लेखक पत्रकार पेरियार

-

पेरियार यांनी जेव्हा सामाजिक कार्य सुरू केले, तेव्हा त्यांना प्रस्थापित वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये स्थान दिले जात नव्हते. त्यामुळे आपल्या चळवळीची विचारधारा आणि त्याचे कार्यक्रम जनतेपर्यंत नेण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्याचे ठरवले. समाजात निर्माण केलेली धार्मिक कट्टरता, जातीय विषमता, सामाजिक राजकीय वर्चस्ववाद, दुष्ट प्रथा आणि रूढी, स्त्री स्वातंत्र्य, देवदासी प्रथा, विधवा समस्या, बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयावर पेरियार यांनी प्रचंड प्रमाणात सडेतोड आणि तर्कनिष्ठ लिखाण केले आहे.

सामाजिक समतेचे उद्गाते म्हणून पेरियार सर्वांना परिचित आहेतच; पण त्याचबरोबर ते लेखक आणि पत्रकार होते, हा त्यांचा परिचय थोडा दुर्लक्षित आहे. पेरियार यांनी आपल्या आयुष्यात अनेक दैनिके, नियतकालिके सुरू केली. त्याचे संपादन केले. त्यामध्ये कुडी अरासु (१९२५), द्रविडियन (१९२७) रिव्होल्ट (१९२८), पुराच्छी (१९३३), पगुथरीवू १९३४, विदुथलाई (१९३५), जस्टिस (१९४२), उन्मई(१९७०), आणि दि. मॉडर्न रॅशनलिस्ट (१९७१).

या नियतकालिकांवर त्यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतील मोठा हिस्सा खर्च केला. यामध्ये त्यांना अनेकदा आर्थिक नुकसानही झाले. तर कधी लिखाणाबद्दल त्यांना बरेच वेळा तुरुंगात जावे लागले; पण त्यांनी आपल्या लेखनकर्तव्यात कसूर केली नाही. (या सर्व नियतकालिकांचे जुने अंक आम्हाला पेरियार रॅशनलिस्ट लायब्ररीमध्ये दाखवले गेले)

पेरियार यांनी सुरू केलेल्या आणि संपादित केलेल्या या काही नियतकालिकांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊ.

साप्ताहिक कुडी अरासु

कुडी अरासु या तमिळ शब्दाचा मराठी अर्थ आहे प्रजासत्ताक. पेरियार यांनी आपल्या इरोड येथील घरातून २ मे १९२५ रोजी या साप्ताहिकाची सुरुवात केली. त्याचे पहिले संपादक म्हणून के.एम ठेंगा पेरूमल पिल्ले यांना नेमले. ‘सत्य प्रदर्शन प्रेस’ या प्रेसमधून हे साप्ताहिक दर रविवारी निघत असे. त्याची किंमत एक आणा होती. तर वार्षिक वर्गणी रुपये तीन होती.

कुडी अरासुच्या पहिल्या अंकात या साप्ताहिकाच्या गरजेविषयी पेरियार लिहितात की, “या देशात अनेक वर्तमानपत्रे आहेत; पण ती विवेकाशी प्रामाणिक नाहीत; पण मी कुडी अरासुमध्ये निर्भयपणे मला जे दिसते, ते सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे साप्ताहिक लोकांच्या हितासाठी समर्पित आहे.”

कुडी अरासु हे साप्ताहिक पेरियार यांच्या विचाराचे मुखपत्र ठरले. त्यांच्या स्वाभिमानी चळवळीची बीजे याच साप्ताहिकातल्या लेखातून त्यांनी उलगडली.

प्रकाशनाच्या सुरुवातीपासूनच कुडी अरासुचा सूर विद्रोही होता. जातिभेद, धार्मिक ग्रंथ, पौराणिक पुराणकथा यांचे चिरफाड करणारे लेख कुडी अरासुने प्रकाशित केले. लेखनाची भाषा सोपी; पण उपरोधिक होती.

