प्रभाकर नानावटी -
“हिंदू राष्ट्राची मशाल बिहारमधून पेट घेईल.”
भरसभेतील हे वाक्य स्वयंघोषित दैवी अवतार म्हणवून घेणार्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार उर्फ बागेश्वर धाम महाराज याचे असून बिहारच्या मुख्यमंत्र्यांपासून इतर राष्ट्रीय जनता दलाच्या पुढार्यांनी याबद्दल मनसोक्त टीका केली आहे. एवढेच नव्हे, तर या बाबाजीने जमलेल्या लोकांना ‘पागल’ म्हणून संबोधल्यामुळे गर्दीला नियंत्रित करणे जड झाले होते. संयोजकांनी पुढील २-४ दिवसांचे कार्यक्रम रद्द करून महाराजाचे सत्संग ऑनलाइन स्ट्रीमिंग करून भक्तांची इच्छा पूर्ण केली.
धीरेंद्र स्टेजवरून बोलताना एका विशिष्ट पद्धतीने बोलतो, वागतो. जर त्याने काही रंजक गोष्ट सांगितली तर स्वतः टाळी वाजवतो आणि ‘जय राम’ म्हणतो. भक्तांशी बोलताना अनेकदा त्याचं वागणं तुसडेपणाचं असतं. आपल्या कार्यक्रमांमध्ये धीरेंद्र शास्त्री भूतबाधेचा इलाज करण्याचाही दावा करतो. तो स्टेजवर पुटपुटतो, फुंक मारतो. मग गर्दीतून ओरडण्याचे आवाज यायला लागतात. पुरुष, महिला उठतात आणि किंचाळताना दिसतात. धीरेंद्र म्हणतो,‘यांना चिमट्यांनी मारा, साखळ्यांनी बांधा.’
संशोधकांचं आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जेव्हा लोकांना वाटतं की आपल्याला भुतांचं अस्तित्व जाणवतंय तेव्हा खरं त्यांचं चित्त थार्यावर नसतं. त्यामुळे शरीरात बदल घडतात आणि त्या लोकांना असं वाटतं की आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण नाहीये, ते दुसरं कोणाच्या आधीन झालंय.
धीरेंद्र ठासून सांगतो, ‘आम्ही काही चमत्कार करत नाही. ही बालाजीची कृपा आहे. तेच सगळे करतात. आम्ही काहीच सांगत नाही, बालाजीच सांगतात.’
धीरेंद्र फक्त भक्तांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत. तो काश्मीर फाईल्स – पठाण चित्रपट ते हिंदू राष्ट्र आणि सनातन धर्माच्या गोष्टी करतो.
या बाबतीत धीरेंद्र याचं ताजं वक्तव्य अलीकडचे आहे. तो म्हणतो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं की ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा’. आज आम्ही भारतात नव्या इतिहासाची नवी घोषणा केली आहे. ‘तुम मेरा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनायेंगे.’ भारतातल्या लोकहो, बांगड्या भरून घरात बसू नका. बोट फक्त बागेश्वर धामकडे दाखवलं नाहीये, तर प्रत्येक सनातन्यावर बोट दाखवलं आहे.
२०२२ मध्ये धीरेंद्र शास्त्रीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एक माणूस धीरेंद्र यांच्या पाया पडताना दिसतो. धीरेंद्र त्याला थांबवून म्हणतो, ‘हात नको लावू मला, अस्पृश्य माणूस आहे. जय हो.’ लोकांनी आरोप केला, धीरेंद्र अस्पृश्यता पाळतो. पण यावरही धीरेंद्र स्पष्टीकरण देताना म्हणाला, ‘आम्ही बाबाजींचा वारसा चालवतो. आम्ही अस्पृश्यता पाळत नाही. अनेक लोक दारू पिऊन येतात किंवा कांदा-लसूण खातात. आम्ही सगळ्यांमध्ये राम बघतो. मग आम्ही रामाकडून नमस्कार कसा करून घेणार? आम्ही त्या दरबारातले आहोत जिथे ना कोणी लहान आहे ना कोणी मोठं.’
