वर्णभेदाचा पाडाव करण्यासाठी गोर्‍यांची राजकीय सत्तेमधील मक्तेदारी संपुष्टात आणली पाहिजे

नेल्सन मंडेला -

दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी, जुलमी गोर्‍या राजवटीविरुद्ध नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस; तसेच समविचारी संघटनांनी उभारलेला प्रदीर्घ यशस्वी लढा हे अर्वाचीन इतिहासातील एक धगधगते पर्व आहे. या लढ्याचे सूत्रधार नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी झाला. त्यांचे वडील हेनरी म्फाकेनिस्वा हे म्वेजो गावाच्या जमातीचे सरदार होते. तिथल्या स्थानिक भाषेत सरदाराच्या मुलाला ‘मंडेला’ म्हणतात. यावरून त्यांना मंडेला हे आडनाव लाभले. ते 12 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. 1952 साली आपला काळ्या लोकांच्या अधिकारांसाठीचा लढा कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून सरकारने त्यांच्यावर कोणत्याही बैठकीत सहभाग घेण्यास बंदी घातली. त्यांनी मग या दडपशाहीपासून बचाव करण्यासाठी योजना तयार केली आणि आपल्या संघटनेचे दोन भाग केले आणि काम विभाजित केले. भूमिगत राहून ते काम करू लागले. 1961 साली त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. परंतु न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले.

सरकारी दडपशाही चालूच होती. आंदोलन निष्प्रभ करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू होते. मधल्या काळात सरकारने असे काही कायदे पारित केले की, जे काळ्या लोकांच्या हिताचे नव्हते. त्याविरुद्ध आयोजित निदर्शनांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यात 180 लोक मारले गेले. सरकारच्या क्रूर दमणतंत्रामुळे मंडेला यांचा अहिंसेवरील विश्वास उडाला. त्यांनी सशस्त्र लढा उभारायचा निर्णय घेतला. त्यांनी यासाठी ‘स्पियर ऑफ द नेशन’ हे दल स्थापन केले. त्यांचा हा लढा मोडून काढण्यासाठी सरकार काम करत होतेच. त्यामुळे मंडेला यांना काही काळ भूमिगत राहून आणि देशाबाहेर राहून काम करावे लागले.

ऑगस्ट 1964 मध्ये त्यांच्यावर मजुरांना आंदोलन करण्यास चिथावणी देण्याचा आरोप लावून खटला दाखल केला गेला. त्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कैदेत असताना सुद्धा ते गप्प बसले नाहीत. काळ्या कैद्यांच्या अधिकारासाठी ते लढत राहिले. शेवटी 27 वर्षे कैदेत काढल्यानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांची कैदेतून सुटका करण्यात आली. सरकार सोबत झालेल्या करारानुसार त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सर्वसमावेशक लोकशाहीचा पाया रचला. देशातील वर्णद्वेषी राजवट संपुष्टात आणली आणि प्रथमच काळ्या वर्णाचा राष्ट्रपती त्यांच्या रुपाने देशाला लाभला. त्यांच्या कार्यामुळे ते वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जागतिक प्रतीक बनले. दक्षिण आफ्रिकेचे लोक त्यांना ‘राष्ट्रपिता’,‘लोकशाहीचे प्रथम संस्थापक’,‘राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता’ म्हणून मान देतात. हिंसक मार्गाने बदल घडवून आणता येत नाहीत, हे लक्षात आल्यावर अहिंसक मार्गावर चालू लागलेले व त्या मार्गाने विजय मिळवणारे मंडेला यांना ‘आफ्रिकन गांधी’ म्हणून जग ओळखते आहे. आजच्या आफ्रिकेचा पाया घालणारा हा धगधगता निखारा दि. 5 डिसेंबर 2013 रोजी कायमचा विझून गेला, मागे वर्णद्वेषविरहित आफ्रिका हा देश आणि अहिंसक आंदोलनाचा विचार प्रज्वलित ठेवून.

मंडेला म्हणत, ‘शिक्षण हे अत्यंत शक्तिशाली हत्यार आहे आणि ते घेऊन तुम्ही जग बदलू शकता,’ त्यांचे विचार एकांगी नव्हते, तर संपूर्ण मानवतेचा विचार करणारे होते. ते म्हणाले होते,‘मी वर्णभेदाचा खूप तिरस्कार करतो, मला हा प्रकार पाशवी वाटतो. मग तो काळ्या लोकांकडून होेत असेल किंवा गोर्‍या लोकांकडून!’ त्यांच्या या सुस्पष्ट विचारांमुळे अल्पसंख्याक गोर्‍या लोकांना देखील सुरक्षित वाटू लागले. कारण मंडेला यांच्या विचारांत कुठेही ‘सूडाची’ भावना नव्हती.