कुडी अरासुच्या जून १९२५ च्या अंकात पेरियार लिहितात, “अस्पृश्यता हे अमानवीपणाचे लक्षण आहे. त्याचा नायनाट करण्याची आता वेळ आली आहे. बाहेरच्या लोकांपेक्षा(इंग्रज) वाईट वागणूक व छळ आपल्याच लोकांकडून होत आहे. आपल्या देशात लाखो बदमाश आणि गुन्हेगारांना मंदिरात मोफत प्रवेश मिळतो; परंतु पंचमवर्णीय यांना (अस्पृश्यांना) प्रवेश नाकारला जातो. आपल्याला सांगितले जाते की, मंदिरातील मूर्ती आत जाऊन पूजा केल्यास त्या अपवित्र होतात. निष्पाप लोकांवर ईश निंदा आणि अपवित्रतेचा आरोप केला जातो. सामाजिक दुष्कृत्यांबद्दल आपणच दोषी असताना आपल्याला मानवतावाद आणि न्यायाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे.”

कुडी अरासु या मासिकामध्ये मुख्यतः स्त्री समानता, जातीयवाद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि नास्तिकता यावर लेख प्रसिद्ध केले जायचे. निर्भीड आणि तर्कनिष्ठ पत्रकारितेमुळे कुडी अरासुला अनेक वेळा प्रतिगाम्यांचा आणि सरकारचा रोष पत्करावा लागला. १९३३ साली प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे संपादक आणि मुद्रक यांना सरकारने १००० रुपये दंड ठोठावला आणि पेरियार यांना तुरुंगात डांबले.

कुडी अरासु साप्ताहिकांमध्ये पेरियार यांनी कम्युनिस्ट जाहीरनामा, भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे?’ हे पुस्तक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक लेख तमिळमध्ये भाषांतरित करून प्रसिद्ध केले. प्रसिद्ध तमिळी विद्रोही कवी भारतीदासन यांच्या कविता या साप्ताहिकात प्रसिद्ध केल्या जात. कुडी अरासु हे साप्ताहिक १६ पानांचे तमिळ भाषेत प्रकाशित होत असे. सुरुवातीला त्याच्या २००० प्रती प्रकाशित झाल्या; पण काही दिवसांतच त्यांच्या प्रतींची संख्या दहा हजारांवर पोचली होती. सलग २५ वर्षे हे साप्ताहिक प्रकाशित होत राहिले. त्याचा शेवटचा अंक ५ जून १९४८ ला प्रकाशित झाला. तमिळी समाजात पुरोगामी नवचैतन्य रुजवण्यास कुडी अरासुचे मोठे योगदान आहे. कुडी अरासुचा उदय हा तमिळनाडूतील विवेकी पत्रकारितेच्या इतिहासातील एक क्रांतिकारक पाऊल होते.

दैनिक द्रविडीयन

जस्टीस दैनिकाची सुरुवात ‘साऊथ इंडियन पीपल्स असोसिएशन’ या संघटनेने जून १९१७ मध्ये केली. तमिळनाडूमध्ये वंचित द्रविडांच्या राजकारणाला चालना देणे, हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. प्रस्थापित वर्तमानपत्रेही ब्राह्मणी विचारधारेला प्रमाण मानणारी होती. त्यामुळे ब्राह्मणेतरांच्या समस्यांवर संवाद साधू शकेल, अशा दैनिकाची त्याकाळी नितांत गरज होती. मद्रास हे शहर द्रविड चळवळीचे केंद्र होते. तेथूनच हा अंक निघत असे. सुरुवातीच्या आठ वर्षांत त्याचे पाच संपादक बदलले. १९२७ पासून या दैनिकाचा खप कमी होऊ लागला. त्यामुळे जस्टीस पार्टीने पेरियार यांना या दैनिकात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यामुळे १९२८ साली द्रविडीयन या दैनिकाचे पेरियार संपादक झाले. संपादक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी या दैनिकाची आकर्षक संवाद शैली, लोकांच्या हिताच्या मुद्द्यांवर लिखाण, संघर्षशील कार्यक्रमांना वर्तमानपत्रात स्थान या गोष्टी केल्यामुळे द्रविडीयनला पुन्हा वाचक संख्या मिळू लागली.

