डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु करणार!

-

लातूर येथे झालेल्या अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

            महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन १३ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथे झाले. याचे उद्घााटन माजी खासदार गोपाळराव पाटील यांनी ज्येष्ठ विधिद्य अण्णाराव पाटील यांच्या उपस्थितीत केले. यावेळी अंनिस ट्रस्ट अध्यक्ष गणेश चिंचोले हे उपस्थित होते.

            माजी खासदार गोपाळराव पाटील म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन हे सकारात्मक पद्धतीने झाले पाहिजे. असते. जगात एक विकृती दिसते. लोक न्यायालयात शपथेवर खोटे बोलतात. अशा लोकांची संख्या कमी असते, पण आपल्याला वाटते की हेच लोक खरे आहेत. या लोकांपासून सावध व्हा, हे सांगणारा खरा सत्यवादी असतो. अंधश्रद्धेचा पगडा जबरदस्त आहे. आज आमच्या सर्व व्यवहारांत अनीती आहे. खरं वागावं एवढंच आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे अंनिस चळवळीने अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे.”

            अण्णाराव पाटील, वरिष्ठ विधीज्ञ यांनी वैचारिक चळवळी आणि बंडखोर विचारांच्या इतिहासाची विस्तृत मांडणी केली. ते म्हणाले, “या देशात पाच हजार वर्षांपासून कथा, प्रवचन हे सगळं चालू आहे. अंनिसने जो आंतरजातीय विवाहाचा मुद्दा उचलला त्याला मी पाठिंबा देतो. देव, देश, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित काम करणे हा मार्ग मी निवडला आहे. दाभोलकर सरांबरोबर संत तुकाराम यांचे अभंग सुद्धा तेवढेच भेदक आहेत. “परोपकार ते पुण्य, परपिडा ते पाप!” “असा कसा हो तुमचा देव, घेतो बकर्‍याचा जीव!” यासारखे अभंगातून अंधश्रद्धा निर्मूलनचा विचार व्यक्त होतो. यावेळी विचार असून चालत नाही, ते विवेकवादी असले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. तुमची माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे. राजकारणी लोकांनी भोंदू बाबांचे अनुकरण करून प्रस्थ वाढवू नये. सनातनने दाभोलकर यांचा बळी घेतला. मी माझ्या कामात वकिलाच्या पक्षकारांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करतो. सगळ्या धर्मांत पुराणमतवादी लोक आहेत. त्याविरोधात आपला लढा आहे. सगळ्यात जास्त अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे देवाला जाताना पडतात. सर्व धर्म हे अंधश्रद्धेने ग्रासलेले आहेत. जातीवाद आणि धर्मवाद यावर उत्तर म्हणजे आंतरधर्मीय लग्न! राजकारणात, समाजकारणात धर्म आणू नये. तुम्ही सत्तेत नसाल, पण तुम्ही देश बदलू शकता. तुम्ही सर्व विचारांचे वाघ आहात. फक्त तुम्ही स्वतःला ओळखायला शिका.”

            डॉ. हमीद दाभोलकर यांनी कार्यकारिणी बैठकीचे प्रास्तविक केले. त्यांनी चळवळीच्या आणि संघटनेसमोरील आव्हानाची चर्चा केली. धर्माची चिकित्सा करणार्‍यांना देशद्रोही म्हणले जाते, ते एक आव्हान आहे. आतापर्यंत चळवळीने केलेल्या कामामुळे झालेले परिवर्तन तसेच मंजूर झालेल्या कायद्यांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तसेच पर्यावरणपूरक गणपती, मेळघाटातील अंधश्रद्धा विरोधी मोहीम, आंतरजातीय लग्न वेबसाईट असे अनेक उपक्रम आता चालू आहेत, याबद्दल त्यांनी माहिती दिली.

            स्वागतपर मनोगत प्रकाश घादगिने यांनी व्यक्त केले. प्रा. रमेश माने यांनी सूत्रसंचालन केले. लातूर शाखेचे अध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब गोडबोले यांनी आभार प्रदर्शन केले. अण्णा कडलसकर यांनी अभिवादन गीत, “संकल्प आमुचा एकच आहे रे, विवेकवादी जग हे व्हावे रे” सादर केले.

