महात्मा फुले आणि विधवांची स्थिती : केशवपन आणि बालहत्या प्रतिबंधक गृह

डॉ. देवकुमार अहिरे -

प्रश्न : निर्दयी काय आहे?
उत्तर : दगाबाज मनुष्याचे हृदय
प्रश्न : त्यापेक्षाही निर्दयी काय आहे?
उत्तर : स्त्रीचे हृदय
प्रश्न : सगळ्यांपेक्षा निर्दयी काय आहे?
उत्तर : पुत्रहीन, निर्धन, विधवा स्त्रीचे हृदय
               (पंडिता रमाबाई, १८८७, पृ. ८२)

पंडिता रमाबाईंनी १८८७ मध्ये ‘उच्चजातीय हिंदू स्त्रिया’(High Caste Hindu Women) या नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले होते. त्यातील वरील प्रश्नोत्तरे आहेत. त्यांच्यावरून एकोणिसाव्या शतकात विधवा स्त्रियांकडे कसे  पाहिले जात होते, याची एक कल्पना आपणास येऊ शकते. त्या काळी, बालविवाह सर्व समाजांमध्ये सार्वत्रिकपणे होत होते. सर्रासपणे विषमविवाह आणि जरठ-बाल विवाह घडत असत. मुलींचे लग्न पाळी येण्याआधी झाले नाही तर मुलीच्या पालकांना वाळीत टाकले जायचे. तसेच, पाळी येऊनही मुलीचे लग्न झाले नसेल, तर पालकांना पाप लागते आणि म्हणून ते नरकात जातात अशी धार्मिक समजूत असल्यामुळेही पाळी येण्याच्या आधीच मुलींचे लग्न लावले जायचे. पाच-सहा वर्षांची मुलगी आणि तीस चाळीस वर्षांचा पुरुष असे विषमविवाह सर्रास होत होते. साहजिकच, बालमृत्यूचे प्रमाण, त्या काळी तुलनेने अधिक होते, मुलींना बालवयात वैधव्य येई. काही वेळा, बाल-जरठ विवाहामुळे बालवधूंनाच मृत्यूला सामोरे जावे लागत असे. उदा. १८९० मध्ये मृत्यू झालेली फुलमनीची केस. बंगालमधील फुलमनी ही अकरा वर्षांची मुलगी होती. तिचे लग्न हे पस्तीस वर्षांच्या पुरुषाशी लावून देण्यात आले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री शरीरसंबंध ठेवताना फुलमनीच्या नवर्‍याने जबरी संभोग केल्यामुळे फुलमनीच्या योनीला जखम झाली आणि ही जखम दीड इंच लांब आणि एक इंच रुंद अशा स्वरूपाची होती. त्यामुळे फुलमनीला साडेतेरा तास रक्तस्त्राव झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.  या उदाहरणावरून आपणास लहान मुलींचे बाल-जरठ विवाहामुळे लैंगिक आणि शारीरिक शोषण कसे होते हे स्पष्टपणे दिसून येते. बहुतेक वेळा, बाल-जरठ विवाहातील मुलींना वैधव्य येत असे. कारण, पाचपासून ते दहा वयोगटापर्यंत असलेल्या मुलींचे लग्न वीस, तीस किंवा चाळीस वर्षे वयाच्या पुरुषांशी लावले जायचे. अशा लग्नाची भरपूर चर्चा ही ‘विधवाविवाह चळवळ’ या पुस्तकात स. ग. मालशे आणि नंदा आपटे यांनी केली आहे. लहान मुली तरुण होईपर्यंत अनेकींचे नवरे मरून जायचे. त्यामुळे बहुतेकींना सक्तीच्या वैधव्याला सामोरे जावे लागत होते. त्यापूर्वी काहींना सतीही जावे लागत होते. मात्र, ब्रिटिशांनी सती बंदीचा कायदा आणल्यामुळे त्यावर बंदी आली होती. सती बंदी कायदा झाल्यामुळे काही विधवांनी नापसंतीही व्यक्ती केली होती. कारण, विधवा म्हणून दररोज तीळ तीळ मारण्यापेक्षा सती म्हणून एकदाच मेलेले बरे होते असे त्यांना वाटत होते. यावरून विधवांची स्थिती किती भयानक आणि दयनीय स्वरुपाची होती याची आपण कल्पना करू शकतो.