धीरेंद्र यांनी मुसलमांनावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तो ‘घरवापसी’च्याही गोष्टी करतो. एका व्हिडिओत दिसतं, सुलताना नावाची एक महिला आपण छत्तीसगढच्या आहोत असं सांगते आणि पुढे म्हणते की, मी मुसलमान आहे, पण मूर्ती आणि फोटोची पूजा करते. यावर माझ्या घरचे चिडतात. स्टेजवर बसलेला धीरेंद्र विचारतो, “तुम्हाला हिंदू धर्मात का यायचं आहे?” ती महिला उत्तरते, “कारण हिंदू धर्मापेक्षा चांगलं काहीच नाही.”
दिवस-रात्र चालणार्या कार्यक्रमात बागेश्वर बाबा भगवान हनुमान (मारुती) वरील वचनाचे पारायण करतो. या वचनात हनुमान किती ग्रेट आहे, त्याच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण रामकथेला कशी कलाटणी मिळाली इत्यादी गोष्टी तो रसाळपणे सांगतो. तोंडपाठ असलेले वचन व बाबाची मधुर वाणी यामुळे ऐकणारे मोहित न झाल्यास ते नवल ठरेल. तीस वर्षांच्या या दैवी पुरुषाचा दिव्य दरबार व त्या वेळी म्हटलेले कथावचन समाज माध्यमांवर व्हायरल होत लाखो भक्तापर्यंत पोचत होत्या.
भारतात इंटरनेटचा वापर वाढला तसंतसं धीरेंद्रला आपली लोकप्रियता वाढवण्यात मदत मिळाली. यू ट्यूब, व्हॉट्सअप, संस्कार चॅनल अशा माध्यमांद्वारे धीरेंद्र लाखो लोकांपर्यंत पोचला. सोशल मीडियावर त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. आज धीरेंद्र याच्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज आहेत. यू ट्यूबवर त्यांचे ३७ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तीन वर्षांत त्याला ५४ कोटींहून जास्त व्ह्यू मिळाले आहेत. फेसबुकवर बागेश्वर धामचे ३० लाख फॉलोअर्स आहेत, तर ट्विटरवर ६० हजार आणि इंस्टाग्रामवर २ लाख.
धीरेंद्र शास्त्री आणि बाबा बागेश्वर धामची टीम इंटरनेटचा प्रभावी वापर करते. बागेश्वर धामची वेबसाईट गुगल सर्चला ध्यानात ठेवून डिझाईन केलेली आहे. लोक गुगलवर काय शोधतात याचा अभ्यास करून त्यानुसार शब्द संयोजना केली आहे. म्हणजेच जर बाबा बागेश्वर धामबद्दल कोणी सर्च करत असेल तर सरळ त्यांच्या वेबसाईटवर पोचेल. बागेश्वर धामच्या वेबसाईटचा दावा आहे की धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून इतर कामंही केली जातात. बागेश्वर धामला देणगीतून जेवढे पैसे मिळतात त्याच्या अर्ध्या हिश्शातून इथे अनेक समाजोपयागी कामे केली जातात असं म्हटलंय.
यातली काही प्रमुख कामं म्हणजे —
गोरक्षा
गरीब मुलींची लग्नं
मंगळवारी आणि शनिवारी भुकेल्यांसाठी अन्नदान
पर्यावरण संवर्धनासाठी बागेश्वर बाग
वेबसाईटच्या होमपेजवर ‘बागेश्वर धाम श्री यंत्र’ चा प्रचार केला जातो. यात असा दावा केला होता की हे यंत्र देशातल्या फक्त पाच हजार ‘भाग्यवान’ लोकांना मिळेल. हे यंत्र घरात ठेवल्याने गरिबी दूर होईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करायचं होतं. इथे आपला फोन नंबर आणि नाव लिहिल्यानंतर संस्कार टीव्ही चॅनलच्या वेबसाईटवर अकाऊंट बनलं जातं. बागेश्वर धामच्या यू ट्यूबवर नजर टाकली तर लक्षात येईल की सध्याच्या इंटरनेटच्या जगातल्या लोकांची आवड लक्षात ठेवून ते व्हिडिओ बनले आहेत. काही व्हीडीओचे शीर्षक असे आहेत..
