अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच असहमतीचे, चिकित्सा करण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य

डॉ. प्रमोद दुर्गा -

धार्मिक बाबतीत न्यायालयाचे निर्णय

हूलीकल नटराज यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात 2008 साली एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की, मदीकेरी कोर्टाने त्यांच्याबाबत दिलेला निर्णय रद्द व्हावा आणि त्यांच्याविरोधात दाखल झालेली तक्रार रद्द व्हावी. नटराज हे बेंगलोर जिल्ह्यामधील स्वामी विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. चमत्कारामगील सत्य उजेडात यावे आणि बुवाबाजी थांबावी, यासाठी नटराज राज्यभर फिरत असतात आणि लोकांना चमत्कारामागचे सत्य समजावून सांगत असतात. अंधश्रध्दा निर्मूलन करण्यासाठी आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोन जनमानसात रुजवण्यासाठी त्यांचे काम मोलाचे आहे.

मदीकेरी गावातील शिवशक्ती युवा या संघटनेने त्यांना 2006 मध्ये चमत्कारावर व्याख्यान द्यायला बोलवले होते. तिथे त्यांनी बुवाबाजीचा भांडाफोड करणारे भाषण केले. या कार्यक्रमाला स्थानिक लोक हजर होते. या कार्यक्रमात त्यांनी ‘तलकावेरीसारखे पाणी निर्माण करतील’, ‘अयप्पास्वामी यांच्या मंदिरात गरुडगर्भाच्या भोवती गरुड फिरतो हे चुकीचे आहे’ आणि ‘मकर संक्रांतीला दिवा पेटतो हे चुकीचे आहे,’ अशी मतं मांडली.

यावर बजरंग दलाचे एक कार्यकर्ते के. एच. चेतन यांनी मदीकरी पोलीस स्टेशनला नटराज यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली आणि नटराज यांनी हिंदू धार्मिक श्रध्दा, चाली-रीती आणि परंपरा दुखावल्या आहेत म्हणून त्यांच्याविरोधी योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक पोलिसांकडे केली. त्यावर स्थानिक पोलिसांनी आय.पी.सी.च्या 153 अ नुसार त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करून गुन्हा नोंद केला. यावर तेथील न्यायालयाने गुन्ह्याची दखल घेऊन नटराज यांच्यावर अजामीनपत्राचे वॉरंट काढले.

हा स्थानिक कोर्टाचा निर्णय रद्द व्हावा आणि याबाबतची तक्रार सुध्दा रद्द व्हावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून नटराज यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात केली. हा खटला नटराज विरोधी कर्नाटक सरकार असा प्रसिध्द आहे.

त्यावर निकाल देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते आणि बुवाबाजीविरोधी लढा देणारे नटराज यांच्या बाजूने निकाल दिला. याबाबतची तक्रार रद्द करून त्यांचे अटक वॉरंटही रद्द केले. या निकालात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रध्दा, अंधश्रध्दा, वैज्ञानिक द़ृष्टिकोन, मूलभूत कर्तव्य यावर उच्च न्यायालयाने उद्बोधक चर्चा केली असून भारतीय नागरिकांनी हा निकाल अभ्यासावा आणि या विषयावर आपली मतं अधिक परिपक्व करावीत, असे वाटते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

माणसाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोठ्या त्यागातून आणि झगडून मिळवलेली गोष्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य लढा हासुध्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग होता. इतर अनेक मूल्यांपैकी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार मिळवून देणे, हे स्वातंत्र्य लढ्याचे एक मूल्य होते आणि आपल्या घटनाकारांनी सुध्दा लोकशाही रचनेच्या मूलभूत गाभ्यात याचा समावेश केला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रतिध्वनीच कलम 19 मधून व्यक्त झालेला आहे; पण हा अधिकार अमर्याद नाही. भारताची एकता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, राज्याची सुरक्षा राखण्यासाठी, इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी, सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकता अबाधित राखण्यासाठी, न्यायालयीन अवमानाच्या बाबतीत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करण्याचे कायदे करू शकते.

