पश्चिम बंगाल आणि दुर्गा उत्सव

-

एकूणच भारतीय हा उत्सवप्रिय आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे उत्सव, सण, समारंभ हे अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. पण सण, उत्सवात धार्मिकता आणि सामूहिक आनंदाऐवजी उन्माद आणि दुसर्‍यावर आक्रमणाची भावना वाढीस लागली आहे. मानवी सामूहिक संस्कृतीस हे गालबोट आहे. या पार्श्वभूमीवर बंगालमधील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे दुर्गा पूजा बघण्याची संधी मिळाली. नुसते उठता बसता पुरोगामी महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक सजगपणे आणि निखळपणे बंगालमध्ये दुर्गा पूजा साजरी केली जाते. त्याचा हा प्रत्यक्ष आँखो देखा हाल

कोलकात्यामध्ये फिरत असताना मुद्दाम होऊन दुर्गा पूजा केली जाणार्‍या मांडवात ज्याला बंगालमध्ये ‘पेंडॉल’ म्हणतात. एका रात्री पेंडॉल फिरण्याचे निश्चित करून एक सायकल रिक्षा ठरवली. ५-७ पेंडॉल फिरवण्याचे रिक्षावाल्याने पाचशे रुपये ठरवले. हात रिक्षा आणि सायकल रिक्षा आजही मोठ्या प्रमाणात कोलकाता शहरात आहेत. आग ओकणार्‍या सूर्याच्या खाली, मानवी रक्त ओकत या रिक्षा बघून १९५४ सालाचा बिमल रॉयने दिग्दर्शन केलेला आणि बलराज सहानीची भूमिका असलेला चित्रपट ‘दो बिघा जमीन’ आठवला नाही तरच नवल वाटले असते. या चित्रपटाचे शीर्षक प्रसिद्ध बंगाली कवी, साहित्यकार, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘दुई बिघा जोमी’ या कवितेवरून घेतले आहे. आम्ही सायकल रिक्षा ठरवली. तीस-बत्तीस वयाच्या मध्यम उंचीच्या, शिडशिडीत बांध्याच्या, गोर्‍यागोमट्या रिक्षाचालकाचे नाव होते ‘मोहम्मद नफिस.’ मला तर चिंता लागून राहिली होती की आता हा आमच्या राहुल थोरातसारख्या हेविवेट पैलवानाला कसं ओढत नेईल? मी हे त्याला बोलूनही दाखवले. तो म्हणाला,”काळजी करू नका. तुम्ही फक्त बसा. मला सवय आहे.” मग प्रवास सुरू झाला आणि नफिसबरोबर संवाद देखील. नफिसची दुसरी पिढी कोलकाता येथे मूळ बिहार येथून मजुरीसाठी येऊन स्थायिक झाली होती. नफिसचा दिवस सकाळी दहा वाजता दिवस सुरू होऊन रात्री उशिरा अकरा वाजता संपतो. दिवसभर भंगार विक्रेता म्हणून आणि संध्याकाळी सायकल रिक्षा भाड्याने घेऊन उशिरापर्यंत कष्टाचे चक्र अखंड चालू असते. आम्ही विचारले, “सायकलने इतके ओझे ओढून पाय दुखत नाही का?” तो म्हणाला,”बहोत दुखते है साहब. रात को घर जाने के बाद बीबी पैर आधा घंटा दबाती है. उसके बाद की निंद आता है. फिर सुबह को सुरू हो जाती है. रोजी रोटी के लिये जद्दोजहद. चलता है” म्हणत त्याने सायकलचे पायडल जोरात मारले आणि “आ गयी हमारी दुर्गामाता” म्हणत एका मोठ्या पेंडॉलसमोर रिक्षा थांबवली.

