संजय बनसोडे -
सांगलीत ‘अंनिस’ आणि शिक्षण विभागाने दहा हजार मुलांना सूर्यग्रहणदर्शन घडविले
देशातील अशा पहिल्याच उपक्रमाचा सांगलीकरांना मान
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘सूर्योत्सव सांगली 2019’ या उपक्रमास विक्रमी प्रतिसाद मिळाला. दहा हजाराहूंन अधिक विद्यार्थी, नागरिकांनी सूर्यग्रहणाचा नजराणा अनुभवला. भारतामधील एकाच ठिकाणहून इतक्या संख्येने सूर्यग्रहण अनुभवण्याची पहिलीच घटना आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर घडली. सकाळी आठपासून सूर्यग्रहण पाहण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘सूर्योत्सव सांगली 2019’ उपक्रमामुळे ग्रहणाबाबतच्या अंधश्रद्धा, गैरसमज दूर होईल. सांगली शहरासाठी हा वैज्ञानिक उपक्रम पथदर्शी ठरेल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, “शिक्षण विभाग आणि अं.नि.स.चा उपक्रम वैज्ञानिक मूल्य रुजविण्यासाठी फायदेशीर ठरेल. ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा आहे. ग्रहणाच्या निरीक्षणामुळे भावी काळात यातील काही संशोधन बनतील. मीही हा खगोलीय आविष्कार अनुभवला. खूप विलक्षण अनुभव होता.”
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग म्हणाले, “वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्यात डोळसपणा वाढवा, शोधक वृत्तीचा विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, “संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक मूल्य रुजविण्यासाठी अं.नि.स. नेहमीच प्रयत्नशील राहते. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ग्रहणाबाबत वैज्ञानिक माहिती पोचवण्याचे काम आम्ही केले आहे. निर्भयपणे मुले ग्रहण पाहतात, ही प्रेरणादायी, आशावादी बाब आहे.”
ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी ग्रहणाबाबत प्रभावी समालोचन करत खगोल वैज्ञानिक माहिती देत होते. या ग्रहणाच्या पाहण्याने, अनुभवण्याने मुलांच्या मनातील गैरसमज दूर होतील, असे स्पष्ट केले.
प्रा. डॉ. नितीन शिंदे, प्रा. प. रा. आर्डे, डॉ. संजय निटवे, संजय बनसोडे यांनी ग्रहणांची माहिती दिली. वैज्ञानिक विवेचन केले. राहुल थोरात यांनी आभार मानले.
शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, विस्ताराधिकारी एस. एस. भांगडे, विस्ताराधिकारी एस. एस. बस्तवाडे, गुरव मॅडम, महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते नीलेश कुडाळकर, शशिकांत सुतार, दिलीप क्षिरसागर, विशाखा थोरात, सुहास पवार, सुहास येरोडकर, आशा धनाले, डॉ. संतोष अक्कोळे, त्रिशला शहा, प्रा. अमित ठकार, प्रज्वल पाटील, दीपक सुतार, धनश्री गावडे यांनी केले.
विजय नांगरे, मयुरी जाधव, अवधूत कांबळे, विवेक कुलकर्णी यांनी विज्ञानगीते सादर केली.
‘सूर्योत्सवा’ची क्षणचित्रे :-
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी आणि ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी मुलांसोबत सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.
ग्रहणकाळात विद्यार्थ्यांनी खाऊ खाल्ला, पाणी पिले. ग्रहणकाळात अन्नपाणी दूषित होते अशा अंधश्रद्धेला विद्यार्थ्यांनी झुगारले, मंचावरील मान्यवरांनीही खाऊ खाल्ला, पाणी पिले.
‘आमची सांगली – सोलर सांगली,’ ‘सोलर सांगली – लय लय चांगली’ अशा घोषणा उत्स्फूर्तपणे विद्यार्थी देत होते.
केरळमध्ये दिसणार्या ग्रहणाचे थेट प्रक्षेपण सांगलीतील मुलांना अनुभवयास मिळाले. कंकणाकृती सूर्यग्रहण दिसताच स्टेडियमवर मुलांनी एकच जल्लोष केला.
सौर चष्मे वापरून विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाचा आनंद घेतला.
सूर्यग्रहणाच्या ‘सेल्फी पॉईंट‘वर तरुणाईने गर्दी केली होती.
‘अंनिस‘ची आरोग्य, आपत्कालीन टीम सज्ज होती.
काही वेळ ढग होते, मात्र ढगांच्या पातळ थरातून ग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत होते.
ग्रहणकाळात सूर्य हळूहळू झाकला जात असताना प्रत्यक्ष डोळ्यात साठवून ठेवण्याचे काम विद्यार्थी करत होते.
सव्वालाख अधिक व्ह्यूअर्सनी हा कार्यक्रम फेसबुकवर पाहिला.
कार्यक्रम झाल्यावर अं. नि. स. चे कार्यकर्ते, शिक्षण विभागातील अधिकारी यांनी स्टेडियमवर स्वच्छता केली.
खंडग्रास ग्रहणाची विविध विलोभनीय रुपे पाहून मुले हरकून गेली होती.
संजय बनसोडे (राज्य प्रधान सचिव) महाराष्ट्र अंनिस