सावनी गोडबोले -
अंनिस पेण शाखेचे वटपौणिमेनिमित्त सर्वेक्षण
वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांची वडाला फेरे मारून दोरे बांधण्याची लगबग सुरू होते. तशीच आभासी (Virtual) लगबग असते सोशल मिडियावर. कुठे वटसावित्रीबद्दल उलटसुलट मते मांडणे जोरात चालू असते. कुठे सात जन्म तोच पती चालेल, पण सासू मात्र बदलून हवी वगैरे छापाचे जुनेच विनोद पुनः नव्याने फिरवले जातात. कुठे वड आपल्याला प्राणवायू देतो, म्हणून पुजायला हवा, किंवा सात जन्म म्हणजे शरीर सात वेळा पेशी बदलते अशा वैज्ञानिक (??) सत्ये सांगणार्या पोस्टस् येतात. वडाबरोबर सेल्फी काढून स्टेटसला टाकणे तर नित्याचेच !
यंदा कुठल्याशा चॅनलवरील मालिकांमधल्या सर्व नायिका आणि खलनायिका यांनी महावटपौर्णिमा साजरी केली. त्यामुळे सत्यवानाला पुनर्जन्म मिळाला की नाही माहीत नाही. पण मालिकांना भरपूर TRP मिळाला असणार नक्की.
वटसावित्रीचे इव्हेंटीकरण देखील प्रत्यक्ष पूजेइतक्याच उत्साहाने पार पडते. ज्यांना वड पुजायला बाहेर जायला जमले नाही त्यांनी फांदी घरी आणली. परदेशी राहणार्या काहींनी वडाच्या फोटोची पूजा केली. हा सण साजरा करण्याची पद्धत आपण आपल्या मनाप्रमाणे, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे बदलली, असे वरवर तरी वाटावे. पण खरंच महिलांना वटपौर्णिमा कशी साजरी करावीशी वाटते? पुराणातल्या सावित्रीशी आजच्या महिला धागा जुळवू शकतात का, असे काही प्रश्न मनात आले.
मग काही वर्षांपूर्वी अंनिस कार्यकर्ते राहुल विद्या माने यांनी बनवलेली गुगल प्रश्नपत्रिका समोर आली. २०२१ साली वटसावित्री निमित्ताने महिलांनी ही पत्रिका गुगल लिंक स्वरूपात भरून दिली होती. तीच मूळ प्रश्नावली घेऊन त्यात काही बदल केले. मुख्य म्हणजे, जिथे जिथे फक्त ‘हो’ आणि ‘नाही’ एवढे दोनच पर्याय होते, तिथे असा कधी विचारच केला नाही असा आणखीन एक पर्याय घातला आणि काही ठिकाणी महिलांना पर्याय लिहिण्यासाठी जागा ठेवली. हेतू असा की, ‘आपण यापूर्वी कधी विचार केला नव्हता’ ह्याची एकदा कबुली दिली की मग ‘इथून पुढे तरी विचार करायला हवा’ असे निदान काहींना वाटू शकते. वटपौर्णिमा साजरे करण्याचे काही पर्याय महिलांना स्वतःला सुचत आहेत का, हे पाहण्याचीही इच्छा होती.
सर्वेक्षण करताना खरं तर सर्व स्तरातील महिलांचे त्यात प्रातिनिधिक चित्र यावे अशी अपेक्षा असते. पण आपण माहिती कशी गोळा करतो यावर ते चित्र प्रातिनिधिक आहे की नाही ते ठरते. “हा अंनिसकडून आलेला फॉर्म आहे का? मग आम्ही नाहीच भरणार!” अशी ही शक्यता राहते. त्यामुळे मुळात बदलायला ज्या तयार आहेत अशा स्त्रियांनीच फॉर्म भरला होता. ४२४ फॉर्म आले होते. बहुतेक कार्यकर्त्यांनी आपापल्या ओळखीच्या गटांमधून फिरवला असावा. त्यामुळे ५०% स्त्रियांनी तरी आम्ही पूजा करतच नाही असे लिहिले होते. म्हणजे, एकूण महिलांपैकी फक्त अर्ध्याच जणी पूजा करतात का? माहीत नाही.
पूजा करणार्या किंवा न करणार्या अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी फॉर्म भरला होता. त्या त्या फॉर्म मध्ये काय काय भरले आहे यावरून त्यांच्या मनात काय आहे, हे मात्र कळत होते. मध्यमवयीन महिलांचे प्रमाण ८० % होते, आणि त्यातील अर्ध्या अधिक द्विपदवीधर असल्यामुळे असेल, त्यात नोकरदार आणि स्वतःचा व्यवसाय असणार्या स्त्रिया जास्त होत्या. गुगल लिंक भरण्याची सवय ही सुशिक्षित महिलांमध्येच जास्त असेल असा एक कयास… म्हणूनच कदाचित इतके प्रमाण होते.
