव प्रकल्पाची बीजे इथे होती.
याच दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देखील स्थापना झालेली होती. आम्ही दर गुरुवारी पु. ल. देशपांडे यांच्या देणगीतून आकाराला आलेल्या मुक्तांगण मध्ये मीटिंगला जाऊ लागलो, येथून पुढे माझ्यावर विवेकनिष्ठ विचारांचा प्रभाव वाढत केला. मिटिंगमध्ये केवळ अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर चर्चा नसायच्या तर विविध सामाजिक विषयांपासून विज्ञानापर्यंत अनेक विषयावर या चर्चा चालायच्या.. याच काळात अनेक मोठमोठे विचारवंत जवळून बघता आणि ऐकता आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, निळू फुले, मेधा पाटकर, ना. ग. गोरे, अनिल अवचट, एन. डी. पाटील, आ. ह. साळुंखे, दत्तप्रसाद दाभोलकर, वसंतराव पळशीकर, भा. ल. भोळे, मे. पु. रेगे, बी प्रेमानंद, मोहन धारीया, बाबा आढाव, प्रसन्न दाभोलकर असंख्य.. या व्याख्यानातून संत तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी, गौतम बुद्ध, चार्वाक, विवेकानंद, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू महाराज, सावरकर वेगळ्या रूपात भेटत गेले.
दर गुरुवारी नवीन विषयावर चर्चा होत असे. कधी आर्डे सरांचे व्याख्यान होई, कधी कोणी आकाश निरीक्षणांविषयी सांगायचे, दुर्बीण आणून दाखवायचे, विविध ग्रह, सूर्यमाला, आकाशगंगा याची माहिती द्यायचे. कधी वडील अंधश्रद्धांमधील विज्ञान समजावून सांगत, मंत्राने अग्नी पेटवणं, खिळ्यावर झोपणे, लिंबातून रक्त काढणे, कुंकवाचा बुक्का करणे, जळता कापूर तोंडात धरणे, विस्तवावरून चालणे, नारळातून बांगड्या, कापड, हळदीकुंकवाच्या पुड्या काढणे, असे नानाविध प्रयोग करून दाखवीत असत, कधी सर्पमित्र अनिल इंगवले येत टेबलवर साप सोडले जात, कोणता विषारी? कोणता बिनविषारी? खवल्यांवरून साप कसा ओळखायचा? त्याचे दात जीभ कसे असतात? सापाला ऐकू येते का? सापाला वास येतो का? साप डूख धरतो का? या आमच्या बालसुलभ प्रश्नांची उत्तरे देत. कधी व्यसनाधीनता, कधी मन व मनाचे आजार याच्यावर व्याख्याने होत, तर कधी स्त्रियांचे आरोग्य व आजार या विषयाला अनुसरून व्याख्याने होत, कधी-कधी जगूबाबा गोरड यांच्यासारखा पूर्वाश्रमीचा बाबा येई ज्यांनी पूर्वायुष्यात अनेक लोकांना फसवले होते; परंतु आता तेच कार्यकर्ता म्हणून काम करीत होते, ते त्यांच्या कथा सांगायचे.
याच दरम्यान गोंदेमाळचा भुताचा पळ थांबवणे, गुणवर्याची टक्कर थांबवणे, कडेगावची भानामतीची उकल करणे, करम अली दरवेशचा दगड उचलण्याचा कार्यक्रम, कधी जटा सोडवण्याचा उपक्रम अशा नानाविध घटना घडत होत्या. एका वर्षी आम्ही प्रतीकात्मक पत्रिका जाळण्याचा कार्यक्रम केला होता. पप्पा आणि त्यांचे सहकारी श्री. पांगे, अॅड. संजय देशमुख, श्री. ओंकार पाटील हे शाळा शाळांतून चमत्कारांचे प्रयोग करून दाखवत असत. डॉक्टरांचे व्याख्यान असे, ते त्या मागील निश्चित भूमिका सांगायचे. ‘शोषण करणार्या अंधश्रद्धा विरोधात आपला लढा आहे’ ही त्यामागील प्रमुख भूमिका होती.
याच दरम्यान वैज्ञानिक जाणीव प्रकल्प देखील आकाराला येत होता. सत्यशोध प्रज्ञा परीक्षा, प्रज्ञा बोध परीक्षा अशा अनेक परीक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत घेतल्या जात. त्या परीक्षेचे ऑफिस आमच्या घरातच थाटले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षक विद्यार्थी यात भाग घ्यायचे. यात माझा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या दृष्टीने सदर अभ्यासक्रम आखला होता. सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या प्रमाणपत्रावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मा. वसंत गोवारीकर अशा थोर व्यक्तींच्या स्वाक्षर्या होत्या.
वरील सर्व घटनांमुळे माझी विवेकनिष्ठ विचारांची बैठक पक्की झाली. बाबा वाक्यम् प्रमाणम्! न मानता कोणतीही गोष्ट तर्कावर घासून बघण्याची दृष्टी मिळाली, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ अशी देवाची संकल्पना मनात रूढ झाली. सत्य, अहिंसा आणि शांती या शाश्वत मूल्यांवरील श्रद्धा वाढली. नीतिमत्ता, सचोटी आणि साधन शुचिता, यांचे जीवनातील महत्व कळले. पुढे देखील माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, त्या प्रत्येक प्रसंगात मी तेव्हा काम करीत असलेले सहयोग हॉस्पिटल आणि महाराष्ट्र अंनिसच्या विस्तारित कुटुंबाने मला भरभरून साथ दिली. विभक्त झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि दिलेल्या सर्व परीक्षांमध्ये मला यशही मिळाले. या कठीण प्रसंगात जर माझ्यावर विवेकनिष्ठ विचारांचे संस्कार नसते तर कदाचित मी नशीब, विधिलिखित, दैव या गोष्टींवर विश्वास ठेवून नशिबाला दोष देत गप्प बसून राहिले असते. परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ मला या संस्कारांनी दिले असे मी मानते. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने आपण आपली स्वप्ने सत्यात उतरवू शकतो, असे माझे मत या विवेकनिष्ठ संस्कारांमुळेच बनले आहे.
आज माझा जोडीदार माझ्यासारखाच विवेकनिष्ठ विचारांचा आहे. आमची मुले चौकस आणि तर्काने विचार करणारी आहेत. माझा मुलगा केवळ पाच वर्षांचा असताना दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत असा निर्णय घेतो. कारण ‘पोल्युशन होते, त्यामुळे लोकांना त्रास होतो’ तेव्हा त्याच्या विचारांचे मला कौतुक वाटते. पुढेही जाऊन आमची मुले सजग, संवेदनशील, समाजाचे हित जोपासणारे नागरीक व्हावेत, एवढीच माझी इच्छा असेल आणि त्याच दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील.
(डॉ. वृषाली या नागपूर येथे असि. कमिशनर (जीएसटी) म्हणून कार्यरत आहेत.)