18 जुलै रोजी त्यांची जयंती आहे. 27 वर्षे कारावास भोगून बाहेर आल्यावर त्यांनी जे पहिले जाहीर भाषण केपटाऊन येथे 11 फेब्रुवारी 1990 साली केले. त्याचा अनुवाद ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’च्या वाचकांसाठी यानिमित्त सादर करीत आहोत. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वेबसाइटवरून या भाषणाचे शब्दांकन भाषांतरासाठी प्रमाण मानले आहे.

——————-

नेल्सन मंडेला यांचे भाषण ः

“शक्ती ! शक्ती ! आफ्रिका, ही आपली आहे!

(Power! Power! -Africa it is ours!)

माझ्या मित्रांनो, कॉम्रेड्सनो आणि माझ्या दक्षिण आफ्रिकन नागरिकांनो, मी तुम्हा सर्वांना शांती, लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्या नावाने अभिवादन करीत आहे. मी तुमच्या समोर एक प्रेषित म्हणून उभा नसून तुमचा, लोकांचा एक विनम्र सेवक म्हणून उभा आहे. तुमच्या अथक आणि विरोचित त्यागामुळे आज मला इथे येणे शक्य झाले आहे. म्हणून मी माझ्या आयुष्याची उरलेली वर्षे तुमच्या हाती सुपूर्द करीत आहे. आजच्या या माझ्या सुटकेच्या दिवशी माझे कोट्यवधी देशबांधव आणि विश्वाच्या प्रत्येक कोपर्‍यातून ज्यांनी माझ्या सुटकेसाठी अथक मोहीम राबविली, त्या सर्वांच्या प्रती मी प्रामाणिकपणे आणि मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

माझे गेल्या तीन दशकांतील घर असलेल्या केपटाऊन शहरातील लोकांच्या प्रती मी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचे विशाल मोर्चेआणि आंदोलनाचे विविध प्रकार यांनी सर्व राजकीय कैद्यांना निरंतर शक्ती देण्याचे काम केले आहे.

मी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला सलाम करतो. या संघटनेने स्वातंत्र्याच्या महान वाटचालीच्या नेत्याच्या भूमिकेतून आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

अत्यंत कठीण परिस्थितीत ‘एएनसी’चे नेतृत्व करणार्‍या अध्यक्ष कॉम्रेड ऑलिव्हर टांबो यांना मी सलाम करतो.

मी ‘एएनसी’च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सलाम करतो. आपल्या आंदोलनाच्या उदात्त प्रयोजनाच्या पूर्तीसाठी तुम्ही आपल्या आयुष्याचा आणि देहाचा त्याग केला आहे.

नेत्यांना अभिवादन!

मी सलाम करतो ‘स्पियर ऑफ नेशन’चे सॉलोमन मल्हांगु आणि अ‍ॅशली क्रिएल सारखे योद्धे यांना, ज्यांनी सर्व दक्षिण आफ्रिकन लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च किंमत दिलेली आहे.

मी सलाम करतो साऊथ आफ्रिकन कम्युनिस्ट पार्टीला, ज्यांचे लोकशाहीसाठी केल्या जात असलेल्या संघर्षात भक्कम योगदान आहे. तुम्ही 40 वर्षे कठोर छळाचा सामना करून टिकाव धरून राहिलात. मोसेस कोटाने, युसूफ डकू, ब्रॅम फिशर आणि मोसेस मदिधा यांच्या सारख्या महान कम्युनिस्ट नेत्यांच्या स्मृती येणार्‍या पिढ्या जतन करून ठेवतील.

आपल्या सर्वोत्तम देशभक्तांपैकी एक, जनरल सेक्रेटरी जो स्लोवो यांना मी सलाम करतो. मला ही वस्तुस्थिती उल्हासित करते की आपली आणि त्यांच्या पक्षाची युती नेहमीप्रमाणेच मजबूत आहे.

मी सलाम करीत आहे यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, नॅशनल एज्युकेशन क्रायसीस कमिटी, साऊथ आफ्रिकन यूथ काँग्रेस, ट्रान्सवाल आणि नाताल इंडियन काँग्रेस यांना; तसेस कोसाटू यांना; तसेच सर्वव्यापी लोकशाही चळवळीच्या अनेक संघांनाही मी सलाम करीत आहे.