पेरियार यांच्या परखड लिखाणामुळे त्यांचे स्पर्धक दैनिक ‘द मद्रास मेल’ ने त्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली. सरकारकडे या दैनिकाच्या विरोधात अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या. १९३१ च्या जानेवारीमध्ये सरकारने हे वर्तमानपत्र बंद करण्याचा आदेश काढला. आणि हे वर्तमानपत्र बंद झाले.

रिव्होल्ट

कुडी अरासु आणि द्रविडीयन हे तमिळ भाषेत प्रकाशित होत; पण जगभरात आपल्या स्वाभिमानी चळवळींचा विचार पोहोचावा म्हणून पेरियार यांनी ७ नोव्हेंबर १९२८ रोजी ईरोड येथून इंग्रजी भाषेमध्ये रिव्होल्ट हे दैनिक सुरू केले. रिव्होल्टचा मराठी अर्थ उठाव किंवा बंड असा होतो.

पेरियार यांच्या पत्नी नागमल्लई या दैनिकाच्या प्रकाशक आणि मुद्रक होत्या. हे दैनिक स्वाभिमान चळवळीचे मुखपत्र होते. १९२८ साली रिव्होल्ट प्रसिद्ध होऊ लागला, तेव्हा मद्रास प्रांतात ब्राह्मणेतरांचे साक्षरतेचे प्रमाण केवळ सात टक्के होते आणि त्यातही इंग्रजी वाचणार्‍यांची संख्या खूपच कमी होती. असे असतानाही पेरियार यांनी इंग्रजीत वृत्तपत्र काढण्याचे धाडस दाखवले.

ब्राह्मणांनी स्वाभिमानी चळवळीवर केलेल्या टीकेला रिव्होल्टमधून उत्तर देण्याचा पेरियारांचा उद्देश होता. रिव्होल्ट या दैनिकातून पुराणातील कथांवर दीर्घ लेख आणि मालिका प्रकाशित झाल्या. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात हे पहिले वर्तमानपत्र आहे, ज्याने पुराणातील पौराणिक कथांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करून वाद विवाद करण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली.

तसेच पेरियार यांनी रिव्होल्टच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील अमीर अमानुल्लाहच्या धार्मिक सुधारणा, अस्पृश्यता निर्मूलनासाठी काँग्रेसची ढिसाळ वृत्ती, नारायण गुरु यांच्या श्री नारायण धर्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसंबंधी लेख – बातम्या प्रसिद्ध केल्या जात. जवळपास दोन वर्षे रिव्होल्ट दैनिक सुरू राहिले. सततच्या आर्थिक नुकसानीमुळे पेरियार यांना हे दैनिक अखेर बंद करावे लागले.

दैनिक पुराच्छी

रिव्होल्ट हे इंग्रजी दैनिक बंद केल्यानंतर पेरियार यांनी पुराच्छी हे तमिळ दैनिक सुरू केले. पुराच्छीचा अर्थ ‘क्रांती’ असा होतो. नावाप्रमाणेच हे दैनिक क्रांतिकारी विचारांचा प्रसार करणारे होते. या दैनिकातून साम्यवादी विचार प्रसिद्ध केले जात. यावर चिडून सरकारने पेरियार यांचे भाऊ कृष्णासामी यांना अटक केली. पुराच्छीच्या कार्यालयाची झडती घेतली. मुद्रक आणि प्रकाशकांना दोन हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करण्याचा आदेश दिला. सुरक्षा ठेव जमा करण्याऐवजी पेरियार यांनी हे दैनिक बंद केले.

