पालघर जिल्ह्यात जादूटोणा व करणी चित्रकला प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद

जतीन कदम -

कलेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा स्तुत्य उपक्रम

एक चित्र हे हजार शब्दांचे काम करते. चित्रकलेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली शाखेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू या ठिकाणी शाळा व महाविद्यालयांमध्ये राज्यभरातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रकारांचे जादूटोणा व करणी या विषयावर आधारित प्रदर्शन मांडण्यात आले आहे. भुताटकी, भानामती, चेटूक अशा भ्रामक व अंधश्रद्धा निर्माण करणार्‍या समजुतीतून पशुबळी, नरबळी, आत्महत्या या विध्वंसक प्रवृत्तींना समाजातील विविध घटकांना बळी पडावे लागते. आजही खेडोपाड्यामध्ये अज्ञान व अडाणीपणामुळे अंधश्रद्धांना मोठ्या प्रमाणावर पेव फुटलेले दिसते. चित्रकलेच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, ग्रामपंचायतीतील नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली. पालघर जिल्ह्यातील अनेक खेडेपाड्यांमध्ये या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. जिल्ह्यातील कलाध्यापक संघटनेच्या पुढाकाराने लीलाधर रायसिंग(राजगुरू ह. म. पंडित विद्यालय, सफाळे), रूपेश वझे (ज. म. ठाकूर विद्यालय वाणगाव), सीताराम प्रभू (स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील विद्यालय, दहिसर), प्रगती भोणे (स. का. पाटील, माकुणसार), रूपेश राऊत (दातिवरे इंग्लिश हायस्कूल), जैतकर सर (रा. हि. सावे विद्यामंदिर तारापूर), राजेश कुमावत (गाडगे महाराज आश्रमशाळा दाभोण) या शाळांमध्ये प्रदर्शन ठेवण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात हे प्रदर्शन जास्तीत जास्त शाळांमध्ये आयोजित करण्याकरिता जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक भाते, राज्य कार्यकारी सदस्य अण्णा कडलासकर, कार्याध्यक्ष संदेश घोलप, प्रधान सचिव जतिन कदम, वार्तापत्र विभाग प्रमुख जगदीश राऊत यांनी विशेष प्रयत्न केले.

जतीन कदम

प्रतिक्रिया १

हे प्रदर्शन विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांसाठी एक पर्वणीच होती. याद्वारे नागरिकांमधील सामाजिक दृष्टिकोन बदलासाठी वाव मिळाला. प्रत्यक्ष चित्रकाराची कल्पनाशक्ती व ती कल्पना प्रत्यक्षात चित्राच्या माध्यमातून मांडण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. या चित्रांद्वारे समाजविघातक चालीरीती व रूढी परंपरा आपल्याला समजण्यास मदत झाली व त्यातील फोलपणा समजून घेण्यास मदत झाली. या प्रदर्शनामुळे सर्वांना एक नवीन विषय शिकायला मिळाला, असे म्हणता येईल.

अशोक गोलवड, मुख्याध्यापक, एस.के.पाटील विद्यामंदिर माकुणसार, ता. जि. पालघर

प्रतिक्रिया २

आपल्या भारत देशाने विज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीचे शिखर गाठले आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. असे असूनही अंधश्रद्धेचा शाप आपल्या देशाला समाजाला लागला आहे. आपल्या देशातील समाजातील बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात. त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्या गोष्टीचे वैज्ञानिक कारण न जाणून घेता त्यावर विश्वास ठेवतात. आमच्या राजगुरू. ह. म. पंडित विद्यालय सफाळे येथे पार पडलेल्या ‘जादूटोणा व करणी या विषयक चित्र प्रदर्शना’तून दिसून आले. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगलीतर्फे आयोजित केलेल्या या प्रदर्शनातून अंधश्रद्धाविषयक संकल्पना स्पष्ट झाल्या. अंधश्रद्धेचा नाश व्हावा यासाठी हे आगळे वेगळे प्रदर्शन आमच्या शाळेत पार पडले. विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्थांचे अंधश्रद्धेबाबतचे मत स्पष्ट झाले. अशी अनेक प्रदर्शने आयोजित केली गेली पाहिजेत जेणेकरून अंधश्रद्धा या समाजातून नाहीशी होण्यास मदत होईल.

संचिता साळवे, विद्यार्थिनी, राजगुरू. ह. म. पंडित विद्यालय, सफाळे

प्रतिक्रिया ३

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली शाखा यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे आणि त्या उपक्रमांमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यातून सर्व कलाशिक्षकांना जादूटोणा व करणी या विषयावर चित्रकला स्पर्धेतून आवाहन केले. विविध गाव, तालुका व जिल्हास्तरावर चित्रकारांनी सहभाग नोंदवून महाराष्ट्रात समाज उद्धारासाठी, समाजाला योग्य दिशा मिळण्यासाठी; समाजातील अनिष्ट, विघातक प्रवृत्तीस आळा बसण्यासाठी उत्कृष्ट चित्र निर्माण करून समाजास प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण हजार शब्दात जे पटवून सांगता येणार नाही, ते काम एक चित्र करू शकते याच्यात शंकाच नाही. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील शाळा शाळांमधून या चित्रांचे फिरते प्रदर्शन भरवून समाजातील अंधश्रद्धा दूर करून ढोंगी, पाखंडी, समाजकंटक व बुरसटलेल्या विचारांना आळा घालण्याचे काम केले जात आहे.

विद्यार्थी व पालक यांचा उत्कृष्ट प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे, ही उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल. आजच्या विज्ञान युगात माणसाने भरमसाठ प्रगती केली असली तरीही तो कोणत्यातरी रूढी-परंपरा यांच्या नावाखाली दबलेला दिसून येतो. त्याला बाहेर काढण्याचे काम करणी विषयावर आधारित चित्र करीत आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे. शंभर दीडशे वर्षांपूर्वी संत गाडगे बाबा हे अशिक्षित असून त्यांनी आपल्या भारुडातून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणाने अंधश्रद्धा दूर करता येईल व समाजाचा विकास साधण्यासाठी शिक्षण हेच साधन महत्त्वपूर्ण ठरेल हे ठामपणे सांगितले. जादूटोणा, नरबळी, तंत्र मंत्र, नजर, टोक, भूत प्रेत, पिशाच याविषयी असणारा अंधविश्वास, अफवा इत्यादी कृतींचा कडाडून विरोध संत गाडगे बाबा यांनी केला होता. तेच महान कार्य आज महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक प्रवृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने २०१३ साली कठोर कायदा केला होता.

सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा लागू करण्यास भाग पाडले. असे असले तरी या कायद्याला विरोध करणारे आहेतच याची खंत वाटते. संपूर्ण समाजातून या गोष्टी हद्दपार कराव्या लागतील आणि त्यासाठी हा कलेच्या माध्यमातून केलेला प्रयोग मी समाजहितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय समजतो आणि सर्व आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो व पुढील त्यांनी केलेल्या विचारांना समर्थ पाठबळ मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो.

श्री.लीलाधर देविदास रायसिंग, राजगुरू ह.म.पंडित विद्यालय, सफाळे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]