कॅन्सर म्हणजे काय?

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

वर्गात आल्यावर सर म्हणाले, “आजचा आपला प्रश्न आहे, ‘कॅन्सर म्हणजे काय’?”

“सर, कॅन्सर म्हणजे कर्करोग.” चंचल विद्युत पटकन बोलला.

“अरे, हो. हा, कॅन्सर या शब्दाला मराठी प्रतिशब्द झाला. कॅन्सर म्हणजे नेमके काय? कोण सांगेल?”

सगळी मुले एकमेकांकडे बघू लागली.

शेवटी सर्वेश म्हणाला, “मी माझ्या डॉक्टर काकांना विचारले. ते म्हणाले शरीरातील पेशींची अनिर्बंध वाढ झाल्यामुळे होणारा रोग म्हणजे कॅन्सर. तो मोठा घातक असतो.”

“पण सर्वेश, अनिर्बंध म्हणजे नेमके काय?” चिमण्या गार्गीने विचारलेच.

“अनिर्बंध म्हणजे कोणतेही बंधन नसलेले.” मराठीप्रेमी मेधाने समास सोडवून सांगितले. आणि तिनेच पुढे विचारले, “पण पेशींची अनिर्बंध वाढ म्हणजे नेमकं काय? मला नाही समजलं.”

देशमुख सर बोलू लागले, “आपण सर्वांनी शरीर विज्ञानाचा काही अभ्यास केला आहे. आपले शरीर बनायला एका पेशीपासून सुरुवात होते. त्यांचे विभाजन होऊन संख्या वाढते, त्यांचा आकार वाढतो आणि विशिष्ट काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार होतात त्यातून आपले शरीर आकार घेते. आपल्या शरीरातील, उदाहरणार्थ आपल्या त्वचेवरील, लाखो पेशी दररोज मृत्यू पावत असतात आणि तशाच नवीन पेशी त्यांची जागा घेत असतात. हे पेशींच्या सुव्यवस्थित वाढीचे उदाहरण झाले. आपण जगण्यासाठी अशी वाढ आवश्यक आहे. अनिर्बंध वाढीत काय होत असावे?”

“सर, मला वाटतं, नेहमी आपल्या शरीरातील जेवढ्या पेशी मरतात तेवढ्याच नवीन निर्माण होतात असं असेल. काही पेशी अचानक वेड्यावाकड्या, त्यांना पाहिजे तशा वाढत गेल्या तर कॅन्सर होत असेल.” विचारी विचक्षण म्हणाला.

“बरोबर आहे.” देशमुख सर म्हणाले. “कॅन्सरच्या पेशींच्या वाढीवर आपल्या शरीराचे नियंत्रण राहत नाही. त्या आपल्या शरीराशी संबंध नसल्याप्रमाणे वाढत राहतात आणि शरीरभर पसरत राहतात. यामुळं काय होईल?”

“आपल्या शरीरातील बाकीच्या पेशींना त्रास होईल, कॅन्सरच्या पेशींच्या गाठी बनतील, रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होईल. अन्ननलिकेत कॅन्सर झाला तर गिळायला त्रास होईल” वर्गातून वेगवेगळी उत्तरे यायला सुरुवात झाली.

प्रसन्न होऊन सर म्हणाले, “शाब्बास. शरीरभर वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरच्या या पेशी वाढायला लागल्यावर जो त्रास होतो त्यामुळे कॅन्सरची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. आणखी काही लक्षणे कोणास माहीत आहेत?”

“राजेश म्हणाला, “मी कॅन्सरवर एक लेख वाचला. त्यात लिहिलं आहे की, वजन खूप कमी होणं, बराच काळ ताप येत राहणं, शरीरात गाठी उगवणं, अचानक रक्तस्त्राव होणं ही कॅन्सरची सुरुवातीची महत्त्वाची लक्षण असू शकतात. हो ना, सर?”

“अगदी बरोबर. कोणत्याही माणसात अशी लक्षणं आढळून आली तर लगेच सर्व तपासणी करणं आवश्यक आहे. असा तपास केला नाही तर काय होईल?” देशमुख सरांनी विचारले.

“काय होईल?” मितवाने परत पटकन विचारले आणि ती ओशाळली. स्वतःलाच सावरत ती पुढे म्हणाली, “कोणत्याही आजाराचं लवकर निदान होणं महत्त्वाचं असतं. कॅन्सरबाबत तर हे फारच महत्त्वाचं असतं असं म्हणतात.”

“बरोबर आहे तुझं म्हणणं. कॅन्सर शरीरात पसरण्याचे वेगवेगळे टप्पे असतात. सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा कॅन्सर फारसा पसरला नसतो तेव्हाच त्याचे निदान होऊ शकले तर अधिक उत्तम उपचार करता येतात.” सरांनी तिच्या सांगण्याला दुजोरा दिला.

“पण कॅन्सरनं माणूस मारतो असं म्हणतात. मग उपचार कसले?” करणचे कुतूहल जागे झाले.

“कॅन्सरमुळे माणूस मरतोच असं नाही. या रोगाची सुरुवात असताना त्याचे निदान झाले आणि त्याच्यावर योग्य उपचार व्यवस्थित घेतले तर अनेक माणसांमध्ये हा रोग बरा होऊ शकतो. कॅन्सरचे शेकडो प्रकार आहेत. कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे आणि तो किती पसरला आहे यावर त्या माणसाचा कॅन्सर बरा होईल की नाही हे अवलंबून असते. काही माणसांमध्ये कॅन्सर बरा होऊ शकला नाही तरी तो आटोक्यात राहतो. रुग्णाचे आयुष्य वाढते.” सरांनी व्यवस्थित समजावून सांगितले.