पगूथरिव

पुराच्छी बंद झाल्यानंतर पेरियार यांनी १२ जानेवारी १९३४ मध्ये पगूथरिवुचे प्रकाशन सुरू केले. पगूथरिवु म्हणजे बुद्धिवाद किंवा तर्कसंगत. एक प्रकारे हा कुडी अरासुचा विस्तार होता. पेरियार यांनी १९३२ मध्ये तमिळ अक्षरांमध्ये काही सुधारणा सुचवल्या होत्या. ही नवी अक्षरे याच वृत्तपत्रातून प्रथम प्रकाशित झाली. त्यामुळे या वृत्तपत्राचे महत्त्वही अधिक आहे. पगूथरिवुमध्ये त्यांनी समाजवाद, साम्यवाद, बुद्धिवाद यांसारख्या विषयांवर अनेक महत्वपूर्ण लेख प्रकाशित केले.

१९३४ पर्यंत पेरियार यांनी स्वतःला नास्तिक घोषित केले होते. त्यामुळे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मही त्यांच्या टीकेचे विषय होत असत. १९३४ च्या पगूथरिवुमध्ये त्यांनी लिहिले होते की, “इस्लाम, ख्रिश्चन यासह सर्व धर्मांमध्ये धार्मिक वाईट गोष्टी आहेत.”

या वृत्तपत्राने द प्रिस्ट, वुमन अँड कन्फेशनमधून तमिळमध्ये अनुवादित करून एक लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये धर्मगुरूला सनातनी विचारांचा उपदेश करताना दाखवण्यात आले होते. ख्रिश्चन धर्मही अवैज्ञानिक आणि अतार्किक गोष्टींना प्रोत्साहन देतो, असे त्यामध्ये सांगण्यात आले होते. त्याच कालावधीत, संपादकीयाद्वारे वृत्तपत्राने हिंदू धर्माच्या कमकुवततेवर निशाणा साधताना लिहिले होते की, “हिंदूंचे धार्मिक सण आणि उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरे केले जातात. यामध्ये जातीय हिंसा भडकवण्याची मोठी शक्यता असते. मिरवणुकीच्या मार्गात एखादी मशीद असेल आणि बहुसंख्य लोकसंख्या मुस्लीम असेल, तर दंगल होण्याची शक्यता अधिक असते. यावरून आपले सण आणि उत्सव सार्वजनिक सुरक्षा आणि शांततेसाठी किती मोठे धोक्याचे बनले आहेत हे दिसून येते. (पगूथरिवु, ११ नोव्हेंबर १९३४) पगुथरिवू हे वृत्तपत्र साधारण वर्षभरच निघू शकले.

दैनिक विदुथलाई

पेरियार यांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्रांमध्ये विदुथलाईला खूप वरचे स्थान आहे. विदुथलाई म्हणजे स्वातंत्र्य. १९३५ मध्ये स्थापन झालेले हे दैनिक वृत्तपत्र तमिळ भाषेत प्रकाशित झाले. १९३५ पर्यंत स्वाभिमान चळवळ लोकांच्या मनात रुजली होती. प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात त्याच्या शाखा निर्माण झाल्या होत्या. विदुथलाईची स्थापना पेरियार यांनी स्वाभिमान चळवळीतील कामगार आणि सामान्य जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी केली होती. वृत्तपत्राचे प्रकाशक ई. व्ही. कृष्णासामी आणि संपादक मुत्तुसामी पिल्लई होते.

