पृथ्वीच्या हवामान बदलाचे उग्र स्वरूप

प्रभाकर नानावटी -

गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादीबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तर भारतात व ऑक्टोबरमध्ये सिकीम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड झाली. दिल्लीच्या काही भागात गंगा व यमुना दुथडी भरून वाहू लागल्या. गेल्या ४५ वर्षांत पोचली नाही त्यापेक्षा जास्त उंची पाण्याच्या पातळीने गाठली व मोठ्या प्रमाणात महापूर आला. ही सर्व भारतातील उदाहरणं हिमनगाएवढेच आहेत.

उष्माघातामुळे मेक्सिको व अमेरिकेत शेकडोंनी मृत पावले असतील. युरोप, चीन व थायलंड या देशांनाही याचा फटका बसला. अमेरिका, जपान, चिली, ब्राझील, हैती, स्पेन, चीन, दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट, पाकिस्तान, ग्रीस, लिबिया इ. अनेक देशांतील शहरांच्या जवळपास महापूर व वणवा यांच्या थैमानामुळे हजारोंनी मृत्युमुखी पडले. लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची हानी झाली. महापूर, वणवा, वादळी वारे व दुष्काळ जगभर पसरले. १२५ वर्षांत झाली नव्हती त्यापेक्षा जास्त तापमानात वाढ झाली. २०२३ हे तापमानातील उच्चांकाचे वर्ष असेच म्हणावे लागेल. तापमान वाढीची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

हवामानातील अशा प्रकारचा बदल भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण त्याची वारंवारता, त्याचा आवाका व तीव्रता यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्याचे कारण जागतिक तापमान हरितगृह वायूंचे (Green House Gases -GHGs) जमा होण्यामुळे असेल. कर्ब वायू व मिथेन वायूचा सापळा वातावरणातील उष्णतेला पकडून ठेवते. जीवाष्म इंधन जाळणार्‍या औद्योगिक व इतर आर्थिक उपक्रमांचे, जंगलतोड व ओलसर जमिनीवरील आक्रमण याचे फलित हे विषारी वायू आहेत. ही उष्णता आर्क्टिक महासागर व ग्रीनलँड येथील जास्त प्रमाणात बर्फ वितळून टाकते. त्यामुळे वितळलेले काळेशार पाणी व उघडे पडलेले खडक सौर उत्सर्जित किरणांना जास्त प्रमाणात शोषून घेत आहेत. व त्यातून पुन्हा जास्त प्रमाणात उष्णता, पुन्हा बर्फ वितळणे त्यातून जास्त उष्णता… अशा प्रकारे हे चक्र अव्याहतपणे हवामान व्यवस्थेचा एक भाग होऊन जात आहे. पुढील काही दशकात अजून काही राष्ट्रे, काही शहरे यांना अवकाळी आलेल्या महापुरांचा सामना करावा लागेल. तसेच या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक जण मृत्युमुखी पडतील. शेतातील पिके जळून खाक होतील. हे सर्व पृथ्वीच्या तापमानातील बदलामुळे होत राहील.  

अनेक वैज्ञानिक, पर्यावरणतज्ज्ञ व संवेदनशील राजकीय नेते इत्यादींना गेल्या दशकभरातील तापमानातील वाढ मुख्यत्वेकरून जीवाष्म इंधनामुळे होत असून त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत याची जाणीव झाली आहे. या समस्येला उत्तर शोधण्यासाठी एकत्र बसून काही ध्येय-धोरणे सुचविली गेली. संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेऊन Inter governmental Panel on Climate Change (आयपीसीसी-IPCC) या नावाच्या समितीची स्थापना केली. या समितीची २८ वी वार्षिक बैठक डिसेंबर २०२३ मध्ये दुबई येथे समाप्त झाली. 