वैधव्य म्हणजे जन्मठेप !

बालविवाह सगळ्याच जातींमध्ये होत होते. मात्र एखादी मुलगी विधवा झाली तर ब्राह्मणेतर समाजामध्ये मुलींचे दुसरे लग्न लावून दिले जात होते. त्याला पाट लावणे, गंधुरं लावणे, मोथूर लावणे असे म्हटले जायचे. मात्र, ब्राह्मणांमध्ये आणि काही तथाकथित खानदानी मराठ्यांमध्ये विधवा मुलींचे दुसरे लग्न लावणे पाप मानले जात होते. त्यामुळे समाजातील तथाकथित उच्च समजल्या जाणार्‍या जातींमधील विधवा स्त्रियांची स्थिती वाईट होती. पंडिता रमाबाईंनी त्यांच्या पुस्तकामध्ये विधवांची स्थिती आणि त्याला कारणीभूत असलेली सामाजिक, धार्मिक व्यवस्था याची भरपूर चर्चा केली आहे. विधवांना केशवपन सक्तीचे होते. त्यांना कांदालसूण वर्ज्य होते, त्यांना उपासतापास करावे लागत होते. एकटे रहावे लागे. या सगळ्यांच्या मागे विधवांच्या मनातील कामेच्छा दडपली जावी हाच हेतू होता. 

विधवांमध्येही दोन प्रकार केले जात होते. ज्या विधवा केशवपन करतात आणि सोवळ्यात राहतात त्यांना थोडा तरी मान असे. सकेशा विधवांना मात्र अपवित्रच समजले जात असे. त्यांचे दर्शन हे अशुभ मानले जात होते, कोणत्याही मंगल कार्यात, सणावारी, चारचौघात त्यांचा वावर बिलकूल खपत नसे. विधवांनी चांगले कपडे घालू नये, तसेच विधवा झाल्यावर विधवांचे दागदागिने काढून घेतले जात असे. या सगळ्यांच्या विधवा या चांगल्या दिसू नयेत, पुरुषांचे त्यांच्याकडे लक्ष जाऊ नये आणि त्या कोणाच्याही संपर्कात येऊ नये, अशीच मानसिकता होती. सगळ्या प्रकारच्या संपर्कापासून त्यांना दूर ठेवले जात होते. कारण, संपर्कामुळे संसर्ग होऊ शकतो आणि आपली बेइज्जत होईल अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांना आणि पालकांना वाटत होती. या संदर्भात जोतिराव फुल्यांनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे. – तिचे दागदागिने तिच्यापासून ओरबाडले जातात; तिच्या जवळचे नातेवाईक तिला सक्तीने बोडकी बनवितात. तिला पुरेसे खायला देत नाहीत, धड अंगभर ल्यायला देत नाहीत. आनंदाच्या प्रसंगी, लग्न समारंभात अथवा धार्मिक समारंभात तिला भाग घेऊ देत नाहीत. खरे तर या जगातील सगळ्याच सुखापासून तिला तोडले जाते. इतकेच नाही तर तीला एखाद्या गुन्हेगारापेक्षा किंवा हलक्या जनावरापेक्षाही नीच प्रतीचे मानले जाते. 

विधवांना सर्वच प्रकारच्या बंधनात ठेवले जात होते. तारुण्यसुलभ वय आणि शरीराची गरज म्हणून या काळात अनेक विधवा स्त्रिया या पुरुषांच्या संपर्कात येत होत्या. काहीवेळा घरातील किंवा शेजारी पुरुषच अशा स्त्रियांच्या दयनीय स्थितीचा फायदा घेऊन किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्या जाळ्यात ओडत असत आणि या सगळ्यामुळे नको असलेले गर्भारपण विधवा स्त्रियांच्या वाट्याला येत असे. विधवा स्त्रियांचे गर्भारपण हे समाजाला मान्य नव्हते. अशा गर्भारपणामुळे विधवा स्त्रियांच्या जीवनात अनेक पेचप्रसंग उद्भवत असत. त्या काळी, कोणतेही गर्भनिरोधक साधन उपलब्ध नसल्यामुळे शारीरिक संबंध स्थापित झाले की गर्भधारणा होत असे. यामुळे कित्येक विधवा गुपचूप झाडपाल्याची औषधे मिळवून गर्भपात करीत, काहीवेळा अशा प्रयत्नात विधवा स्त्रिया दगावत असत. ज्यांना गर्भपाताची शक्यता नसे, त्या पंढरपूर, नाशिक क्षेत्री जाऊन सुटका करून घेत. काही कुचंबणा झालेल्या विधवा आत्महत्याही करत असत.

