महात्मा गांधींची धर्मचिकित्सा

चंद्रकांत झटाले -

महात्मा गांधींचा धर्म किंवा गांधींनी धर्माची केलेली चिकित्सा हा गांधी समजून घेतानाचा अत्यंत किचकट विषय आहे. गांधींना काळानुसार जसजसे धर्माचे आकलन होत गेले, त्यानुसार त्यांच्या धर्माच्या व्याख्येत बदल होत गेले. खरंतर गांधींना आपण कुण्या एका धर्माच्या चौकटीत बांधूच शकत नाही. अगदी सुरुवातीच्या आयुष्यात गांधीसुद्धा चातुर्वर्ण्य मानणारे आणि ही व्यवस्था समाजाच्या हितासाठीच आहे असे मानत होते; पण यातील सत्य जेव्हा गांधींना कळले तेव्हा त्यांनी जराही वेळ न दवडता या चातुर्वर्ण्याला ठोकर मारली. 

धर्म मग तो कोणताही असो, त्याची चिकित्सा करायची नसते, त्यावर शंका घ्यायची नसते असेच संस्कार बालपणापासून प्रत्येकावर झालेले असतात. त्या संस्कारांचा पगडा एवढा जबरदस्त असतो की, व्यती कितीही शिक्षण घेऊन मोठी शास्त्रज्ञ झाली, आय.ए.एस. झाली तरी धर्माची चिकित्सा करण्याचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही. कारण, धर्म हा माणसापेक्षा मोठा, धर्मापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही हीच शिकवण आपल्याला देण्यात येते. शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमातसुद्धा इतिहासातील महान व्यतींचे विविध पैलू शिकवले जातात. कुण्या महापुरुषाने धर्माची चिकित्सा केली असेल तर त्याची माहिती मात्र दिली जात नाही.

एखाद्या धर्माची चिकित्सा करणे म्हणजे त्या धर्माला शिव्याशाप देणे, त्या धर्माची बदनामी करणे असे अजिबात नाही. तर त्या धर्मातील चांगल्या वाईट गोष्टींची समीक्षा करणे, त्यातील वाईट व अनावश्यक गोष्टी बाजूला काढणे, हे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेऊ या. आपण धर्मग्रंथांमधील माहिती जर बघितली तर बायबलनुसार पृथ्वी ही सपाट आहे. तिच्यावर स्वर्ग आणि खाली नरक आहे. पण प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे हा शोध लावला. चंद्राला अग्निगोल मानणार्‍या ग्रंथांना गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्रावरील खडक आणि दर्‍या दाखविल्या. भगवान महावीरांच्या सांगण्यानुसार, चंद्रावर देवांची वस्ती आहे. सर्व जैन धर्मीय हजारो वर्षे तेच सत्य मानत होते. कारण त्या वेळी ती गोष्ट तपासून बघण्याची सोय नव्हती. परंतु आता मनुष्य स्वतः चंद्रावर जाऊन आल्याने तिथे कुठलीच सजीव वस्ती नसल्याचे त्याच्या लक्षात आले. हिंदू धर्मग्रंथांप्रमाणे पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी आहे. हजारो वर्ष हिंदूधर्मीय तेच सत्य मानत होते. परंतु विज्ञानाद्वारे प्रचंड आकाराच्या ब्रह्मांडाची मनुष्याला माहिती झाली. त्या ब्रह्मांडात पृथ्वी अधांतरी फिरते आहे हा शोध लागला. त्यामुळे शेषनागाची कथा खोटी ठरली.  हिंदू धर्मात समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले आहे. परंतु आज रोज करोडो लोक समुद्र ओलांडून जातात, पण त्यांचं काहीही वाईट होत नाही. हिंदू धर्माचे आराध्य श्रीराम स्वतः समुद्र ओलांडून श्रीलंकेत गेले होते. हिंदू धर्मानुसार स्त्री-शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. पण आज ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं काहीही वाईट झालं नाही, उलट कल्याणच झालं आहे. बौद्ध धर्म देखील बाबासाहेबांनी जसाच्या तसा स्वीकारला नाही. त्यातील कर्मकांड-अंधश्रद्धा काढून टाकून बौद्ध धम्म बनवला. त्यावर त्या काळच्या सनातनी बौद्ध भिक्खूंनी बाबासाहेबांवर टीकेची झोड उठवली होती. पण अनेकांनी बौद्ध धर्मातील जे महायान आणि हीनयान हे दोन पंथ आहेत, त्यात बाबासाहेबांनी काढलेला हा तिसरा भीमयान पंथ असे बाबासाहेबांचे समर्थन केले. मुस्लीम समाजात मृत व्यतीला जमिनीत पुरण्याचे विधान आहे. परंतु चीनमध्ये प्रत्येकाला जाळलेच गेले पाहिजे असा नियम आहे. मग तिथे मुस्लिमांना सुद्धा जाळले जाते पण त्यामुळे कुणाचं काही वाईट झालेले नाही. उलट हे समजत गेल्यामुळे धर्मातील अनावश्यक गोष्टी बाजूला पडत गेल्या आणि धर्म अधिक शुद्ध होत गेले.

