-
या संपादकीयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक मिनिटाचे मौन पाळतो… केवळ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला 20 ऑगस्टच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या खुनाला सात वर्षे झाली तरी या खुनाचा खटला आजही न्यायालयात अधांतरी अवस्थेतच आहे, तपास यंत्रणा अजूनही सूत्रधारापर्यंत पोचू शकलेल्या नाहीत, याचा निषेध करण्यासाठीही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणि इतर डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी विविध माध्यमे वापरीत गेली सात वर्षे खुनाच्या तपासाचा प्रश्न सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेत जागता ठेवला, तर न्यायालयात अॅड. अभय नेवगी व त्यांचे सहकारी तो नेटाने लढवत आहेत. त्याबद्दलचा तपशील देणारा व त्या खटल्याचा गेली सात वर्षे नेटाने पाठपुरावा करणार्या मुक्ता दाभोलकर यांचे लेख आम्ही या विशेषांकात प्रसिद्ध करीत आहोत. त्यावरून ‘अंनिवा’च्या वाचकांना या खटल्याची आणि खुनाच्या तपासाची कल्पना येईल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने 2013 ते 2019 असे प्रत्येक ऑगस्ट महिन्यात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन अंक प्रकाशित केले. या सर्व विशेषांकातून देश-विदेशातील मान्यवरांनी, वर्तमानपत्र, मासिकांच्या संपादकांनी, विचारवंतांनी त्यांच्या लेखांतून डॉक्टरांवर लिहिले. डाव्या पुरोगामी संघटनांतील कार्यकर्त्यांनी व डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणार्या; तसेच डॉक्टरांच्यानंतरही तेवढ्याच तडफेने लढणार्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनोगतातून आणि आठवणीतून डॉक्टरांबद्दल सांगितले. त्यातून डॉक्टरांचे कार्यकर्ता विचारवंत, संघटक, लेखक, वक्ता, कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा पालक, आधार, मार्गदर्शक, कुटुंबप्रमुख, नातेवाईक, कार्यकर्त्यांच्या संघर्षामागे ठामपणे उभा राहत त्यांचा आधार, प्रेरणा बनलेल्या डॉक्टरांचे ‘समग्र व्यक्तिमत्त्व’ उभे राहिलेले दिसेल. त्याबरोबरच डॉक्टरांच्या खुनानंतर दिवसेंदिवस अस्वस्थ होत चाललेले भवताल आणि त्यात अवघड होत चाललेली परिवर्तनाची लढाई आणि ती लढणारे कार्यकर्ते याबद्दलही या विशेषांकातून अनेक लेखक, कार्यकर्त्यांनी केलेली मांडणी आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तवाशी संघर्ष करण्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल. हे विशेषांक नुकतेच आम्ही सोशल मीडियावरून प्रसारित केले. त्याला विविध क्षेत्रांतील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या विशेषांकातही आम्ही डॉक्टरांच्या एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधले आहे. ते कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू होते, हे बहुतेकांना माहीत आहेच; पण त्यांनी कबड्डीवर 261 पानी पुस्तक लिहिले आहे आणि ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने 1980 साली प्रकाशित केले आहे, हे फारच कमी जणांना माहीत असेल. त्यात त्यांनी कबड्डी या खेळाचा किती खोलवर, बारकाईने आणि सर्वांगीण विचार केला होता, हे नुसती अनुक्रमणिका डोळ्यांखालून घातली तरी समजून येईल. आता या खेळाच्या नियमात, स्वरुपात बरेच बदल झाले असले, तरी या पुस्तकातून पट्टीच्या तज्ज्ञ खेळाडूबरोबरच एका विवेकवादी कार्यकर्त्याचेही दर्शन व्हावे, या दृष्टिकोनातून आम्ही त्या पुस्तकातील ‘खेळाचे मानसशास्त्र’ हे प्रकरण ‘अनिवा’च्या वाचकांसाठी दिले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांबद्दलच्या कार्यकर्त्यांच्या ‘आठवणीतील दाभोलकर’, जाती-धर्माच्या पलिकडे जाणार्या संघटनेच्या ‘जोडीदाराची विवेकी निवडी’च्या उपक्रमाबद्दल दाभोलकरांना लिहिलेल्या पत्राबरोबरच, आपल्या परंपरेत अविवेकी विचारांना विरोध करणार्याच्या झालेल्या खुनांचा आलेख दर्शविणारा लेख; तसेच वैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांनी अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने दिलेल्या उत्तराचा धागा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनापर्यंत नेणारा लेख, पाकिस्तानातील विवेकवादी प्राध्यापकांच्या छळाबद्दलचा लेख; तसेच गेली तेवीस वर्षे रमाबाई आंबेडकरनगराच्या हत्याकांडाच्या आजही ‘भळभळणार्या जखमेबद्दल’ लिहित आहेत, या हत्याकांडाचा पाठपुरावा गेली तेवीस वर्षे करणारे श्याम गायकवाड! हे सर्व लेख शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांकासाठीच्या खास लेखांबरोबर ताज्या विषयांवरील इतरही लेख वाचकांच्या नक्कीच पसंतीस पडतील, याची खात्री आहे.
