डॉ. विजय रणदिवे -

तब्येत बिघडली तर डॉक्टरकडे जायचं असतं. गाडी बिघडली तर मेकॅनिककडे. नशीब बिघडलं तर कुठं जायचं? माहीत नाही. नशीब कोण लिहितं?….देव! पण आता देवाला कसं गाठायचं? माहीत नाही!
कुणाला माहीत आहे? देवाच्या माणसांना.. अर्थात बुवा-बाबा-बापू-स्वामी-महाराज-मौलाना- पाद्री लोकांना. या लोकांना खरंच देवाबद्दल माहिती असते का? खात्री नाही! परंतु असावी असं आमच्या मनाला वाटतं. नव्हे, तसं वाटून घेणं ही आमची अगतिकता आहे. अन्यथा आमचा शेवटचा आधारही सुटेल. कोणती आशाच उरणार नाही. मनाला तेवढाच तर एक धीर आहे. तोही हिरावून घेतला तर कुणाच्या तोंडाकडं पाहायचं?
पूर्वीच्या काळी खरा साधु/संत ओळखण्याचे काही निकष असायचे. इंद्रियांवर आणि मनाच्या विकारांवर विजय प्राप्त केलेल्या व्यक्तीची अंतर्गत अवस्था प्रकट करणारी काही बाह्यलक्षणे ग्राह्य धरली जायची. जसे की वैराग्य प्राप्त झालेलं असल्याने ती व्यक्ती घरदार आणि सर्व सुखसोयींचा त्याग केलेली असायची.
हे खरे साधू आहेत, की ढोंगी आहेत, याचा विचार त्यांच्या अनुयायांनीच करायला हवा. तुमच्या स्वच्छ पवित्र धर्माचा अवमान करण्याचं काम हे ढोंगीच तर करताहेत, मग शिव्या का बरं विवेकवाद्यांना घालता?
मुट्ट्या पंखा बाबा दक्षिणेत हाताने सिलिंग फॅन थांबवणारा एक नवीन बाबा ‘प्रकट’ झालाय. आता त्यांचा लवकरच आश्रम तयार होईल. पोथ्या आणि स्तोत्रही येतील. मंत्र येतील. भक्तांना आलेल्या प्रचित्या बढवून चढवून रंगवून त्या स्तोत्रात सांगितल्या जातील. नवसाला पावणारा, संकटात पाठीशी उभा राहणारा ‘समर्थ’ अशी ख्याती त्यांना प्राप्त होईल. ब्रह्मांडनायक वगैरे उपाध्या मिळतील, घरोघरी देव्हार्यात पंखाबाबांच्या तसबिरी असतील, गळ्यात लॉकेट, बोटात अंगठ्या, कि-चेन, पेन, जिथं तिथं पंखाबाबांचे फोटो असतील. लाखो करोडो अनुयायांच्या हृदयावर राज्य करणार्या पंखाबाबाचा कुणी अपमान केला, त्यांचा उपहास केला की मग भक्तांच्या भावना दुखतील आणि ती माणसं तुमच्या घरावर चालून येतील, बदडून काढतील, जाहीर माफी मागायला लावतील, अन्यथा तुमच्यावर गोळ्याही झाडतील.

१) कोण आहे हा सिलिंगफॅन बाबा?
फिरता सिलिंग फॅन हाताने थांबवून दाखवण्याची ‘अलौकिक शक्ती’ त्याच्या अंगी आहे; परंतु या बाबाला फॅनपर्यंत हात पोचवण्यासाठी दोन माणसांनी उचलून धरावं लागतं, कारण बाबांमध्ये हवेत तरंगण्याचं ‘फीचर’ अद्याप नाही. एवढंच नाही तर, बाबा शारीरिक विकलांगतेमुळे नीट उभे राहू शकण्यासही ‘समर्थ’ नाहीत.