महात्मा गांधींचा धर्म किंवा गांधींनी धर्माची केलेली चिकित्सा हा गांधी समजून घेतानाचा अत्यंत किचकट विषय आहे. गांधींना काळानुसार जसजसे धर्माचे आकलन होत गेले, त्यानुसार त्यांच्या धर्माच्या व्याख्येत बदल होत गेले. खरंतर गांधींना आपण कुण्या एका धर्माच्या चौकटीत बांधूच शकत नाही. अगदी सुरुवातीच्या आयुष्यात गांधीसुद्धा चातुर्वर्ण्य मानणारे आणि ही व्यवस्था समाजाच्या हितासाठीच आहे असे मानत होते; पण यातील सत्य जेव्हा गांधींना कळले तेव्हा त्यांनी जराही वेळ न दवडता या चातुर्वर्ण्याला ठोकर मारली. 

आधी गांधींनी कर्मसंकर घडवला. म्हणजे गांधींचा जो चातुर्वर्ण्य होता तो कर्मावर आधारित होता, जाती-धर्मावर नाही. भंगीकाम, मेलेल्या ढोरांची कातडी सोलणे ही कामे शूद्रांची; पण गांधींनी ही कामे सवर्णांनाही करायला लावली, ही सगळी कामे गांधींच्या सांगण्यावरून ब्राह्मणांनीही केली. अस्पृश्यता निवारणाच्या किंवा श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली असो, गांधींनी असली हलक्या दर्जाची समजली जाणारी कामे, हलक्या जातींनी करावयाची कामे वरच्या जातींच्या लोकांना करायला लावली आणि तेसुद्धा आजपासून ९०-९५ वर्षांअगोदर. त्यासाठी त्यांनी अनेक सवर्णांना प्रेरणा दिली. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोकणातील आप्पासाहेब पटवर्धन हे शुद्ध चित्पावन ब्राह्मण. त्यांनी आयुष्यभर गांधींच्या सांगण्यावरून भंगीकाम व चांभारकाम केले. लोक त्यांची घृणा करत आणि म्हणत, ‘गांधी तर मेलेल्या माणसांनाही जिवंत करतो आणि दोन पायांवर चालायला शिकवतो असे ऐकले होते; पण हा तर दोन पायांवर चालणार्‍या माणसांनाही डुकरासारखा चार पायांवर चालायला लावतो.’ अशा प्रकारे या कट्टरवाद्यांनी त्यांची निंदा केली. आप्पासाहेब पटवर्धनांसारखी असंख्य उदाहरणे आहेत की, गांधींच्या सांगण्यावरून समाजात ‘कर्मसंकर’ घडून येत होता. चातुर्वर्ण्यामध्ये असा कर्मसंकर करणे किंवा घडवून आणणे हे मान्य होईल काय? अजिबात नाही, पण गांधींचा धर्म आणि गांधींचा चातुर्वर्ण्यच वेगळा होता. त्यामुळे जातिव्यवस्था व चातुर्वर्ण्य शिरोधार्‍य मानणारे, त्याला खतपाणी घालणारे, जातिव्यवस्था टिकली पाहिजे याकरिता जिवापाड प्रयत्न करणारे कट्टरवादी लोक समाजात असे गैरसमज पसरविण्यासाठी व गांधींचे माहात्म्य धूसर करण्यासाठी त्या काळात सुद्धा गांधींची बदनामी करण्यात मशगुल होते.

प्रत्येकच धर्मात काही चांगल्या, काही वाईट गोष्टी आहेत. मग आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या त्या धर्मातील वाईट गोष्टी, प्रथा, परंपरा आपण काढून टाकून आपला धर्म अधिक शुद्ध कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धर्माची चिकित्सा केली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणत असत की, भारतात असा एक काळ होता की गोमांस खाल्ल्यावाचून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे. वेदांमध्ये तुम्हाला आढळेल की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा मोठा पाहुणा आला की उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे समाजाच्या लक्षात आले, उत्तम बैलांची हत्या केल्यास आपल्या शेतीवर संकट येईल म्हणून ही रूढी बंद पडली. त्यामुळे त्या काळी गोहत्या ही निषिद्ध मानली गेली. आज आपणाला भयंकर वाटणार्‍या अशा रूढी एके काळी विद्यमान होत्या हे आपल्याला जुन्या ग्रंथावरून कळून येते. कालानुरूप दुसरे नियम केले गेले. धर्मातील असे नियम ज्या वेळी निरुपयोगी वा हानिकारक ठरतील त्या वेळी त्यांना बदलावं लागेल. धर्माचे आजचे विकृत स्वरूप हेच हिंदुस्थानच्या अवनतीचे प्रमुख कारण आहे असे विवेकानंद म्हणत.

