सोडवते आयुष्याचा गुंता

सायली मिलिंद देशमुख-जैन -

आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी असंख्य प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. रोजच्या बातम्या जरी वाचल्या तरी दुःखद व निराशाजनक अशा अनेक घटना बघण्यास मिळतात. कधी गैरव्यवहार तर कधी भांडण, कधी आत्महत्या तर कधी खून वगैरे. व्यसनात अथवा रागात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. ‘संयम व शांततापूर्ण विचार बाळगण्याचे महत्त्व जाणायला हवे’, हा विचार मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व माझे पप्पा मिलिंद देशमुख यांच्यामुळे मिळाला. अडचणींकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगवेगळे असू शकतात हे त्यांच्याशी होणार्‍या चर्चेतून व त्यांच्या वागणुकीतून आम्हाला कळतच असे. पण आपण प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करू शकतो, हे मला व माझ्या परिवाराला त्यांच्याकडून शिकता आले.

मी सायली मिलिंद देशमुख. शाळेत शिक्षिका व घरी क्लासेस घेत असते. लहानपणापासून मी माझ्या पप्पांना आदर्श मानत व ते करत असलेले अंनिसचे काम समजून घेत आले. छोट्या छोट्या गप्पा-गोष्टींतून, चमत्काराचे प्रयोग व त्यामागील वैज्ञानिक स्पष्टीकरण सांगून आम्हाला त्यांचे काम व त्यासाठी द्यावा लागणारा लढा ते शिकवत गेले. आमच्या घरी देव्हारा, पूजा, कर्मकांड, हातात धागा दोरा, असे प्रकार मी कधीच नाही पाहिले. इतर मुला-मुलींच्या घरात अनेक वेळा त्यांचे आई-वडील त्यांना नावडता उपवास ठेवण्यास तसेच अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासण्यासाठी भाग पाडायचे. त्यामुळे आयुष्यात यशस्वी, आनंदी होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची किती नितांत गरज आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रत्येक गोष्टींतील कार्यकारण भावाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात हातात, गळ्यात गंडा-दोरा बांधण्याची गरज वाटली नाही.

दोन वेळा डोक्यावर अर्धा लिटर दुधाची बाटली ठेवून हात न लावता चालण्याबद्दल माझ्या वडिलांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. दैवी शक्तीऐवजी चिकाटी आणि एकाग्रता ह्यामुळेच हे रेकॉर्ड निर्माण झाले. ‘असाध्य ते साध्य’ ह्या संत तुकारामांच्या अभंगाचा प्रत्यय ह्या निमित्ताने येतो. पप्पांच्या ह्या रेकॉर्डबद्दल शाळेत सांगताना मला फार गंमत आणि अभिमान वाटत असे.

त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मला अनेक कार्यक्रम, शिबिरे आणि व्याख्यानांमधे सहभागी होता आले. त्यातून मुक्ताताई दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकरकाका, हमीद दादा, डॉ. कांकरिया सर, ललवाणी, गिरमे, नंदिनीकाकू व अशा अनेक कार्यकर्त्यांचे विचार ऐकायला मिळाले. अनेक लेख वाचताना जाणवत गेले की लोकांमध्ये हे विचार पोहचविण्याचे काम किती अवघड आहे. कारण हे कार्य एका भेटीत गोष्ट सांगून पटवता येईल किंवा एक दिवसात साध्य करता येईल, असे नाही; तर ह्यालाही चिकाटी आणि सातत्य लागते. प्रशिक्षण शिबिरांमधून मिळालेल्या ह्या शिदोरीमुळे मी शाळेतल्या मुलांना छोट्या छोट्या किश्श्यांच्या माध्यमातून विवेकी विचारसरणीचे महत्त्व समजावू लागले. विज्ञान दिवस, कुठलाही सण आपण का साजरा करतो व इको फ्रेंडली पद्धतीने कसा साजरा करायचा, हे मुलांपर्यंत मी पोचवत गेले.

आज जीवनात वाटचाल करताना कुठलीही समस्या सोडविण्यासाठी अवघड असे काही वाटत नाही. कारण एकच, सरळ सोपे आयुष्य जगण्याची व्याख्या ‘विवेकी वैज्ञानिक दृष्टिकोन.’ माझं लग्नही कोणतेही कर्मकांड न करता शनि अमावस्येला सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. विशेष म्हणजे जैनधर्मीय तरुणाशी आंतरधर्मीय लग्न करूनही हे विचार त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना, नातलगांना पटवता आले, हे मात्र नवलच. ह्याचे क्रेडिट माझ्या आई-वडिलांनाच. कारण त्यांचे लग्नदेखील कुमुहूर्तावर म्हणजे सिंहस्थात झाले. कोर्ट मॅरेज आणि रिसेप्शन. त्यांच्याच पावलांवर चालण्याचा प्रयत्न मी आणि माझा नवरा–मयूर करत असतो. घरात नेहमीच हसते-खेळते वातावरण पाहून नातेवाइकांना, मित्र मैत्रिणींनादेखील कौतुक वाटते. याचे श्रेय माझ्या आईवडिलांना देईन.

माझी आई अंजली मिलिंद देशमुख… लग्नाआधी उपवास, पूजा-अर्चा करणारी आई लग्नानंतर परिवर्तनाच्या वाटचालीवर चालू लागली, हे पाहत आम्ही मोठे झालो. स्त्री-पुरुष समानता मानत आमच्या वडिलांनी नेहमीच घरात आनंदी वातावरण ठेवले. आई देखील बर्‍याच भानामती केसेस मध्ये पप्पांसोबत काम करत असते. मीदेखील कॉन्व्हेंटमधील सातवीत शिकणार्‍या मुलीची भानामतीची केस सोडवावयास पप्पांबरोबर गेले व छान समुपदेशन करून ती केस सोडवली होती. पेंडसेकाकांनी त्यांच्या व माझ्या नावावर एक लाख रुपये ठेवून नवीन कार्यकर्त्यांना अंनिस व ग्रंथदिंडीमार्फत प्रेरणा पुरस्कार देण्याची योजना आखली आहे. पुढील काळातही विवेकाचा आवाज बुलंद करीत कार्य करीत राहू.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]