ब्राह्मणी जादूटोणा, दांभिकता आणि कर्मकांडाची जाणीव जनतेला करून देणे, तसेच त्यांच्यात वैज्ञानिक वृत्ती वाढवणे हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे वेद, पुराण इत्यादी धर्मग्रंथांमध्ये नोंदवलेल्या पौराणिक मिथकांवर तिखट आघात या वर्तमानपत्रातून करण्यात येत होते. यामुळे त्याच्यावर एक समाज गट चांगलाच संतापला होता. वृत्तपत्राचे संपादक मुत्तुसामी यांना एकदा आर्य आणि द्रविड यांच्यात मतभेद निर्माण करून दोघांमध्ये द्वेष निर्माण केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

विदुथलाईच्या प्रत्येक अंकात दुसर्‍या पानावर एक-दोन स्तोत्रे दिली जात. या वर्तमानपत्रांमध्ये एक खास मालिका होती ती म्हणजे ‘जागतिक इतिहासातील बुद्धिवाद’. जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात घडणारे वैज्ञानिक आविष्कार आणि विज्ञानाशी संबंधित बातम्या ‘विदुथलाई’मध्ये नियमित प्रसिद्ध होत असत. बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने दैनिक विदुथलाईचा स्वर हा शासन व ब्राह्मणी अवडंबर, पुराणादी ग्रंथांत नोंदविलेल्या मिथकांवर टीकेचा भडीमार करण्यावर होता. यामुळे त्याला अनेक वेळा ब्राह्मणवाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दैनिक विदुथलाईचे प्रकाशन मात्र गेल्या ९० वर्षांपासून आजही सातत्याने सुरू आहे. आज के. वीरमणी हे त्याचे संपादक आहेत. १९५६ मध्येच ते या वृत्तपत्रात रुजू झाले होते. १९७८ पासून ते विदुथलाईच्या संपादकपदावर आहेत. आम्ही या दैनिकाच्या कार्यालयास आणि छपाईच्या प्रेसला भेट देऊन त्यांचे कामकाज समजावून घेतले.

दि मॉडर्न रॅशनॅलिस्ट

‘दि मॉडर्न रॅशनॅलिस्ट’ हे इंग्रजी मासिक असून ज्याचा पहिला अंक १९७१ मध्ये पेरियार यांच्या चित्रासह प्रकाशित झाला होता. नावाप्रमाणेच दि मॉडर्न रॅशनॅलिस्टच्या प्रकाशनाचा उद्देश वाचकांमध्ये तर्क आणि बुद्धिमत्तेवर विश्वास निर्माण करणे हा आहे. गॅलिलिओ, थॉमस जेफरसन, व्होल्टेअर, कोपर्निकस, डार्विन, ब्रुनो, ऍनाक्सागोरस, कन्फ्यूशियस, हक्सले, थॉमस पेन, हेगेल, रूसो इत्यादी जगभरातील बुद्धिवादी विचारवंतांचे विचार या वृत्तपत्रातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले. याशिवाय पेरियार यांच्या लेखन आणि भाषणांसाठी एक नियमित स्तंभ राखीव असायचा. या पत्रिकेत वैज्ञानिक आविष्कारांसाठी एक स्तंभही ठेवण्यात आला होता. हिंदू धर्मावर टीकात्मक समीक्षा हेदेखील मॉडर्न रॅशनॅलिस्टचे वैशिष्ट्य होते. पेरियार यांच्या विचारांना समर्पित असे देशातील हे एकमेव मासिक आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीसोबतच त्यांच्यासाठी चालवल्या जाणार्‍या प्रचार मोहिमेचा पर्दाफाश करणे हा त्याचा उद्देश आहे. द मॉडर्न रॅशनॅलिस्ट आजही अविरतपणे प्रकाशित होत आहे. सध्या त्याची जबाबदारी कुमरेसन यांच्याकडे आहे. आम्ही त्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