ब्लॅक साश आणि नॅशनल यूनियन ऑफ साऊथ आफ्रिका स्टुडंट्स यांनाही मी सलाम करीत आहे. आम्ही अभिमानाने नमूद करीत आहोत की, तुम्ही गोर्‍या दक्षिण आफ्रिकन लोकांची सदसद्विवेक बुद्धी या रुपात भूमिका पार पाडलेली आहे. एवढेच नाही, तर इतिहासातल्या ‘त्या’ काळ्या कालखंडातील आमच्या संघर्षात, तुम्ही स्वातंत्र्याचा झेंडा उंच फडकत ठेवलात. गेल्या काही वर्षांतील मोठ्या प्रमाणातील जमवाजमाव ही कळीचा मुद्दा ठरली आणि आपल्या संघर्षातील शेवटच्या अध्यायाच्या आरंभाकडे घेऊन गेली.

आपल्या देशातील कामगार वर्गाला मी अभिवादन करतो. तुमचा संघटित पवित्रा हा आपल्या चळवळीला अभिमानास्पद आहे. ज्यांच्यावर विसंबून राहावे अशी, पिळवणूक आणि जुलमाच्या अंताच्या आंदोलनातील तुम्ही विश्वासार्ह शक्ती आहात.

प्रचारकांचा सन्मान

आपल्या लोकांच्या संघटनांचा आवाज दडपून टाकला जात असताना ज्या अनेक धार्मिक समुदायांनी पुढे येऊन न्यायासाठी प्रचार अभियान राबविले, त्यांचा मी सन्मान करतो, आदर करतो.

आपल्या देशातील पारंपरिक नेत्यांना मी अभिवादन करतो. तुमच्यापैकी अनेक जण हिंतसा आणि सेखुखुनी यांच्या सारख्या महान नायकांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहात.

युवकांच्या अनंत नायकांचा मी सन्मान करतो. तुम्ही तरुण सिंह आहात. आमच्या संपूर्ण आंदोलनाला तुम्ही तरुण सिंहांनी ऊर्जा दिलेली आहे.

आपल्या देशातल्या माता, पत्नी आणि भगिनी यांचा मी आदर-सन्मान करीत आहे. तुम्ही आपल्या चळवळीचा कातळासारखा मजबूत असा पाया आहात. वर्णद्वेषाने अन्य कोणापेक्षाही अधिक यातना तुमच्यावर लादल्या आहेत. याप्रसंगी, आम्ही आभार मानत आहोत विश्वाचे – विश्वातील समुदायांचे ज्यांनी वर्णद्वेषविरोधी चळवळीत महान योगदान दिले आहे. तुमच्या पाठिंब्याशिवाय आमचा संघर्ष एवढ्या पुढच्या टप्प्यावर येऊ शकला नसता.

आघाडीवरील राज्यांनी केलेला त्याग दक्षिण आफ्रिकन जनता अनंतकाळ स्मरणात ठेवेल.

माझ्या तुरुंगवासातील प्रदीर्घ काळात मला ज्यांनी शक्ती दिली, त्या माझ्या प्रिय पत्नी आणि कुटुंबीयांविषयी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय माझी अभिवादने अपूर्ण ठरतील.

माझी खात्री आहे की, तुम्ही भोगलेल्या यातना आणि व्यथा या मी स्वतः जे भोगले, त्यापेक्षा खूप मोठ्या आहेत.

पुढे बोलण्यापूर्वी मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, या टप्प्यावर मी फक्त काही प्राथमिक स्वरुपाचे भाष्य करू इच्छितो आहे. माझ्या कॉम्रेड्स सोबत सल्लामसलत करण्याची संधी मिळाल्यावर मी अधिक परिपूर्ण निवेदन देणार आहे.

आज बहुसंख्य दक्षिण आफ्रिकन लोकांनी, काळ्यांनी आणि गोर्‍यांनी, हे ओळखले असेल की वर्णभेदाला आता कसलेही भवितव्य नाही. शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी याचा अंत आपण आपल्या स्वतःच्या सामूहिक निर्णायक कृतीने केला पाहिजे. सामूहिक अवज्ञा अभियाने आणि आपल्या संघटनेच्या; तसेच लोकांच्या अन्य कृतीच लोकशाहीची स्थापना करण्यात प्रगती करतील.

वर्णद्वेषाने केलेला आपल्या उपखंडाचा विध्वंस अपरिमित आहे. माझ्या कित्येक दशलक्ष लोकांच्या कौटुंबिक जीवनाची वीण विस्कटली गेली आहे. अनेक दशलक्ष लोक बेघर आणि बेरोजगार आहेत.