सावित्रीची कथा खरी आहे असे फक्त १० टके महिलांना वाटत होते. ५६ टके महिलांना ती पुराणकथा आहे असेच वाटत होते आणि ३४ टके महिलांना ती नीतिकथा वाटत होती. स्त्रियांनी कसे वागावे हे शिकवण्यासाठी मुद्दाम लिहिलेली कथा. यावरून शिक्षणामुळे विचार करण्याची, शंका घ्यायची सवय रुजते असे म्हणायला हरकत नसावी.
काही असे प्रश्न होते की, त्यातून आपल्यालाही कळावे, महिलांना जे मनापासून करावेसे वाटते आहे ते करायला मिळते आहे का ? म्हणजे एक प्रश्न होता पूजा कशी ‘करायला हवी’ असे तुम्हाला वाटते? आणि काही प्रश्नानंतर प्रश्न होता तुम्ही स्वतः ही पूजा कशी ‘करता’ ह्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तफावत आढळली तर त्याचा अर्थ की त्या स्त्रीला ज्या गोष्टी पटतात, आदर्श वाटतात त्या ती प्रत्यक्षात करू शकत नाही. तर ह्या प्रश्नाचे उत्तर देताना फक्त एखादा टका बायकांनी निर्जळा उपवास करावा असे लिहिले होते. आणि चांगल्या सत्तर टके बायकांनी वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरी करायला हवी असे लिहिले होते. पण स्वतः वटवृक्ष लावला तो मात्र फक्त ४० टके बायकांनी.
वडच का याचे उत्तर मात्र अनेकांनी (म्हणजे ६५ टके महिलांनी) तो प्राणवायू देतो असे लिहिले होते. पण मग इतर झाडे सुद्धा प्राणवायू देतात, मग त्यांना का पुजत नाही अशी शंका त्यांना आली नव्हती. किंवा प्राणवायूची गरज फक्त महिलांनाच का किंवा वर्षातून एकच दिवशी असते का, असे प्रश्न त्यांना पडले नव्हते. वड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देते अशी एक छद्म वैज्ञानिक पोस्ट फिरत होती तीच अनेकांना खरी वैज्ञानिक वाटली असणार हे उघड आहे, एवढाच ह्यातून निष्कर्ष काढता येईल.
आपण कसे जगावे, सत्यवानाच्या सावित्रीसारखे, की ज्योतिबांच्या सावित्रीसारखे ह्याचे उत्तर जरी ९०% स्त्रियांनी ज्योतिबांच्या सावित्रीसारखे असे दिले असले, तरी फक्त पन्नास टके बायकांनी ‘पुरुषांनासुद्धा असे काहीतरी व्रत असावे’ असे लिहिले होते. म्हणजे समानतेची मूल्ये रुजायला अजून पुष्कळ काळ जायला हवा हेच खरे! २५ % बायकांनी तर असा कधी विचारच केला नव्हता.
एक चांगली गोष्ट अशी होती की आत्मा, यम, पुनर्जन्म यातील कशावरच विश्वास नाही, असे ७० % बायकांनी लिहिले होते. मासिक पाळी चालू असताना कुठलेही देवाधर्माचे कार्य करू नये असा अजूनही बर्याच जणांचा विचार असतो. म्हणूनच की काय, पूजा करणार्या बायकांपैकी २२% बायका ‘पाळी असताना पूजा करत नाही’ असे लिहितात. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी की फक्त एखादा टका बायका औषधे घेऊन पाळी पुढे ढकलतात. बाकी कोणी हे निसर्गाचे ऋतुचक्र ह्या कारणासाठी हलवत नाहीत, ही गोष्ट आश्वासक वाटली.
पूजेसाठी फांदी तोडल्याने पर्यावरणाचे नुकसान होईल असे ८४ टके बायकांना वाटते असे त्यांनी लिहिले होते. १२ टके बायकांना फार मोठे नुकसान आहे असे वाटत नसल्याचे लिहिले आणि फक्त २ % बायकांनी पर्यावरणाचे नुकसान होत नाही असे लिहिले होते…स्वतः पूजा करणार्या महिलांपैकी फक्त ४ % महिलाच फांदी तोडून पुजतात असे उत्तरांमधून कळले होते.
पूजा करत असलात तर का करता यावर २०% पतीवरच्या प्रेमापोटी असे लिहिले होते. आणि २५% स्त्रियांनी इतकी वर्षे करते आहे म्हणून पूजा थांबवली नव्हती. काहींनी पूजा करून आनंद मिळतो असे लिहिले होते. इतर बायका (त्यातही विशेष करून दारुड्या नवर्यांच्या बायका) पूजा का करतात याची उत्तरे मासलेवाईक होती. त्यात शो बाजी असते, सेल्फी काढायची म्हणून, अशीही उत्तरे काहींनी सुचवली होती. तर सासूच्या किंवा आईच्या इच्छेपोटी, परंपरा जपण्यासाठी असे अनेकींनी लिहिले होते.