वारकरी परंपरेतील संतांनीसुद्धा धर्मातील अशा वाईट व अनावश्यक बाबींना विरोध केला आहे. ‘नवसे पुत्र होती तर का करणे लागे पती’ म्हणणारे तुकोबा असो की ‘योग याग विधी, येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म’ सांगणारे ज्ञानोबा असो. हाच धागा गांधींनी पुढे सुरु ठेवला. पण धर्मचिकित्सा करताना धर्माला सोडून चालणार नाही हे सुद्धा गांधींनी ओळखले होते. गांधी ईश्वराला मानतात; पण ह्या ईश्वराचे दर्शन घ्यायला कधीच मंदिरात गेले नाहीत. त्यांच्या आश्रमात देवघर नाही की आश्रमाच्या आवारात मंदिर नाही. कारण गांधींचा ईश्वर वेगळा होता. कोणता ईश्वर तर सत्य हाच ईश्वर. धर्माच्या नावावर केले जाणारे शोषण, देवाधर्माच्या नावावरचे कर्मकांड, वाईट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता, उच्च-नीच भेदभाव दूर करण्यासाठी धर्माचा आधार सोडून चालणार नाही, असे गांधींचे मत होते. जसे तुकारामांनी धर्मावर, त्याच्या नावाने चालणार्‍या ढोंगबाजीवर कितीही कठोर प्रहार केले असतील; पण त्यांनी कधी ‘विठ्ठल’ सोडला नाही. “तुमच्या देवावर काय कुत्रेही टांग करून मुतते” इतकी कठोर भाषा गाडगेबाबांनी वापरली असेल; पण त्यांनी कधी ‘गोपाला’ सोडला नाही. तसेच गांधींनी फक्त वाईट परंपरा तोडण्याकरिता, अस्पृश्यता निवारणाकरिता, लोकांना जोडण्याकरिता, माणुसकीच्या प्रचार प्रसाराकरिता धर्माचा आधार घेतला. गांधींच्या आश्रमातील प्रार्थना ही सर्वधर्म प्रार्थना होती. गांधी गीतेला आदर्श मानत, मात्र गीतेचा आशय अनासती आहे हे त्यांचे म्हणणे होते. गीतेचा संदेश हिंसा नाही व जर गीता हिंसा शिकवत असेल तर मी गीता नाकारतो असेही त्यांनी ‘अनासती योग’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. देव चराचरात भरला आहे, तो झाडावेलीत, पशुपक्ष्यांत आणि प्रत्येक जिवंत माणसात आहे हे मानणारा, विश्वाची एकता सांगणारा हिंदू धर्म गांधींना अभिप्रेत होता. हिंदू धर्माचे हे उन्नत रूप प्रकट करण्यासाठी हिंदू धर्माचे पाईक असणार्‍यांनी आपल्या चालीरीती, जीवनपद्धती आणि मनोधारणा बदलण्याची नितांत गरज गांधींना वाटत होती. त्यासाठी धर्मपंडित किंवा पुरोहित वर्ग सांगत असलेल्या आशयापेक्षा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून धर्माचरण करण्याचा आग्रह त्यांनी वारंवार धरला. हिंदू धर्माची पाठराखण म्हणजे त्यातील कुप्रथांचे, अंधश्रद्धेचे आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन नव्हे, किंवा हिंदू धर्मात सुधारणेला काहीच वाव नाही, तो मुळातच महान आहे अशी भलावण करणे नव्हे. हिंदू धर्माविषयी प्रेम असणार्‍यांनी हिंदू धर्म अधिकाधिक उन्नत बनविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातील कुप्रथांचे आणि ब्राह्मण्याचे समर्थन करणार्‍यांना हिंदू विरोधी मानणे आवश्यक आहे असे ते म्हणत. धर्म हा माणसाचे जगणे सुकर करण्यासाठी आहे, जगण्यात अडचणी निर्माण करण्यासाठी नव्हे हा गांधींचा हिंदू धर्म होता.

गांधींनी फक्त धर्मच नाही तर धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे आणि धर्मवर्तनाबद्दलसुद्धा महत्त्वाचं चिंतन करून ठेवलं आहे. धर्मग्रंथाच्या बाबतीत गांधी म्हणतात, “मी नेहमी म्हणतो की धर्मग्रंथांच्या नावाने छापलेल्या पुस्तकांमध्ये असणार्‍या सर्वच गोष्टींना ब्रह्मवाक्य मानण्याची गरज नाही. पण प्रत्येक मनुष्य हे ठरवू शकत नाही की काय चांगलं आणि प्रामाणिक आहे, तसेच काय वाईट आणि अप्रामाणिक आहे. प्रत्येक धार्मिक ग्रंथांच्या बाबतीत, गीतेच्या बाबतीतही मी आपला विवेक वापरतो. धार्मिक ग्रंथातील कोणत्याही वचनांना मी माझ्या विवेकबुद्धीवर हावी होऊ देत नाही.

प्रत्येकच धार्मिक व्यतीला गांधी इथे विवेक वापरण्याचा सल्ला देतात. धार्मिक स्थळांच्या बाबतीत गांधी म्हणतात, “धार्मिक स्थळांच्या नावावर भारतभरात जे भांडार पडून पडून सडले आहेत, ते धार्मिक स्थळं नाहीत तर फसवणूक करणार्‍या गोष्टी आहेत. हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहेत. मला जर अधिकार असता तर मी धार्मिक स्थळांवरील महाप्रसाद (जेवणावळी )बंद करून टाकला असता आणि केवळ अशा व्यतींना जेवू घातलं असतं ज्यांनी प्रामाणिकपणे यासाठी कष्ट घेतले आहेत.” पुढे गांधी सांगतात की, “धार्मिक स्थळांची संपत्ती जर आता शिक्षण, संस्कृती आणि सत्कार्यात लागली तर देशाचं खूप मोठं हित होऊ शकते. प्रत्येक धार्मिक स्थळाला संस्थेचं रूप देणं ही भारताची वर्तमान आवश्यकता आहे. धार्मिक स्थळांचे धन जर राष्ट्र निर्माणासाठी लागले तर यापेक्षा चांगले काम अजून कोणते असू शकेल?” या ठिकाणी धार्मिक स्थळ म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई अशा सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं असा अर्थ आहे.

