विश्वास पेंडसे -

ग्रंथदिंडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार’ वितरण सोहळा पिंपरी – चिंचवड पुणे येथे संपन्न
पिंपरी-चिंचवड, पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने समाजातील अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करणार्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या राज्यभरातील १० कार्यकर्त्यांना ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा गौरव समारंभ गदिमा नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे पार पडला.
पुरस्कार प्रदान समारंभ सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी अंधश्रद्धा, आस्था आणि संविधान या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. यावेळी त्यांनी लिहिलेलं व दिग्दर्शित केलेलं ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक सादर करण्यात आलं. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाट्य सिद्धांतावर आधारित या नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, तनिष्का लोंढे व नृपाली जोशी यांच्या सशक्त अभिनयाने आधुनिक सावित्रीचे भान प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक गिरमे होते. यावेळी अनिसचे कार्यकर्ते अनिल वेल्हाळ, डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र अंनिस सचिव मिलिंद देशमुख,अलका जाधव, तसेच बार्टीच्या ज्योती शेटे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथदिंडीचे विश्वास पेंडसे, सरोज पेंडसे, सुरेश बावणकर आणि सीमा बावणकर यांनी परिश्रमपूर्वक केले. प्रेरणा पुरस्कार सोहळ्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्याला नवचैतन्य प्राप्त झाले असून कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली आहे.