-
सभासद नोंदणी अभियान
(मार्च ते मे २०२३)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्याहून अधिक काळ संघटितरित्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या समितीची स्थापना केली. सुरुवातीला मूठभर कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनानंतर देखील अत्यंत निर्धाराने हे काम दशकभर चालू आहे.
महाराष्ट्रातला प्रगतीशील विचारांचा वारसा आहे. इथली संत परंपरा आणि समाजसुधारक यांनी चालू केलेले कृतिशील समाजप्रबोधनाचे काम समिती आपल्या ताकदीने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहे. आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती झालेली दिसत असली, तरी अजूनही समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा टिकून राहिलेला दिसतो. केवळ तेवढेच नाही, तर विज्ञानाचे नाव वापरून त्या माध्यमातून अंधश्रद्धांचा प्रसार केला जाताना देखील दिसून येतो. या सगळ्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, हे चित्र बदलावे असे वाटत असेल, तर हे आवाहन तुमच्यासाठी आहे.
समिती भारतीय संविधानाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याचा प्रयत्न करणारे संघटन आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्या गोष्टींना काही कारण असते आणि ते चिकित्सा करून आपण समजून घेऊ शकतो, ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची कार्यपद्धती समिती वापरते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही ‘डोके चालवा चळवळ’ आहे.
प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाने दिलेले देव आणि धर्म स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे जे स्वातंत्र दिले आहे, त्याचा आपण सन्मान करतो. समितीचा विरोध हा कोणत्याही देव आणि धर्माला नसून, देव आणि धर्माच्या नावावर होणार्या शोषणाला आहे. आपण सर्व धर्मातील शोषण करणार्या अंधश्रद्धांना प्रश्न विचारण्याचे काम करतो. हे काम पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत केले जाते. सर्व प्रकारच्या हिंसेला समितीचा विरोध आहे. आजपर्यंतचे आपले सर्व लढे हे अहिंसक मार्गाने केले गेले आहेत.
फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून समिती सतत कार्यरत असते. समितीशी जोडून घेणार्या बहुतेक कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा व्यक्तिमत्व विकास होतो. त्यांना आयुष्यात अधिक अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचे समाधान लाभते, असा अनुभव आहे.
सध्या अंनिसचे सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. तुम्हाला या कामाशी जोडून घ्यायचे असेल, तर आम्हाला जरूर संपर्क करा.