हे बाबा फक्त सिलिंग फॅनच थांबवू शकतात. मिक्सर ग्राईंडर वगैरे यंत्र थांबवण्याचे ‘चमत्कार’ ते करत नाहीत. फिरता पंखा हाताने थांबवू शकण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आहे, या गोष्टीचा साक्षात्कार बाबांना केव्हा आणि कसा झाला असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. न्यूटन जसा झाडाखाली बसून पडत्या सफरचंदाकडं पाहत निरीक्षण करायचा, तसा हा पंखेवाला बाबा दिवसभर सिलिंग फॅनकडे पाहत बसला असणार.
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का? बाबा हाताने फॅन थांबवतो या मागे काहीतरी फिजिक्स असेल, भौतिकशास्त्राचा एखादा नवीन सिद्धांत शोधून काढला असेल म्हणून या बहाद्दराला लोकांनी वैज्ञानिक घोषित करण्याऐवजी आध्यात्मिक बाबा म्हणूनच का बरं लॉन्च केला असेल? कारण या देशात वैज्ञानिक होण्यापेक्षा बाबा होणं अत्यंत सोपं, सोयीचं आणि सन्मानाचं आहे. एका वैज्ञानिकाला मिळणार नाही इतका सन्मान, लोकप्रियता आणि पैसा इथं बुवा बाबांना मिळतो.
पंखाबाबा चेहर्यावरून भोळा भाबडा वाटतो, कदाचित बिचारा साधा सरळ माणूस असेल. अगदीच सुमार दिसणारं व्यक्तिमत्त्व, वरून शारीरिक व्यंग असलेल्या माणसाच्या मनात न्यूनगंड असतात. लोकांचं अटेन्शन मिळेल असं आपल्यापाशी काहीही नसल्याची खंत त्यांना सलत असते. काहीतरी अद्भूत दिव्य किंवा थोर असं करून दाखवावं आणि लौकिक प्राप्त करावं ही नैसर्गिक इच्छा प्रत्येकात असते. अशात दिवसभर पंख्याखाली बसल्या बसल्या त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली असावी असे मला वाटते.
सुरुवातीला तो व्हिडीओ पाहून असं वाटलं होतं की काहीतरी मजेशीर कॉमेडी म्हणून त्या लोकांनी व्हिडीओ केला असावा; परंतु आता तो व्हिडीओ मजेदार उरला नाही. तो व्हिडीओ कित्येकांसाठी चमत्कारी आणि अलौकिक झाला आहे. पंखा बाबांचे भक्तगण तयार होत आहेत. लोक त्यांच्या दर्शनाला जाताहेत. त्यांना ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी आमंत्रण मिळत आहेत.
आपल्या समाजात शारीरिक, मानसिकदृष्ट्या विकलांग बाळ जन्माला येणं म्हणजे एक अभिशाप आहे. असं बाळ म्हणजे जन्मभराची liability (जवाबदारी) किंवा ओझं म्हणा. अशा बालकांना बर्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. लहानपणी त्यांना चिडवलं जातं, वेळोवेळी अवहेलना भोगावी लागते. याचा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागतो.
मग यापासून वाचण्यासाठी एक युक्ती लढवली जाते. अशा बाळांना ‘देवरूपी’ म्हणून टॅग लावला जातो. देवरूपी म्हणताच मग त्याचा अपमान करायला सहसा कुणी धजावत नाही. सोबत त्याला एक विशेष सन्मान प्राप्त होतो. अशा व्यक्तींना वाचासिद्धी प्राप्त असते असा एक समज लोकांमध्ये प्रचलित असतो. वाचासिद्धी म्हणजे त्या व्यक्तीने बोललेला शब्द खरा होतो असा समज. मग लोक साहजिकच अशा लोकांच्या तोंडून आपल्याबद्दल चांगलं शुभ ऐकणं पसंत करतात. म्हणून मग यांचे विशेष लाड पुरवले जातात. कुणाच्याही शारीरिक मानसिक व्यंगाहून त्याला अपमानित करणे मुळातच वाईट आहे; पण ते माणुसकी म्हणून केलं पाहिजे, मला पुण्य लाभेल या भावनेतून नाही.