देशातील कोरोनाचा कहर काही अजूनही आटोक्यात येऊ शकलेला नाही; पण आपण इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत, असे दावे सर्वोच्च नेतृत्वाकडून केले जात असले तरी दररोज जवळपास 45 ते 50 हजारांच्या वेगाने देशभरात रुग्णसंख्या वाढत आहे. हा लेख लिहिण्याच्या वेळेपर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांच्याही पुढे जाऊन पोचली आहे. अशा या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्टला पंतप्रधानांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे. खरे तर कोणत्याही धार्मिक समारंभाला या साथीच्या काळात बंदी असूनही असे कार्यक्रम केले जात आहेत. बिहारमधील निवडणुकांना समोर ठेवत हा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातही स्थिती फारशी चांगली आहे, असे नाही. विविध जिल्ह्यांत टाळेबंदी वाढविण्याची पाळी येत आहे. पंढरीच्या पायी वारीची शेकडो वर्षांची परंपरा असूनही वारकरी पंथानं सरकारच्या आवाहनाला विवेकी प्रतिसाद देत वारी टाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, महावीर जयंती, मोहरम, रमजान ईद हे सर्व सण त्या-त्या धर्मियांनी साधेपणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्या घरात साधेपणाने साजरे केले.
आता मोठे आव्हान गणपती उत्सवाचे आहे. प्रतिष्ठापनेच्या, विसर्जनाच्या मिरवणुका, देखावे, दर्शनासाठी होणारी गर्दी, कोकणात जाण्यासाठी होणारी गर्दी, हे सर्व टाळायचे तर उत्सवाचे स्वरूप बदलणे भागच आहे. त्यात बाजाराची एकंदर स्थिती मंदीची आहे, रोजगार नाही, लोकांच्या हातात पैसे नाहीत. याचा मोठा परिणाम गणेशोत्सवावर होणार. त्यामुळे भपका, सजावट, भव्यता यावर मर्यादा येणारच. ‘मूर्ती लहान करा’, ‘एक गाव-एक गणपती’सारखे किंवा ‘अंनिस’ने सुरू केलेल्या विसर्जित गणपतीचे दान करा, यांसारख्या उपक्रमांचे महत्त्व लोकांना या आधीही जाणवत होतेच; पण आता ते जास्तच प्रकर्षाने निश्चितच जाणवेल आणि रूढी, परंपरा यांचे स्तोम न माजवता समाजोपयोगी उपक्रम राबवत साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा होईल, अशी आशा करूया कारण अखेर इतर कशाही पेक्षा आरोग्याची, शरीराची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची. शरीर सदृढ असेल तरच सगळ्यात आनंद आहे, अर्थ आहे….संतश्रेष्ठ तुकारामांनी हे अगदी योग्य शब्दांत सांगितले आहे –
शरीर उत्तम चांगले। शरीर सुखाचे घोसुले।
शरीरे साध्य होय केले। शरीरे साधले परब्रह्म।
मुखपृष्ठाविषयी …
मी कलाविद्यालयात शिकत असल्यापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तिचे काम मला प्रभावित करत आलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करत असलेले बुवाबाजीचा भांडाफोड आणि इतर अंधश्रद्धांविरोधात करत असलेला संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देत आलेला आहे. मी नेहमीच ‘अंनिस’च्या कामाबद्दल माझ्या मित्रांकडून माहिती घेत असतो. आज मी प्रदीर्घ कालावधीनंतर या मासिकाचे मुखपृष्ठ बनवत आहे. मी दाभोलकरांना प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नाही; पण त्यांच्या कार्याची मला पूर्णत: माहिती आहे.