विधवा स्त्रियांना अशा अत्याचार आणि दयनीय परिस्थितीला सामोरे जाऊ नये म्हणून विधवाविवाह समाजात झाले पाहिजे, अशी भूमिका समाजसुधारकांनी घेतली. यामध्ये लोकहितवादी, फुले, रानडे अशा सगळ्या समाजसुधारकांनी त्यास पाठिंबा दिला. मात्र, त्याचवेळी समाजातील परंपरावादी आणि सनातनी लोकांनी विधवा पुनर्विवाह करू नयेत अशी चर्चा घडवून आणली आणि विधवा पुनर्विवाहांना विरोधही केला.

केशवपन विरोधी –

विधवांचे पुनर्विवाह होत नाहीत म्हणून त्यांना सन्मानाने जगता येत नाही अशी जाणीव सुधारकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळेच, विधवा स्त्रियांच्या केशवपनाच्या विरोधी चळवळ उभारली गेली. विधवा स्त्रियांची अगतिकता आणि दयनीय परिस्थिती ही मध्यमवर्गीय आणि ब्राह्मणी समस्या होती. शूद्रातिशूद्र बहुजन जातींमध्ये अशी स्थिती नव्हती, तरीही बहुजन सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या महात्मा जोतिराव फुल्यांना या उच्चवर्णीय, मध्यवर्गीय स्त्रियांविषयी करुणा आली आणि त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. मुंबई शहरात केशवपनाविरुद्ध न्हावी लोकांच्या तीन सभा झाल्या. २३ मार्च १८९० रोजी डोंगरी येथे झालेल्या सभेला वाई, जुन्नर, पुणे इ. भागातून सुमारे पाचशे न्हावी आले होते. विधवा केशवपन हे शस्त्रविरोधी नव्हे, तर ते एक राक्षसी कृत्य आहे, असे श्रोत्यांच्या मनावर बिंबवणारी भाषणे सभेत झाली. केशवपनाविरोधी चळवळीला संघटित स्वरूप देण्यात महात्मा फुले यांचे शिष्य, ‘दीनबंधू’कार कृ. पां. भालेकर (१८५०-१९१०) यांचा मोठा पुढाकार होता. भालेकरांनी दीनबंधूत एक सडेतोड लेखमाला लिहून या प्रश्नाला तोंड फोडले.  

ब्राह्मण स्त्रियांचे दु:ख हे महात्मा जोतिराव फुल्यांनी समजून घेतले, तोपर्यंत कोणीही केशवपनाविरोधी चळवळ केली नव्हती. कारण या सगळ्या गोष्टी धर्माचेच अंग आहे अशी अनेकांची समज होती. काहींना तसे वाटत नव्हते, मात्र तरीही त्यांची त्याविरोधात चळवळ करण्याची हिंमत झाली नाही. कारण परंपरावादी आणि सनातनी ब्राह्मणांची धार्मिक-सामाजिक जुलूमशाही प्रभुत्वशाली होती. जोतिराव फुल्यांनी त्या जुलूमशाहीला आव्हान दिले आणि धर्माच्या नावाखाली माणुसकीला काळिमा फासणार्‍या प्रथांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. म्हणूनच, गोपाळ गणेश आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ वृत्तपत्रात सत्यशोधक चळवळीतील मंडळींचे आणि दीनबंधूकारांचे अभिनंदन करणारे लिखाण करून ब्राह्मणांना इशारा दिला होता. आगरकर त्यांच्या लेखात लिहितात, तुमच्या लेकी, सुना, भगिनींची दया शूद्रांनासुद्धा येऊन त्यांची सद्भावना धरली हे पाहून माना खाली घाला. न्हाव्यांकडून असा कट झाल्यावर ब्राह्मण लोक स्वत: भादरण्याचा धंदा पत्करून विधवावपनाची चाल कायम ठेवतील, असे वाटत नाही. वेळेवर जागे व्हाल तर बरे आहे. नाहीतर सुधारणेचा शकट जो ब्राह्मणांकडून बर्‍याच अंशाने हाकला जात आहे, ते सर्व फिरून आजपर्यंत अडाणी मानलेल्या लोकांकडे त्यांचे धुरिणत्व जाईल. ब्राह्मण स्त्रियांची दैना पाहून स्वलाभाची संधी सोडून स्वतःच्या पोटावर बिब्बा घालून ब्राह्मण भगिनींचा उद्धार करण्याची खटपट डोळ्यांदेखत बघत असूनही अजून कलियुग आहे, इत्यादी वृथा कल्पना करणार्‍यांचे दात (यामुळे) त्यांच्याच घशात घातल्यासारखे आहे.