धर्म परिवर्तनाच्या बाबतीतही गांधी वास्तव विचार करतात. ते म्हणतात, “जर कुणी व्यती भीतीने, जोर जबरदस्तीने, भुकेपोटी किंवा काही पैशांच्या लालसेपोटी दुसर्‍या धर्मात जातो, तर त्याला हृदयपरिवर्तन म्हणता येणार नाही. खरे मतपरिवर्तन हृदयातून होते. कुण्या अनोळखी व्यतीच्या प्रेरणेने नव्हे. कुणी जर धर्म परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या धर्माची इतरांसमोर प्रशंसा करेल तर त्यावर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. कारण धर्माची प्रशंसा करायची नसते तर त्यावर आचरण कार्याचे असते. आचरणामुळे धर्माचा आपोआप प्रचार-प्रसार होतो.” गांधींनी कायम धर्माचे आचरण केले. आपल्या आचरणातून एक नवा आदर्श निर्माण केला. गांधींसारखे लोक ज्या धर्मात असतात त्या धर्माला ते मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात यात कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही.

धर्मातील सहिष्णुतेबद्दल गांधींनी त्या काळात म्हटलं होतं की, “अमृतमय हिंदुस्थान तो आहे जो केवळ हिंदूंचा नाही. तो मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन आणि शिखांचाही तितकाच असेल जितका हिंदूंचा असेल आणि अमृतमयी पाकिस्तानसुद्धा तोच असेल ज्यामध्ये सर्वच धर्मीयांसाठी जागा असेल आणि कुणाबद्दल तिथे विष नसेल.” त्या काळी गांधींनी जे सांगितलं ते किती महत्त्वाचं होतं हे आज आपल्याला देशातील घडामोडी बघून कळते आहे.

गांधी हे संपूर्ण देशाचे प्रमुख नेते होते. स्वातंत्र्य लढ्यासोबतच त्यांचा साम्राज्यवादाला विरोध होता. जाती निर्मूलन व अस्पृश्यता निर्मूलनासोबतच त्यांना हिंदू- मुस्लीम आघाडीवर लढून धार्मिक ऐक्यसुद्धा घडवून आणायचे होते. धर्माचा अर्थदेखील जनसामान्यांना समजावून सांगायचा होता. गांधींवर स्वातंत्र्यलढ्याची सर्वांत मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी चोख पार पाडत गांधीजींनी अनेक आघाड्यांपैकी धर्माच्या आघाडीवरसुद्धा अतिशय महत्त्वाचे विचार मांडून ठेवलेत. विचार, सिद्धांत, ग्रंथ यापेक्षा महात्मा गांधींचा धर्म हा आचरणात होता. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात येण्याअगोदरपासून आधी सामाजिक स्वातंत्र्य की आधी राजकीय स्वातंत्र्य असा टोकाचा वाद आपल्या देशात सुरू होता. गांधींअगोदरच्या काँग्रेसमध्ये तर सामाजिक सुधारणेचा विषयच ‘काँग्रेस’ नेत्यांना नको होता. या सामाजिक सुधारणेच्या विरोधाची तीव्रता इतकी होती की, काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा ‘विटाळ’ नको आणि तसे झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देऊ, इतकी प्रखर विरोधी भावना ‘काँग्रेस’ पक्षात होती. इतक्या तीव्र विरोधानंतरसुद्धा गांधींनी नागपूरच्या सन १९२०च्या ‘काँग्रेस’ अधिवेशनात ‘अस्पृश्यता निवारणा’चा ठराव स्वतः मांडला. कारण अस्पृश्यता पाळणे हासुद्धा धर्माचाच एक भाग होता.

धर्माला इतकं व्यापक पद्धतीने आचरणार्‍या गांधींवर ते मनुवादी होते, सनातनी होते, चातुर्वर्ण्य पाळत होते, अस्पृश्यांकरिता त्यांनी कधीच काही केले नाही; अस्पृश्यांच्या ते कायम विरोधातच होते, असाही आरोप लावला जातो. विशेष म्हणजे, जे लोक गांधींना मुस्लीमधार्जिणे म्हणत असतात तेच लोक त्यांना मनुवादी-सनातनीसुद्धा म्हणत असतात. हे दोन्ही परस्परविरोधी आरोप आहेत. कोणत्याही मार्गाने असो गांधी बदनाम झाला पाहिजे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट असते.

