-
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महात्मा फुलेंचा सत्यशोधक वारसा जपणे काळाची गरज – ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव
ज्या देशात दगडाला देव म्हणून किंमत दिली जाते, तिथे बुद्धिमान माणसाला किंमत उरत नाही. महात्मा फुले यांनी जातीच्या आणि स्त्रियांच्या गुलामगिरीवर प्रहार करून सत्य आणि नीतीलाच जगण्याचा आधार मानले. आजचा समाज शिकलेला असूनही भोंदू बाबा, बापू आणि कर्मकांडांच्या जाळ्यात अडकला आहे, ही खेदाची बाब आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. ज्ञानेश महाराव यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर, प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान व ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या महात्मा फुले विशेषांकाचा’ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. पाटील होते.
ज्ञानेश महाराव पुढे म्हणाले की, आजचा सुशिक्षित समाज भोंदूंचे स्टेटस ठेवण्यात धन्यता मानतो, पण आपल्या आयुष्याचे शिल्पकार असणार्या महापुरुषांचे विचार विसरत चालला आहे. फुले दांपत्याने आधुनिक काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे बीज रोवले, तोच क्रांतिकारी वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.
याप्रसंगी अंनिसमधील योगदानाबद्दल संस्थेच्या सचिव सरोजमाई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. एस. के. माने (राज्य कार्यकारिणी सदस्य) आणि शशिकांत बामणे (वाळवा तालुका कार्याध्यक्ष) यांची निवड झाल्याबद्दल ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दीपक कोठावळे यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन डॉ. अलका पाटील व प्रा. किरण पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. एस. के. माने, डॉ. राजेश दांडगे, प्रा. अजित पाटील, प्रा. पी. एच. पाटील, निलेश जगताप यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.