पूजा करत नसलात तर का करत नाही ह्याचे उत्तर फक्त ४०% बायकांनी विश्वास नाही, असे लिहिले होते. ‘उपवास झेपत नाही’ किंवा ‘वेळ मिळत नाही’ अशी प्रॅक्टिकल कारणे जवळजवळ ५०% स्त्रियांनी दिली होती. काही थोडक्या स्त्रियांनी पुढचा जन्म बाईचा नकोच, किंवा नामस्मरण पूजेपेक्षा चांगले असे लिहिले होते. किंवा स्वतः उपवास करण्यापेक्षा उपाशी कोणाला तरी जेवू घालावे असे सुचवले होते.
यात काही बदल हवे वाटतात का यावर ३० टक्क्यांनी बदल हवे वाटतात असे नोंदवले. १४ % बायकांनी आहेत त्यावर खूश आहोत, असे लिहिले होते. पण ३४ % बायकांनी असा कधी विचारच केला नसल्याचे कळवले, जे वाचून फार वाईट वाटले. बदल घडवणे, घडावासा वाटणे या तर फार पुढच्या गोष्टी… बदल घडू शकतात अशी मुळात कल्पनाच नसणे हे जास्त वाईट !
पुनर्जन्म असलाच तर तो माणसाचा असेल का यावर ४५ % बायकांनी पुनर्जन्म नसतोच असे ठामपणे लिहिले होते. ३५ % बायकांनी माहीत नाही, असे कळवले होते. तर फक्त १० % नी माणूस सोडून इतर प्राणीजात असेल असे आणि १० % नी माणूसच असेल असे लिहिले होते. तुम्हाला सावित्रीचा कोणता गुण आवडतो असाही एक प्रश्न होता.. हेतू हा की, सावित्री नुसतीच पतीपरायण पतिव्रता नव्हती, एक स्वतंत्र विचाराची स्त्रीही होती हे फॉर्म भरणार्या महिलांपर्यंत पोचावे. तिने श्रीमंत, दीर्घायुषी नवर्यापेक्षा हुशार, अल्पायुषी नवरा निवडला याचे ३४ टक्क्यांना जास्त अप्रूप वाटले. तर ३८ टके बायकांना तिने धीराने नियतीशी हात केले जास्त भावले. आणि फक्त २८ टक्केंना तिने स्वतःच्या आयुष्यापेक्षा नवर्याचे आयुष्य मागितले ह्याचे जास्त कौतुक वाटले.
एकूणच ह्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हे जनमानसातील स्त्रियांचे मन किंवा मत कळण्यासाठी उपयुक्त ठरेल की नाही याची कल्पना नाही. त्याकरिता आणखीन मोठ्या प्रमाणावर ही पाहणी व्हायला पाहिजे. पण ज्या महिला विचार करतात, बदलाला तयार आहेत अशांनीही अजून स्वतःचे विचार घासून पुसून घ्यायला हवेत असे मात्र वाटले.
–सावनी गोडबोले
संपर्क : ८८०५४ ०४९८९
वटपौर्णिमेनिमित्त पेण अंनिसचा वृक्षारोपण उपक्रम पेण येथील रिंग रोडच्या बाजूला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पेण शाखेने वटपौर्णिमेचं औचित्य साधून वृक्षारोपण हा उपक्रम आयोजित केला होता. वृक्षारोपणाची सुरवात डॉ. सुजाता निकम मॅडमच्या हस्ते करण्यात आली. नंतर प्रत्येक कुटुंबाच्या हस्ते एक एक रोप लावण्यात आली, जे रोप ज्या कुटुंबाने लावली ते रोप त्या कुटुंबाने दत्तक घेऊन वाढविण्याची शपथ घेतली. योवळी वटपौर्णिमेच्या सर्वेक्षणाचे फॉर्म या महिलांच्याकडून भरून घेण्यात आले. सदर उपक्रमास लागणारी सर्व रोपं आदरणीय खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमांची सर्वच जबादारी नितीन निकम सर यांनी घेतली. सदर कार्यक्रमाला विनोद म्हात्रे, हेमंत म्हात्रे, गीता भानुशाली, नंदकिशोर परब, सतीश पोरे, सुमिता पोरे, मीना मोरे, अश्विनी मोरे म्हात्रे, जगदीश डंगर, योगिता डंगर, युगांश डंगर, चंद्रहास पाटील, ज्योती पाटील, आदेश पाटील, प्राजक्ता पाटीलं, मनीषा शेलार, श्रावणी साखरे, आराध्या साखरे, अजित साखरे, एन. जे. पाटील आणि संदेश गायकवाड उपस्थित होते.