उन्मई

तमिळ शब्द उन्मई म्हणजे अस्तित्व किंवा वास्तविक. पेरियार यांनी प्रकाशित केलेले हे तमिळ भाषेतील पाक्षिक होते. त्याचा पहिला अंक १४ जानेवारी १९७० रोजी प्रकाशित झाला. पेरियार यांनी हे वृत्तपत्र भारतीय समाजात होत असलेल्या बदलांना समर्पित केले होते. पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर गौतम बुद्धाचे चित्र छापले होते. तर दुसर्‍या पानावर बुद्धाची सुभाषिते छापली होती. पेरियार यांनी संपादित केलेल्या इतर वर्तमानपत्रांप्रमाणे उन्मई देखील ब्राह्मणवाद, जातीय आणि सामाजिक भेदभाव, लिंगभेद संपवण्यासाठी समर्पित होते. अंधश्रद्धा निर्मूलन, चमत्कार सादरीकरण यावर या अंकात लेख असतात. उन्मई अजूनही डिजिटल स्वरूपात प्रकाशित होत आहे. त्याचे संपादक के. वीरमणी हेच आहेत.

द्रविड कळघमची बुद्धिवादी पुस्तक प्रकाशन समिती

‘धर्मग्रंथाशी स्पर्धा ही अत्यंत आधुनिक विवेकी जीवनमूल्य असणार्‍या पुस्तकांची निर्मिती करून केली जाऊ शकते.’ या विचाराने प्रभावित होऊन पेरियार यांनी बुद्धिवादी पुस्तक प्रकाशन समितीची स्थापना १३ डिसेंबर १९३२ रोजी केली. पेरियार यांच्यावर लंडनस्थित ‘रॅशनलिस्ट प्रेस असोसिएशन ऑफ लंडन’चा प्रभाव होता.

ही प्रकाशन समिती मुळात स्वाभिमान चळवळीची एक शाखा होती. इरोड हे त्याचे मुख्यालय होते. बौद्धिक देशी-विदेशी साहित्याचे प्रकाशन हा समितीचा मुख्य उद्देश होता. या प्रकाशन समितीने सुरुवातीला फक्त तमिळ भाषेत पुस्तके प्रकाशित केली. पहिल्या टप्प्यात जगभरातील बुद्धिमान विचारवंतांची २० पुस्तके अल्पदरात वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

बुद्धिवादी प्रकाशन समितीने प्रकाशित केलेल्या प्रमुख पुस्तकांमध्ये एम. सिंगारवेलू यांनी लिहिलेले, ‘वैज्ञानिक पद्धती आणि अंधश्रद्धा’, रॉबर्ट जी. इंगरसोल यांचे ‘देव आणि मी संशयवादी का झालो?’, ब्रर्ट्रांड रसेल यांचे ‘सुसंस्कृतीकरणात धर्माचे काही मूलभूत योगदान आहे का?’, जोसेफ मक्काब यांचे, ‘मृत्यूनंतरही जीवन आहे का?’ आर. जी. टून्सँड फॉक्स यांचे, ‘पुरोहितांचे ब्रह्मचर्य’ इत्यादींचा समावेश होता.

बुद्धिवादी बुक्स पब्लिकेशन्स कमिटीने प्रकाशित केलेली अनेक पुस्तके इंग्रजीतून अनुवादित करण्यात आली होती. त्यांच्या काही पुस्तकांतून ख्रिस्ती धर्म आणि चर्चलाही लक्ष्य केले होते. त्यामुळे कॅथलिक चर्चचा संताप होणे स्वाभाविक होते. त्यांनी पेरियार आणि स्वाभिमान चळवळीविरोधात तक्रार दाखल केली. परिणामी मद्रास सरकारने संपादक आणि प्रकाशकाला अटक केली. खटल्यादरम्यान न्यायालयाने त्याला सामाजिक सलोखा बिघडवल्याबद्दल प्रत्येकी एक हजाराचा जामीन जमा करण्याचे आदेश दिले. यावर कॅथलिक चर्चचे समाधान झाले नाही. आजही बुद्धिवादी प्रकाशन समितीचे काम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. पेरियार यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी हजारो ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. त्यांच्या प्रकाशनाच्या पुस्तकाच्या दुकानात आम्ही भेट देऊन पेरियार यांची काही इंग्रजी पुस्तके खरेदी केली.

–रुपाली आर्डे-कौरवार, राहुल थोरात, प्रा. डॉ. अशोक कदम


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]