त्यांनी पुढे विचारले, “कॅन्सरवर काय इलाज असतो, कोणाला काही माहीत आहे का?”

मुलांची आपापसात चर्चा सुरू झाली. अनेक उत्तरे पुढे येऊ लागली. “इंजेक्शने आणि गोळ्या असतात. त्यांचा फार त्रास होतो म्हणतात.” “हो, केस गळतात.” “ऑपरेशन करून शरीराचा तो भागच कापून टाकतात. माझ्या लांबच्या आत्याला पोटाचा कॅन्सर झाला होता. दोन वेळा ऑपरेशन करून तिचा आतडं कापलं. आता ती बरी आहे.” “रेडिएशन देऊन कॅन्सरच्या गाठी जाळून टाकतात.”

“दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी, जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले गेले. त्यांच्या रेडिएशनमुळे नंतर अनेक वर्षे तेथील कॅन्सरचं प्रमाण वाढलं होतं, असे मी वाचलं आहे. मग कॅन्सरवर रेडिएशन कसं वापरता येईल?” इतिहासप्रेमी अशोकने विचारले.

त्याच्याकडे अभिमानाने पाहत सर म्हणाले, “छान. तुझं वाचनही चांगले आहे आणि प्रश्नही नेमका विचारलास. हे काहीसं ‘विषच विषाचा उतारा’ असं आहे. आपल्या शरीरावर ‘एक्स-रे’ सारखे किरण बराच काळ पडत राहिले तर कॅन्सर होऊ शकतो. पण आता अत्यंत आधुनिक आणि अचूक यंत्र वापरून शरीरातील ज्या भागात कॅन्सर आहे फक्त त्याच भागावर रेडिएशन केंद्रित केले जाते. त्यामुळे तेथील कॅन्सरच्या पेशी मरतात आणि इतर साईड इफेक्ट्स कमी राहतात.”

सरांनी बोट वर करून सांगायला सुरवात केली, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅन्सरवर जगभर सतत संशोधन सुरु आहे. कमी साईड इफेक्ट असलेले नवनवीन उपचार मानव शोधून काढीत आहे.

सरांनी पुढे विचारले, “आज रेडिएशन हे कॅन्सरचे महत्त्वाचे कारण नाही. तुम्हाला कॅन्सर होण्याची इतर कोणती कारणे ठाऊक आहेत?”

“सिगरेटमुळे, खूप दारू प्यायल्यामुळे, व्हायरस मुळे, अनुवंशिकता” मुलांनी त्यांना ज्ञात असलेली कारणे सांगितली.

“पण या कारणांमुळे कॅन्सर का होतो?” ईशाचा प्रश्न तयार होताच.

“पेशींच्या अनिर्बंध वाढीमुळे कॅन्सर होतो हे आपल्याला ठाऊक झाले आहे. वर जी कारणे सांगितली त्यामुळे पेशींची अशी निर्बंध वाढ होण्याचं प्रमाण वाढतं.” सर म्हणाले.

“सर, म्हातार्‍या माणसांत कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं म्हणतात. त्याचं काय कारण?” शांत ऋत्विक अखेर बोलला.

“उत्तम प्रश्न. असं आहे, आपल्या शरीरात अनेक पेशी नैसर्गिकरीत्या नवीन तयार होत असतात. या प्रक्रियेत गडबड होऊन कॅन्सरच्या पेशी निर्माण होतात. पण आपले शरीर त्या पेशी वेगळ्या आहेत हे ओळखते आणि त्यांना मारून टाकते. याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. आधी आपण सांगितलेल्या कारणांमुळे कॅन्सरच्या पेशी तयार होण्याचे प्रमाण वाढते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच वाढत्या वयातदेखील कॅन्सरच्या पेशी शरीरात तयार होण्याचे प्रमाण वाढत जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे त्या पेशींचा नायनाट शरीर नीट करू शकत नाही.”

तास संपायची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात दिनेशने विचारले, “सर, एकच प्रश्न. कर्करोग होऊच नये म्हणून काय करायचे?”

“याच प्रश्नाची मी वाट पाहत होतो.” खूष होऊन सर म्हणाले. “कॅन्सरचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे हे आपण बघितले. ‘Prevention is better than cure’ ही म्हण तुम्हाला माहीत आहेच.

वर्गात फेरी मारीत सर पुढे सांगू लागले, सुदैवानं कॅन्सर टाळण्यासाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. चौरस आहार, फळे, पालेभाज्या यांचा भरपूर वापर, नियमित व्यायाम, व्यसनांपासून दूर राहणे या आरोग्यवर्धक गोष्टी कॅन्सर प्रतिबंधासाठीही आवश्यक आहेत. व्हायरसमुळे होणारे काही कॅन्सर टाळण्यासाठी लसीदेखील उपलब्ध होत आहेत. ज्यांना कॅन्सर होण्याची अनुवंशिकता जास्त आहे त्यांच्यावर आपण अधिक लक्ष ठेवू शकतो. नियमित शारीरिक तपासणी करून अगदी सुरुवातीच्या अवस्थेमधीलच कॅन्सर शोधून त्यावर योग्य इलाज केल्यास अनेक प्रकारच्या कॅन्सरमधून माणूस बरा होऊ शकतो.”

जाता जाता अनिकेतकडे बघत सर म्हणाले, “तुला मिळालेले हे ज्ञान तू तुझा मित्र रक्षित याला टप्प्याटप्प्याने जरूर दे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.”

डॉ. प्रसन्न दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ]