प्रा. प. रा. आर्डे - 9822679546
94 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाली, याचा आनंद सर्वांपेक्षा अधिक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना व्हावा. याचे कारण नारळीकरांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विज्ञाननिष्ठा वाढविण्यासाठी दूरचित्रसंवादाद्वारे त्यांनी व्यक्त केलेले मनोगत.
“तंत्रज्ञानाचा वापर करणार्या समाजामध्ये विज्ञानवाद दिसत नाही. हातामध्ये आधुनिक मोबाईल असला, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालत भविष्य पाहण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे पाहतो. तेव्हा एकविसाव्या शतकातही आपल्या धारणा बदललेल्या दिसत नाहीत, याची जाणीव होते,” अशी खंत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.
“युवापिढीवर विश्वास ठेवून आपण विज्ञाननिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही मी हेच मांडण्याचा प्रयत्न करेन,” असे डॉ. नारळीकर यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हाच वैज्ञानिक दृष्टिकोन मांडत होते. त्यांच्या मृत्यूनंतर नारळीकर हा विचार पुढे नेत आहेत, यासाठी ‘महाराष्ट्र अंनिस’चा त्यांना सलाम!
आपल्या मनोगतात डॉ. नारळीकर पुढे म्हणाले, “व्याख्यान, प्रदर्शन, कार्यशाळा आणि विज्ञानकथा अशा विविध माध्यमांतून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला पाहिजे. विज्ञान हे साहित्यातून कसे मांडता येईल, याबाबतचे माझे विचार मी अध्यक्षीय भाषणातून मांडणार आहे. शिकलेल्या लोकांमध्येही अंधश्रद्ध वृत्ती आढळते; परंतु आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे, हळूहळू फरक पडेल.”
ते पुढे म्हणाले, “साहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करू शकतो. वेगवेगळ्या भागातील साहित्यिक व इतर क्षेत्रातील लोक संमेलनाला उपस्थित राहतात. त्यामुळे विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करता येऊ शकेल. विज्ञानाचे महत्त्व सामान्य माणसांपर्यंत पोचविण्यासाठी मी काम करत आहे.”
बाबा, बापू आणि माँ यांची बोगस बाजारपेठ अजूनही तेजीत आहे. या काळात समाजाच्या विचारधारणा विज्ञानावर आधारित असाव्यात, यासाठी नारळीकर यांनी जे लेखन केले, ते लोकप्रिय झाले. प्रयोगशाळेतील अभ्यासाचा सामान्यांशी काहीही संबंध नाही, असे मानणार्या जगात नारळीकरांनी विज्ञानाचे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचवले. त्यांच्या विज्ञानकथा आणि विज्ञानावरील निबंध याविषयीचे लेखन अतिशय सुबोध आणि सहज पद्धतीने समजावून सांगणारे आहे. त्यामुळे मराठी साहित्याचे जग अधिक समृद्ध झाले.
वैज्ञानिक कार्य
जयंत नारळीकरांनी बनारस विद्यापीठामधून पहिल्या क्रमांकाने पदवी मिळविली आणि ते थेट केंब्रीज विद्यापीठात दाखल झाले. तिथे त्यांनी बी. ए., एम. ए., पीएच. डी. आणि रँग्लर या पदव्या मिळविल्या. इंग्लंडमध्येच डॉ. फ्रेड हॉईल व डॉ. नारळीकर यांनी 11 जून, 1964 रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीपुढे गुरुत्वाकर्षणाचा एक नवा सिद्धांत मांडला. विश्वरचनेबाबत मान्यता पावलेल्या ‘महाविस्फोट’ सिद्धांताला हॉईल, नारळीकर यांनी आव्हान दिले होते. पुढील संशोधनासाठी नारळीकर मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रूजू झाले. पुण्यामध्ये त्यांनी ‘आयुका’ या खगोलविज्ञानात संशोधन करणार्या आदर्श संस्थेची स्थापना केली. ‘आयुका’मध्ये जागतिक कीर्तीच्या अनेक वैज्ञानिकांना बोलावून त्यांचा येथील संशोधकांशी आणि समाजाशी संवाद घडवून आणला. अलिकडच्या काळात ‘लायगो’ प्रकल्पात गुरुत्वीय लहरींचा शोध लावण्यात यश आले. त्यात ‘आयुका’तील वैज्ञानिकांचाही मोठा वाटा होता. या कामगिरीचे श्रेय नारळीकरांनी केलेल्या ‘आयुका’च्या आंतरराष्ट्रीय स्वरुपातील उभारणीला जाते.