गेली कित्येक वर्षे ही समिती जागतिक GHG संबंधीचे – त्यातही कर्ब वायूसंबंधीचे व त्यामुळे तापमान, जैववैविध्यता व नागरी जीवनावर होत असलेल्या परिणामांचा तांत्रिक अहवाल प्रसिद्ध करत आली आहे. काही काल्पनिक परंतु सैद्धांतिकरित्या बरोबर असलेल्या प्रसंगातून जीवाष्म इंधनच्या वापरामुळे, जंगल व पाणथळ यांच्या विनाशामुळे नेमके काय होत आहे याबद्दल शासन व इतर संस्थांना समिती मार्गदर्शन करत आहे. प्रदूषणामुळे व औद्योगिकीकरणाच्या चुकीच्या कल्पनामुळे वातावरणातील GHG त कशी वाढ होत आहे, हे  लक्षात आणून देत आहे. या समितीच्या अंदाजाप्रमाणे जागतिक तापमानात २०३०-२०५३ च्या सुमारास औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला असलेल्या तापमानाच्या तुलनेने  सरासरी १.५ अंश तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु आताच २०२३ मध्येच १.४५ अंशाने तापमान वाढलेले आहे. आपण आताच धोक्याच्या पातळीजवळ आहोत. जर यापेक्षाही थोडेसे जरी वाढ झाल्यास नेमके काय काय होऊ शकते याची आकडेवारी दिल्यामुळे आयपीसीसीच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करता येत नाही, हे कळून चुकले आहे.  या धोक्याच्या सूचनेमुळे कित्येक राष्ट्रे आपल्या देशातील उद्योग संस्थांना कर्ब वायूची पातळी खाली आणण्यासाठी दबाव आणत आहेत. एक मात्र खरे की, समितीच्या आग्रहामुळे केवळ पर्यावरण समानतेच्या वायफळ गोष्टी न करता विकसित व अति विकसित राष्ट्रांकडून एक निधी (loss and damage fund) गोळा करून विकसनशील व अविकसित राष्ट्रांना नुकसानभरपाई करण्यास भाग पाडले जात आहेत. कारण, पर्यावरण विनाशात विकसित/अति विकसित देशांचा वाटा फार मोठा आहे. 

आयपीसीसीच्या अहवालात भरपूर माहिती, त्या माहितीचे विश्लेषण व वैज्ञानिकरित्या केलेले भाष्य असल्यामुळे आपल्या पृथ्वी विज्ञान प्रणाली (Earth Science System) बद्दलच्या ज्ञानात चांगलीच भर पडते. पर्यावरण तज्ज्ञांचे हजारो पानं असलेले हे अहवाल जगभरातील वैज्ञानिकांनी लिहिलेले असून जगातील सर्व प्रदेशातील प्रदूषण व पर्यावरण हानी याबद्दलची एकूण एक माहिती वाचायला मिळते. तरीसुद्धा काही राष्ट्रे यातील पळवाटा शोधतात व आपापल्या वाट्याला निर्दिष्ट केलेली निधी देण्यात टाळाटाळ करतात. काहीतरी निमित्त काढून प्रदूषण कमी करण्याऐवजी त्यात वाढच करतात. निसर्गाला ओरबडून विकासाच्या गप्पा मारतात.

यासंबंधी एक गोष्ट विषादपूर्वक नमूद करावीशी वाटते. गेली तीन दशके आयपीसीसीने प्रयत्न करूनही GHG ची पातळी तसूभरही कमी न होता  वाढतच राहिली. म्हणूनच कदाचित आयपीसीसीमुळेच ही वाढ झाली असे म्हणावेसे वाटले असेल. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व विद्युतवाहनांचा वापर यांच्यात लक्षणीयरित्या वाढ होऊनही जागतिक GHG वाढीचा दर कमी होत नाही. हा दर असाच वाढत गेल्यास २१०० सालापर्यंत तापमान तीन अंशाने वाढेल. जगभरातील अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली असून कुणीतरी याची नेमकी कारणं शोधून उपाय सुचवावे (To figure this out and fix it) असे म्हणण्याची पाळी येऊन ठेपली आहे. तापमान वाढ कसे थांबविता येईल? परिस्थिती इतकी हाताबाहेर का गेली? वेळीच उपाय का सुचले नाहीत? पाणी, वारा, किरणोत्सर्जन इत्यादी बाबीबद्दलची केमिस्ट्री व डायनॅमिक्स माहीत असूनसुद्धा त्यांची कारणं, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध याबद्दल शेकडो, हजारो प्रबंध उपलब्ध असूनसुद्धा आपण कुठे चुकत आहोत?  आपण अजूनही का धडपडत आहोत? आपल्याला मार्ग का सापडत नाही? आपली दिशाच चुकली नसेल ना?

वरील विषयावरील आलेखांचा अभ्यास करत असताना हवामान बदलाविषयी जागरूक असलेले सामान्य नागरिक हताश होतील. काहींना असे वाटेल की, ही समस्या मानवी प्रयत्नांच्या आवाक्यात नाही. या पृथ्वीची लचके तोडल्याशिवाय आपण जगूच शकत नाही, असे नैराश्याने म्हणावेसे वाटेल. परंतु ही निराशा, हे वैफल्य मानवी उत्क्रांतीच्या विरोधात जात आहे. गेल्या तीन लाख वर्षांत (बुद्धिमान माणसाच्या) सुमारे दहा हजार पिढ्या होऊन गेले असावेत. या पूर्वी आताच्या तुलनेने जागतिक हवामानातील चढ-उतार एवढ्या तीव्रतेने कुठल्याही पिढीला जाणवले नसेल का? गेल्या दहा पिढ्यांनाच (सुमारे तीनशे वर्षे) या समस्येला सामोरे का जावे लागत आहे?

