रायगड येथील अंनिसच्या राज्यस्तरीय शिबीरात ‘मॅड सखाराम’ हा नाट्यप्रयोग सादर

प्रा. प्रवीण देशमुख -

अंनिसचा लढा ही सर्वच सखारामांच्या विरोधात..!

१४ सप्टेंबर २०२४ ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साने गुरुजी स्मारक, वडघर जि.रायगड येथे आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांकरिता ‘मॅड सखाराम’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

हे नाटक म्हणजे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांना धारेवर धरण्याकरिता लिहिलेलं विडंबन आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी त्या काळी ‘पुलं’नी दिलेली जळजळीत प्रतिक्रिया होती. या विडंबनाकरिता वापरलेली भाषा ही या नाटकाचं मोठं बलस्थान आहे. धर्म, भाषा, संस्कृती, साहित्य या सर्वांचे ठेकेदार समजणार्‍यांची खिल्ली उडवण्यासाठीच जाणीवपूर्वक या भाषेचा आणि पल्लेदार वाक्याचा वापर केलेला आहे, ते लक्षात येतं.

‘मॅड सखाराम’ अर्थात भगवान श्री सखाराम बाईंडर ही पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरला तथाकथित संस्कृती रक्षकांकडून होणार्‍या विरोधातील प्रतिक्रिया होती.

१९७२ साली विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक रंगमंचावर आल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. हे नाटक म्हणजे विवाह व्यवस्थेलाच छेद देणारं आहे. भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारं आहे, असा आरोप करीत तथाकथित संस्कृती रक्षकांनी धुडगूस घातला. नाटकपरीक्षा मंडळाने काटछाट करून प्रमाणपत्र दिले व नंतर ते पूर्णतः रद्दच केले. दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना कोर्टाची पायरी चढावी लागली आणि प्रयोगाची मान्यता मिळवावी लागली.

तथाकथित संस्कृती रक्षकांच्या दृष्टीने अश्लील असलेलं हे नाटक नंतर खूप गाजलं. या नाटकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर होऊन विदेशात सुद्धा प्रयोग झालेत.

त्यापूर्वी या नाटकाला होणारा विरोध पाहून एक तीव्र प्रतिक्रिया म्हणून पु. ल. देशपांडे यांनी १९७४ ला ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’ या नावाचं विडंबन लिहिलं. तब्बल पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच मंगेश सातपुते या दिग्दर्शकाने हे नाटक ‘मॅड सखाराम’ या नावाने रंगमंचावरती आणलं.

हे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशावेळी पुरोगामी विचारांच्या चळवळीत नेहमी अग्रेसर असणार्‍या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भकम समर्थक असलेल्या सोनाली कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला व त्यामुळे हे नाटक साकार होऊ शकले. नाटकाच्या निर्मितीपासून ते विविध ठिकाणचे सगळे प्रयोग व्यवस्थित पार पडण्यासाठी सोनाली कुलकर्णी यांच्याकडून मिळणार्‍या पाठबळाबाबत दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या नाटकाची भाषा जाणीवपूर्वक अतिशय कठीण अशी, विडंबनात्मक पद्धतीने वापरली आहे. ती भाषा प्रेक्षकांना कळावी म्हणून कलाकारांनी ती अतिशय हळू वेगाने पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच दिग्दर्शकाचं हे कौशल्य आहे हे वेगळे सांगायला नको.

उदाहरणार्थ:

सखाराम : “वा! वा! चंपाताई संस्कृतीची किती सुंदर व्याख्या केलीत.”

“भाषेला संस्कृतचे गंध विलेपन करा. आध्यात्मिक रंग सफेदी चढवा. परलोकीचे कोणी पाहिले आहे, पण इहलोकी तुमचे भरपूर कल्याण होईल. संस्कृती म्हणजे दाखवायचे दात, हे नीट ध्यानात घ्या आणि तसे वागा.”

“सूर्यदेव अस्ताचलावर उतरले की भोजन करायची सवय आहे आम्हाला. तत्पूर्वी सोमपानाचा नित्य परिपाठ आहे आमचा. भोजनात सामिष आणि निरामिष असा भेदभाव नाही.”

चंपा : “पतिव्रतेच्या पदरात जगाला जाळून टाकण्याची विद्युल्लता असते.”

लक्ष्मी : “तशी मी जन्म जन्मांतरीची सेविका आहे. आधीच्या जन्मात मी राधा, मीरा, जनाबाईसुद्धा होते, असं भगवान श्रींनी मला सांगितलंय.”

भाषा अतिशय कठीण आहे. ती तासभर पेलवायची हे चॅलेंज असल्याचं मत कलाकारांनी प्रयोगानंतर व्यक्त केलं. खरंतर हे नाटक म्हणजे एक तास पाच मिनिटांचा दीर्घांक आहे.

‘मॅड सखाराम’ मध्ये सुनील जाधव यांनी सखारामाची मध्यवर्ती भूमिका अतिशय समर्थपणे पार पाडली. अनुष्का बोर्‍हाडेने वठविलेली चंपा लाजवाब आणि भूमिकेला न्याय देणारी ठरली. किरण प्रधान यांची लक्ष्मी, विशाल मोरे यांचा दाऊद आणि प्राजक्ता पवार हिने आपल्या भूमिकांना योग्य असाच न्याय दिला.