ब्राह्मण स्त्रियांची दैना पाहून अडाणी लोकांना म्हणजे शूद्रातिशूद्र मंडळींना वाईट वाटत आहे. ब्राह्मण लोक मात्र कलियुग आहे म्हणून काहीही करत नाहीत, असा आगरकरांनी आरोप केला आहे. सत्यशोधक समाजामध्ये प्रामुख्याने शूद्रातिशूद्र समूहातील लोकांचा भरणा होता आणि जोतिराव फुले हे त्यांचे पुढारी होते. शूद्रातिशूद्र मंडळींना जातीधर्मामुळेच जाच झाला होता. तसाच, जाच स्त्रीधर्मामुळे ब्राह्मण स्त्रियांना होतोय म्हणून सत्यशोधक मंडळी त्या विरोधात उभी राहिली. जोतिराव फुल्यांच्या संपूर्ण लिखणात ‘स्त्रीशूद्रातिशूद्र’ असा शब्दप्रयोग सातत्याने केलेला दिसतो. कारण, त्यांच्या मते, सगळ्या स्त्रिया या शोषित आहेत. ब्राह्मण स्त्रिया याही शूद्रातिशूद्र पुरुषांप्रमाणेच ब्राह्मणी व्यवस्थेच्या बळी आहेत.