अंधश्रद्धांना विरोध
प्रज्ञा, प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचा संगम असलेले नारळीकर विज्ञानसंशोधक तर आहेतच; पण विज्ञान लोकांपर्यंत नेणारे लोकवैज्ञानिकही आहेत. साध्या पोस्टकार्डवर विज्ञानविषयक कुणीही विचारलेल्या प्रश्नाला नारळीकर उत्तर देतात. अनंत अवकाशात प्रचंड गतीने फिरत असलेल्या तार्यांचा आणि ग्रहांचा मानवी जीवनाशी संबंध लावणार्या ज्योतिषशास्त्राला त्यांचा विरोध होता. फलज्योतिषाचा प्रतिवाद करणारे लेखन त्यांनी केलेच; याशिवाय वास्तुशास्त्र आणि विविध प्रकारच्या अंधश्रद्धा यांच्या विरोधातही त्यांनी प्रबोधन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंनिवा’ मासिकासाठी राजीव देशपांडे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत अतिशय वाचनीय आहे. या मुलाखतीमध्ये नारळीकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याविषयी मांडलेली भूमिका त्यांच्या स्वभावाला धरून आहे. त्यांच्या मताप्रमाणे, अशा चळवळी आवश्यकच आहेत; पण त्यांचे असे मत आहे की, या चळवळी फार आक्रमक स्वरुपाच्या असू नयेत. सामान्य माणसाला जास्त समजावून सांगितले, तर अंधश्रद्धा टाकून देईल; पण ज्या गोष्टींवर तो परंपरेने विश्वास ठेवत आला आहे, त्या गोष्टींबाबत त्याचा एक ‘इगो’ तयार झालेला असतो. त्यामुळे जर त्यावर एकदम आक्रमक हल्ला झाला, तर तो बचावात्मक होईल व त्या गोष्टींना जास्तच कवटाळून बसेल. ‘पंचतंत्रा’तील एक गोष्ट आहे – एका व्यक्तीच्या अंगावरचा सदरा काढायचा होता. वारा म्हणाला, “मी काढून दाखवतो.” जोरात वारा सुटला तसे त्या व्यक्तीने सदरा धरून ठेवला. मग सूर्य म्हणाला “मी काढून दाखवतो.” अन् तो तळपू लागला. खूप उकडू लागल्यावर त्या व्यक्तीने तो सदरा काढून टाकला; म्हणजे थोडे ‘टॅक्टफुली’ समजावून सांगितले, तर लोक ऐकतात, विचार करतात, अंधश्रद्धा टाकायला राजी होतात. दाभोलकरही हेच सांगत होते. झोपलेल्या माणसाच्या उशाशी आपण विवेकाचा दिवा लावून ठेवायला हवा. समोरच्या व्यक्तीला हिणवण्यापेक्षा बुद्धिकौशल्याने तिला विचार करायला प्रवृत्त करणे, हे कौशल्य अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी वाढवायला हवे.
ग्रहणाच्या अंधश्रद्धावर प्रहार
‘इंडियन स्केप्टिक’ या केरळमधून बी. प्रेमानंद प्रकाशित करीत असणार्या मासिकात जयंत नारळीकर यांचा खग्रास सूर्यग्रहणावरील लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात नारळीकरांनी 16 फेबु्रवारी, 1980 या दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा उल्लेख केला आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत आधुनिकतेचा दावा करणारे शहर. या शहरातील लोकांनी ग्रहणकाळात आपली दारे बंद करून ठेवली होती.