हा बदल असा अचानक झाला आहे का? याचे मुख्य कारण म्हणून काहींना आपल्यातील हाव वाटतो, काहींना आपला स्वार्थ वाटतो. परंतु हे दोन्ही गुणविशेष आपल्या जीवनाचाच भाग असून काही वेळा हे गुण मानवी अस्तित्वाला हातभार लावलेले आहेत, हे विसरता येत नाही. परंतु एवढ्या हजारो-लाखो वर्षांनंतर हे गुणविशेष दुर्गुण म्हणून का ओळखले जात आहेत? एवढे त्रासदायक का ठरत आहेत? आपण समस्येचे सुलभीकरण तर करत नाही ना? कुणाला तरी दोष द्यायचे म्हणून राजकीय नेते व तेल कंपन्यांना दूषण दिले जात नाही ना?

परंतु फक्त यांच्यामुळेच तापमान वाढ होत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कदाचित, एक धोरण म्हणून GHG कमी करण्यात ते अपयशी ठरले असतील. परंतु व्यक्तिशः आपण त्यांना जबाबदार धरू शकत नाही. त्यांची कृती कायदेशीर असू शकेल वा त्याला काही मर्यादा असू शकतील. आपण जसे आपल्या आधुनिक जीवन व्यवहारासाठी व्यवस्थेवर अवलंबून आहोत त्याच प्रकारे ते सर्व व्यवस्थेचे बळी आहेत. आपला जीवनव्यवहार खनिज इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. खनिज इंधन ही भांडवलशाहीच्या राजकारणातील एक महत्त्वाचा घटक आहे. राजकीय नेते व कंपन्यांचे मुख्यस्थ बाजारीकरणाच्या तडाख्यात सापडलेले असल्यामुळे स्पर्धा जिंकायची असल्यास पर्यावरण वा प्रदूषण या (क्षुल्लक) बाबीकडे लक्ष देण्यास वेळ नाही वा त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, अशी मानसिकता विकसित झालेली आहे. रॅटरेसच्या या जीवघेण्या स्पर्धेत तगून राहायचे असल्यास या पर्यावरणीय नैतिकतेला तिलांजली देणे योग्य ठरेल, असे बहुतेक कॉर्पोरेट्सच्या मुख्यस्थांना वाटते. व्यवस्थेच्या या गुंतागुंतीतून बाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे परिस्थितीशरणतेला पर्याय नाही, असेच आपल्यासारख्या सामान्यांना वाटत आले आहे. 

गंमत अशी आहे की, एखाद्या समस्येला (बरोबर वा चुकीचे) उत्तर हवे असल्यास ती समस्या कशा प्रकारे मांडावी याची जाणीव आपल्याला असते. ज्याच्या हातात हातोडा असतो, त्याला सगळ्या समस्या खिळ्यासारखे दिसू लागतात. हातातील हातोड्याने हाणले की समस्या गायब! वा अंधार्‍या रात्रीत हरवलेल्या पैशाचे पाकीट प्रखऱ दिव्याखाली शोधणार्‍याच्या गोष्टीसारखे. मला पाकीट कुठे हरवले हे माहीत नाही, परंतु येथे चांगल्यापैकी उजेड असल्यामुळे येथे शोधत आहे, त्याचे स्पष्टीकरण. ज्या प्रकारे आपण आपल्या समोर असलेल्या प्रश्नाची मांडणी करतो वा त्याचे कार्य-कारणभाव तपासतो वा त्याची जबाबदारी कशावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करतो यावर सर्व काही अवलंबून असते. जागतिक तापमान वाढीबद्दल आपण मुळातच चुकीचे प्रश्न विचारत असल्यामुळे आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत. किंवा आपण चुकीच्या जागी त्याचा शोध घेत आहोत. 

