डॉ. दीपक माने -
करणी काढण्याच्या नावाने आर्थिक लूट करणार्या अंभेरी (ता. कोरेगाव) येथील भोंदूबाबा जंगू अब्दुल मुलाणी याला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र अनिष्ट प्रथा आणि नरबळी विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, भोंदूबाबा जंगू अब्दुल मुलाणी (वय ७२, रा. अंभेरी- रहिमतपूर) हा अनेक दिवस नागरिकांना फसवत असल्याची तक्रार ‘महा. अंनिस’कडे आली होती.
सुभाषचंद्र आप्पाजी मदने (रा. रहिमतपूर) यांच्या घरात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वादविवाद चालू असल्याने त्याला कंटाळून काही मार्ग काढण्यासाठी त्यांना यामधील काही लोकांनी जंगू मुलाणी यांच्याकडे जायचा सल्ला दिला होता. या भोंदूबाबाने त्यांच्या घरातील भांडणे त्याच्या दैवी शक्तीने सोडवतो, असे सांगून त्यांना वेळोवेळी अनेक उपाय सांगितले. यामध्ये मंतरलेले पाणी, मंतरलेली वाळू, अंगारा पाण्यात घालून पिणे, असे उपाय सांगण्यात आले. त्यात इतरांकडून १० हजार घेतो, पण गरिबीमुळे तुझे ७ हजारात काम करतो, सांगून त्याच्याकडून पैसे घेतले. विविध उपाय करूनही काहीच फरक न पडल्याने त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अर्जाद्वारे संपर्क केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या सहकार्याने अंनिस कार्यकर्ते व रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबा मुलाणी याचा भांडाफोड केला. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही कारवाई शंकर कणसे, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, मधुकर माने, सीताराम माने, चंद्रहार माने आदी अंनिस कार्यकर्ते तसेच पोलीस तुषार कळंगे, व्ही. आर. खुडे यांनी केली.
– डॉ. दीपक माने