सावित्री जोगदंड - 9892895858
सोनाली (नाव बदललेले आहे). तिनेच फोन उचलला. आवाज एकदम उत्साही वाटत होता. ‘आजच हॉस्पिटलमधून सोडलेय,’ म्हणाली. ‘आता मी एकदम चांगली आहे. पूर्ण बरी झालेय,’ म्हणाली. मी म्हटलं, ‘वा, छान! खूपच छान वाटते ऐकायला. बरं, आणखी कोणी अॅडमिट होते का घरातले?’ तर म्हणाली, ‘हों ना, आधी माझे सासरे अॅडमिट होते, नंतर माझे मिस्टर व मुलगी दवाखान्यात होती. ते सगळे बरे होऊन आले. नंतर माझा नंबर लागला. आता मी पण बरी होऊन आले…’ आणि अगदी हसून बोलत होती. तिच्या आत्मविश्वासाबद्दल मला फारच आश्चर्य वाटत होते. कुठेच तक्रार नाही. कोरोना झाला म्हणून दु:ख नाही. माझ्याच वाट्याला हे का, असा प्रश्न नाही. सहजपणे प्रसंगाला तोंड देऊन बाहेर पडलीय. मला तिचे फार कौतुक वाटले. मी तिचे अभिनंदन केले. इथून पुढे काळजी घेण्यास सांगितले. कारण बाहेर अजून साथ चालू आहे. ती म्हणाली, ‘काळजी घेतच होतो. कुठून आला माहीत नाही.’ मी म्हटलं, ‘तो दिसतो थोडीच. त्यामुळे आपल्याला कळायला मार्ग नाही. तरीपण तुम्ही औषध घेऊन बरे झालात, ते महत्त्वाचे. त्याबद्दल तुमचं कौतुक!’ छानशी हसली. ‘थँक्यू,’ म्हणाली. सोनालीसारखा आत्मविश्वास आपण सर्वांनी बाळगला, तर आपण कोरोनाची अर्धी लढाई जिंकल्यासारखं होईल. वेळीच ट्रिटमेंट घेतली, तर जगण्याची शाश्वती वाढेल, भय कमी होईल आणि हे जगावर आलेले संकट आपण पार करू शकू, अशी मला आशा वाटते. कोरोना साथीचे संकट सर्व जगावरच आले आहे; कुणा एकावर नाही. आपण जर थोडा धीर धरून त्याच्याकडे डोळसपणे पाहिले, तर आपली भीती थोडी कमी व्हायची शक्यता आहे. कारण याचा सामना करणारे आपण एकटे नाही; शिवाय या आजाराबद्दलची जितकी माहिती देता याईल, तेवढी सर्वत्र पोचलेली आहे. त्यासाठी आपण काय दक्षता घ्यायची, हे पण सांगितले आहे. जर आपण विचारपूर्वक या आजाराकडे पाहिले, तर लक्षात येईल की, सगळंच काही महाभयंकर नाही. बाहेर जरी वाईट परिस्थिती असली, तरी काही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपण सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वागलो, तर आजार न होण्याची शक्यता वाढते आणि मग आपली भीतीपण कमी होईल. अगदी शेजारी जरी मृत्यू होत असतील किंवा लागण झाली म्हणून लोकांना घेऊन जात असतील, तरी जर आपण आपल्या घरातच असू, बाहेरचा काही संपर्क नसेल, तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही.
आणि जरी लागण झाली, तर लगेच दवाखाना गाठला, तर ट्रिटमेंट घेऊन आपण घरी परत बरे होऊन येऊ शकतो, हे वरच्या केसवरून आपणास दिसून येते. सगळ्या जगावरच संकट आले आहे. त्यामुळे त्यानंतर जो काही बदल होणार आहे, तो सर्वांच्याच जीवनात होणार आहे. हे आपण स्वीकारले, तर आपल्याला नैराश्य येणार नाही व आपण या मोठ्या संकटातून तरून जाऊ शकू. त्यासाठी ‘अंनिस’ने पण लगेच एक नवीन उपक्रम हाती घेतला. ‘अंनिस’ने ‘मानसमित्र’ ही हेल्पलाईन सुरू करण्याचे ठरवले आणि हा उपक्रम लगेच अमलात आणण्यास सुरुवात केली. सगळ्यांना शिकवणार कधी? म्हणून मग ‘ऑनलाईन’ ट्रेनिंग घेतले. कारण लॉकडाऊनमुळे कोणी कोणाला भेटू शकत नव्हते व एकत्र जमू पण शकत नव्हते. डॉक्टरांनी पण सगळ्यांना तयार करण्याचा जणू विडाच उचलला होता. सर्व कामाच्या व्यापातून त्यांनी आमचे ट्रेनिंग घेतले, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांनी पण खूप उत्साह दाखवला. त्यामुळे हे काम आम्ही समर्थपणे तरून नेऊ शकलो. संघटनेच्या लोकांनी पण अतोनात प्रयत्न करून कार्यक्रम आखणे, पब्लिसिटी करणे आणि सतत संपर्कात राहणे, ही कामे अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली आणि हेल्पलाईनची वाटचाल समर्थपणे चालू झाली.
मी बर्याच लोकांना फोन केले. काही फोन बाहेरून आम्हाला येतात. काही फोनची लिस्ट सरकारकडून आम्हाला आली. कोरोनामुळे दवाखान्यात आहे किंवा जस्ट त्यातून बाहेर आलेत, त्यातील आणखी एक केस इथे ‘शेअर’ करते.
सखाराम (नाव बदललेले आहे) यांचा फोन लागला. आवाज खोल येत होता. अजून दवाखान्यात आहेत. इंजेक्शन बंद होऊन आता गोळ्या सुरू आहेत. त्यांना बाकी काही समस्या नाही, असे ते म्हणाले. ‘कोणाशी बोलणे होते का?’असे विचारले असता म्हणाले, ‘घरी पत्नी व मुलगी आहे. त्यांचे फोन येतात.’ मग मी त्यांना पुढील प्रश्न विचारले, ‘तुम्हाला घरी गेल्यानंतर काही त्रास झाला, तर काय कराल?’ जर शेजारी किंवा इतर कोणी ‘अनटचेबल’सारखे वागत असतील, तर आपण त्यांना कसे ठाम उत्तर द्यायचे ते सांगितले आणि तरी त्यांनी नाही ऐकले, तर त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल, ते सांगितले. तेव्हा ते लगेच मोकळेपणाने बोलू लागले. म्हणाले, ‘घरी आम्हाला खूप त्रास आहे. शेजारचे लोक तुम्ही मरून जा म्हणतात.’ मी त्यांना धीर दिला, थोडे समजावले. नंतर त्यांचा पत्ता घेतला. आमची संस्था शेजार्यांना समजावेल, असे सांगितले.
ते घरी गेल्यानंतर पोलिसांत जाणार होते, असे म्हणाले. त्यांना सांगितले, ‘सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, तर आधी आपण आपल्या परीने प्रश्न सोडवून पाहू.’ ‘बरं,’ म्हणाले. आवाज समाधानी आला.