गांधींच्या धर्मचिकित्सेचा अभ्यास करताना जातिभेदाबद्दलचे त्यांचे विचार आणि कार्य आत्यंतिक महत्त्वाचे आहे. धर्मातील भेदाभेदावर टीका करताना गांधी म्हणतात, ‘अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे,’ ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि जर तसे असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको, मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करीत असल्याने, मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे.’ तसेच शूद्रांना वेद शिकण्याबाबत मनाई करणे मला स्वत:ला कधीच मान्य होणार नाही. ‘ज्ञान म्हणजे कोण्या एका वर्गाची वा वर्णाची मिरासदारी वा हक नव्हे,’ हे वाक्यही गांधींचेच आहे. अस्पृश्यतेवर टीका करताना गांधी दि. २ ऑक्टोबर १९२१ च्या ‘यंग इंडिया’ मध्ये लिहितात की, ‘अस्पृश्यतेला सैतानाचा खेळ म्हणत असताना मला जराही संकोच वाटत नाही.’ श्री. के. एन. प्रभू व यू. आर. राव यांनी आपल्या ‘माईंड ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकात गांधींचे अस्पृश्यतेविरोधातील तीव्र शब्दातील वतव्य दिले आहे, ‘मला वाटते की अस्पृश्यता जिवंत राहिल्यापेक्षा हिंदू धर्मानेच मरून जावे.’ या वाक्यांवरून गांधींची धर्मचिकित्सेविषयीची भूमिका आपल्या लक्षात येईल.

मनुवाद्यांनी गांधींना ‘अस्पृश्यांना जवळ करून धर्म बुडविणारा’ ठरवले, तर कधी मुस्लीमधार्जिणा ठरवले आणि त्याकरिता त्यांचा खून केला आणि मनुविरोधक त्यांना मनुवादी, चातुर्वर्ण्य मानणारे म्हणून त्यांना आपला कट्टर शत्रू मानतात ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. एका घटनेचा इथे उल्लेख करणे आवश्यक आहे. ‘काँग्रेस’ला पाठविलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, ‘मला करणे जमले असते तर देशाच्या राष्ट्रपतीपदावर मी भंगी समाजातील एका तरुण मुलीची निवड केली असती. केवळ १७ वर्षांची मुलगी इंग्लंडची राणी आणि ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी होऊ शकत असेल, तर आपल्या समाजाविषयीचे प्रेम असलेली एखादी दलित मुलगी आपली राष्ट्रपती का होऊ नये? ती सीतेसारखी स्वच्छ चारित्र्याची व सरळ-साध्या मनाची असावी एवढेच. अशा मुलीची निवड करून आपण जगाला दाखवू की, आमच्यात कोणी लहान वा मोठा नाही.’ या विचारांवरून गांधी चातुर्वर्ण्य मानणारे दिसतात की मनुवादी? गांधीनी सामाजिक सुधारणेत भाग घेतला नसता तरी ते ‘काँग्रेस’चे आणि देशाचे सर्वोच्च नेते होतेच. त्या वेळी दलितांनी बौद्ध धर्मात प्रवेश घेतलेला नव्हता. ते सर्व हिंदूच होते आणि देशातील बहुतांश हिंदू हे गांधीसोबतच होता. हिंदू धर्मातील स्पृश्य-अस्पृश्य हा भेद त्यांना मिटवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केले.

‘द सर्च लाइट’ १६ ऑक्टोबर १९२५ मध्ये छापून आलेले गांधींचे विचार – ‘हिंदूंना मी अस्पृश्यतेसंबंधी काही सांगू इच्छितो. जर तुम्हाला खरी सेवा करावयाची असेल आणि हिंदू धर्म वाचवायचा असेल तर तुम्ही अस्पृश्यतेचे निवारण केलेच पाहिजे. तुम्ही जर अस्पृश्यतेपासून सुटका करून घेतली नाही तर हिंदुत्व तुमच्यापासून सुटका करून घेईल याची खात्री बाळगा. ज्या धर्मात अगदी एका मनुष्याविरुद्धही द्वेष शिकविला जातो तो धर्म पवित्र असूच शकत नाही. मनुष्य किती घोर अपराधी असू द्या, तुम्ही त्याच्यात सुधारणा करू शकता, द्वेष नव्हे. या देशाचे सेवक असणार्‍या अस्पृश्यांचा द्वेष करण्यासाठी कोणते समर्थन आहे? त्यांना स्पर्श करणे पाप नाही असा विचार करायला लागू या. जे सनातनी हिंदू असल्याचा दावा करतात त्यांना मी सांगू इच्छितो की, स्पृश्यतेचा धर्म जो आज जसा समजला जातो तसा कोणत्याही वेदांमध्ये किंवा धर्मग्रंथात आढळणार नाही. प्रभू रामचंद्रांना गुहराजाला स्पर्श करताना संदेह वाटलं नाही. त्यांनी गुहराजाला आलिंगन दिलेच. त्यांच्या हातचे पाणीही प्रश्न केले. भरत एवढे पुढे गेले की त्यांनी तर गुहराजाला अभिवादन केले.’ (गांधी XXXII ४४)         

