कल्याणी अक्कोळे -

‘तू जैन ना?’ बर्याच वेळा वेगळ्या संदर्भाने वेगवेगळ्या कारणांसाठी विचारलेला हा प्रश्न माझ्यासमोर येतो. याचे उत्तर ‘होय’ यापलीकडे काही देता आले नाही अजूनतरी. सध्याच्या कट्टरवादी वातावरणामध्ये मी जन्माने जैन आहे ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे का? किंवा अभिमानाने सांगण्याइतपत मला जैन धर्म समजला आहे का? हे आणि यासारखेच बरेच प्रश्न मला माझ्या ‘होय’ या उत्तरामागे पडतात…
लहानपणापासून जैन धर्म आणि धार्मिक वातावरण बर्याच वेगवेगळ्या बाजूंनी मला बघण्यास आणि अनुभवण्यास मिळाले आहे. दोन्ही आजोबा जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक; पण अवडंबराला थारा न देणारे, आजी पक्की धार्मिक, मम्मी भाव जपणारी सश्रद्ध, दीदी श्रद्धाळू आणि समंजस, पप्पा निरीश्वरवादी; पण कट्टरवादाचे विरोधक! अशा बर्याच अंगांनी जैन तत्त्वज्ञान मी शिकत गेले, अजूनही शिकत आहे. या सार्यांमधून मला समजलेले जैन तत्त्वज्ञान किंवा धर्म याबद्दल थोडी चर्चा आपण करू.
जैन धर्माची खरी ओळख
जैन धर्म संपूर्ण निरीश्वरवादी नाही; पण इतर धर्मांप्रमाणे तो ईश्वराचे अस्तित्व सृष्टीचा कर्ता, पालनकर्ता, हर्ता असेही मानत नाही. अवतारवाद, मूर्तीपूजा, यशपूजा, कर्मकांड हे जैन तत्त्वज्ञानाला मान्य नाहीत. ‘जिन’ या शब्दावरून ‘जैन’ शब्द प्रचलित झाला. जिन म्हणजे आपल्या ध्यान आणि ज्ञानाने मनाच्या विकारांवर विजय मिळवणारा. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही जिन बनण्याची पात्रता आहे. ज्या जिवाने मोक्ष प्राप्त केला आहे, तो भगवान किंवा सिद्ध. तो कोणाचे पाप पुण्य लेखत जोखत नाही, कोणाचे रक्षण करत नाही किंवा कोणाला शिक्षासुद्धा करत नाही. हा जिन बनण्याचा मार्ग तपश्चर्या, आहार विहाराचे नियम, व्यापक अभ्यास आणि ज्ञान आहे.
या मूलतत्त्ववादानुसार जैन तत्त्वज्ञान जगण्याचे आचरणाचे गुण शिकविते. हे तत्त्वज्ञान गुरू, विकारांवर विजय मिळविलेल्या जिनांना नमन करायला शिकविते.
लहानपणी मी अगदी भक्तिभावाने पाठशाळेमध्ये जायचे. पाठशाळा म्हणजे जिथे धर्माभ्यास शिकविला जातो. हाच धर्माभ्यास करण्यासाठी स्वइच्छेने हे मूळ तत्त्वज्ञान समजावे यासाठी धर्मसंस्कार शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये नक्कीच आचरण चांगले असावे, मन शुद्ध असावे यादृष्टीने खूप चांगली शिकवण दिली गेली. मनासोबतच शरीराची मशागत कशी असावी, याचीही शिकवण दिली गेली; पण ही पाठशाळा करताना किंवा काही ग्रंथांचा अभ्यास करताना काही प्रश्न मला सतत पडायचे, अजूनही पडतात.