बालहत्या प्रतिबंधक गृह

विधवा स्त्रिया गर्भपात करता आला नसेल तर बाळंतपण झाल्यावर मुलांना मारून टाकायच्या किंवा तीर्थक्षेत्री सोडून द्यायच्या. लोकहितवादी यांनी एका जिल्ह्यात सरासरी शंभर बालवध होत असतील असा अंदाज व्यक्त करून पुणे व आसपासच्या प्रांतात शंभर कोसात दोन तीन हजार लेकरे (लहान मुले) मारली जातात असे लिहिले आहे. यावरून किती मोठ्या प्रमाणात लहान मुलांची हत्या केली जात असेल याचा आपण एक अंदाज लावू शकतो. लहान मुलांना मारून टाकणे हे मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळेच, जोतिराव फुल्यांनी पुण्यात त्यांच्या स्वतःच्या घरी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली. लहान मुलांच्या हत्या बर्‍याच दिवसांपासून होत होत्या. त्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापने  मागील हे दीर्घकालीन कारण होते. मात्र, त्याचवेळी एक तत्कालीन कारणही घडले होते आणि त्यामुळे जोतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. त्याविषयी त्यांनी स्वतःच पुढीलप्रमाणे लिहिले आहे. इनाम कमिशनमध्ये अधिकारी असलेले माझे एक ब्राह्मण मित्र रावसाहेब सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या घरी काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा स्वयंपाकिणीचे काम करीत होती. ही गरीब काशीबाई एका चांगल्या घरातली, चांगल्या चालचलवणुकीची सुंदर तरुण बाई होती. तिचे चारित्र्य निर्मळ होते. ती त्यांच्या घरात अनेक महिने काम करीत होती. त्यांच्या शेजारी ब्राह्मण जातीतील एक धूर्त आणि कावेबाज शास्त्रीबुवा राहात होता. त्याने या अडाणी बाईची दिशाभूल करण्याचा चंग बांधला. काशीबाईने प्रथम आमिषांना भीक घातली नाही, पण शेवटी ती त्याच्या वासनेला बळी पडली आणि लगेच गरोदर राहिली. नंतर या जाराच्या सल्ल्यानुसार तिने गर्भपातासाठी अनेक विषारी औषधे घेतली, पण तिचे सर्व प्रयत्न फोल ठरले. नऊ महिने झाल्यावर काशीबाईने एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि आपली छी:थू होईल म्हणून त्या निरागस अर्भकाचा सुर्‍याने गळा कापला आणि आपल्या मालकाच्या घरामागच्या विहिरीत ते प्रेत टाकून दिले. दोन दिवसांनंतर पोलिसांनी तिला संशयित स्त्री म्हणून अटक केली आणि पुण्यातील सेशन कोर्टात तिच्यावर खटला भरला आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. ब्राह्मण समाजात आपल्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून काशीबाईने हा गुन्हा केला होता. आर्य रीतीरीवाजाचे अन्यायी आणि पक्षपाती स्वरूप तिच्या खटल्यामुळे उघडकीस आले आणि एकूण ह्या प्रकरणामुळे लोकांना विधवांच्या जीवनातील भीषणता जाणवली. काशीबाईच्या सुनावणीनंतर माझी स्वतःची मिळकत माझ्या खर्चापुरती नसूनही ब्राह्मण समाजासाठी मला लगेच माझ्याच घराच्या अंगणात एका अनाथ बालकाश्रमाची स्थापना करावी लागली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केल्यानंतर त्याच्या प्रसारासाठी काय करावे लागले आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला. या संदर्भात ते म्हणतात की, या संबंधी छापील सूचनापत्रके ब्राह्मण वस्तीमध्ये कोपर्‍याकोपर्‍यात चिकटवली. ह्या अनाथ बालकाश्रमाच्या स्थापनेपासून आजतागायत पस्तीस गरोदर विधवा आल्या आणि बाळंत झाल्या. त्यातील पाच मुले जिवंत आहेत आणि तीस मुले त्यांच्या आयांनी गर्भधारणा लपविण्यासाठी येथे येण्यापूर्वी जी विषारी औषधे घेतली असतील त्यामुळे गर्भाशयातच इजा होऊन मरण पावली.

            ‘विधवाविवाह चळवळ’ या ग्रंथात मालशे आणि आपटे यांनी म्हटले आहे की, जोतिराव फुल्यांनी लोकक्षोभाची पर्वा न करता १८६८ मध्ये पुण्यास जुन्या गंजपेठेतील स्वतःच्या घरात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ काढले. कोणाही  विधवेची प्रसूतीची व्यवस्था तेथे केलेली होती व त्याबाबत गुप्तता राखली जाणार होती. विधवांनी अर्भके गृहातच ठेवली व त्या निघून गेल्या, तरी त्या अर्भकांची पुढील काळजी घेण्यात येणार होती. काही ठिकाणी स्थापना १८७३ मध्ये झाली असेही उल्लेख आहेत.