लवेरियाच्या मुलाची इच्छा अशी पूर्ण झाली
श्रीमंत बनण्याचे दहा उपाय
सासू-सुनेच्या भांडणावर उपाय
कर्जातून मुक्त व्हाल, व्यापारात बरकत
घरात लक्ष्मीचा वास का नाही?
मुलीला का सांगितलं लग्नानंतर फार बोलू नको
लहानपणापासून बागेश्वर बाबा हनुमान देवळाच्या बाजूस असलेल्या निर्मोही आखाड्याला जात असे. हा आखाडा त्याच्या आजोबाचा होता. नंतरच्या काळात बागेश्वर येथेच दैवी दरबार भरवू लागला. त्यातून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. एका व्हिडिओत धीरेंद्र म्हणतो, सलग तीनदा आजोबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की, अज्ञातवासात जा. तेव्हा मी लहान होतो आणि अज्ञातवास म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. मग कळलं की पांडवही अज्ञातवासात गेले होते. तेव्हा समजलं की अज्ञातवासामुळे देवाचा वर मिळतो. मी जेव्हा अज्ञातवासातून परत आलो तेव्हा दरबार लागायला लागला. लोकांची साथ मिळत गेली.
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम सरकार नावाचे धार्मिकांच्या दृष्टीने पवित्र क्षेत्रस्थळ आहे दिल्लीहून खजुराहोला जाणारी ट्रेन बर्याचदा छतरपूरजवळ थांबते. इथे कोणतंही स्टेशन नाही. इथे रोज, खासकरून, मंगळवारी आणि शनिवारी ट्रेनची चेन ओढून ट्रेन थांबवली जाते. ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात लोक उतरतात. या लोकांसाठी बस, रिक्षा किंवा टेम्पो उभे असतात. हे लोक बागेश्वर धाम नावाच्या जागी जात असतात जिथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ‘बाबाजी’ बसलेले असतात.
याच परिसरात जन्मलेला धीरेंद्र कृष्ण गर्ग हा नंतर नाव बदलून धीरेंद्र कृष्ण शास्त्री झाला. त्याचे आजोबा, भगवानदास गर्ग हे सिद्धी पंथाचे संत होते.
एके दिवशी बालाजी महाराजांच्या आज्ञेने आणि कृपेने त्याला आजोबा, श्रीदादा गुरुजी महाराजांचा सहवास लाभला आणि त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या माध्यमातून दादा गुरू बालाजी महाराजांच्या सेवेत रुजू झाला. संन्यासी बाबांचा आणि या धामचा महिमा जगभर पसरला आणि त्याचाच परिणाम म्हणजे, दर मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविक या धामला दर्शनासाठी येतात.
हजारोंच्या समुदायासमोर प्रवचन देत असताना हा बाबाजी एखाद्याला नावाने हाक मारतो, त्याच्या काय समस्या आहेत, हे सांगतो व किती काळ ही समस्या त्याला त्रास देत आहे, हेही सांगतो. त्यावरील उपाय सुचवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतो. त्याला लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर तो कागदावर लिहून देतो. त्याच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे.
हे सर्व त्याला एकदाही न भेटता सांगितल्यामुळे जमलेला समुदाय आश्चर्यचकित होतो व बाबाजीजवळ दैवी शक्ती आहे याची त्यांना खात्री पटते. काहींच्या अंगात भुताचा संचार झाला आहे हे ओळखून भूत उतरून दाखवितो. भुताबरोबर तो संवाद करतो. हे सर्व प्रकार जमलेल्या गर्दीला अचंबित करते व बाबाजीच्या प्रसिद्धीत भर घालते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत सायकल, मोटारसायकलवर फिरत असणारा धीरेंद्र शास्त्री आज खासगी विमानाने फिरतो. भारत ते लंडन सगळीकडे त्याला मान-मरातब मिळतो. तो कुठे जायला निघाला तर डझनभर गाड्यांचा ताफा त्यांच्यामागे फिरतो.
धीरेंद्र शास्त्रीने इथे आधी राहणार्या ज्ञानपीठ पारितोषक विजेते रामभद्राचार्य महाराजांना अनेकदा आपलं गुरू म्हटलं आहे. रामभद्राचार्य लहानपणापासूनच अंध होते आणि त्यांच्या भक्तांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठ्या लोकांचा समावेश आहे.