दुर्गापूजा : एक सांस्कृतिक उत्सव

दुर्गा उत्सव हा पश्चिम बंगालमधील सर्वांत मोठा उत्सव. सर्व ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. मोठेमोठे पेंडॉल. पेंडॉलच्या मध्ये एकूण पाच मूर्त्या. मध्ये सिंहावर आरूढ असलेली आणि राक्षसाचा वध करणारी दुर्गामाता. दुर्गामातेच्या उजव्या बाजूला लक्ष्मी. लक्ष्मीच्या बाजूला गणपती. दुर्गामातेच्या डाव्या बाजूला सरस्वती. सरस्वतीच्या बाजूला कार्तिक, असा त्याचा क्रम असतो. पेंडॉलच्या समोर किंवा आसपास शंकर भगवान पण कंपल्सरी. याचे कारण युक्तिबादीच्या मनिषने आम्हाला त्याच्या भाषेत सांगितले होते. “दुर्गापूजा फुल्ल फॅमिली गॅदरिंग होता है. हमारा भी और माता का भी. माता हरसाल जब आती है तब अपने पूरे फॅमिली के साथ आती है. और हम भी जब माता को मिलने जाते है. पुरी फॅमिली के साथ जाते है. इसलिये सडकों पे इतनी भीड होती है.” काचेची झुंबर, पताका, वेगवेगळे डिझाईन इत्यादीने पेंडॉल हा फुल डेकोरेटेड केलेला असतो. जेवढी जमेल तितकी म्हणजे काही ठिकाणी दोन दोन किलोमीटरपर्यंत लायटिंग केलेली होती. लायटिंगच्या माळा वापरून सुंदर प्राणी, पक्षी असे देखावे केलेले असतात. म्हणजे, प्रचंड लायटिंगच्या माळा वापरून केलेले डेकोरेशन मोठमोठे पेंडॉलमध्ये केलेली सजावट, दुर्गामातेची मूर्ती आणि त्यासोबतच्या इतर मूर्त्या यांचे मुकुट, साड्या, दागिने, बांगड्या इत्यादीने केलेली सजावट ही सर्व वैशिष्ट्ये आहेत बंगालमधील दुर्गा उत्सवाची. यासाठी करोडो रूपयांचा खर्च केला जातो. शहरापेक्षा जास्त साधेपणा हा खेडोपाड्यात असतो.

दुर्गापूजेला सरकारी अनुदान

युक्तिबादीचा जनरल सेक्रेटरी मनिष रॉय चौधरीने आम्हाला पश्चिम बंगालमधील इंग्रजी वृत्तपत्रांच्या बातम्यांचा हवाला देत पश्चिम बंगालमधील दुर्गा उत्सवाबाबतचा आर्थिक लेखाजोखा मांडला. पश्चिम बंगालमधील दुर्गा उत्सवाला ‘युनिसेफ’ कडून २०२१ साली सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळासाठी ममता सरकारने २०१८ पासून सुरू केलेली रु. १० हजारांची सरकारी अनुदानाची रकम या वर्षी म्हणजे २०२३ साली रु. ७० हजारपर्यंत पोहोचली आहे. आणि ती जवळपास ४० हजार मंडळांना मिळणार आहे. या अनुदानासोबत सरकारी जाहिराती आणि विजेच्या बिलात सवलत आहेत. पुढे मनिष रॉय टाइम्सच्या बातमीचा संदर्भ देत, नागरिकांच्या मूलभूत गरजेवर खर्च करण्याऐवजी राज्यसंस्था लोकप्रिय राजकारणासाठी धर्माचा कसा वापर करीत आहे याचे नमुनेदार उदाहरण देतात. या सर्व अनुदानाचा सरकारी खर्च येणार आहे साडेतीनशे कोटी आणि चांद्रयान-३ या शास्त्रीय अभियानाचा खर्च आलेला होता. ६१५ कोटी म्हणजे चांद्रयान खर्चाच्या ५७% रकम ही दुर्गापूजेसाठी देण्यात आलेले आहे. धार्मिक उत्सवासाठी जनतेच्या सरकारी तिजोरीतून खर्च करणे हे तर सरळ सरळ भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्याला हरताळ आहे. त्यामुळेच या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करण्यात आली आहेत. ही पीआयएल स्वीकार करण्यात आलेली असून, सुनावणी होऊन निकाल प्रलंबित आहे. यातून काही निष्पन्न होईल का, हा प्रश्न उपस्थित केल्यावर तरुण मनिष रॉय खूप महत्त्वाची टिप्पणी करतात. ते म्हणाले, “आजच्या शासन व्यवस्थेचे चरित्र बघता काही सांगता येणे अवघड आहे. पण संविधानिक मूल्यासाठी लढणारे काही आहेत, हेही नसे थोडके.”

मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी आणि बर्‍याच घरात बसविण्यात येणार्‍या दुर्गामाता आणि त्यासोबतच्या मूर्त्यांचे उत्तरपूजेनंतर कशा प्रकारे विसर्जन केले जाते. हा महाराष्ट्र अंनिसचा जिव्हाळ्याचा प्रश्न होताच. याबाबत युक्तिबादीचे उपाध्यक्ष संतोष शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, साधारणत: सर्व मूर्त्या या माती, गवत, बांबूच्या काठ्यांपासून बनवल्या जातात आणि त्या नैसर्गिक रंगाने रंगविल्या जातात. घातक रंग व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या शक्यतो आढळत नाहीत.