इथं विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त अभ्यासक्रमापुरता बंदिस्त झाला आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या आविष्काराने दिलेल्या सोयी सुविधांचा उपभोग तर घेतला जातो, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या आचरणात आला नाही. सेफ्टी फिचर महत्त्वाचं म्हणून दोनचार लाख रुपये ज्यादा खर्चून आपण कारचं सर्वात महागडं मॉडेल घरी आणतो, चार चार एअर बॅग्स आपल्याला हव्या असतात, इतकं आपण विज्ञानाला महत्त्व देत असलो तरीही लिंबू मिरची टांगल्याशिवाय आम्हाला सुरक्षित फील होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या आचरणात नसल्याचं हे लक्षण आहे.
कुठं लोकांना शहाणपणा शिकवता?
ज्या समाजात नाकाचा शेंबूड भूषण म्हणून मिरवला जात असेल अशा समाजात राहून लोकांना ‘शेंबडं’ म्हणणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणं. चार्वाक, संत तुकारामापासून ते पानसरे, दाभोलकरांपर्यंत पुरोगाम्यांना लोकांनी शेवटी काय दिलं?
असो. आपल्या प्रयत्नांशिवायही शेवटी मानवी उत्क्रांतीचा ओघ गूढवादाकडून विज्ञानाकडेच जातो आहे. तो प्रवाह नैसर्गिक आहे, त्यामुळे शेवटी उत्क्रांतीच जिंकणार आहे, विज्ञानच जिंकणार आहे. पृथ्वी सपाट आहे, सूर्य तिच्याभोवती फिरतो आहे ही काही शतकांपूर्वी लोकांची श्रद्धा होती, आता ती विज्ञानाने खोडून काढली आहे. आता पृथ्वी गोल आहे असं विधान केलं किंवा फेसबुकवर लिहिलं म्हणून कुणी अंगावर धावून येत नाही, माफी मागायला लावत नाही. हे सहज झालं. तसं काही काळाने नास्तिकता, विवेकवाद, विज्ञानवाद सहज अंगवळणी पडेल. काही माकडं तेव्हाही असतील; पण विज्ञानवादी माणूसच उत्क्रांत म्हणून ओळखला जाईल. तोच I am sapien असेल.
२) दुर्गामातेचा अवतार?
एका नवरात्रातला किस्सा आहे. दुपारचे वेळी क्लिनिकमध्ये एक तिशीतली महिला पेशंट आली. सहसा पेशंटसोबत एक किंवा दोन नातेवाईक येत असतात; परंतु या महिलेसोबत दहा पंधरा लोकांचा जमाव आला. त्यातले बरेच जण माझे नियमित पेशंटच होते, पण त्या महिलेला मी पहिल्यांदाच बघत होतो. हिरवी साडी चोळी, कपाळावर मळवट भरलेला, दोन्ही हातभार बांगड्या, केस मोकळे, तळहात आणि तळपाय लालभडक रंगवलेले. ती आरतीच्या वेळी भोवळ येऊन पडल्याचं तिच्या सोबतचे सांगत होते. “आईला सलाईन लावून द्या बरं डॉक्टरसाहेब” त्या गर्दीतला एक चाळिशीतला इसम मला आदेशवजा विनंती करत होता. हा इसम वयाने त्याच्याहून लहान बाईला ‘आई’ का बरं म्हणत असावा? असा विचार मनात आला.
पण ती बाई सलाईनचं नाव घेताच घाबरली. मला फक्त गोळ्या औषधी द्या, सलाईन नको असं ती लहान मुलीसारखे हावभाव करत बोलली. त्यावर सोबतचे सगळेच्या सगळे एकाच सुरात बोलू लागलेत ,”नाही आई असं नको करू .. लावून घे सलाईन, आधीच उपवास करून गळून गेली आहेस तू.” मला आता जास्तच आश्चर्य वाटून गेलं , या सर्वांची ही ‘आई’ कशी?