आफ्रिकेतून आल्यानंतर गांधींनी अहमदाबादमधील ‘कोचरब’ येथे आश्रम सुरू केला असताना ठकरबाप्पांचे पत्र आले की, ‘एका अस्पृश्य परिवाराला आश्रमात पाठवू इच्छितो. त्यांना आपल्या आश्रमात प्रवेश द्याल काय?’ आश्रमात अस्पृश्यांना प्रवेशबंदी नव्हतीच. त्यामुळे आश्रम शिस्त पाळण्याच्या अटीवर त्यांना पाठवा असे गांधींनी ठकरबाप्पांना कळवले; पण ते अस्पृश्य कुटुंब जेव्हा आश्रमात राहायला आले तेव्हा आश्रमाचा खर्च भागवणारे श्रेष्ठी आणि आश्रमवासीय गोंधळून गेले. मदत करणार्‍या श्रेष्ठींनी मदत थांबवली. आश्रमातील लोक आणि खुद्द कस्तुरबा यांनी आश्रम सोडायची तयारी केली. गांधी कस्तुरबांना म्हणाले, ‘तुम्हें मैं मना नही सकता, जो नियम नही मानेंगे वो आश्रमसे जा सकते हैं|’ राजकोटला गांधींची बहीण राहात होती. तिच्याकडे राहा, तुला महिन्याला खर्चासाठी सहा-सात रुपये मी पाठवत जाईन, असे गांधींनी मुंबईहून कस्तुरबांना पाठविलेल्या पत्रात म्हटले; पण कस्तुरबांमध्ये परिवर्तन झाले. अस्पृश्य परिवाराचा त्यांनी स्वीकार तर केलाच आणि त्याच अस्पृश्य दुधाभाईची मुलगी लक्ष्मी हिला स्वतःची मुलगी मानले. आपल्या मूल्यांसाठी, अस्पृश्य परिवारासाठी गांधी आपल्या पत्नीलाही दूर करायला तयार झाले होते. गांधींनी एका अस्पृश्य जोडप्याकरिता आपला परिवार व आपली पत्नी, आपल्या आश्रमाला रसद पुरवणारे श्रेष्ठी यांचीसुद्धा पर्वा केली नाही. यावरून गांधींनी फक्त स्वतः धर्मचिकित्सा केली नाही तर आपल्या वर्तनातून ती इतरांनाही करायला लावली असे म्हणावे लागेल. गांधी म्हणायचे की, ‘वेदांनी अस्पृश्यतेला मान्यता दिल्याचे जर कुणी सनातनी सिद्ध करेल तर मी वेद सोडून देईल; पण अस्पृश्यांना सोडणार नाही’,  हा गांधींचा धर्म होता.

गांधींचा धर्म पुस्तकी नव्हता, तर तो प्रत्यक्ष जगण्यातून आणि वास्तवाच्या स्वीकारातून आला होता. गांधींच्या प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ असायचा, दूरदृष्टी असायची. असं यासाठी म्हणतोय की ‘पुणे करारा’च्या वेळी गांधींनी दलितांना विभक्त मतदारसंघ देऊ नये तर संयुक्त राखीव मतदारसंघ त्यापेक्षा दुप्पट संख्येने द्यावेत अशी भूमिका घेतली. कारण विभत मतदारसंघामुळे स्पृश्य व अस्पृश्यांमध्ये आणखी दुफळी निर्माण होईल. यासाठी केलेल्या उपोषणाच्या ५ दिवस अगोदर म्हणजेच दि. १५ सप्टेंबर १९३२ मध्ये काढलेल्या एका पत्रकात गांधी म्हणतात, ‘हिंदूंमधील सवर्णांचे नेते आणि अस्पृश्यांमधील दलितांचे पुढारी यांच्यात जाती निर्मूलनाबद्दल एकमत होण्यात फारसा अर्थ नाही. जोपर्यंत समस्त हिंदू समाज अस्पृश्यता निवारणाची प्रतिज्ञा करीत नाही आणि त्यासाठी सज्ज होत नाही, तोवर आतापर्यंतचे सारे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत.’ गांधींच्या या आवाहनाने आणि उपोषणामुळे देशाच्या कानाकोपर्‍यात अस्पृश्यता निवारणाचा संदेश गेला. कलकत्त्याचे काली मंदिर, बनारसचे राम मंदिर त्यानंतर पहिल्याच आठवड्यात अस्पृश्यांसाठी खुले झाले. बडोदा, काश्मीर, भोर आणि कोल्हापूर येथील मंदिरांसह शेकडो मंदिरांचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले झाले. पाणवठे खुले झाले. हरिजनांमध्ये जागृती झाली. आधी दलिताने रस्त्याने चालायचे म्हणजे गळ्यात गुरासारखी घंटा किंवा ढोल बांधून ‘दूर व्हा मायबाप’ असे म्हणत चालावे लागायचे; पण या उपोषणानंतर दिल्लीतील रस्त्यांवर दलित-सवर्णांचे बंधुत्व दाखवणार्‍या एकत्रित मिरवणुका निघाल्या. मुंबईत महिलांच्या संघटनांनी दलितांच्या मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर जनतेचे मतदान घेतले. त्यात २४ हजार ७९७ मते अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या बाजूने तर फक्त ४४५ मते प्रवेश विरोधात पडली. अस्पृश्यतेचा विचार बोथट झाला.