एककेंद्री सर्वशक्तिमान देवाचे अस्तित्व जैन धर्म नाकारत असला, तरीही कर्मसिद्धान्त, त्याप्रकारे जिवांचा होणारा पुनर्जन्म, त्यांना मिळणार्या गती, स्वर्ग, नरक, ८४ लक्ष योनींमधून फिरणारा जीव, मोक्षस्थळ इत्यादी इत्यादीवर विश्वास ठेवतो असे दिसते. मूळ तत्त्वज्ञान आणि या संकल्पना यात बरीच मोठी तफावत दिसते. जर जिन किंवा सिद्ध या सर्वांचा म्हणजे पाप-पुण्य कर्माचा लेखाजोखा ठेवत नाही, तर या गती, स्वर्ग वा नरकातील जागा, पुनर्जन्माचे स्वरूप कोणत्या आधारे ठरते, एखाद्याने चांगलेच कर्म करावे किंवा एखादा वाईट कर्मच का करतो, हे सारे कोणत्या आधारावर ठरते हा प्रश्न आहे. मूळ तत्त्वज्ञान पुढच्या काळात प्रसारित होणे गरजेचे होते, ते न होता इतिहासातील दाखल्यांनुसार मूळ ग्रंथ मधल्या काळात नष्ट करण्यात आले. उर्वरित ग्रंथांवरून जे साहित्य प्रकाशित झाले त्यावर ब्राह्मण्यवादाचा, वैदिक विचारांचा, दैववादाच्या उदात्तीकरणाचा जास्त प्रभाव दिसतो. याचाच परिणाम आज प्रत्येक जैन सण, समारंभ, महत्त्वाचे दिवस किंवा दिनचर्या यावर ठळकपणे दिसतो.
पंचकल्याण पूजा
जैन धर्मातील तीर्थंकर किंवा भगवान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर किंवा नूतनीकरण केल्यावर जी पूजा केली जाते, त्याला पंचकल्याण पूजा म्हणतात. यामध्ये मुख्य पाच विधी असतात. जे जिन किंवा अगदी वास्तववादाने सांगायचे झाल्यास ज्या व्यक्ती मोक्षास गेल्या आहेत, त्यांचा जीवनप्रवास येथे मांडला जातो. गर्भ, जन्म, तप, ज्ञान आणि मोक्ष हे जीवनाचे पाच महत्त्वाचे टप्पे या पूजेत सोहळा स्वरूपात उलगडले जातात. कोणतीही सामान्य व्यक्ती जिनत्वापर्यंत कशी पोहोचू शकते, हे शिकविण्यासाठी हा मंच अगदीच योग्य आहे; परंतु या सोहळ्याचे स्वरूप आणि आवाका दिवसेंदिवस फारच मोठा आणि अवडंबराच्या दिशेेने वाढत आहे.
जैन धर्मात झालेल्या पंथांच्या विभागणीनुसार प्रथांमध्येही काही प्रमाणात बदल आढळतो. ‘गर्भ’ सोहळ्यामध्ये तीर्थंकर मातेला सोळा स्वप्ने पडतात, त्या स्वप्नांचा प्रत्येकाचा वेगळा गहिरा अर्थ अशा कथा आहे. या कथांनुसार या जीवनपटात इंद्र-इंद्राणी यांचा सहभाग असतो, हत्ती घोडे यांच्या मोठ्या मिरवणुका असतात. यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व बनण्यासाठी, घोेडे, हत्ती यांच्या मिरवणुकींसाठी, कलश चढविण्यासाठी बोली म्हणजेच सवाल लावले जातात. थोडक्यात, लिलावाचाच एक प्रकार. ज्याला ज्या जागेचा मान हवा आहे, त्यानुसार हे मान वाढत जातात. कित्येक मध्यमवर्गीय कुटुंबांना फक्त हा मान मिळविण्यासाठी ते आपल्या आवाक्याबाहेर पैसा ओततात, हे मी बघितलेलं आहे. काही क्षणांच्या मानासाठी आयुष्य पणाला लावणं किती योग्य आहे?