मूर्ती विसर्जनाचा पर्यावरणपूरक आदेश

सप्टेंबर २०१८ पश्चिम बंगालच्या पर्यावरण विभागाने एक विशेष आदेश काढून दुर्गा मंडप, मूर्ती आणि दुर्गा मूर्ती विसर्जनाबाबत काही नियम केले आहेत. यामध्ये मंडपाची उंची चाळीस आणि दुर्गा मूर्तीची उंची वीस फुटांपेक्षा जास्त नसावी. मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नसावी. ती रासायनिक रंगाने रंगवलेली नसावी. मंडळाने मूर्ती विसर्जनापूर्वी मूर्तीचे कपडे, दागिने, आभूषणे इ. काढून घेण्यात यावे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्यात यावा. दुर्गा मूर्ती नदी, नाले, तलाव इ. ठिकाणी विसर्जित होणार्‍या मूर्त्या या तातडीने वा चोवीस तासाच्या तास पाण्यातून काढून रिसायकलसाठी देण्यात याव्यात आणि ही जबाबदारी शासनाच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे स्थानिक प्रशासन मूर्ती विसर्जनानंतर लगेच ताब्यात घेऊन कुंभार वा तत्सम ठिकाणी दिल्या जातात. आम्हाला पडलेला महाराष्ट्रातील सनातन प्रश्न राहुलने संतोषला विचारलाच. “शास्त्र के अनुसार बहते पानी में विसर्जन करने का हमारा धार्मिक अधिकार है. ऐसा कहकर कुछ धार्मिक संघटन इस का विरोध नही करते क्या?”

संतोषने दिलेले उत्तर पण तार्किक होते. “यहाँ के लोग मानते है की उत्तर पूजा होने के बाद देवी माँ के शरीर से प्राण निकल जाता है. इसलिये विसर्जन मूर्ती रिसायकल को देते समय कोई प्रॉब्लेम नही करता. गाव मे जहाँ पे तालाब नही है या पानी नही होता. तो बहुत सारी मूर्तीयाँ एक बडे से पेड के नीचे छोडकर लोग चले जाते है. इस बारे में अभी तक यहाँ के लोगों की समझ अच्छी रही है.”

दुर्गा पूजा आणि विज्ञानवादी चळवळींची भूमिका

दुर्गा उत्सवाबाबत विज्ञानवादी चळवळींची भूमिका जाणून घेण्यासाठी पश्चिम बंगाल विज्ञान मंचच्या अरुण बो यांना विचारले असता त्यांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण वाटली. ते म्हणाले, “दुर्गा पूजा हा बंगालच्या लोकांचा सांस्कृतिक उत्सव आहे, धार्मिक नव्हे. त्यामुळे यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी असतात. आम्ही दुर्गा उत्सवाला सांस्कृतिक अभिव्यक्ती मानतो. हा उत्सव सर्व जाती-धर्माचे लोक मिळून साजरा करतात. एकमेकांना मिठाई वाटणे. एकमेकांच्या घरी स्नेहभोजन करणे, एकदम उत्साहाचे वातावरण असते. विशेषतः तीस टके मुस्लिमांचा दुर्गा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग असल्याचा ते सांगतात. अनेक दुर्गा पूजा उत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लीम कार्यकर्ते असतात. सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा केली जाते. पारंपरिक पूजेच्या वेळी पारंपरिक वाद्ये जसे ढोल, ताशा, दिमडी वाजवली जाते. एरवी दिवसभर किशोर कुमार ची बंगाली आणि हिंदी सुरेल गाणी वाजत असतात. सर्वत्र जुने पत्र्याचे (कर्णा) स्पीकर लावली होती. आम्हाला एकाही ठिकाणी कर्कश आवाजाचे बॉक्स स्पीकर आढळले नाहीत. डॉल्बीचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी तर ऐकूच आली नाही. सर्वांत विशेष म्हणजे, अनेक पेंडॉलच्या बाहेर चिकन बिर्याणीचे स्टॉल होते. लोक सहकुटुंब दुर्गा पूजा मंडपासमोर चिकन बिर्याणी खाताना दिसत होते. अनेक पेंडॉलच्या होर्डिंगवर मटण-चिकन मसाल्याच्या जाहिराती होत्या.

वेळ मिळेल तसे आम्ही बरेच पेंडॉल पायी फिरलो. आता मोहंमद नफिसबरोबर काही महत्त्वाच्या प्रसिद्ध आणि मोठ्या पेंडॉल त्याच्या सायकल रिक्षावरून तीन तास फिरून रूमवर पोहोचलो. रिक्षा भाडे देऊन जाता जाता मी नफिसला सलाम केला. तो ‘वालेकुम सलाम’ म्हणत निघून गेला. पुढच्या अनिश्चित प्रवासाला…


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]