सण उत्सवांचे बाजारीकरण

राजीव देशपांडे -

सध्या सण, उत्सवाचे दिवस आहेत. नुकताच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, ईद असे उत्सव पार पडले. नवरात्र, दिवाळी उत्सव येऊ घातलेले आहेत. हे सर्वच सण, उत्सव हल्ली मोठ्या धडाक्यात साजरे केले जातात. धार्मिक कर्मकांडांची रेलचेल, ढोलताशे, डीजे, लेझर, रोषणाई, झगमगाट, फटाक्यांची आतिषबाजी, नाचगाण्यांचा दणदणाट, प्रचंड मिरवणुका, भव्य मूर्ती, देखावे, बक्षीसांची खैरात. या सगळ्या उत्सवी गोंगाटात रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कोलकाता, ओदिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, येथील स्त्रियांवरील अत्याचार, बदलापूर या सर्व घटना दबल्या गेल्या आहेत. त्यात यावर्षी आणखी एका उत्सवाची भर पडली आहे लोकशाहीच्या उत्सवाची…. विधानसभेच्या निवडणुकाही येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे या सण, उत्सवांना आणखीनच झळाळी प्राप्त झालेली आहे.

सण, समारंभ, उत्सव साजरे करण्याची माणसाची भावना आदिम आहे, आदिम काळात त्याच्या श्रमपरिहाराचा तो भाग होता. जसजसा माणूस उत्क्रांत होत गेला, समाजव्यवस्थेत बदल होत गेले तसतसे सण, समारंभ, उत्सव साजरे करण्याच्या आनंद व्यक्त करण्याच्या त्याच्या पद्धतीतही बदल होत गेले. कृषी संस्कृतीत हे साजरेपण शेतीशी निगडीत ऋतुबदलाशी, शेतात आलेल्या नव्या पिकाशी, नवनिर्मितीशी, त्या बद्दलच्या कृतज्ञतेशी निगडित होते. दुसर्‍या बाजूला नवनवे शोध लागत होते. विज्ञान प्रगत होत होते. कृषी संस्कृतीचे रूपांतर भांडवली, औद्योगिक नागरी संस्कृतीत होऊ लागले, तसतसे सण, उत्सवांचे स्वरूपही बदलू लागले. पण बदलत्या परिस्थितीतही समाजातील सण, उत्सवांची लोकप्रियता, ते उत्साहात साजरे करण्याची भावना मात्र कायमच राहिली.

सणांचा संबंध प्रथमपासूनच बाजाराशी होता. पण समाजव्यवस्था बाजारकेंद्री नसल्याने बाजाराचा हस्तक्षेप मर्यादित होता. सणासुदीला नवे कपडे, नवी खरेदी वैगेरे इतपतच. पण आजच्या नवउदारवादी आर्थिक धोरणाच्या जमान्यात माणसाच्या शिक्षण, आरोग्य यासारख्या सर्वच मूलभूत गरजा बाजाराशी निगडीत केल्या गेलेल्या आहेत. मग लोकांच्या भावनिक, धार्मिक, पारंपारिक विश्वाशी जोडल्या गेलेल्या सण, समारंभ, उत्सव या सारख्या गोष्टी बाजारासाठी कशा अपवाद असतील? त्यामुळे एकूणच सण, समारंभाला बाजारू स्वरूप प्राप्त झाले. मग एकदा का स्पर्धा, द्वेष, मत्सर, चैन, अभिलाषा, भपका, जाहिरातबाजी ही बाजारू मूल्ये सण, उत्सवात घुसली की विचार निव्वळ नफ्याचा, ना मानवी आनंदाचा, ना नैतिकतेचा, ना सामाजिक बांधीलकीचा, ना पर्यावरणाचा!

आजच्या सत्ताधारी वर्गाच्या धर्मकारणाचे, राजकारणाचे लागेबांधेही बाजाराशीच निगडित आहेत. त्यांनाही या बाजारू मूल्यांनाच प्रोत्साहन देत आपले राजकारण, धर्मकारण पुढे रेटायचे आहे. त्यामुळे सण, उत्सवामुळे समाजात जे प्रेमाचे, धार्मिक सौहार्दाचे, खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हायला हवे, त्याऐवजी समाजात द्वेष, मत्सराचे, प्रदूषित, दु:खी वातावरण निर्माण होताना दिसत आहे. या संदर्भात घडलेल्या अनेक घटनांच्या बातम्या नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर वर्तमानपत्रातून आलेल्या आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन चालू केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कार्यक्रमाला आता समाजाचा व्यापक पाठिंबा मिळत आहे. फटाकेविरोधी अभियान, होळीची पोळी दान करा सारख्या उपक्रमांनाही पाठिंबा मिळत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यापुढेही इतर समविचारी संघटनांच्या साथीने अशाच पद्धतीचे उपक्रम राबवत या धर्मांध आणि बाजारू वातावरणाला छेद देत सण, उत्सवाला आनंदाचे, प्रेमाचे, धार्मिक सौहार्दाचे, खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]