अलीकडे याच पूजांमध्ये वाढत जाणारी एक नवी प्रथा दिसते. मौंजीबंधन किंवा मुंज! अगदी संपूर्णपणे ब्राह्मण्य प्रथेतून आलेला सोहळा. सध्या तो इतका सहजतेने आणि आनंदाने स्वीकारला आहे की, मुंज हा प्रकार जैन संस्कृतीमध्ये नाहीच हे कोणालाही कदाचित पटणार नाही. मौंजीबंधन सोहळ्याद्वारे मुलांवर नक्की कोणते संस्कार केले जातात, कोणत्या शिक्षणासाठी आणि संकटांना तोंड देण्यासाठी या मुलांना या प्रथेतून तयार केले जाते, हा प्रश्नच आहे.
मी स्वत: अलीकडे या पूजांमधले काही कार्यक्रम जेव्हा उपस्थित राहून अनुभवले, तेव्हा त्यातील बर्याच गोष्टी मला आक्षेपार्ह वाटतात. उदाहरणादाखल काही गोष्टी आपण येथे पाहू:
स्त्रियांनी डोक्यावर पदर किंवा ओढणी न घेता प्रवचनास बसू नये, बिनाबाह्यांचे किंवा जिन्स टॉप्स असे कपडे परिधान करून येऊ नये. हे कार्यक्रमाचे निवेदक अगदी जाहीरपणे खिल्ली उडवत सांगतात. स्त्रियांना समान न्याय मिळावा, पुरुषांप्रमाणेच मुक्तीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी चोवीसावे जैन तीर्थंकर महावीर यांनी स्त्रियांचा संघ तयार केला होता. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी स्त्रीमुक्तीचा विचार करणारे जैन आणि दिवसेंदिवस स्त्रियांना अधिक बंधनात कळत नकळत अडकवत जाणारे आताचे जैन यात खरंच कितीतरी मोठा आणि निराशाजनक फरक आहे.
या पूजांमध्ये असणारा जैन मुनींचा सहभाग हासुद्धा अलीकडे काळजीत टाकणारा विषय आहे. मुनी-दीक्षा ही टप्प्या-टप्प्याने, त्याग आणि अभ्यास यावर घेतली जाते. या पूजांमध्ये हे मुनी जेव्हा सवाल लावताना दिसतात, अगदी व्यावसायिक निवेदकांप्रमाणे बोलतात तेव्हा मुनी-दीक्षा यावर विश्वास बसणे अवघड जाते.
ही पूजा भव्य पद्धतीने पार पाडण्यासाठी ओतला जाणारा, मिळवला जाणारा पैसा हा प्रचंड प्रमाणात असतो. पूजा साध्या प्रमाणात पार पाडून हा पैसा सहज कोणत्याही चांगल्या कामासाठी वापरला जाऊ शकतो. तरुण उभरते उद्योजक, दवाखान्यातील रुग्ण, गरजू मुलांचे शिक्षण वा उच्चशिक्षण अशा ठिकाणी योग्य नियोजनाने वापरल्यास कितीतरी जणांचे जीवन सुकर होऊ शकते.
रोजच्या जगण्याची धडपड चालू असताना, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस हौशीपोटी, मानापोटी या सार्या दिखाव्याच्या जंजाळात वाहावत जाऊन स्वत:चे आणि कुटुंबाचे आर्थिक नुकसान करून घेतो ही अतिशय दु:खाची बाब आहे.
