-

नुकताच कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार २०२४ हे वर्ष आजवरचे सर्वांत तप्त वर्ष असल्याचे दाखवून दिलेले आहे. या तप्ततेच्या झळा आता महापूर, भुस्खलन, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा स्वरुपात जगभरातील सर्वच देशांना मग ते प्रगत असोत अगर मागासलेले, गरीब असोत अगर श्रीमंत सर्वांनाच सोसाव्या लागत आहेत. त्यातही जगभरातील वंचित, शोषित वर्गाला या हवामान बदलाच्या संकटाचा फटका सर्वांत जास्त बसत आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात आणि कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजिलीससारख्या धनाढ्य लोकांच्या शहरालगतच्या जंगलात लागलेले वणवे हेही याच हवामान बदलाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. तरीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताक्षणी ट्रम्प यांनी हवामान बदलाच्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या आदेशावर सही केली व आपण पर्यावरणाच्या धोक्यांची काहीही फिकीर करत नसल्याचे दाखवून दिले.
या वणव्यांमुळे ४०,००० एकरातील परिसर जळून खाक झाला. १,५०,००० लोकांना बेघर व्हावे लागले, तर २४ लोकांचे त्यामुळे प्राण गेले. १२,००० घरे या वणव्यात पूर्णपणे नष्ट झाली. हवामान बदलाचे संकट जसजसे गडद बनत चालले आहे, तसतसे टोकाच्या हवामानाची स्थिती जगभरच बनत चालली आहे. कॅलिफोर्नियाला त्याचाच अनुभव आला.
पण या हवामान बदलाच्या संकटापलीकडे जात लॉस एंजेलीसच्या वणव्यांनी तेथील समाजाच्या समस्यांचे जे दर्शन घडवले ते मात्र विचार करायला लावणारे आहे. भांडवली प्रवृत्ती कोणत्या टोकाला जाऊ शकते याचे ते निदर्शक आहे. या वणव्यांनी तुटपुंज्या पगारावर अतिशय घातक कामासाठी वापरल्या जाणार्या तुरुंगातील कैदी कामगारांच्या शोषणाकडे लक्ष वेधविले. कॅलिफोर्नियात कैद्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात काळे अमेरिकन आणि लॅटिनो बहुसंख्य आहे. त्यांना हे वणवे काबूत आणण्यासाठी वापरले गेले. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्स (सीडीसीआर)च्या वृत्तांतानुसार तुरुंगातील ९०० कैदी लॉस एंजेलीस भागातील आग काबूत आणण्याचे काम करत होते. अशा प्रकारचे वणवे विझविण्याच्या कामासाठी ते प्रशिक्षितही नव्हते. तरीही सीडीसीआरनुसार अशा प्रकारच्या अत्यंत घातक कामांसाठी या तुरुंगातील कैदी कामगारांचा वापर केला गेला. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन आणि शिकागो विद्यापीठ लॉ कॉलेज यांच्या २०२२ मधील अहवालानुसार आग विझवताना व्यावसायिक कामगारांपेक्षा तुरुंगातील कैदी कामगारांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. या पाच वर्षांच्या काळात जंगलातील वणवे विझवताना १००० तुरुंगातील कैदी कामगार जखमी झाले असून कमीत कमी चार जणांचा मृत्यू झालेला आहे.
लॉस एंजेलीसमधील विद्ध्वसांने अमेरिकेतील विमा उद्योगाचे खरे स्वरूप दाखवून दिले. ज्या भागात अशा विद्ध्वसांची जास्त शक्यता आहे त्या भागातील पॉलिसी कंपनी रद्द करून टाकते. २०२० ते २०२२च्या दरम्यान विमा कंपन्यांनी कॅलिफोर्नियातील २.८ मिलियन घरविम्याचे नूतनीकरण केले नाही. त्यातील ५,३१,००० विमे लॉस एंजेलीसमधील होते, जेथे वणवे पेटले होते. यातील काही विम्यांचे नूतनीकरण घरमालकांनी केले नसेल; पण बहुसंख्य विमे कंपनीने सरळ रद्द केले. आरोग्यविमा असो अगर नैसर्गिक आपत्ती विमा असो विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना त्यांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत केवळ आपल्या नफ्यासाठी कशा वार्यावर सोडतात, याचे हे उदाहरण आहे. खासगी विमा कंपन्यांच्या या नफेखोरीसाठी विमे रद्द करण्याच्या प्रकारामुळे तेथील सर्वसामान्य लोकांना अतिशय महागड्या, जास्त हफ्ते भराव्या लागणार्या विम्याकडे वळावे लागत आहे.
लॉस एंजेलीसमधील या वणव्यामुळे तेथे घरांचा प्रश्नही उभारून आलेला आहे. हजारो घरे पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे अनेकजण बेघर झाले आहेत. त्यामुळे घरांच्या भाडेबाजाराला प्रचंड तेजी आलेली आहे. त्याचा फायदा घरमालक, जमीनमालक यांनी घेऊ नये म्हणून राज्य आणि शहराच्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी तेथील भाडेकरू हक्क गटांनी केलेली आहे. कारण यापूर्वी न्यू आर्लिन्स येथे आलेल्या कटरिना वादळामुळे झालेल्या विस्थापनानंतर गुंतवणूकदारांनी वादळात उद्ध्वस्त झालेल्या इमारती विकत घेतल्या आणि त्याच्या किंमती वाढवून त्यानंतर घरांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. त्यामुळे काळी अमेरिकन कुटुंबे बाजूला सारली गेली आणि नवी कुटुंबे तेथे राहावयास आली.
तुरुंगातील कैदी कामगारांच्या शोषणापासून विमा उद्योगाच्या अपयशापर्यंत लॉस एंजेलीसच्या वणव्यांनी पर्यावरणविरोधी भांडवलशाही प्रवृत्तीची किंमत शोषित वर्गाला कशी सोसावी लागते, हे दाखवून दिले त्याची ही काही उदाहरणे; पण त्यालाही सोनेरी किनार आहेच. लॉस एंजेलीसमधील लोक संघटितपणे विस्थापित लोकांसाठी देणग्या गोळा करत आहेत. अत्यावश्यक वस्तू पुरवत आहेत. ज्या स्थलांतरीत कामगाराविरोधात ट्रम्प गरळ ओकत आहेत, ते स्थलांतरीत कामगार नॅशनल डे लेबरर ऑर्गनायझिंग नेटवर्कच्या नेतृत्वाखाली जळलेल्या इमारतींचे ढिगारे, रस्ते साफ करण्यास मदत करत आहेत. डाव्या, समाजवादी आणि कामगार संघटना या संकटात एकत्र येत जमिनीवर मदतकार्य करत जनतेच्या शक्तीचे प्रभावशाली स्फूर्तीदायी दर्शन घडवत आहेत.
(‘पीपल्स डेमॉक्रसी’ मधील नतालिया मार्केझ यांच्या लेखावर आधारित)
आभार
सांगली येथील हितचिंतक विमल गणेश करंदीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीस रुपये ५०,००० ची देणगी दिली आहे. या देणगीतून डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके ग्रंथालय आणि शाळांना दिली जातील. करंदीकर यांचे मनःपूर्वक आभार..!
संपादक