मग तर ती आई माऊली लहान मुलांसारखीच हातपाय घासून रडू लागली. तिला सर्व जण उगी उगी करत समजावत होते. आई कशीबशी शेवटी आपल्या लेकरांच्या हट्टापायी तयार झाली. मी सलाईन लावलं आणि त्यातल्या एका जणाला विचारलं, “कोण आहेत ह्या बाई?”
“बाई नाहीत साहेब त्या आई आहेत आमच्या. दुर्गामातेचा आशीर्वाद आहे तिला. ती नागपूरजवळच एका खेड्यात असते. आम्हा भक्तजनांना दर्शन देण्यासाठी म्हणून त्या आज इकडं आल्या आहेत. गावोगावी त्यांचा भक्तपरिवार आहे.”
अच्छा! आता माझ्या लक्षात आलं प्रकरण. ती महिला डोक्याने जरा मंद होती. तिला देवरूपी म्हणून लोकांनी आई घोषित करून दिलं. तिच्या अंगात देवी यायची. उन्मनी अवस्थेत मग ती काहीतरी असंबद्ध बरळायची. त्या बडबडीचा आपल्या सोयीने अर्थ लावून भक्तगण मार्गदर्शन घ्यायचे.
हा प्रकार तसा गावखेड्यात फार प्रचलित आहे. अंगात येणे हा मानसिक आजार आहे. अंधश्रद्धा आहे. कुणाच्याही अंगात देव येत नसतो. ती महिला फार कमी शिकलेली आणि गरीब कुटुंबातली असावी. त्यात मानसिकरीत्या स्थिर नाही. मग अशा व्यक्तीला करून टाकलं माता. आता माता म्हटल्यावर भक्तमंडळी जमणारच. मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घोळका करतील. मातेच्या गुडबुक्समध्ये स्थान पटकावण्यासाठी मग प्रचित्या आणि छुटपूट चमत्कारांच्या कथा रचल्या जातात. एकाचं ऐकून दुसरा, दुसर्याचं ऐकून तिसरा सगळे कथा रंगवतात. मातेचा कोप नको म्हणून कुणीही त्या चमत्कारिक कथांची चिकित्सा करणार नाही. त्यात खरं काय खोटं काय तपासणार नाहीत. इतके सगळे जण सांगताहेत ते काय खोटं सांगणार आहेत का? हा एकमेव निकष लावून त्या बुवा/आईला देवाचा दर्जा देऊन मोकळे होतात. यात सहसा त्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या घेर्यात वावरणारे लबाड असतात. ते लाभार्थी असतात. दान मिळतं, भोजन, अन्नधान्य आणि वरून सन्मान मिळतो. बुवा/माता प्रस्थापित झाली की मग त्यांचा रुबाब वेगळाच असतो. पैशाचे व्यवहार तेच बघत असतात. भेदरलेल्या घाबरलेल्या गरिबी आणि आजारपणाने पिचलेल्या भक्तांचं आर्थिक शोषण करणं सोपं असतं. अशा केसेसमध्ये सहसा तो मुख्य बुवा/माता निरागस असतात. त्यांचा मेंदू कुणाचं शोषण करण्याइतका चलाख नसतो; पण त्यांच्या आडून हे सोबतचे पट्टशिष्य लबाड्या करतात. भक्तांना घाबरवून लूट करतात.