महादू सहादू वाघोले यांना लहानपणी जोतिराव फुल्यांचा सहवास लाभला होता. ‘आम्ही पाहिलेले फुले’ या ग्रंथात त्यांच्या आठवणी नोंदवलेल्या आहेत. त्यामध्ये विधवा विवाह, बालहत्या प्रतिबंधक गृह, त्यासाठी जोतिराव फुल्यांनी केलेले प्रयत्न आणि गृहातील मुले या सगळ्यांविषयी त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. ते सांगतात की, जोतिराव फुल्यांनी ज्या समाजात पुनर्विवाह नाहीत अशा विधवा बायांचे वाकडे पाऊल पडल्यास त्यांनी गर्भपात करू नये म्हणून येथे एक अनाथ बालकाश्रम काढला होता. मला कळू लागण्या अगोदर येथे काही बाया बाळंत होऊन आपली मुले सोडून गेल्या होत्या व मला कळू लागल्यावर येथे काही बायांची बाळंतपणे झाली. ती मला चांगलीच आठवतात. त्या आश्रमात एकंदर ३०-४० मुले आली होती. त्यापैकी काही मुले बाळंतपणातच वारली व काही आठ-दहा वर्षांची होऊन वारली. आठ-दहा वर्षे जगली अशी चार मुले होती. त्यांची नावे शांताराम, बाबुराव, लक्ष्मीबाई व यशवंतराव अशी होती. यापैकी फक्त यशवंतराव तेवढा वाचला होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची जाहिरात आणि प्रचार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या. तसेच, त्याचा खर्च जोतिराव फुल्यांनी कसा चालवला या संदर्भात ते सांगतात की, अनाथ बालकाश्रमाच्या भिंतीवर लावण्यासाठी मोठाल्या अक्षराच्या नाटकाच्या जाहिरातीसारख्या जाहिराती जोतिरावांनी छापल्या होत्या. त्यातून काही जाहिराती बरेच दिवस माझ्याजवळ होत्या. त्या जाहिरातीवर ‘काळे पाणी टाळण्यासाठी उपाय’ असे शीर्षक होते व ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिले आहेत, त्यांनी जोतिराव गोविंदराव फुले याचे घरी येऊन बाळंत होऊन जावे. बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात येईल असा मजकूर होता. या जाहिराती त्यांनी पुणे शहरात ठिकठिकाणी लावल्या व तसेच या जाहिराती त्यांनी पंढरपूर, नाशिक, वाई, काशी वगैरे तीर्थांच्या गावी लावण्याची व्यवस्था केली होती. या आश्रमाचा सर्व खर्च त्यांनी आपल्या स्वखर्चाने केला. यावरून आपणास हे स्पष्टपणे दिसते की, जोतिराव फुल्यांनी धाडसाने ब्राह्मण वस्तींमध्ये जाऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाचे फलक लावले तसेच विधवा गरोदर स्त्रियांची नावे उघड होणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली. तसेच, यासाठी मुद्रणाचा वापर केला आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाहिरात लावण्याचीही व्यवस्था केली. स. ग. मालशे आणि नंदा आपटे यांच्या मते, जोतिराव फुल्यांनी पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. त्यांच्यानंतर काही वर्षांनी प्रार्थना समाजाच्या मंडळींनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.

बालहत्या प्रतिबंधक गृह काढल्यानंतर काही वर्षं चालवल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींचे निरीक्षणे जोतिराव फुल्यांनी केली आहेत. विशेषत: बाळंतपणानंतर किती दिवस बाळ आणि आई एकत्र राहिले पाहिजेत. ‘सत्यदीपिका’ या वृत्तपत्रात जोतिराव फुल्यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे आणि त्यामध्ये लिहिले आहे की, पूर्वी ‘विधवांस तुरुंग आणि काळेपाणी टाळण्याचा उपाय’ या नावाच्या जाहिरातीमध्ये पुनर्विवाह प्रतिबंध असणार्‍या जातींतील विधवा स्त्रियांस व त्यांच्या संबंध्यास खाली सही करणार अति नम्रतेने व मोठ्या कळवळ्याने विनवीत आहे की, पुनर्विवाहाचा प्रचार पडे तो पावतो गर्भपात बालहत्यादिक क्रूर कर्मे न व्हावी म्हणून अशा अडचणीच्या स्थितीत जन्मलेल्या अर्भकांस जुना गंज पेठेत नंबर ५२७ च्या घरांत मुकाट्याने आणून सोडले असता कोणत्याही प्रकारची विचारपूस न करिता त्या बालकांस घेऊन सर्व प्रकारे त्यांचा सांभाळ केला जाईल. हे कलम रद्द केले. कारण, बिन आईच्या मुलांचा सांभाळ करण्यास फार आयास पडतात. ‘परंतु सदरी लिहिलेल्या गरोदर स्त्रियांचे बाळंतपणाकरिता सर्व प्रकारची तजवीज केली आहे’, हे कलम कायम करून पुढे असे कळविण्यात येते की, सदरी लिहिलेल्या बायांनी या घरात अडीच वर्षांची मुले होईपर्यंत राहिल्यास त्यांजपासून जन्मलेली मुले व या पूर्वी आम्हाजवळ असलेली मुले आमच्या औरस पुत्रासारखी समजली जातील; परंतु बाळंत होण्याच्या बाईने अडीच वर्ष राहीन, अशी पूर्ण खात्री केल्यावाचून वरील सूचनेप्रमाणे आश्रय दिला जाणार नाही. कारण काही स्त्रिया बाळंत झाल्याबरोबर निघून जातात आणि तसे झाले म्हणजे अज्ञानी अर्भकाचे हाल आमच्याने पाहवत नाही. पुढे कदाचित आमचे स्वस्त्रीपासून संतती झाल्यास त्यांचा व यांचा हक्क सारखा समजला जाईल, यांत कोणतेही रीतीने कमीपणा होणार नाही.

