रमेश माने -
१० मे २०२३. उन्हाळ्याची तीव्रता टोकाला पोहोचलेली. बाहेरचे तापमान जसे वाढले होते, तसेच मनातही विचारांचे तापमान वाढत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी विधायक काम करायचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याच्या वाढीसाठी वेळ द्यायचा असा सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी निश्चय केला होता. उन्हाच्या तीव्र झळ्याने घराबाहेर पडणे शक्य नव्हते, अशा परिस्थितीत नेमके काय करावे? हा प्रश्न मनात होता.
अचानक एक विचार मनात चमकून गेला. आपल्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी आपण काही करू शकतो का? कारण, एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. कार्यकर्त्यांचे वाचन कमी होत चालले आहे. आणि वाचनाशिवाय वैचारिक चळवळ जिवंत राहू शकत नाही. हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे शब्द कानात घुमले कार्यकर्त्यांनी सतत वाचन केले पाहिजे. नोंदी ठेवल्या पाहिजेत. विचारांची शिस्त जोपासली पाहिजे, हा डॉ. दाभोलकर यांचा शिरस्ता होता.
यातूनच एक संकल्प जन्माला आला, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांतील लेख दररोज कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायचे. सुरुवातीला असा विचार केला होता की, लेख वाचून लेखातील सारांश काढून तो सारांश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायचा.
परंतु दोन दिवस वाचन केल्यानंतर जाणवले की, दाभोलकरांनी प्रत्येक लेख इतक्या नेमकेपणाने, परिपूर्णतेने आणि मुद्देसूदपणे लिहिला आहे की, त्याचा सारांश काढणे ही अपने बस की बात नही! ही माझी मर्यादा माझ्या लक्षात आली आणि मग ठरवले, लेख जसेच्या तसेच पाठवायचे. पुढे प्रश्न निर्माण झाला, हे एवढं मोठं टाईप करणं आपणाला शक्य आहे का? मग मोबाईलमधील व्हॉईस टायपिंग हा पर्याय निवडला. या उपक्रमाला १२ मे २०२३ ला ‘भ्रम आणि निरास’ या पुस्तकातील पहिल्या लेखाने सुरुवात झाली. पहिले पंधरा दिवस दररोज एक लेख पाठवण्यासाठी किमान दीड तास लागत होता. वाचन, उच्चार, एडिटिंग ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ होती. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे वेळ मिळत होता. आपण ठरवलेले काम होतेय याचा आनंद मिळत होता.
जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर मात्र ही कसरत रात्री करावी लागे. दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी टायपिंग करणे तरीही संकल्प कायम ठेवला. दररोज लेख पाठवायला लागलो. याच काळात सोशल मीडिया विभागाचे वाघेश साळुंखे यांचा फोन आला. त्यांनी काही तांत्रिक सूचना दिल्या आणि एक अॅप सुचवले. त्या अॅपमुळे एडिटिंगचे काम सुलभ झाले आणि जवळपास ५०% वेळ वाचू लागला.
नंतर गुगल लेन्सचा पर्याय सापडला. काम करत गेले की, कामामध्ये सुधारणा होते. या डॉक्टरांच्या विचारांचा पुन्हा प्रत्यय आला. चमत्कार सादरीकरण करताना डॉ. दाभोलकर हेच म्हणायचे की, वेळोवेळी चमत्कार सादरीकरण करा म्हणजे त्यामध्ये सफाईदारपणा येतो. इथेही त्याचीच प्रचिती आली.
गुगल लेन्सच्या पर्यायामुळे पुस्तकातील मजकूर थेट डिजिटल स्वरूपात आणणे सोपे झाले आणि कामाचा वेग वाढला. तरीही काही चुका रहात होत्या यात काही सुधारणा सुचविण्यासाठी मुक्ता दाभोलकर यांनी स्वतः लेख परत एडिट करून पाठवला. भगवान रणदिवे व श्रीनिवास जांभळे सरांनी एक महत्त्वाची सूचना केली. प्रत्येक दिवशीच्या लेखाखाली आपले नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा, जेणेकरून वाचकांना शंका असल्यास संपर्क साधता येईल. त्याप्रमाणे पंधरा दिवसांनी प्रत्येक लेखाखाली माझे नाव व मोबाईल क्रमांक टाकण्यास सुरुवात झाली. सातत्याने हा उपक्रम सुरू झाल्यानंतर एक महिन्यानंतर काही फोन येऊ लागले. लेख वाचून प्रतिक्रिया देणारे, प्रश्न विचारणारे लोक संपर्क करू लागले. कोल्हापूरच्या कार्यकर्त्या सुजाता लोहकरे मॅडम यांनी हे लेख इतर ग्रुपमध्ये पाठवायला सुरुवात केली. त्यांना मिळालेल्या प्रतिक्रिया त्या मला पाठवत होत्या. या प्रतिसादाने उत्साह वाढत गेला.