या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच ‘मतभेदाचा अधिकार’ सुध्दा आहे. मतभेदाचा अधिकार नष्ट करण्याचा अधिकार आपले संविधान देत नाही. मतभेदाच्या विरोधी असलेली कोणत्याही प्रकारची असहिष्णुताही लोकशाहीसाठी घातक आहे. मतभेदाचा अधिकार भुतकाळाच्या किंवा वर्तमानकाळाच्या प्रतिबंधनांनी बाधित होत नाही. जर एखाद्या व्यक्तीने मतभेदाचा अधिकार अमलात आणला तर राज्यांनी आपल्या वाजवी निर्बंधात येत नाही, तोपर्यंत यामध्ये हस्तक्षेप करू नये. राज्यावर हे बंधन आहे की, प्रत्येक भारतीय आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद मतभेदाच्या अधिकारासहीत घेईल, याची तजवीज करावी किंवा याची खात्री द्यावी.

एखाद्या समाजाच्या सामाजिक विकासासाठी लोकांच्या मनांच्या मुक्त आविष्काराची संधी निर्माण करणे अपरिहार्य आहे. यासाठी सत्य शोधण्याचे माणसाचे स्वातंत्र्य कोणत्याही रुढीवादाच्या आव्हानांमध्ये प्रतिबंधित होत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे आवश्यक आहे. पारंपरिक शहाणपणाशी फक्त सहमत होऊन विकास होणार नाही, तर धैर्याने आणि वैज्ञानिक विवेकाच्या आधाराने लोकांना त्यांची मतं बदलवायला प्रवृत्त केले पाहिजे. वैचारिक प्रक्रियेचा विकास होण्यासाठी, तर्कसंगतता फुलण्यासाठी, विवेकाचा मुक्त आविष्कार होण्यासाठी, बौध्दिक आणि मानसिक क्षितिजे विस्तारण्यासाठी आणि माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची मतं आणि विचार अनुभवायला आणि उपभोगायला मिळाली पाहिजेत. लोकशाहीमध्ये राज्याने किंवा सरकारने आपल्या लोकांना सर्व प्रकारची मतं आणि विचार अनुभवण्याची आणि उपभोगण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

भारताला सत्याचा शोध घेण्याचा आणि अंधश्रध्दांना आव्हान देण्याचा मोठा इतिहास आहे. गौतम बुध्द ते बसवेश्वर यांच्यापर्यंत विवेकी आणि मुक्त विचारांच्या चर्चेचा इतिहास आहे. बसवेश्वरांच्या हजारो वचनांचा जन्म यातूनच झाला आहे. या वचनांचा अंतिम उद्देेशवर्गरहित, जातविरहित आणि लिंगभेदभाव नष्ट करणे हाच आहे.

ज्ञान आकाशातून धर्मदीक्षा म्हणून आणता येत नाही किंवा ज्ञान म्हणजे काही तयार वस्तू असत नाही. वर्तमानकाळातील गरजांनुसार समकालीन मानवी ज्ञान तयार होत असते. मानवी अनुभवाचे ज्ञान जेव्हा चिकित्सेच्या कसोटीला उतरते, तेव्हा विवेकवादाचा जन्म होतो आणि हाच विवेकी विचार पुरोगामी असतो. याच प्रक्रियेमधून मानवी सभ्यतांचा विकास शिकारी युगापासून डिजिटल युगापर्यंत झाला आहे. चिकित्सेला सावधगिरीची जोड असावी. विध्वंसक किंवा इजा करणारी चिकित्सा नसावी. तिरस्कार करण्याच्या किंवा भेद निर्माण करण्याच्या उद्देशाने चिकित्सा केलेली नसावी किंवा व्यक्ती आणि समाजाला इजा होईल, अशी चिकित्साही नसावी. चिकित्सा ही नेहमी पोषक, निकोप, विधायक असावी. चिकित्सा चूक दुरुस्त करून आहे त्यापेक्षा अधिक चांगल्याकडे नेणारी असावी, म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यात चिकित्सेचे स्वातंत्र सुध्दा सामावलेले आहे. पोषक, निकोप आणि विधायक चिकित्सा करणार्‍या लोकांचे संरक्षण करणे, ही राज्याची किंवा सरकारची जबाबदारी आहे. विधायक चिकित्सेबरोबर राहणे, हे समाजाचेही बंधन आहे.