आपली अर्थव्यवस्था

आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे आणि आपले लोक राजकीय कलहात गुंतले आहेत. आपण 1960 साली ‘एएनसी’च्या शाखेच्या रूपात ‘स्पियर ऑफ नेशन’ हे सैन्यदल स्थापून अवलंबिलेला सशस्त्र संघर्ष ही वर्णद्वेषी लोकांच्या हिंसेविरोधात शुद्ध बचावात्मक कृती होती.

सशस्त्र संघर्षासाठी जे घटक कारणीभूत होते, ते आजही अस्तित्वात आहेत. आपल्याला तो चालू ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही आशा व्यक्त करतो की, वाटाघाटीच्या माध्यमातून समझोत्यासाठी पोषक वातावरण लवकरात लवकर निर्माण केले जाईल, ज्यायोगे यापुढे सशस्त्र संघर्षाची गरजच भासणार नाही.

मी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा एकनिष्ठ आणि शिस्तबद्ध सदस्य आहे. म्हणून संघटनेची सर्व उद्दिष्टे, धोरणे आणि डावपेच यांच्याशी सहमत आहे.

लोकशाही पद्धती

आपल्या देशातील लोकांना एकत्रित करण्याची गरज हे महत्त्वपूर्ण काम आहे आणि ते नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. कोणताही एक नेता स्वतःच्या व्यक्तिगत बळावर अशी प्रचंड कामे करू शकत नाही. नेते म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की, आपली मते आपल्या संघटनेसमोर मांडवीत आणि लोकशाही संरचनेला पुढील वाटचालीसाठी निर्णय घेऊ द्यावा.

लोकशाही प्रघाताच्या प्रश्नावर, मी हे नमूद करण्यास बांधील आहे की, चळवळीचा नेता तोच असेल, जो नॅशनल कॉन्फरन्समध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. हे तत्त्व अगदी निरपवादपणे उचलून धरलेच पाहिजे.

आज मी तुम्हाला हे कळवू इच्छितो की, माझा सरकार सोबत झालेल्या बोलण्याचा उद्देश देशात राजकीय परिस्थिती सामान्य स्तरावर आणणे हा होता. आपल्या चळवळीच्या मूलभूत मागण्यांच्या बाबतीत चर्चा अजून सुरू केलेली नाही.

मी हे जोर देऊन सांगू इच्छित आहे की, मी स्वतः कोणत्याही वेळी देशाच्या भवितव्याशी संबंधित वाटाघाटी सुरू केलेल्या नाहीत. मात्र ‘एएनसी’ आणि सरकार यांच्यामध्ये बैठक व्हावी, यासाठी आग्रह धरलेला आहे. श्री. डी. क्लार्क हे परिस्थिती सामान्य करण्यासाठी वास्तविक पावले उचलण्यात अन्य कोणत्याही राष्ट्रवादी अध्यक्षाच्या पुढे आहेत. परंतु, ‘हरारे घोषणापत्रा’त आखून दिलेल्या अजून काही पुढील पावलांची पूर्ती, लोकांच्या मूलभूत मागण्यांवरील वाटाघाटी सुरू व्हायच्या आधी झाली पाहिजे.

मी आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार करीत आहे की, आणीबाणी तत्काळ उठविण्यात यावी आणि सर्व राजकीय कैद्यांना; फक्त काही जणांना नव्हे, सोडून देण्यात यावे.

निर्णायक क्षण

केवळ सामान्य झालेल्या अशा परिस्थितीतच मुक्त राजकीय घडामोडी होऊ शकतात आणि त्यायोगे लोकांशी जनादेश मिळविण्याविषयी सल्लामसलत होऊ शकते. वाटाघाटी कोण करणार आणि अशा वाटाघाटीचे मुद्दे काय असावेत, याबाबतीत लोकांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

वाटाघाटी या आमच्या लोकांच्या डोक्याच्या वर किंवा पाठीमागे घेतल्या जाऊ शकत नाहीत आणि घेतल्या जाऊ नयेत. आमचा हा विश्वास आहे की, आपल्या देशाच्या भवितव्याचा निर्णय हा फक्त लोकशाही पद्धतीने आणि वंशभेदरहित आधारावर निवडलेल्या मंडळातर्फे घेतला जाऊ शकतो.

वर्णभेदाचा पाडाव, या मुद्द्यावरील वाटाघाटींमध्ये लोकतांत्रिक, वंशवादविरहित आणि एकत्रित दक्षिण आफ्रिकेसाठी केलेल्या आपल्या लोकांच्या तीव्र मागणीवर विचार झालाच पाहिजे. गोर्‍यांची राजकीय सत्तेमधील मक्तेदारी संपुष्टात आलीच पाहिजे.