यानंतर ‘कामाचे बोला’ या ग्रुपवर एक अवाहन केले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शाखांमध्ये हे लेख फॉरवर्ड करावेत. मी स्वतः तीन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केल्या आणि सुमारे २५ व्हॉट्सअॅप ग्रुप्समधून हे लेख दररोज पाठवू लागलो. या उपक्रमामध्ये डॉक्टरांच्या विविध पुस्तकांचा आणि लेखसंग्रहांचा समावेश करण्यात आला. त्यात आतापर्यंत प्रमुखतः पुढील पुस्तकांचा समावेश केला आहे.
भ्रम आणि निरास, विचार तर कराल, श्रद्धा अंधश्रद्धा, अंधश्रद्धा विनाशाय, ऐसे कसे झाले भोंदू, तिमिरातुनी तेजाकडे, ठरलं डोळस व्हायचंच, लढे अंधश्रद्धेचे, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम? प्रश्न मनाचे हे प्रा. प. रा. आर्डे सोबत व डॉ. हमीद दाभोलकर यांच्यासोबत लिहिलेली दोन पुस्तके तसेच साधना प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या साधनेतील डॉक्टरांच्या निवडक लेखांचे विनोद शिरसाट यांनी संपादित केलेले, ‘समता संगर’, प. रा. आर्डे यांनी लिहिलेले ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ आणि अनिल चव्हाण यांचे ‘वसा दाभोलकरांचा’ या पुस्तकांचाही समावेश केला.
यानंतर समग्र अंधश्रद्धा निर्मूलन खंड १ मधील पाचही भाग या उपक्रमात घेतले. हा उपक्रम यापुढेही असाच सुरू राहणार आहे. डॉ. दाभोलकर यांनी इतकी विचारसंपदा निर्माण केलेली आहे की, पुढचे २५ वर्षे आपण ते दररोज सर्व महाराष्ट्रभर पोहोचवू शकतो एवढा विचार डॉक्टरांनी आपणा सर्वांना दिलेला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे लेख दररोज सोशल मीडियावर प्रसिद्ध करताना एक वेगळीच बौद्धिक जबाबदारी पार पाडावी लागली. अनेक लेख मोठ्या स्वरूपाचे होते. काही लेखांची ७ ते ८ भागांत विभागणी करावी लागली. ही विभागणी करताना दोन प्रश्न कायम समोर असायचे. लेख नेमका कुठे थांबवायचा? दुसर्या दिवशीची सुरुवात कुठून करायची? कारण विचारांची सलगता तुटू नये आणि वाचकाला स्वतंत्र चिंतनाचा धागा मिळावा, हे दोन्ही साधणे आवश्यक होते.
डॉक्टरांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य इथे प्रकर्षाने जाणवले. त्यांचा लेख कोणत्याही पानांवर थांबवला, तरी तो स्वतंत्र विचार मांडतो. कोणत्याही पानांपासून घेतला तरी त्यात एक स्वतंत्र बौद्धिक रचना तयार होते. हीच डॉ. दाभोलकरांच्या लेखनशैलीची खरी ताकद आहे.
या उपक्रमादरम्यान अनेक उत्साहवर्धक प्रसंग घडले.
प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी त्यांच्या गप्पागोष्टी या समूहात मला सहभागी करून घेतले आणि त्या ग्रुपमध्येही डॉक्टरांचे लेख नियमित पाठवण्याची सूचना केली. ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास असलेले दीपक सुकाळे यांनी चालविलेल्या Borderless Panther या समूहावरही दररोज डॉक्टरांचे विचार पाठवावेत, अशी विनंती केली. यामुळे डॉक्टरांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. महाराष्ट्रातील विविध भागांतून कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, पुणे, वसई, गोंदिया, यवतमाळ, विदर्भ, अहिल्यानगर ठाणे, मुंबई, बारामती, जेजुरी, नाशिक, शहादा, मालेगाव, ओत्तूर येथून फोन, संदेश आणि प्रतिक्रिया येत राहिल्या. काही ठिकाणी वैचारिक प्रश्नही उपस्थित झाले.