पंडित नेहरूंच्या मातोश्री स्वरूपराणी ह्या अगदी कर्मठ सनातनी ब्राह्मण; पण त्यांनी हरिजनांना आमंत्रित करून आपल्या हाताने भोजन भरवले. ‘काँग्रेस’चे जमनालाल बजाज यांनी वर्ध्यातील स्वतःच्या लक्ष्मीनारायण मंदिरात हरिजनांना प्रवेश दिला. ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तील ध्रुव या कर्मठ कुलगुरूंनी हजारो दलितांसोबत सहभोजनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या परिसरात आयोजित केला. आज जरी आपल्याला या सर्व गोष्टी सामान्य वाटत असल्या, तरी त्या वेळी भारतीयांच्या मानसिकतेत इतक्या सुधारणा होणे ही सामान्य गोष्ट नव्हती. हा क्रांतिकारी बदल होता. हे उपोषण न करता जर गांधींनी ‘गोलमेज परिषदे’तच बाबासाहेबांना जास्त जागा देण्याचे मान्य केले असते तर देशभरात हा संदेश गेला नसता आणि अस्पृश्यताविरोधी इतकी जनजागृती झाली नसती. एका उपोषणाने संपूर्ण देशात घडून आलेले हे असामान्य परिवर्तन पाहता आले नसते. स्पृश्य हिंदूंमध्ये दलितांविषयीच्या खोलवर रुजलेल्या तिरस्काराचे गांधींना निर्मूलन करायचे होते. गांधींच्या या उपोषणाच्या एक दिवस आधी मुंबईत झालेल्या सनातनी हिंदूंच्या सभेत एक ऐतिहासिक ठराव झाला, ‘स्वराज्याच्या संसदेतील सर्वांत पहिला कायदा हा अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक शाळा, रस्ते आणि इतर सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये जाण्या-येण्याचा, प्रवेशाचा समान अधिकार देणारा असेल.’ गांधींच्या उपोषणाच्या दबावाखालीच का होईना; पण धर्माच्या माध्यमातून सामाजिक समानता रुजविण्याची सुरुवात झालेली होती. म्हणजेच गांधींनी आपल्या परीने लोकांना धर्माची व्याख्या करायला लावली होती.

सत्यशोधक दिनकरराव जवळकर आपल्या जहाल शैलीकरिता ओळखले जातात. ते आधी गांधींचे विरोधक होते. त्यांनी दि. ५ जानेवारी १९२९ रोजी ‘काँग्रेसचा ढोंगी कार्यक्रम’ असा लेखही ‘कैवारी’ या नियतकालिकात लिहिला होता. पुढे त्यांचे मतपरिवर्तन झाले व त्यांनी ‘काँग्रेस’मध्ये प्रवेश करून कायदेभंगाच्या चळवळीत कारावासही भोगला. ‘तेज’च्या दि. १८ जुलै १९३१ च्या अंकात त्यांनी ‘सत्यशोधक महात्मा गांधी’ हा प्रसिद्ध लेख लिहिला. त्यामध्ये सुरुवातीलाच ते लिहितात की, ‘चाळीस वर्षांपूर्वी मोहनदास करमचंद गांधी हे नाव कोणास माहितीही नव्हते. आज मात्र त्या नावाचा त्रिखंडात जयजयकार होत आहे. अखिल भारतीय मानवजातीच्या उद्धारार्थ कायावाचामने झटणारा हा पुरुष आज जगद्वंद्य ठरला. यापुढील अनेक शतकांत असा अद्वितीय पुण्यपुरुष पुन्हा होणे नाही. अनत्याचारी व्रताचा स्वीकार करून केवळ नि:स्वार्थ बुद्धीने गांजलेल्या जिवांना दुःखमुत करण्याचे खडतर व्रत याने चालवले आहे. कोणी आज त्यांना येशू ख्रिस्ताच्या पदवीला नेऊन बसवितो, तर कोणी सवाई महंमद पैगंबर बनवितो, कोणी साधू म्हणून त्यांची पूजा बांधतो, तर कोणी तत्त्वज्ञानी म्हणून त्यांना सॉक्रेटिस, टॉलस्टॉय यांच्या पंतीला नेऊन बसवितो. कोणी त्यांना स्वातंत्र्याचा निस्सीम उपासक म्हणतात, तर कोणी त्यांचा महा राजकारणी पुरुष म्हणून गौरव करतात. कोणी धर्मात्मा तर कोणी काव्यात्मा. सारांश, नाना विषयातील उपासक एकमताने त्यांचे श्रेष्ठत्व कबूल करतात. कोणासही सहसा न मिळणारा मान आज त्यांना हटकून कोठेही मिळतो. यातच त्यांच्या दिव्य संदेशाचे कौतुक चाललेले पाहावयास मिळते. आज ३३ कोटी लोकांनी आपली सर्व सूत्रे जवळजवळ त्यांच्याच हातात दिलेली दिसतात. या एकाच गोष्टीवरून या अलौकिक विभूतीवर जनताजनार्दनाचे किती प्रेम आहे. हे स्पष्ट दिसते.’ या लेखातील कुणी त्यांना येशू ख्रिस्ताच्या पदवीला नेऊन बसवितो, तर कोणी सवाई महंमद पैगंबर बनवितो, कोणी साधू म्हणून त्यांची पूजा बांधतो हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकच धर्माच्या लोकांना गांधी जणू आपल्याच धर्माचं पालन करत आहेत असं वाटत होतं. यातच सर्व आलं.

गांधींचे ब्रह्मचर्य हा सुद्धा अनेकांना फक्त लैंगिक सुखासंबंधीचा विषय वाटतो, परंतु गांधींचे ब्रह्मचर्य अतिशय व्यापक होते. या व्यापक व्याख्येतूनच गांधींच्या तीन माकडांचाही उदय झाला असावा. गांधींचे ब्रह्मचर्य म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावर, भावनांवर, वागण्यावर, बोलण्यावर, ऐकण्यावर अशा प्रत्येकच गोष्टीवर नियंत्रण ठेवणे. ह्या मानवी जीवनावर नैतिक मूल्ये कोरणार्‍या ब्रह्मचर्यालाही गांधींनी धर्माशी जोडले. गांधींची अहिंसा हीसुद्धा त्यांचा धर्माचाच एक भाग होती, पण भ्याडांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा परवडली असा वास्तव विचार करणारे गांधी होते.