अंधश्रध्दा

अंधश्रध्दा व अंधविश्वास आणि श्रध्दा व विश्वास यामध्ये फरक करणे अवघड आहे. यामधली रेषा अधिक पुसट आहे. काही श्रध्दा आणि विश्वास स्पष्ट आहेत, काही नाहीत. काही विश्वास आणि श्रध्दा या अहिंसक, मनाला समाधान देणार्‍या आणि आत्मविश्वास निर्माण करणार्‍या आहेत; तसेच लोकांच्या उपयोगाच्या आहेत. कार्यकारणभाव, ज्ञान आणि अनुभव यांच्या कसोटीला न उतरणारा अंध विश्वास आणि श्रध्दा यांना अंधश्रध्दा असे म्हटले आहे. अशा अंधश्रध्दा जगभर आहेत. भारतीय माणसांचे रोजचे जीवनही अशा अंधश्रध्दांनी नियंत्रित केले आहे.

अंधश्रध्दा हिंसक, धोकादायक, विध्वंसक, हानिकारक आणि अमानवी असतात. माणसाचा बळी देण्याची अंधश्रध्दा अजूनही आहे. डाकीण आणि चेटकीण समजून छळ करून स्त्रियांना मारणार्‍या अंधश्रध्दा आहेत. अंधश्रध्दांनी सगळ्यात मोठे नुकसानही केले आहे की, त्या मूलभूत कारणांच्यावरून लक्ष विचलित करून पराभववादी द़ृष्टिकोन लाचारीने स्वीकारायला लावतात. समस्येच्या मूलभूत कारणांचे समूळ उच्चाटन करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या मार्गात अडथळा म्हणून अंधश्रध्दा उभ्या असतात. अंधश्रध्दा अज्ञानी लोकांना अशक्त बनवतात आणि त्यांना मानसिक आळशीपणाकडे नेतात. अंधश्रध्दा लोकांना ऐतिहासिक आणि उदात्त हिंमत आणि उत्साहापासून लांब ठेवतात.

अंधश्रध्दा माणसाला परिस्थितीच्या सर्वोच्च वातावरणात न ठेवता बाह्य वातावरणाच्या अधिन ठेवतात. स्वविकसित सामाजिक अवस्थेला अंधश्रध्दा कधीही न बदलणार्‍या विधिलिखित नैसर्गिक अवस्थेत ठेवतात. अंधश्रध्दा पिळवणूक, गुलामी, अस्पश्यृता, न्यूनगंड, उच्चगंड, जात, पंथ, लिंग आणि वर्ण यावर आधारित असमानतेला कायम करतात आणि त्यांचा प्रसार करतात. अंधश्रध्दा या काही थोड्या लोकांच्या हातातील हत्यार बनतात, ज्याच्या आधारे ते अज्ञानी माणसांची पिळवणूक आणि फसवणूक करतात.

वैज्ञानिक द़ृष्टिकोन

वैज्ञानिक द़ृष्टिकोनाची चर्चा करताना या निकालात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांना प्राध्यान्य देण्यात आले आहे. पंडित नेहरू यांच्या मते, वैज्ञानिक द़ृष्टिकोनानेच आपण आपल्या देशाचा विकास करू शकतो. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाच्या हत्यारानेच आपण अंधश्रध्दांशी लढू शकतो. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाच्या ढालीनेच आपण भारतीय लोकांचे पूर्वग्रह, अज्ञान, ज्ञानांधकारवाद किंवा प्रतिगामीवाद यापासून संरक्षण करू शकतो, ज्यामुळे लोक गुलामीचे आणि हीन जीवन जगत आहेत.