उदाहरणार्थ, सौरमालिकेतील आपले जग काही यांत्रिकी नियमानुसार चालत असून याच अभियांत्रिकीच्या नियमांचा वापर भांडवली व्यवस्थेतील मानवी आर्थिक उन्नतीत करत आपल्या समोरील कुठल्याही समस्येचे उत्तर शोधू शकतो, असे आपल्याला नेहमीच वाटत आले आहे. प्रत्येक समस्येच्या उत्तरासाठी पैसा असतो. कारण जागतिक, औद्योगिक अर्थव्यवस्थेतील सर्व समस्या पैशाच्या जोरावर सुटतात याचा पगडा आपल्यावर आहे.  परंतु या संकुचित दृष्टीच्या पलीकडील व्यापक दृष्टिकोनातून Earth’s living systems कडे बघितल्यास एक वेगळेच चित्र उभे राहते. १९७० च्या सुमारास ‘फॅशनेबल’ वाटणार्‍या या मानसिकतेतून ८०-९० च्या दशकात आपण बाहेर पडलो. Earth’s living systems बाजारीकरण वा अर्थशास्त्राच्या नियमानुसार चालत नसून त्याकडे सम्यक व समग्र दृष्टिकोनातून बघायला हवे याची जाण येण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले. Earth system समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानापेक्षा सर्वसमावेशक कृतीची गरज असून त्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे लक्षात आले. ज्या विज्ञानाच्या भरवशावर आपण यातून बाहेर पडू असे वाटत होते, तेच विज्ञान अगदी मलूल होऊन काहीही करू शकली नाही, हे हळूहळू उमगले. सर्वकाही पैशातून विकत घेता येत नाही, हे लक्षात आले व यातून पैसाही कमावता येत नाही, हाही पाठ आपण शिकलो.   

हवामान बदलासंबंधी विचार करणार्‍यांना  मुख्य प्रवाहातील प्रत्येक प्रतिसाद बाजारीकरणातूनच मिळेल अशी एक भाबडी आशा होती. त्याच चष्म्यातून सर्व संस्था व जागतिक व्यवस्था सर्व समस्यांकडे बघत होती. तापमानातील वाढ असो की समुद्र पातळीतील वाढ असो की हवामानातील कर्ब वायूतील वाढ असो, या सर्व समस्यांचे सुलभीकरण करत कसेतरी या समस्यांचे उत्तर शोधू असे म्हणत गंभीरपणे त्यांच्याकडे न बघता आपापले व्यवहार सांभाळत होते. सर्व समस्यांकडे स्थानिक पातळीवर बघितले जात होते. परंतु ही जागतिक समस्या असून हवामान व्यवस्थेत काहीतरी मूलभूत बदल होत आहेत याची कल्पनाच आपल्याला आली नव्हती व अजूनही आली नाही. आपण या समस्या सुटे सुटे आहेत असे समजून उत्तरं शोधत होतो. पृथ्वी विज्ञान प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे याची कल्पनाच आपल्याला आली नाही. हे केवळ कर्ब वायूतील वाढ नसून संपूर्ण बायोस्फीअरची (biosphere) पातळी खालावलेली आहे, जल व नायट्रोजन चक्राला धका बसत आहे. नागरिकतेच्या अस्तित्वाला आवश्यक असलेल्या ग्रहविषयक नऊ घटकांपैकी सहा घटकांची मर्यादा आपण केव्हाच ओलांडली आहे. येथे फक्त कर्ब वायूची वाढच नव्हे, तर संपूर्ण बायोस्फिअरलाच अवकळा लागली आहे. ज्या प्रकारची आताची आपली जीवनशैली आहे ती जीवनशैली संपूर्ण नागरिकतेलाच गिळंकृत करणारी आहे. दिवसेंदिवस बिघडत असलेली पर्यावरणीय अवस्था व त्यासाठी आपण करत असलेले जुजबी उपाय या भूमीच्या भविष्याला अंधारात ढकलत आहेत.   

या समस्येला एकमेव उपाय आहे, आपण ज्या प्रकारे जगत आहोत त्यासाठी आपली जी उत्पादन पद्धती आहेत व त्या उत्पादनांचे उपभोग घेण्याच्या तर्‍हा आहेत त्यात आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. परंतु आताच्या जीवनपद्धतीची भलावण लाखो-करोडो लोक करत आहेत. जर आपण उत्पादन व उपभोग व्यवस्थेत बदल करायचे ठरविल्यास जागतिक मानवी संस्कृतीच धोक्यात येण्याची शक्यता आहे. आपण आता फक्त समस्यांना उपाय शोधत नाही, तर येऊ घातलेल्या दुर्दशेला थांबविण्याच्या प्रयत्नात आहोत. समस्यांना उपाय असू शकतात, परंतु दुर्दशेला नाही. फक्त ही दुर्दशा टाळण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो व काही नवीन गोष्टी शिकून घ्यावे लागतात. गेली कित्येक दशके Refuse, Reuse, Repair, Recycle हे चार R आपण आपल्या आयुष्यात आणू शकलो नाही. त्याऐवजी वापरा व फेका (use and throw) याची अंमलबजावणी करत आहोत. त्याचप्रमाणे Less stuff, less desire, less comfort, less convenience, Less of everything याबद्दलही विचार करण्याची कुवत हरवून बसलो आहोत.

            यासाठी पहिल्यांदा आपण दुर्दशेच्या उंबरठ्यावर आहोत याची मनाशी पकी गाठ बांधणे गरजेचे आहे.   

संदर्भ : दि वायर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]