गरिबी, बेरोजगारी, आजारपण, कौटुंबिक कलह इत्यादी दुःखांनी वैतागलेल्या लोकांना हे तथाकथित देवरूपी बाबा-बुवा-माता आश्वासक वाटू लागतात, आपल्यावर कृपा झालीच तर आपली सर्व दुःखे दूर होतील या आशेने ते बिचारे जाळ्यात फसतात. आधीच भयग्रस्त मन शंका घ्यायला घाबरतं, कोप होईल या भीतीने निंदा करणं टाळली जाते. आपल्याला नसेल झाला लाभ, आपलंच काही चुकलं असेल, आपणच पापी असणार अशी स्वतःची समजूत घालून ते निगेटिव्ह बोलणं टाळतात.
माझी दुःखं दूर करायला कोणीतरी मसीहा अवतार येईल, माझ्यावर कृपादृष्टी टाकून माझं कल्याण करेल अशी आशा भक्तांच्या मनात असते. अशा रितीने दैववाद माणसाला पोकळ बनवत असतो.
३) अनिरुद्धाचार्य
दैनंदिन व्यवहारात ताकही फुंकून पिणारे तथाकथित बुद्धिजीवी धर्मक्षेत्रात मात्र आपली बुद्धी कशी काय गहाण ठेवत असतील याचंच आश्चर्य वाटतं. धर्मक्षेत्रात चिकित्सा करणे, शंका घेणे निषिद्ध असतं.
शास्त्रवचनांवर शंका उपस्थित करणं म्हणजे अधर्मी कृत्य मानलं जातं. अध्यात्मावर प्रवचन करणारी व्यक्ती ही पवित्रच असते आणि त्या व्यक्तीने केलेलं वक्तव्य त्रिकालाबाधित सत्य असतं हे विनाशर्त मान्य करणे हीच भक्तीची पहिली अट असते आणि म्हणूनच अशा ‘धर्माधिकारी’ व्यक्तीने बोललेल्या अगदी निरर्थक, हास्यास्पद, बेताल आणि बिनबुडाच्या गोष्टीही मोठ्या भक्तिभावाने ऐकल्या जातात. त्यांनी सांगितलं, तुम्ही ते मान्य करा. विषय संपला.
भक्तिमार्गातील या अलिखित नियमाचा गैरफायदा घेऊन मनात येईल ते काहीही बरळणार्या बुवा बाबांचं हल्ली मोठं पीक आलं आहे. अनिरुद्धाचार्य महाराज त्यातलेच एक. हे महाशय काहीही बरळतात. अक्षरशः काहीही!
बिस्कीट म्हणजे ‘बिष-किट’ (विषाची किट) असं तो म्हणतो; पण ऐकणार्या हजारो श्रोत्यांपैकी एकही जण त्यावर आक्षेप घेत नाही की साधी शंकाही घेत नाही. मूर्खासारखे माना डोलावतात. या अनिरुद्धाचार्यचे करोडो भक्त आहेत. या भक्तांना हा महाराज असं कोणतं दिव्य ज्ञान देत आहे? की त्यांच्या कोणत्या समस्या तो सोडवत आहे? त्याच्यापाशी जाणारे बहुतांश भक्त हे अल्पशिक्षित आणि गरीब मध्यमवर्गीय आहेत; पण बरेच उच्चशिक्षित डॉक्टर्स इंजिनीयर्ससुद्धा त्याच्या सत्संगात बसलेले दिसून येतात. या सुशिक्षित लोकांच्या डोक्यात तर्क आणि चिकित्सा करणारे मेंदूचे कप्पे मिसिंग तर नसतील ना?
कोणत्याही महाराजांपाशी कुणाच्याही कोणत्याही समस्येचं निराकरण नसतं. ते कोणत्याही ज्वलंत प्रश्नावर मार्गदर्शन करू शकत नाहीत. तरीदेखील त्यांच्या पुढ्यात हात जोडून कृपेची याचना करणार्या लोकांची इतकी प्रचंड गर्दी कशी काय जमत असेल?