अनुभवाने आपल्या हे लक्षात आले आहे की, शिक्षण आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून आपण अंधश्रध्दा दूर करू शकतो; पण वैज्ञानिक द़ृष्टिकोन आणि शोधाची प्रेरणा हे अंधश्रध्दा निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. वैज्ञानिक द़ृष्टिकोन कशासाठी पाहिजे? विज्ञान हे आपल्या सभोवतालच्या रचनेचे आणि स्थित्यंतराचे ज्ञान आहे. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा विकास म्हणजे आपल्या सभोवतालचे जग समजावून घेण्याचा प्रयत्न ज्याच्या आधारे आपण अधिक कार्यक्षमतेने आणि आनंदाने कार्यरत राहतो. याच्या आधारे आपण कट्टरतावादाचे वस्तुनिष्ठ आणि विवेकी परीक्षण करू शकतो. परंपरेने चालत आलेल्या अविवेकी व्यवहारांचे निरसन करण्याचे वैज्ञानिक द़ृष्टिकोन, हे एक साधन आहे; तसेच वैज्ञानिक द़ृष्टिकोन असे वातावरण निर्माण करते, ज्यामधून आपण वर्गभेद, गुलामी, अस्पृश्यता, कर्ज किंवा करारी कामगार पध्दत, लिंगभेद आणि वंशभेदाचे निर्मूलन करू शकतो.

वैज्ञानिक द़ृष्टिकोन सत्य, वास्तविक माहिती आणि वास्तववादी दृष्टिकोन यावर आधारित खर्‍या ज्ञानाच्या आधारे धैर्य निर्माण करतो. त्यामुळे माणसामध्ये अशी एक स्वतंत्र क्षमता निर्माण होते, ज्याआधारे एखाद्या प्रमुख व्यक्तीने काय सांगितले, पवित्र अवशेष काय सांगतात यापेक्षा आणि अंधपणे गोष्टी स्वीकारण्यापेक्षा शोध आणि चिकित्सेच्या आधारे गोष्टी स्वीकारल्या जातात. माणसाचे स्वातंत्र्य अभंग ठेवण्याबरोबरच त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा स्वाभिमान वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण करतो. याच्या आधारे एखादी व्यक्ती भ्रामक दंतकथांमधून बाहेर येऊन जीवनाचा खरा अर्थ समजावून घेते. गरज असताना धैर्याने लढण्याचे बळ वैज्ञानिक द़ृष्टिकोन देतो आणि माणसामधून न्यूनगंड नाहीसा करून आत्मविश्वास निर्माण करतो.

मूलभूत कर्तव्यं

वैज्ञनिक द़ृष्टिकोनाच्या विकासाचे महत्त्व ओळखून आपल्या कायदे करणार्‍यांनी 42 वी घटना दुरुस्ती करून ‘वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा, मानवतेचा आणि संशोधक आणि सुधारणेच्या वृत्तीचा विकास करणे’ या तत्त्वाचा समावेश मूलभूत कर्तव्यात केला आहे. यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकांवर वैज्ञानिक द़ृष्टिकोन, मानवता आणि संशोधक वृत्ती विकसित करण्याचे बंधन आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की, आपला समाज अधिक चांगल्या अवस्थेत नेण्यासाठी समाजसुधारणेमध्ये त्याने योगदान दिले पाहिजे आणि जिथे-जिथे भारतीय नागरिकाला आपली मूलभूत कर्तव्ये निभावण्यामध्ये धोका निर्माण होईल, तिथे-तिथे अशा नागरिकाला संरक्षण देण्याचे बंधन राज्यावर आहे. नागरिकांना आपली मूलभूत कर्तव्यं बजावण्यासाठी राज्याला निर्देश देण्यासाठी कोर्टात जाऊन संरक्षण मागता येईल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]