वसई येथील राजेंद्र लवटे या वाचकाने स्मशानभूमीत कावळ्याची वाट पहात राहण्याचा या लेखावर प्रतिक्रिया देताना प्रश्न विचारला, “तुम्हाला फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धाच दिसतात का? ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांवरही लिहा.” त्यांनी प्रत्यक्ष वसईला येण्या-जाण्याची, राहण्याची सोय करण्याची तयारी दर्शवली. ही भूमिका विरोधाची नव्हे तर संवादाची होती आणि डॉक्टरांनी जपलेला हाच विवेक संवादी मार्ग आहे. विपश्यनेवरील लेखानंतर गोंदिया येथून काही जणांनी विचारले, “हे खरंच आहे का? याचे संदर्भ आहेत का?” ही विचारपूस हीच डॉक्टरांच्या कार्याची फलश्रुती आहे. लोक प्रश्न विचारू लागले, पडताळणी करू लागले. महत्त्वाचे म्हणजे, विरोधी प्रतिक्रिया फारच कमी होत्या. समर्थनार्थ, अभ्यासू प्रतिक्रिया अधिक होत्या. अमरावती येथील गजानन देशमुख दररोज घरामध्ये सर्व एकत्रित बसून नियमितपणे लेखाचे वाचन करतात. ओतूर येथील अजित मोरे हे गेली ७०० दिवस दररोजच्या लेखावर नियमित प्रतिक्रिया देतात. त्यांच्या ‘शिवनेरीचे शिलेदार’ या ग्रुपमध्ये मला अॅड केले व तिथे एका एका लेखावर किमान दोन दोन तास चर्चा चालतात.
या उपक्रमाचा आणखीन एक फायदा म्हणजे, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे लेख पाठवले गेल्याने तेथील अनेकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुस्तके मागवली. काहींना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राचे वर्गणीदार होण्यास प्रवृत्त करता आले. समितीमार्फत प्रकाशित पुस्तके विविध भागांत पोहोचवता आली. ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकातील एक एक प्रकरण वाचून अनेकांनी आपल्या भागात चाललेल्या शोषण, भोंदूगिरी, बुवाबाजी याची माहितीही दिली. त्याचबरोबर काय करता येईल याच्या संदर्भात चर्चा केली. त्या त्या वेळी त्यांना ‘अंनिस’च्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे फोन नंबर सुद्धा दिले गेले आहेत. झाशीच्या राणीच्या पुनर्जन्माची कथा हा लेख पाठवताना उद्याचा लेख आजच पाठवा आम्हाला हे पूर्ण वाचायचे आहे अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. दैनंदिन कामे कौटुंबिक जबाबदार्या परराज्यातील प्रवास करताना नेहमी डॉ. दाभोलकरांचे पुस्तक सोबत ठेवायचे व त्यात गेल्या १०-१५ दिवसांत एकही दिवसाचा खंड न पडू देता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे.
हा उपक्रम केवळ लेखनप्रसार नव्हता; तो संघटनात्मक आणि वैचारिक विस्ताराचाही एक भाग ठरला. या संपूर्ण प्रवासाचा सर्वांत मोठा लाभ मला वैयक्तिक पातळीवर झाला. या निमित्ताने डॉक्टरांचे संपूर्ण साहित्य वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळे विचारांच्या पातळीवर एक प्रकारची सुस्पष्टता आणि आत्मविश्वास प्राप्त झाला.
आज एखाद्या विषयावर अचानक व्याख्यान द्यावे लागले, तर मी त्वरित मोबाईलमधून संबंधित लेख काढू शकतो. दहा मिनिटांत तयारी करून त्या विषयावर सुसंगत मांडणी करू शकतो. ही माझ्यासाठी अत्यंत मोठी बौद्धिक संपत्ती आहे. हे १००० दिवस म्हणजे केवळ डिजिटल उपक्रम नाही, तर तो आत्मशिस्तीचा, सातत्याचा आणि वैचारिक बांधिलकीचा प्रवास.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्यभर जपलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि सामाजिक बांधिलकी तोच वारसा पुढे नेण्याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचाराचा वाहक बनण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
रमेश शकुंतला दौलतराव माने
संपर्क : ८२७५९ २४१७२