जैन मुनी/महाराज
सामान्यत: इतर धर्मांतील लोकांच्यासुद्धा जैन मुनी कधी ना कधी पाहण्यात आलेले असतात. जैन धर्मातील पंथांनुसार आणि मुनी-दीक्षेच्या स्तरानुसार यामध्ये वेगवेगळेपणा दिसू शकतो. संपूर्ण निर्वस्त्र, श्वेत वस्त्रधारी, भगवे वस्त्र परिधान केलेले महाराज बरेचदा आपल्या पाहण्यात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा विहार. आपल्याला मिळालेले ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी मुनी विहार करतात. तप करण्यासाठी त्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो आहार. विहारादरम्यान मुनींनी सात्त्विक आहार करणे अपेक्षित असते. दिगंबर पंथामध्ये ३ ते ५ कुटुंब पहाटेपासून या आहाराचे नियोजन, तयारी करतात. त्यातील जेथे मुनींना योग्य वाटते, तिथे ते आहार करतात. आता या ‘योग्य’ वाटण्यामागे नक्की कोणते कारण असते? किंवा फक्त एखाद्याच घरी मनात आले म्हणून आहार करणे किंवा नाकारणे अगदीच चूक आहे. मग हे मुनी कोणत्या विकारांवर नक्की विजय मिळवतात? एका घरामध्ये फक्त आंतरजातीय विवाह झाला आहे, या कारणामुळे आहार नाकारल्याचे उदाहरण माझ्या ऐकिवात आहे.
श्वेतांबर मुनी एखादेच घर ठरवून पूर्वकल्पनेने आहार करतात असे ऐकीवात आहे. आमच्याच शहरात आलेल्या काही मुनींचे सुखसोयींनी युक्त अशा ठिकाणी राहण्याचे किस्से मी ऐकले आहे. या मुनींची रथातून मिरवणूक काढली गेली आहे.
मला माझ्या लहानपणीची एक घटना आठवते. जैन मुनी बघताच त्यांना वंदन केले जाते. मग तो रस्ता असो किंवा एखादे ठिकाण. मला हे सारे फारच अवघडल्यासारखे व्हायचे. यावरून मी माझ्या आजोबांना विचारले होते की, असेकुठेही मुलींना वंदन करावेच लागते का? आणि त्यांना अजिबातच ओळखत नसतानासुद्धा हा आदर आणावा कसा? यावर त्यांनी अगदी सरळ सोप्या शब्दांत मला सांगितले होते. ‘तुला ज्यांच्या ज्ञानामुळे किंवा मनापासून वाटत असेल तर वंदन कर अन्यथा नको करू.’ किती छान आणि सुटसुटीत तत्त्व! या तत्त्वामुळेच जागेचे व्यवहार करणारे, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, सर्व सुखांचा उपभोग घेणारे अशा कितीही मुनींच्या घटना समोर आल्या तरी आदरणीय, वंदनीय मुनी अजूनही समाजाच्या, लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करत आहेत, ही गोष्ट नेहमीच वरचढ ठरेल! विद्यानंद महाराजांचा संघ, शांतिसागर महाराजांचा संघ, कोल्हापूर आणि श्रवण-बेळगोळचे भट्टारक, आदरणीय समंतभद्र महाराज यांनी ज्ञानोपासना, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत खूपच चांगले काम केले आहे. अशा मुनींबद्दलचा आदर आपसूकच वाढत जातो.
ज्योतिष, मुहूर्त आणि काही इतर अंधश्रद्धा
आधीच चर्चा केल्याप्रमाणे जैन धर्मात जिनत्वाला पोचलेल्यांची आराधना, त्यांना वंदन केले जाते. सर्वशक्तिमान देवाची कल्पनाच अमान्य असल्याने भगवंत आणि सामान्य व्यक्ती यामध्ये कोणताही दुवा, मध्यस्थ लागत नाही. मोक्षाचा मार्ग स्पष्ट आहे, ज्याला इच्छा आहे त्याने तो जमेल तसा अनुसरावा. तरीसुद्धा प्रतीक स्वरूपात असलेल्या जिनांपर्यंत पोचण्यासाठी पंडित हा दुवा मध्ये आलेलाच आहे. बरं, हा दुवा फक्त मुक्तिमार्गाचे मार्गदर्शन न करता शुभमुहूर्त, चांगला काळ, वाईट काळ, अशुभ वेळ, ज्योतिष या सार्यांचेही सर्रास मार्गदर्शन करत आहे. या पांडित्यामध्ये धर्माभ्यासक म्हणून त्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण, डॉक्टरेटसुद्धा मिळत आहे, हे विशेष! हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मसुद्धा अंधश्रद्धांना अधिकाधिक बळी पडत आहे, यात नवल नाही.