रामचरित मानस व शिव पुराण यावर तो आपल्या धाममध्ये प्रवचन देतो. कुठलीही शारीरिक वा मानसिक व्याधी वा आर्थिक, सामाजिक समस्यांमुळे त्रस्त असो, बाबा दैवी उपचारातून बरा करतो अशी याची ख्याती दूरवर पसरलेली आहे. ‘त्याच्यावर भगवान हनुमानाचा वरदहस्त असल्यामुळे त्याचे चमत्कारसदृश आशीर्वाद पॉवरफुल्ल असतात,’ यावर सर्व भक्तांचे एकमत आहे.
बागेश्वर महाराजांना लोकांचे विचार कसे कळतात? यावर काही तज्ज्ञ दावा करतात की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या चेहर्यावर काही हावभाव निर्माण होतात. ते हावभाव काही लोक वाचू शकतात. ज्या पद्धतीने अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या मदतीने वाचू शकतात, तसे लोकांच्या चेहर्यावरचे भाव वाचू शकणारे लोक आहेत. हातवारे आणि शारीरिक प्रयत्नांव्यतिरिक्त, समोरच्या व्यक्तीचे वर्तन कसे आहे. यासोबतच त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, हे त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसते.
बागेश्वर सरकार अनेकदा हिंदूंना जागृत करण्याची भाषा करतो. मोठ्या मुद्यावरही तो आपली विधाने करतो. बागेश्वर महाराज म्हणतो की, ‘मी माझ्या कुटुंबासाठी काम करत नसून लोकांना जागृत करण्यासाठी करत आहे. धर्मांतराच्या विरोधात मी लोकांना जागृत करण्याचे काम करत आहे.’
काही महिन्यांपूर्वी बागेश्वर बाबाचे नाव राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये गाजत होते. बागेश्वर बाबाचे सत्संग व दर्शन समारंभाचे आयोजन नागपूर येथे पूर्ण तयारीने केले जात होते. भरपूर जाहिरात केली जात होती. आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबा करत होता. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिले. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपये घेऊन जावे, असं आव्हानच श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिले.
हे आव्हान दिल्यानंतर बागेश्वर बाबाही इरेला पेटला. त्यांनीही श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं. ‘मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या’, असं आव्हानच बागेश्वर बाबांनी दिलं.
महाराष्ट्र पोलिसांनी ठाण्यात बागेश्वरच्या सत्संगाचे आयोजन करणार्यांना एक नोटीस पाठवून बागेश्वर कुठलेही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही याची काळजी घेण्याची ताकीद दिली. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होता कामा नये अशी तंबी दिली.
याच सुमारास शास्त्रीच्या सत्संग प्रवचनावेळी ३६ महिलांनी आपले दागिने चोरीला गेल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या. शास्त्रीच्या प्रवचनाला हजारोंची उपस्थिती होती.
दोन दिवसांच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या या कार्यक्रमास अंधश्रद्धेच्या विरोधात लढणार्या अनेक संघटनांकडून विरोध झाला. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये येथे बागेश्वर बाबाचे कार्यक्रम होता कामा नये अशा तक्रारी नोंदविण्यात आले. पोलिसांनी आयोजकांना नोटीस पाठवून धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादग्रस्त वक्तव्य करणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. तरीसुद्धा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संपूर्ण भारत देशाला प्रभू रामचंद्राचा भारत करण्यात येईल. मला जिवंत ठेवणार नाहीत याची मला कल्पना आहे. परंतु मीही त्यांना जिवंत ठेवणार नाही, असे भडकाऊ विधान केले.
‘रामचरितमानस’ या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्यावी म्हणून आग्रह केला. आपण हिंदू राष्ट्र व अखंड भारत यासाठी प्रयत्न करत राहणार अशी घोषणा केली.