याचं कारण म्हणजे लोकांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेलाच नाही. शाळेत कॉलेजात विज्ञान तर शिकवलं जातं; परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं तर सोडाच, जर एखाद्या विद्यार्थ्यात थोडाफार उपजतच असेल तर तोही गळा दाबून मारला जातो.
देवाधर्माबाबत ‘जाणता’ म्हणून जराशीही ख्याती प्राप्त असेल तर त्या व्यक्तीभोवती भक्तांची गर्दी जमू लागते. त्या व्यक्तीला खरोखरच कोणतं दिव्य ज्ञान, दिव्यदृष्टी किंवा काही विशेष दिव्यशक्ती प्राप्त झाली आहे का? हा प्रश्न कुणी विचारत नाही. तो सांगत असलेल्या गोष्टी अर्थात आध्यात्मिक ज्ञान खरोखरच देवामार्फत येत आहे का? ही शंका कुणी घेत नाही. त्या तथाकथित धर्माधिकार्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची कुणी तसदी घेत नाही. मुळात तसं करण्याची कोणतीही सोयच नसते, असली तरीही ते करण्याची मुभा भक्तांना दिलेली नसते. भक्तिमार्गात हीच तर पूर्वअट आहे.
चिकित्सा करणार तरी कशी? ती करण्यासाठी आवश्यक असलेली तर्कबुद्धी आणि धाडस कुठून आणणार? एखाद्याने धाडस केलंच तर त्या महाराजाआधी त्याच्या अंधभक्तांची झुंडच तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पुढं येईल. या झुंडींना अक्कल नसते. त्यांना स्वतःचा विवेकही नसतो. त्यांच्या गुरुजी/स्वामींनी त्यांचा विवेक आधीच पंगु करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपल्या गुरूंना; पर्यायाने गुरूंच्या पाखंडाला पाठीशी घालत त्यांचं रक्षण करण्यासाठी ही विवेकहीन निर्बुद्ध बिनपगारी फौज तैनात असते. ही फौज खूप ताकतवान असते; पण ही ताकत दंडात आणि दंडुक्यात असते, डोक्यात नसते, बुद्धीत नसते. दंडुकेशाहीच्या जोरावर ही माणसं विवेकाचा आवाज बंद करू पाहतात. काही अंशी ते तसं करण्यात यशस्वी होतात; परंतु असं करून ते आपल्याच पिढ्या नासवण्याच्या गोरखधंद्यास हातभार लावत असतात. एका अर्थाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत असतात.
भक्तीच्या नावाखाली आपली तर्कबुद्धी आणि विवेक गहाण ठेवून शेवटी त्यांना काय प्राप्त होत असेल? याचं मूल्यांकनसुद्धा ते करत नाहीत. आपण काय मिळवलं, आपण कुठं पोचलो, आपल्या जगण्यात जीवनात असा कोणता आमूलाग्र आणि स्थायी बदल घडून आला, यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्यापाशी नसतं.. इनफॅक्ट हे प्रश्नच त्यांच्या डोक्यात कधी डोकावत नाहीत. यालाच ते ‘निस्सीम भक्ती’ असं गोंडस नाव देतात. भगवं नेसलेली अन् कपाळावर टिळा लावलेली व्यक्ती ज्ञानीच असते हे पक्कं डोक्यात ठसवलं असल्याने ते शुअर असतात. कॉन्फिडन्ट असतात.
आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांचं समाधान अंगठीच्या खड्यात, नावाच्या स्पेलिंगात, टॅरो कार्डात, कुंडलीत, ग्रहतार्यात शोधणार्या लोकांचे मेंदू किती कमकुवत असतील विचार करा. भेदरलेल्या, घाबरलेल्या या लोकांपुढं देवाचा अवतार म्हणून आठ-दहा वर्षांचं शेंबडं पोरगं जरी उभं केलं तरीही ही लाचार जमात त्याच्या पायावर डोकं ठेवायला तयार असते. लग्न जुळावं म्हणून, पोरगं व्हावं म्हणून, नोकरी मिळावी म्हणून, आजारपण ठीक व्हावं म्हणून या निर्बुद्ध लोकांचे जत्थेच्या जत्थे ढोंगी बुवा बाबांच्या आश्रमात रांगा लावून उभे असतात. यातल्या ९९ टक्के लोकांना देवाशी अन् भक्तीशीही काही घेणंदेणं नसतं. यांना फक्त आपलं जीवन सुखप्रद करायचं असतं, काही जणांना आपल्या बेइमानीच्या मिळकतीचा हिस्सा देवापर्यंत पोचवण्यासाठी एक एजंट हवा असतो, जो या पापाच्या कमाईच्या अपराधबोधातून यांची सुटका करून यांना नरकातून वाचवू शकेल. हे ढोंगी बुवा बाबा म्हणजे ते एजंटच असतात.
कुठेही स्वर्ग नाही, स्वर्गाचे आमिष आहे.
कुठेही नरक नाही, नरकाची भीती आहे.
हा सर्व खेळ या भीतीवरच उभा आहे.
४) तोचि साधू ओळखावा!
तब्येत बिघडली तर डॉक्टरकडे जायचं असतं. गाडी बिघडली तर मेकॅनिककडे. नशीब बिघडलं तर कुठं जायचं? माहीत नाही. नशीब कोण लिहितं?….देव!
पण आता देवाला कसं गाठायचं? माहीत नाही!
कुणाला माहीत आहे? देवाच्या माणसांना.. अर्थात बुवा-बाबा-बापू-स्वामी-महाराज-मौलाना- पाद्री लोकांना. या लोकांना खरंच देवाबद्दल माहिती असते का? खात्री नाही! परंतु असावी असं आमच्या मनाला वाटतं. नव्हे, तसं वाटून घेणं ही आमची अगतिकता आहे. अन्यथा आमचा शेवटचा आधारही सुटेल. कोणती आशाच उरणार नाही. मनाला तेवढाच तर एक धीर आहे. तोही हिरावून घेतला तर कुणाच्या तोंडाकडं पाहायचं?
माझ्या जीवनात निर्माण झालेली समस्या नेमकी कशामुळे झाली याचं ज्ञान नसल्याने प्रारब्ध, नशीब, भोग इत्यादी गोष्टींना थारा मिळतो. समस्येच्या मुळाशी कोणतं कारण आहे हे जेव्हा अज्ञात असतं तेव्हा सुरू होतो गूढवाद.
या सृष्टीत काहीतरी गूढ रहस्यमय नक्कीच असणार आणि तिथपर्यंत पोचलेली काही माणसं हमखास असणार असा कयास बांधला जातो. प्रत्येक घटनेमागे काहीना काही कार्यकारणभाव असतो हे आपल्या मेंदूला माहीत असल्याने हा तर्क योग्य वाटू लागतो; परंतु ते गूढ काय आहे हे माहीत नसतं. ते माहीत असण्याचा दावा काही स्वयंघोषित साधु-संत करत असतात. ते सिद्ध करण्यास ते असमर्थ असले तरीही ते लोकांना तसं पटवून देण्यात पटाईत असतात. प्रत्येकाच्या बुद्धीला ते पटणार नाही, याची कल्पना त्यांना असते तरीही ते पटवून घेणार्यांचीही संख्या अफाट आहे हे गणितही त्यांना ठाऊक असतं. अशा कमबुद्धी लोकांच्या जिवावरच त्यांना आपलं सिंहासन थाटायचं असतं आणि यांचं संख्याबळ प्रचंड असतं.
हळूहळू ही गर्दी वाढत जाते. गर्दी गर्दीला खेचत असते. एकदा का या गर्दीचा फुगा फुगला की मग त्यांच्यावर कुणीच शंका घेत नाही. इतके सगळे लोक काय मूर्ख असतील का? हा बालिश तर्क देऊन, हा सगळा व्यापार जस्टीफाय केला जातो.