आणि, वर्णभेदामुळे आलेल्या असमानतेवर लक्षपूर्वक विचार आणि समाजाचे पूर्णतः लोकशाहीकरण सुनिश्चित करण्यासाठी आपल्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची मूलभूत पुनर्रचना केली पाहिजे. अजून पुढे सांगायचे म्हणजे श्री. डी. क्लार्क हे स्वतः सचोटीने वागणारे आहेत आणि त्यांना खरोखरच ही जाणीव आहे की, त्यांनी दिलेल्या हमीचा अनादर करणार्‍यास सार्वजनिक जीवनातील लोकांचा धोका पुढे आहे. परंतु एक संघटना म्हणून आपली धोरणे आणि रणनीती आपण ज्याला तोंड दिले, त्या कठोर वास्तवावर आधारित ठेवत आहोत आणि हे वास्तव असे आहे की, आपण राष्ट्रवादी सरकारच्या धोरणांचे परिणाम अजूनही भोगत आहोत.

आपला संघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की, या क्षणाचा लाभ घ्यावा, ज्यायोगे लोकशाहीकडे जाण्याची प्रक्रिया जलद आणि अखंडित राहील. आपण स्वातंत्र्यासाठी खूपच काळ वाट पाहिलेली आहे. आपण आता अजून वाट पाहू शकत नाही. आता आपण सर्वच आघाड्यांवर आपला संघर्ष तीव्र करण्याची हीच वेळ आहे.

वैश्विक मत

आता जर आपण आपल्या प्रयत्नात शिथिलता आणली तर ती अशी चूक ठरेल की, येणार्‍या पिढ्या आपल्याला माफ करू शकणार नाहीत. क्षितिजावर दिसणार्‍या स्वातंत्र्याने आपल्याला आपले प्रयत्न दुप्पट करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. केवळ आपल्या शिस्तबद्ध सामूहिक कृतीने आपले यश सुनिश्चित करू शकतो.

आम्ही आपल्या गोर्‍या देशबांधवांना आवाहन करतो की, त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिकेला आकार देण्यासाठी आमच्या सोबत यावे. स्वातंत्र्याची चळवळ हे तुमच्यासाठी सुद्धा राजकीय निवासस्थान आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायांना आवाहन करीत आहोत की, वर्णद्वेषी राजवटीला एकटे पाडण्यासाठी मोहिमा चालू ठेवाव्यात. आता प्रतिबंध उठवल्यास वर्णद्वेषाचे संपूर्ण निर्मूलन करण्याची प्रक्रिया निरस्त होण्याचा धोका आहे. आपली स्वातंत्र्याकडे जाणारी वाटचाल अपरिवर्तनीय आहे. आपण आपल्या मार्गात भीतीला स्थान देऊ नये. संयुक्त लोकशाही आणि वंशभेदरहित दक्षिण आफ्रिकेमध्ये सामायिक मतदार याद्यांवर वैश्विक मत हा शांतता आणि वांशिक सलोखा याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

शेवटी, मी माझ्या स्वतःच्या 1964 सालातील खटल्यात वापरलेल्या शब्दांकडे जाऊ इच्छितो. ते त्या वेळेस जेवढे खरे होते, तेवढेच आजही आहेत. मी लिहिले होते – मी गोर्‍यांच्या वर्चस्वाविरुद्ध लढलो आहे, आणि मी काळ्यांच्या वर्चस्वाविरुद्ध लढलो आहे. मी लोकशाहीवादी आणि मुक्त समाजाची कल्पना जतन करून ठेवली आहे, ज्यामध्ये सर्व लोक सद्भावाने आणि समान संधींसह एकत्र राहत आहेत. हा असा आदर्श आहे, ज्यासाठी मी जगू इच्छितो आणि तो प्राप्त करू इच्छितो. परंतु गरज पडली तर मी त्या आदर्शासाठी मरायला तयार आहे. माझ्या मित्रांनो, माझ्याकडे आज तुम्हाला देण्यासाठी एखाद्या वक्त्यासारखे प्रभावी शब्द नाहीत. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस तुमच्या हातात आहेत. मला आशा आहे की, इथून तुम्ही बाहेर पडताना शिस्त पाळाल आणि तुमच्यापैकी कोणीही, एकाने सुद्धा असे काही करू नये की, ज्यामुळे दुसरे लोक म्हणतील, आपण आपल्याच लोकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.

अनुवादक – उत्तम जोगदंड संपर्क 9920128628


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]