मागच्या वर्षी या बाबाजीने तीनशे ख्रिश्चनांचे सनातन हिंदूंत धर्मांतर घडवून आणल्याचा दावा केला. शास्त्रीच्या या सनातन धर्माला बाबा रामदेव याचे पूर्ण अनुमोदन होते. परंतु बाबा रामदेवप्रमाणे या शास्त्रीच्या मतांना वा वादग्रस्त वक्तव्याला कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता.
लहान-थोर सगळेच महाराजांचे भक्त आहेत. धीरेंद्रच्या दरबारात सामान्य माणसं, नेते, व्यावसायिक, लहान-थोर सगळेच जातात. छतरपूरचे स्थानिक नेते आणि काँग्रेसचे आमदार त्याचे भक्त आहेत. धीरेंद्र शास्त्रीचं महत्त्व वाढवण्यात त्यांची मुख्य भूमिका आहे असं म्हटलं जातं. या यादीत कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा तसेच नितीन गडकरी आणि गिरिराज सिंह अशा केंद्रीय नेत्यांची नावंही येतात.
जेव्हा नेते धीरेंद्र यांच्या दरबारात जातात तेव्हा फक्त फोटो बाहेर येतात, पण सामान्य माणसं दरबारात जातात तेव्हा अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येतात. जवळपास सगळ्याच व्हिडिओमध्ये भक्त धीरेंद्र यांनी कागदावर लिहिलेल्या गोष्टी आणि भक्तांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं याबद्दल समाधानी दिसतात. धीरेंद्र या भक्तांना विचारतात, ‘धाममध्ये आल्यानंतर तुमचं आयुष्य बदललं का?’ सगळेच लोक होकारार्थी उत्तर देतात.
धर्माचा बाजार आणि त्यामागचं सत्य पुढे आणण्याचे प्रयत्न होत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र लोकांचा विश्वास अशा गुरू आणि बाबांवर वाढत चालला आहे, हे मात्र नकी.
(आउटलूकच्या सौजन्याने)

धीरेंद्र शास्त्री आणि जमीन
बागेश्वर धाम इथे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गढा गावाच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. इथे दुकानं आणि इतर व्यवसायही वाढीला लागले आहेत. इथल्या जमिनी वादात अडकल्या आहेत. चंदलाचे माजी आमदाराचा आरोप आहे की, गढाची सरकारी जमीन धीरेंद्र यांनी बळकावून त्यावर आपलं बांधकाम केलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी आपली जमीन बळकावली असा आरोप काही स्थानिकांनी केला. त्यांनी याविरोधात निदर्शनंही केली होती. तसंच स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांकडे तक्रारही केली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने सध्या या जमिनींवर ‘स्टे’ आणत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला नकार दिला आहे.
या प्रकरणी कोर्टात जाणार्या अनेक लोकांपैकी संतोष सिंह होते. त्यांनी ‘बीबीसी’शी बोलताना म्हटलं, ‘या जागेवर आमची दुकानं होती. एके रात्री ते लोक आले आणि आमची दुकानं काढली. आम्हाला कळलंही नाही. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातही गेलो, निदर्शनं केली पण काही कारवाई झाली नाही. ती जागा मंदिराच्या मागे आहे. काही दिवसांपूर्वी या लोकांनी म्हटलं की, जमीन आम्हाला द्या आणि आमच्या नावावर कागदपत्रं करा. मग आमचे वडील, काका लोकांनी ती जमीन ३० लाखांना विकून टाकली.’
सरकारी जमीन, तलाव आणि स्मशान
धीरेंद्र यांच्या वेबसाईटवर पर्यावरण संवर्धनासाठी झाडं लावण्याचा उल्लेख आढळतो. पण त्यांनी गढातल्या पर्यावरणाचं नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर झालेला आहे. गढामध्ये एक तलाव आहे, तसंच इथल्या मंदिराजवळ एक स्मशानही होतं.
आर. डी. प्रजापती यांचा आरोप आहे की, गावात एक तलाव होता. स्मशान होतं जिथे प्रेतं जाळली जायची. पण ते बळकावलं गेलं आहे. इथली धर्मशाळाही बळकावली गेली आहे. बरं, हा असा भाग आहे जिथे चुकीच्या चालीरीती आणि अंधश्रद्धा अजूनही फोफावलेली आहे. इथे ५ रुपयाचं लॉकेट कधी ५ हजारांना तर कधी ५१ हजारांना विकलं जातंय. असेच त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. हाच यांचा व्यवसाय आहे.