मुखपृष्ठाचे रेखाटन हे निश्चितच आव्हान होते. पण हे रेखाटन चित्रकाराची प्रतिभा दर्शविणारे डॉ. दाभोलकरांचे केवळ पोट्रेट असणार नाही, तर ते अंधश्रद्धांना आणि अविवेकी विचारांना आव्हान देणारे विज्ञानाचे प्रतीक असणार, याबाबत मी ठाम होतो. म्हणून मी नेहमीची रुळलेली अंधश्रद्धांची प्रतीके टाळली. इथे मी प्रकाशाच्या वक्रीभवनाचा सिद्धांत वापरला. वैज्ञानिक मार्ग स्पष्ट करणारे, प्रकाश किरणाची रुपकात्मक विविधता दर्शविणार्या अनेक रंगांच्या इंद्रधनुष्यात संघटनेचे, विचारपीठाचे प्रतीक मानलेल्या लोलकाच्या माध्यमातून रुपांतरित झाल्याचे मी चित्रित केले आहे.
साधा, थेट आणि आधुनिक दृष्टिकोन व्यक्त होणारी शैली अनुसरणेच योग्य आहे, असे मला वाटते. मुखपृष्ठावरील चित्रासाठी मी वापरलेल्या पद्धतीत शाई आणि ब्रशच्या सहाय्याने कागदावर उतरवलेले चित्र कॉम्प्युटरवर घेतल्यानंतर ‘फोटोशॉप’च्या सहाय्याने त्यात रंग भरले आहेत. – उत्तम घोष, मुंबई (9821825994)
उत्तम घोष यांच्यासंबंधी…
सर जे. जे. उपयोजित कला संस्था, मुंबई 1985 मधील पदवीधारक. कलाकार म्हणून त्यांचे काम राजकीयच आहे. विद्यार्थीदशेपासून ते मुंबईतील अनेक आंदोलनांशी आणि चळवळीशी निगडित आहेत. 1993 पासून ते संपादकीय रेखाचित्रे, मुलांसाठी रेखाचित्रे आणि राजकीय व्यंगचित्रे उदरनिर्वाहासाठी काढत आहेत. मासिके आणि वर्तमानपत्रे डिझाईन करण्याबरोबरच ते छायाचित्रकार म्हणूनही काम करतात.
1997, 2008 मध्ये त्यांचा जागतिक छायाचित्र स्पर्धेत सहभाग, 2013 मध्ये गोथे इन्स्टिट्यूट, हैदराबाद येथील ‘वुमेन इन पब्लिक स्पेसेस’ या छायाचित्र प्रदर्शनात सहभाग, 2015 मध्ये सुधारक ओलवे यांच्या आर्टिस्ट ट्रस्ट, मुंबई येथील ‘फोटोग्राफी ट्रस्ट’ छायाचित्र प्रदर्शनात सहभाग, 2017 मध्ये क्लार्क हाऊस, मुंबई यांच्या पुढाकाराने ‘टेक/द/सिटी’ या सार्वजनिक ठिकाणच्या आंदोलनातील कलेसंदर्भातील प्रदर्शनात सहभाग; तसेच हाकारा.इन या सर्जनशील अभिव्यक्तीच्या द्विभाषिक मासिकात आईबरोबरचे संभाषण या विषयावर लिखाण, 2018 मध्ये क्लार्क हाऊसच्या पुढाकाराने आजवरच्या कलाकृतींचे पुनरावलोकन प्रदर्शन, 2019 मध्ये अजंठा येथे धर्मनिरपेक्ष आंदोलनाच्या 50 कलाकारांच्या राष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग; तसेच 2019 मध्ये पुणे येथे ‘कलागोष्टी’ आयोजित ‘व्हान गाँग लेटर्स रिटोल्ड’ यात सहभाग.