यावरून आपणास असे स्पष्टपणे दिसते की, जोतिराव फुल्यांनी नुसती गर्भार विधवा स्त्रियांसाठी बालहत्या प्रतिबंधक काढले नाही, तर त्यामध्ये जन्माला आलेल्या बाळांचेही त्यांनी काळजी घेतली होती. आईशिवाय बाळ जास्त दिवस जगत नाहीत हेही त्यांनी पाहिले म्हणूनच बायांनी बाळंतपण झाल्यावर बाळासोबत अडीच वर्ष राहावे अशी अट त्यांनी घातली. ही अट घालण्यामागेही लहान मुलांची काळजी होती असे दिसते. शेवटी, या बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्माला आलेली ही सगळी मुले ही माझीच औरस मुले अशी भूमिका घेऊन जोतिराव फुल्यांनी अनाथांचे पालकत्व स्वीकारलेले दिसते. पुढे, यातील बरीच मुले दगावली. यशवंत वाचला. यशवंत हाच त्यांचा मुलगा झाला. त्यांच्या मृत्युपत्रात सर्वच गोष्टींचा वारस म्हणून जोतिरावांनी यशवंतला नेमले होते ही गोष्ट येथे आवर्जून नमूद केली पाहिजे.

जोतिराव फुल्यांनी सामाजिक सुधारणा, धर्मचिकित्सा, शेतकरी चळवळ, शैक्षणिक प्रयोग अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात केल्या. मुलींसाठी जोतिराव फुल्यांनी शाळा काढल्या. याचीही आपणास माहिती असते मात्र मुलींसाठी शाळा काढण्यासोबतच स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. जोतिराव फुल्यांनी शूद्र समाजातील स्त्री-पुरुषांसाठी आयुष्याला दिशा देणार्‍या अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या. त्यासोबतच, ब्राह्मण स्त्रियांना दयनीय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी धाडसाने अनेक गोष्टी केल्या. अलीकडच्या काळात दबक्या आवाजात फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाने ब्राह्मणद्वेष पसरवला अशी कुजबूज केली जाते. ही कुजबूज अज्ञानामुळे पसरवलीही जाते. जोतिराव फुल्यांच्या लिखाणाचा आढावा आणि मागोवा घेतला तर इतर मंडळींपेक्षा जोतिराव फुल्यांचे काम हे जास्त महत्वाचे, धाडसाचे आणि आव्हानात्मक होते. म्हणूनच, मालशे आणि आपटेंनी त्यांचे कार्य इतरांच्या तुलनेत क्रांतिकारी होते असे म्हटले आहे. कारण, एकोणिसाव्या शतकात त्यांनी विधवा स्त्रियांच्या लैंगिकतेचा प्रश्न नुसता हाताळला नाही तर त्यांना पाठिंबा दिला. त्यांची बाजू घेतली. त्यांच्या मुलाबाळांना आपले स्वत:चे नाव दिले. यातूनच, जोतिराव फुले माणुसकीचा आणि करुणेचा विचार किती मुळापर्यंत करत होते, हे दिसून येते.

संदर्भसूची –
१. मालशे स. ग., नंदा आपटे, विधवाविवाह चळवळ, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, १९७८
२. रायकर सीताराम (संपा.) आम्ही पाहिलेले फुले, महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९८१
३. नरके हरी (संपा.), समग्र महात्मा फुले वाङ्मय, महात्मा जोतिराव फुले चरित्रे आणि साधने समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०२१ 
४. कुंभोजकर श्रद्धा, बापूराव घुंघरगावकर (संपा.), महात्मा जोतिराव फुले नऊ जुनी अल्पचरित्रे, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, २०२६
५. Pande Ishita, Phulmoni’s body : the autopsy, the inquest and the humanitarian narrative on child rape in India,      South Asian History and Culture, Vol. 4, No. 1 P- 9-30


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]