मी ईश्वराचा प्रेषित आहे किंवा मी ईश्वराशी संपर्क स्थापित झालेला मनुष्य आहे ही घोषणा तर मी केली; परंतु हे सिद्ध करण्यासाठी माझ्यापाशी पुरावे तरी कोणते आहेत? निकष तरी कोणते आहेत? अशी कोणती खूण, असा कोणता संकेत आहे अशी ‘पोचलेली’ माणसं ओळखण्याचे? कोणतेच नाही.
पुरावे नसले की, मग आप्तवचन प्रमाण मानलं जातं. शब्द प्रमाण. शास्त्र प्रमाण; पण हे प्रमाण किती विश्वासार्ह आहे? विश्वासार्हता सिद्ध करता येत नसेल तिथं मग श्रद्धा येते. श्रद्धा किंवा आस्था ही भावनेच्या क्षेत्रात येते. व्यक्तिगत भावना नेहमीच नाजूक असते; परंतु ती जेव्हा सामूहिक रूप घेते तेव्हा ती शक्तिशाली होते. ही शक्ती बरेचदा विधायकही असते. तिच्यामार्फत अनेकदा दुर्बलांची सेवाही घडून येते. असे असले तरीही ही शक्ती तेवढीच विघातक असते हेही अमान्य करता येणार नाही.
आस्थेपायी एकत्र जमलेल्या भक्तगणांचा चेंगराचेंगरी होऊन मृत्यू होतो. आस्थेतून जन्मलेल्या अंधश्रद्धेपायी कित्येकांचा बळी जातो. ही त्या शक्तीची विघातक बाजू.
पूर्वीच्या काळी खरा साधु/संत ओळखण्याचे काही निकष असायचे. इंद्रियांवर आणि मनाच्या विकारांवर विजय प्राप्त केलेल्या व्यक्तीची अंतर्गत अवस्था प्रकट करणारी काही बाह्यलक्षणे ग्राह्य धरली जायची. जसे की वैराग्य प्राप्त झालेलं असल्याने ती व्यक्ती घरदार आणि सर्व सुखसोयींचा त्याग केलेली असायची. आत्मिक आनंद हाच सर्वोत्तम आनंद असल्याचा अनुभव प्राप्त झाल्याने इंद्रियसुखाची गरजच उरली नाही म्हणून मग ते ब्रम्ह्चर्य पालन करायचेत. हे जग नश्वर असून सर्वकाही स्वप्नवत असल्याने आपल्या मालकीची कोणतीही भौतिक संपत्ती ते बाळगतही नव्हते आणि उपभोगही घेत नव्हते. सर्व चराचरात केवळ तो एकमेव परमेश्वर वास करत असतो असा साक्षात्कार झाल्याने ते स्वतःही अहिंसा आणि एकात्मता आचरणात आणायचे आणि आपल्या अनुयायांकडून तसं आचरण करवून घ्यायचे. पण आता कुठं आहेत असे महात्मे?
आता जे आहेत ते तर सर्व अगदी हे विपरीत आचरण करताना दिसतात. ऐशोआरामात जगतात, लग्झरी गाड्यांतून फिरतात, चार्टर्ड विमान, फाइव्ह स्टार हॉटेल्स, महागडी भरजरी वस्त्रे नेसतात. हिंसेला समर्थन करतात. अनुयायांची माथी भडकवतात. लैंगिक गुन्हेगारीत सापडतात.
हे खरे साधू आहेत, की ढोंगी आहेत, याचा विचार त्यांच्या अनुयायांनीच करायला हवा. तुमच्या स्वच्छ पवित्र धर्माचा अवमान करण्याचं काम हे ढोंगीच तर करताहेत, मग शिव्या का बरं विवेकवाद्यांना घालता?
– डॉ. विजय रणदिवे, नागपूर
लेखक संपर्क : ९८२३८ ७१४४३