लातूर राज्य कार्यकारणीमध्ये झालेले निर्णय

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारणी ची बैठक शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी लातूर येथे ओम मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील २६५ कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.

शनिवारी १३ सप्टेंबर रोजी कार्यकारणीच्या सकाळच्या सत्रामध्ये १९ जिल्ह्यांचे कार्य अहवाल सादरीकरण झाले.

त्यानंतर दुपारच्या संघटना बांधणी या सत्रात अंनिसची सभासद नोंदणी मोहीम ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत राबविण्याचे ठरले. त्यासाठी संघटनेने जो छापील फॉर्म दिला आहे तो प्रत्येक सभासदाकडून भरून घ्यावा.

शाखा कार्यकारिणी निवड प्रक्रिया ही सभासद नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२६ अखेरपर्यंत करावी. शाखेची कार्यकारणी दिलेल्या फॉर्ममध्ये भरून सातारच्या मध्यवर्ती कार्यालयाला पाठवावी.

शाखा निवडीनंतर जिल्हयाची कार्यकारिणी निवड ही जानेवारी- फेब्रुवारी २०२६ मध्ये करावी. निवड झालेल्या जिल्हा कार्यकारिणीची यादी सातारला मध्यवर्तीला पाठवावी.

फेब्रुवारी २०२६ च्या दुसर्‍या आठवड्यात होणार्‍या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये राज्य कार्यकारणी आणि कार्यकारी समिती निवड केली जाईल. त्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून स्वेच्छा फॉर्म भरून घेतले जातील.

यानंतर खालील राज्यस्तरीय उपक्रमांचे नियोजन सर्वांच्या विचारविनिमयाने केले गेले.

१. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे सहा ऑनलाईन अभ्यासक्रम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीदिनी म्हणजे एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे ठरले. या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, फसवे विज्ञान, व्यसनमुक्ती, भ्रामक वास्तूशास्त्र इत्यादीचा समावेश आहे.

२. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर राज्यस्तरीय शिक्षक शिबिर आयोजित केले जाईल.

३. राज्यातील सहा महसुली विभागात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने दोन दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील.

४. राज्यातील ५०० शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

५. मेळघाट डंभा प्रथा विरोधी मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात करण्यात येईल.

६. आदिवासी/भटके विमुक्त युवा कार्यकर्ता राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात येईल.

७. आंतरजातीय वधू वर सुचक केंद्र वेबसाईटवर जास्तीत जास्त वधू-वराने नोंदणी करावी यासाठी शाखांनी प्रयत्न करावेत.

८. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वार्षिक अंक जाहिरात आणि वर्गणी संकलन मोहीम सुरू करावी. मागील वर्षीपेक्षा दहा टक्के जास्त जाहिराती आणि देणगी मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पहिल्या टप्प्यातील जाहिराती या १५ ऑक्टोबरपर्यंत आणि दुसर्‍या टप्प्यातील जाहिराती दिवाळीनंतर २५ ऑक्टोबरपर्यंत पाठवाव्यात. १० नोव्हेंबरला वार्षिकांक प्रसिद्ध केला जाईल.

९. पुस्तक विक्री नियोजन दिवाळी सुट्टीमध्ये मुलांना वाचण्यास बाल साहित्याची पाच पुस्तके आणि दाभोलकर स्मृती ग्रंथमाला याची पुस्तक विक्रीसाठीचे राज्यस्तरीय नियोजन केले गेले. आपल्या ओळखीतील शाळांना भेट देऊन त्यांनी मुलांसाठी बालसाहित्य खरेदी करावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

१०. व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी तयार केलेले विवेकरेषा व्यंगचित्र प्रदर्शन राज्यभर लावावे यासाठी शाखांनी नियोजन करावे.

११. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ परीक्षा, बालसाहित्य पुस्तक विक्री, राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर यासाठी आपल्या गावातील शिक्षकांची नावे व फोन नंबर मध्यवर्तीला कळवावे. त्यासाठी जो फॉर्म तयार केला आहे, तो भरून सर्वांनी लवकर पाठवावा.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]