अंजली नानल -
‘अंनिस’च्यावतीने गावकर्यांचे प्रबोधन आणि चमत्काराचा पर्दाफाश
अंत्रोली (दक्षिण सोलापूर) गावात एका मंदिरात देवीला डोळा आल्याचे लहान मुलाने सांगितले. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. १० सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर कर्नाटकातूनही लोक चमत्कार पाहण्यासाठी आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन केल्यानंतर ग्रामस्थांचा गैरसमज दूर झाला.
गावात एका उभ्या दगडावर फक्त शेंदूर फासलेले एक मंदिर आहे. त्या देवीला रात्रीतून डोळा आला, अशी चर्चा सुरू झाली. देवी जागृत झाली असून देवीने एक डोळा उघडला आहे. नवरात्रीत दुसरा डोळा येईल. देवीचे मोठे मंदिर बांधले पाहिजे, यात्रा काढायला हवी, अशी चर्चा होऊ लागली.
सोलापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला माहिती कळताच त्यांनी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना घटनेची माहिती दिली. मंद्रूप पोलीस स्टेशनमधील श्रीकांत बुर्जे, आयेशा फुलारी हे पोलीस अंनिस टीमसोबत घटनास्थळी गेले. त्यानंतर गावकर्यांचे प्रबोधन करण्यात आले.
डोळा आपोआप आलेला नसून तो कोणीतरी चिकटविला आहे. दुसर्या बाजूला असलेली खपली दुसरा डोळा येणार असल्याची खूण नसून फासलेल्या शेंदुराचा पापुद्रा आहे. जर कोणी हा चमत्कार आहे असा दावा करीत असेल तर त्यांनी अंनिसला ते लेखी द्यावे, आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तत्पर आहोत, असे अंनिसकडून सांगताच कोणीही पुढे आले नाही.
मंगळवार, शुक्रवार अंगात येऊ लागले
१० सप्टेंबरपासून अफवा पसरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी महिेलांच्या अंगात येऊ लागले. पाहता-पाहता तिथे खण, नारळ, नैवेद्याचा ढीग जमा होऊ लागला.
मंदिरात कोणत्याही प्रकारची देवीची मूर्ती नसून तो फक्त एक उभा ओबडधोबड शेंदूर फासलेला दगड आहे, ज्यात कुठेही पुरातन भारतीय स्थापत्य शैली म्हणून काही आढळत नाही. अशा दगडाला अनेकदा ‘तांदळा’ म्हटले जाते. कोणीतरी हा डोळा चिकटवलेला दिसतोय. त्यामुळे कोणीही यावरून अफवा पसरवू नये.
अफवा असल्याचे पुजार्याकडून कबूल
शेवटी पुजार्याने कबूल केले की, इथे कोणताही चमत्कार नाही. ही अफवा आहे. देवी जागृत झाली, प्रसन्न झाली, कौल दिला असे काहीही आमचे म्हणणे नाही, असे ‘अंनिस’कडून सांगण्यात आले.
या वेळी प्रा. शंकर खलसोडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अस्मिता बालगावकर, उषा शहा, निशा भोसले, अंजली नानल, कुंडलिक मोरे, नितीन अन्वेकर, सिद्धार्थ परीट, ब्रह्मानंद धडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
– अंजली नानल, सोलापूर