या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पु.लं.नी त्या काळातील नाटकाच्या साचेबद्ध मांडणीतील पात्रांचे प्रवेश, संवाद यावर टिप्पणी करणारी वाक्य ही कंसात लिहून ठेवली होती. ती वाक्यं सांगायलाच एक पात्र सूत्रधाराच्या रूपाने दिग्दर्शकाने अतिशय कल्पकतेने रंगमंचावर आणलं आणि तेच लेखकाचं ‘कंसातलं पात्र’ श्रेयस वैद्य यांनी अतिशय छान पद्धतीने वठविलं.

पुलंचा ‘मॅड सखाराम’ ही जरी स्वतंत्र संहिता असली, तरीही ती ‘सखाराम बाईंडर’वरील प्रतिक्रिया असल्यामुळे मूळ सखाराम बाईंडर हे नाटक समजून घेणे तितकेच गरजेचे ठरते.

‘पुलं’नी आपला सखाराम हा विजय तेंडुलकरांच्या सखारामपेक्षा पूर्णतः वेगळा दाखवला आहे. तुम्हाला तेंडुलकरांचा अत्याचार करणारा, शिव्या घालणारा, तुम्हाला वाटणारी अश्लील भाषा तोंडी असलेला सखाराम नको असेल तर, ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’ मधील हा सोज्वळ सखाराम बघा, असा तथाकथित संस्कृती रक्षकांची खिल्ली उडविणारा सल्ला, या प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिला.

दरवेळी वेगवेगळ्या स्त्रिया घरी घेऊन येणारा सखाराम बाईंडर मधील सखाराम नाटकाच्या शेवटी, चंपाच्या अनैतिक संबंधांवर संतापून तिचा गळा दाबून खून करतो.

‘मॅड सखाराम’ मधील सखाराम मात्र घरी येणार्‍या सर्व स्त्रियांचा ‘भगवान’ बनून अगदी सहजपणे या सर्वांना उपभोग्य दासी बनवून आपल्या पायाशी ठेवून घेतो.

“भगवान श्री सखाराम बाईंडरचे नवे सोज्वळ आयुष्य सुरू होते. इथून पुढे सर्व कसे पवित्र पवित्र…. उगाच निषेध ओढून घेणे नाही, बंदी नाही… म्हणजे म्हटलं तर काही नाही आणि न म्हणता सगळं काही आहे”, असे म्हणत सूत्रधार या नाटकाचा शेवट करतो.

नाटक संपताच सर्वांनी उभे राहून कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. एवढा प्रचंड प्रतिसाद मिळण्यामागचं कारणही तसंच आहे. जणू काही या नाटकात बुवा-बापू, महाराजांच्या शोषणाच्या विरोधातील आपलाच लढा एवढ्या समर्थपणे मांडला जातोय याचा प्रचंड आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता आणि त्याचीच ही प्रतिक्रिया होती. आजही ५० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीमध्ये तसूभरही बदल झालेला नसल्यामुळे हा विषय आणि नाटक कालातीत असंच ठरतं.

‘सखाराम बाईंडर’मधल्या सखारामाची आणि ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’मधल्या सखारामाची कृती ही एकच आहे. प्रत्येक वेळी दोघेही वेगवेगळ्या स्त्रियांचा त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत उपभोगच घेतात.

एक शिवीगाळ करत आक्रमकपणे करतो, तर दुसरा शुद्ध सोज्वळ भाषेचे लेपन लावून धार्मिकतेचा साज चढवून, शोषण करावयाच्या स्त्रियांना आई, ताई, मामी अशी नात्यांची विशेषणे चिकटवून करतो.

एकीकडे ‘सखाराम बाईंडर’मधल्या सखारामाच्या कृत्याला प्रचंड विरोध करणार्‍यांना याच सखारामाचा भगवान सखाराम झालेला बिनबोभाट चालतो. बेगडी संस्कृती रक्षकांचं एक कालातीत वास्तव पुलंनी आपल्या प्रतिक्रियेतून मांडलं.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढासुद्धा केवळ भगवान बनलेल्या सखाराम बाईंडरच्याच विरोधातील नव्हे, तर सर्वच शोषण करणार्‍या सखारामांच्या विरोधात असल्याने, या नाटकाचा प्रयोग प्रत्येकाला प्रचंड भावला. म्हणूनच या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या अंनिसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर होणे हे औचित्याला धरूनच होते.

अंनिसच्यावतीने नाटकाच्या मदतीसाठी प्रेक्षकांमधून झोळी फिरवली गेली. १७ मिनिटांत १७ हजार रूपयांची मदत जमा झाली. या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत व्हावेत याकरिता अनेकांनी पुढाकार घेणार असल्याचे मत व्यक्त केले. अंनिससारख्या समाजप्रबोधन करणार्‍या चळवळीतील कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया म्हणजे लेखक-दिग्दर्शक आणि कलाकारांनी सादर केलेल्या ‘मॅड सखाराम’ या नाटकाचा हेतू सफल झाल्याचीच पावती होय..!

प्रा. प्रवीण देशमुख, डोबिंवली


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]