“प्रिय ब्रूटस, दोष तार्यांचा नव्हे, तो आपला आहे…” असे विल्यम शेक्सपिअरने आपल्या ‘ज्यूलिअस सीझर’ या अमर कलाकृतीत म्हटले आहे. शेक्सपिअर सोळाव्या शतकातला, तर ज्युलिअस सीझर सतरा शतके त्याच्या पूर्वीचा. वरील विधान आकाशस्थ ग्रहगोलांमध्ये मानवाच्या भविष्य घडविण्यात काहीही शक्ती नसल्याचे सांगते. या प्रगत विज्ञानयुगात तारे कशाचे बनले आहेत व ते का चमकतात, हे माहीत झाले असताना मानवाचे भविष्य तारे घडवतात, ही कल्पना सोडून द्यायला हवी. 1990 पासून जवळपास 30 वर्षेडॉ. जयंत नारळीकर ज्योतिष या विषयावरील आपली परखड मते मांडत आहेत. पुणे विद्यापीठात ज्योतिषांची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्यासाठी त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मदत केली.
फसव्या विज्ञानाचा प्रतिवाद
आज विज्ञानाच्या क्षेत्रात जे काही संशोधन सुरू आहे, ते कित्येक हजार वर्षांपर्यंत भारतात अस्तित्वात असल्याचा छातीठोक पुरावा देणार्या निर्बुद्ध महाभागांशी नारळीकर निरर्थक वाद घालीत बसले नाहीत; पण पूर्वी अग्निबाण होते, अशा फसव्या दाव्यांना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर्कशुद्ध उत्तरेही दिली आहेत. यासाठी त्यांचा ‘पुराणातील वांगी पुराणात’ हा लेख अवश्य वाचायला हवा. या लेखात अग्निबाणाचा उल्लेख आहे. आपल्या पूर्वजांना अग्निबाणाचे तंत्र अवगत होते, असे पुराणमतवादी सांगतात. नारळीकर लिहितात – अग्निबाण जर त्यावेळी असेल, तर अणुविज्ञानाचाही अभ्यास झालेला असला पाहिजे. त्यासाठी विद्युत चुंबकीय लहरींचं ज्ञान माहीत असलं पाहिजे. मग त्याकाळी वीज उपलब्ध असली पाहिजे, अशी साधने त्याकाळी होती. याला पुरावाच नाही हजारो वर्षांपूर्वीचे अॅरिस्टॉटल, प्लेटोनी लिहिलेले साहित्य आज उपलब्ध आहे. मग अग्निबाण, विमान, टेस्ट ट्यूब बेबी यासंदर्भातील साहित्य आज उपलब्ध का नाही? याचा अर्थ पूर्वजांची विमाने, टेस्ट ट्यूब बेबी, अग्निबाण हे सर्व ‘पुराणातील वांगी’ ठरतात.
मराठी साहित्यविश्वाने डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून जो सन्मान केला, त्याबद्दल साहित्य संमेलन समितीचे अभिनंदन! 28 फेबु्रवारी हा भारतात विज्ञानाचा गौरव करणारा दिवस. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर नारळीकरांचा सन्मान म्हणजे विज्ञानाचा सन्मान, असे आम्ही मानतो. विज्ञानप्रसारासाठी आणि अंधश्रद्धेची जळमटे वेगाने दूर होण्यासाठी साहित्यरसिकांनी डॉ. जयंत नारळीकर यांना बळ द्यावे, हीच अपेक्षा; पण अलिकडे उच्चपदस्थ राजकारणी आणि वैज्ञानिक बोगस विज्ञानाचे समर्थन करीत सुटलेत, त्यांचे भ्रम दूर करण्याचे काम नारळीकरांनी करावे, यासाठी त्यांना सदिच्छा!