काही ग्रंथ सुतक विधी सांगतात. कोणत्या पिढीतील व्यक्ती गेल्यावर किती दिवस, किती वेळ सुतक पाळावे याचे संदर्भ दिले जातात.
मासिक पाळी चालू असताना स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करू नये हा तर अगदी स्त्रियांच्या मनात पक्के घर करून बसलेला विषय. हे फक्त जैनच नव्हे, तर जवळपास सर्व धर्मांत थोड्याफार फरकाने असेच आहे. हा नियम न पाळल्यामुळे कित्येक जैन मूर्ती भंग पावलेल्या कथा मी लहानपणी ऐकल्या होत्या. अर्थात, कथाच त्या! मी जेव्हा माझ्या आजीसोबत, मम्मीसोबत पाळीच्या दिवसात मंदिरात जायचे तेव्हा यातील फोलपणा निष्कर्षानिशी मला कळला. हे फक्त एवढ्यापर्यंतच मर्यादित नाही. मंदिराच्या गाभार्यात जाऊन पूजा करताना मी तरी कधी कोणत्या स्त्रीला पाहिले नाही. मुळात मूर्तीपूजाच चुकीची असली, तरी भावार्थ लक्षात घेता इथे स्त्री-पुरुष समानतेला, समान भक्तीला थारा नाही हेच खरे. श्रवणबेळगोळ येथील गुल्लिका आज्जीची कथा ज्या भावार्थाने सांगितली जाते, “तिच्या लोटाभर दुधातसुद्धा मूर्तीचा मस्तकाभिषेक झाला” तो भावार्थ, ती भक्ती प्रत्यक्षात स्त्रियांना लागू होत नाही. मनूवादाचा, बाह्मण्यवादाचा नकळत जैन धर्मावर होत असणारा प्रभाव हा खरंच चिंतेचा विषय आहे.
एकीकडे जैन विज्ञान प्रगत असल्याचे दाखले शोधत राहायचे आणि आधुनिक विज्ञानाला सरळ सरळ फेटाळून लावायचे जी सध्याची धार्मिक स्थिती झाली आहे.
पर्युषण पर्व
ज्या प्रमाणे शरीराच्या विकारांवर विजय मिळवला जातो, त्याचप्रमाणे मनाच्या विकारांवर विजय मिळवण्यासाठी दहा भावनांचे अनुसरण ज्या काळात केले जाते, त्याला पर्युषण किंवा दशलक्षण पर्व म्हणतात. माणूस आपले जगणे समाधानी, निरपेक्ष कसा जगू शकेल हे क्षमा, मार्दव, आर्जव, अपरिग्रह, संयम, तप, त्याग इ. दहा भावना सांगतात. या पर्वाचेसुद्धा स्वरूप बरेचसे बदलले आहे.
प्रत्येक दिवसाचे महत्त्व यावर भर देण्यापेक्षा या काळात पूजा अर्चा, मिरवणूक, आपल्या धर्माची महानता, जैनधर्मीयांची एकजूट यातील दिखाव्यांवर जास्त भर दिला जात आहे. हे सर्व बाकी सगळ्यांना दिसण्यासाठी धर्मातील चिन्हांचे, झेंड्याचे मार्केटिंग ओघाने आलेच. गेल्या काही वर्षांमध्ये ‘मी जैन आहे’ हे दाखविण्याचे वेगवेगळे मार्ग जैन समाज अवलंबत आहे.