सगळ्या धर्मांचं सार काय? हे सांगताना गांधी सांगतात की, “टॉलस्टॉलचं म्हणणं होतं की शरीर बलापेक्षा आत्मबल अधिक शक्तिशाली असते, हेच सर्व धर्मांचे सार आहे. संसारातून दुष्टपणा नष्ट करण्यासाठी वाईट व्यतींसोबत वाईट वागण्यापेक्षा चांगलं वागणं हाच योग्य मार्ग आहे. कुणाशीही दुष्टपणा हा अधर्म आहे.” गांधींचं स्पष्ट मत होतं की, “ज्याप्रमाणे अनेक नावे असूनही ईश्वर एकच आहे, अगदी त्याचप्रमाणे अनेक नावे असूनही धर्मसुद्धा एकच आहे. कारण, सर्वच धर्म हे ईश्वरामुळे आले आहेत. आणि जर हे धर्म ईश्वराकडून आलेले नसतील तर ते काहीच कामाचे नाहीत, ते सैतानाचे धर्म आहेत, जे कुणाचेच होऊ शकत नाहीत.” राजकारणाबद्दल गांधी म्हणतात, “धर्महीन राजकारणाला एक फाशीच समजा. ती आत्म्याचा नाश करून टाकते. जितके ही धर्म आहेत ते सगळेच्या सगळेच महान आहेत. धर्मात कोणतीच कमी नाही, कमी आहे ती त्या धर्मातील माणसांमध्ये. मी धर्मापासून वेगळ्या राजकारणाची कल्पना करू शकत नाही. इथे धर्माचा अर्थ कट्टरवाद नाही, तर धर्माचा अर्थ आहे विश्वाची एक नैतिक सुव्यवस्था.” आज राजकारणात कट्टरवादाचा झालेला वापर/अतिरेक बघून गांधींच्या विचारांचे महत्त्व पटते. 

गांधींची धर्मचिकित्सा किंवा धर्मचिंतन समजून घेणे जरा कठीणच आहे. कारण गांधींच्या अनुयायांमध्ये जसे आस्तिक होते तसे नास्तिकही. हिंदू होते तर मुस्लीमही. गांधींसोबत या देशातील सश्रद्ध, अति धार्मिक हिंदू होताच. सोबतच प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील, सत्यशोधक चळवळीतील जेधे-जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनीसुद्धा गांधींचे नेतृत्व स्वीकार केले होते. मला वाटतं, की महात्मा गांधींनी लोककल्याणासाठी हिंदू धर्म वापरून घेतला. हिंदू धर्म देशातील नागरिकांसाठी वळवला, लवचीक केला. ते म्हणायचे, मी हिंदू आहे कारण त्या काळी देशात बहुतांश हिंदू होते, त्या वेळी देशातील दलितही हिंदूच होते. त्यांना स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घ्यायचं होतं, त्याशिवाय स्वातंत्र्य मिळवणं शक्य नव्हतं. गांधी कोणत्याही काल्पनिक गोष्टीत न रमता कायम वास्तवाचा विचार करणारे व्यती होते. गांधी हे मुळातच विद्रोही व्यक्तिमत्त्व. आधी दक्षिण आफ्रिकेत विद्रोह केला. भारतात अनेकांनी हिंदू धर्म सोडून धर्माशी विद्रोह केला; पण गांधींनी हिंदू धर्मातच राहून धर्माशी विद्रोह केला. (धर्मात राहून धर्माशी विद्रोह करणे महाकठीण काम) चातुर्वर्ण्य धुडकावून लावला, कर्मसंकर घडवून आणला, अस्पृश्यता निवारणासाठी आपल्या बायको-लेकरांनासुद्धा आश्रमाबाहेर काढले. आश्रमात प्रार्थना होती; पण देवाची मूर्ती नव्हती, देवघर नव्हते, मंदिर नव्हते. महात्मा गांधींनी धर्माचा आणि देवाचा अर्थच बदलून टाकला. असत्याशी विद्रोह केला आणि सत्यालाच ईश्वर मानले.

तथागत गौतम बुद्ध म्हणायचे, “माणूस जे बोलतो ते बोलत नसतो तर माणूस जसा वागतो ते बोलत असतो.” म्हणजे बोलण्यापेक्षा वागणूक महत्त्वाची. अगदी याच न्यायाने महात्मा गांधी तोंडाने काहीही म्हणोत, पण त्यांच्या आचरणातून स्पष्टपणे दिसते की सत्य, अहिंसा, नैतिकता, परोपकार, प्रेम आणि माणुसकी हाच गांधींचा धर्म होता. शेतीला विहिरीचं पाणी देताना शेतातल्या दांडातून आपल्या पिकाकडे शेतकरी जसा पाणी वळवतो अगदी तसाच महात्मा गांधींनी मानव जातीसाठी जसा सोयीस्कर असेल तसा धर्म वळवला. कारण माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही, हे गांधींना कळले होते.

- चंद्रकांत झटाले, अकोला

(लेखक गांधीविचारांचे अभ्यासक आहेत.)
संपर्क : ७७६९८ ८६६६६

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]