धीरेंद्र यांचे चुलतभाऊ आणि त्याच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य लोकेश गर्ग आपण जमीन बळकावल्याचा आरोप फेटाळून लावतात. ते म्हणतात, ‘स्मशानाची जमीन आणि तलाव आजही तिथेच आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही स्मशानाच्या जमिनीची साफसफाई केली होती. जिथे आम्ही राहतो ती जागा आमच्या आजोबांची होती. राहता राहिला अंधश्रद्धेचा मुद्दा तर लोक येतात, तेच गर्दीत उभे राहून विचारतात. आम्ही थोडी म्हणतो, याला उभं करा किंवा त्याला उभं करा. ही तर बालाजीची कृपा आहे.’
गढातून बाहेर पडून आता दुसर्या शहरात नोकरी करणार्या एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना म्हटलं की, या लोकांकडे इतका पैसा आणि जमीन नव्हतीच की हे धर्मशाळा बांधतील. आताच्या नव्या बांधकामाच्या ठिकाणी खालच्या मजल्याची डागडुजी केली नसेल तर तुम्हाला आताही दिसेल ती जागा सरकारी आहे.
जमिनीशी संबंधित वादांबद्दल लोकेश म्हणतात की, जेव्हा कोणी पुढे जातं तेव्हा त्याच्यामागे काही ना काही कारस्थान रचलं जातंच. ज्या जमिनीचा वाद आहे ती मंदिराचीच होती. कोणीतरी उगाच विरोध करत होतं. त्यांच्या सांगण्यावरून आणखी काही लोकांनी विरोध केला. पण जेव्हा खरं काय ते समजलं तेव्हा ते लोक स्वतःहून मागे हटले.
दरम्यान गढा एक भतिस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांमध्ये एक कहाणी इथल्या स्थानिक लोकांचीही आहे. उमाशंकर यांचं आजोळ गढा आहे तर त्यांचं कुटुंब आता छतरपूरमध्ये राहतं. ते म्हणतात, ‘गावाकडे लोक वर्षानुवर्षं एका ठिकाणी राहात असतात. पण त्या जमिनीची कागदपत्रं थोडी असतात. सरपंचाने सांगितलं, इथे घर बांधा तर लोकांनी बांधलं. आता धामवाले लोक प्रसिद्ध झाले तर कागदपत्रांची ढाल पुढे करून त्यांच्या रस्त्यात जी घरं आहेत ती प्रशासनाच्या मदतीने पाडून टाकली. जेव्हा प्रशासनाकडे तक्रार केली तेव्हा उत्तर आलं, चौकशी सुरू आहे.’ तलाव आणि स्मशानाबद्दलही उमाशंकर सांगतात. ते म्हणतात, ‘एकदा यांनी म्हटलं की स्मशानाच्या जागी यज्ञ करायचा आहे तर इथल्या गोष्टी हलवा. इथे यज्ञाला लोक येतील त्यांची गैरसोय नको. मग या ठिकाणी त्यांनी मोठी यज्ञवेदी उभारली. आता म्हणतात की यज्ञवेदी काढू शकत नाही कारण ते धर्मविरोधी ठरेल.’
गढातल्या व्यापारात धीरेंद्र शास्त्रीचा किती हस्तक्षेप?
काही स्थानिक लोकांनी या वर्षी घडलेला एक किस्सा सांगितला. गढाच्या दुकानांमध्ये जवळच्या भागातून पाणीपुरवठा होतो. पाण्याची एक कॅन २० रुपयांची असते. धीरेंद्र शास्त्रीच्या लोकांनी २० रुपयांच्या एका कॅनवर ५ रुपये कमिशन मागितलं असा आरोप आहे.
गढा गावातले एक जण सांगतात, स्थानिक लोकांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ज्यांनी वाद घातला होता त्या लोकांनी माफी मागितली आणि पोस्ट डिलीट करायला सांगितली. महाराजांचाही फोन आला, मग हा वाद शमला. आता तसं काही नाहीये.
– बीबीसी–मराठी