याच पर्युषणात प्रत्येक वेळी गाजत असणारा विषय म्हणजे शाकाहार-मांसाहार. पर्युषणात सर्व मांसाची दुकाने दहा दिवस बंद ठेवावीत अशी मागणी जैन समाज गेली काही वर्षे करत आहे. माझ्या मते शाकाहार आणि मांसाहार हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असावा. जैन धर्म शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे आणि शाकाहाराशी मी पूर्ण सहमत आहे; पण याचा अर्थ असा आहे का, की मांसाहार करणारी व्यक्ती चुकीची जगत आहे, खूपच मोठी काहीतरी चूक करत आहे? नाही! माणूस हा मूळ मांसाहारी प्राणी आहे, उत्क्रांतीवादातील दाखला आपण विसरू शकत नाही. म्हणूनच ज्यांना मांसाहार पसंत नाही, त्यांनी तो करू नये; पण मांसाहार करणारी व्यक्ती किंवा त्या निगडित ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना विरोध करण्याचेही काही कारण नाही.
अहिंसा
अहिंसा परमो धर्म:| म्हटले जाते. म्हणजे अहिंसा हाच परमोच्च धर्म आहे. ही हिंसा फक्त शारीरिक किंवा जीवाशी निगडित आहे का? अहिंसा ही प्रामुख्याने तीन प्रकारांत विभागली जाते. शारीरिक, वाचिक आणि मानसिक! शाकाहार ज्याप्रमाणे शारीरिक हिंसा अडवते, त्याप्रमाणे आपल्या बोलण्यातून आणि आपल्याकडून कोणाला मानसिकदृष्ट्या त्रास होणार नाही, याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
अनेकान्तवाद
जैन तत्त्वज्ञानापैकी एक महत्त्वाची देणगी म्हणजे अनेकान्तवाद! प्रत्येक जिवामध्ये विज्ञान आणि विचार करण्याची क्षमता असते. या क्षमतेच्या आधारे आपल्याला जे ज्ञान प्रयोग, शास्त्र, शिक्षण, अनुभव इत्यादीद्वारे मिळते, तेच पूर्ण सत्य असे आपण मानतो; पण ही आपली सर्वांत मोठी चूक आहे. सत्य हे नेहमी अनेकांगी असते. भिन्न विचार भिन्न मते तयार करतात. या अनुषंगाने सत्याच्या भिन्न बाजू समोर येतात. मग शेवटी हा प्रश्न उरतोच की, कोणता विचार अंतिम किंवा योग्य मानला जावा? यावर मार्ग मिळतो तो ‘स्याबाद’ या तत्त्वामधून. ‘स्याबाद म्हणजे काही प्रमाणात ‘सत्य विधान’. सार्या विचारभिन्नता लक्षात घेऊन, त्या मान्य करून त्यामध्ये समन्वय साधून योग्य विचार आणि सत्य मान्य करणे म्हणजेच स्याबाद. काही शतकांमागे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याने हाच सिद्धान्त जगासमोर मांडला – Theory of Relativity
“Everything is relative, nothing is absolute. The way you see the world depends on your point of veiw and context.” म्हणजेच ‘अनेकान्तवाद’
जैन धर्माची मूलतत्त्वे ही जगण्याचा योग्य मार्ग सांगतात, सर्व विकारांतून मुक्तीचा मार्ग सांगतात; पण दिवसेंदिवस हे सारे मागे पडून वैदिकांचा, ब्राह्मण्यवादाचा प्रभाव जैन धर्मावर जास्त झालेला दिसून येतो. माझ्याच समवयीन किंवा माझ्यापेक्षा लहान मुला-मुलींचे जैनत्वाबद्दलचे कट्टर विचार कधी ऐकले जातात. यावेळी ‘जैन’ असणं याबद्दल पुढच्या पिढीसाठी थोडी का असेना भीती वाटतेच.
हा धर्म कागदोपत्री मर्यादित नसून, पूजा, अर्चा, अवडंबर, अंधश्रद्धा यात न पडता फक्त चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी जैन तत्त्वज्ञान मार्ग दाखविते. हा मार्ग कोणत्या पद्धतीने येणार्या पिढीसमोर आणायचा हे मात्र विचारपूर्वक आमच्या पिढीने ठरविले पाहिजे, यात शंका नाही.
– कल्याणी अक्कोळे, जयसिंगपूर
संपर्क : ८१४९० ७९२६१