रॅट रेसचा विळखा

प्रभाकर नानावटी -

बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य व इनोव्हेटिव्ह माइंड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत नसते. त्याचप्रमाणे या गोष्टी असणार्‍यांना वाटेल ती किंमत देऊन विकत घेता येते याचीसुद्धा सोय येथे होत असते. याचा परिणाम जीवघेण्या स्पर्धेत होत आहे व बहुतेकांना या रॅट रेसमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळते वा जे संधीच्या शोधात आहेत त्यांचेच हे जग आहे. आणि इतरांना येथे स्थान नाही.

परंतु वास्तव फार वेगळे आहे. ही रॅट रेस सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. काही (मोजके चाणाक्ष) स्मार्ट अगोदरच या शर्यतीच्या विनिंग लाईनजवळ उभे आहेत. व शिट्टी वाजवली की तेच सर्वांच्या अगोदर पोहोचतात व शर्यत जिंकतात. बाजारावरील नियंत्रण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेंव्हापासूनच समान संधी नाकारली गेली हे विसरता येत नाही. उत्कर्षाच्या शिडीच्या खालच्या पायरीपाशीच बहुतेक जण घुटमळत आहेत, एकमेकाचे पाय ओढत आहेत. व यातूनही काहींना वरच्या पायरीवर जाणे शक्य झाले तरी त्यांना वर येऊ न देण्यासाठी काही अडथळे उभे करणारे ठिकठिकाणी उभे आहेत. खरे पाहता उदारीकरणाच्या सिद्धांतानुसार विलक्षण बुद्धिमत्ता, सर्जनशीलता किंवा अविश्रांत परिश्रम असलेल्यांच्याकडेच संपत्ती हवी. परंतु यापैकी कुठलेही गुणविशेष श्रीमंतांच्या जवळ नसते.

बुद्धिमत्ता वा परिश्रमांची फळंसुद्धा फार काळ टिकत नाहीत. पहिल्या पिढीतील उद्योजकांनी स्वतःच्या हिकमतीवर व इनोवेशनच्या जोरावर उद्योगधंदे उभारून संपत्ती गोळा केली असली तरी नंतरच्या कालखंडात स्पर्धेची झळ लागणार नाही याची शाश्वती देता येत नाही. इनोवेशन्स सतत होत असतात. त्यामुळे नवीन उद्योगधंदे उदयास येत काही उद्योगधंद्यांना कालबाह्य ठरवतात. त्यामुळे बापाच्या पैशाच्या जोरावर उद्योजकांची पुढली पिढी टिकून राहील याची खात्री देता येत नाही. कुठल्याही कालखंडात नावीन्यतेला, त्याच्या उपयुक्ततेला अग्रक्रम दिला जातो. अमेरिका वा ब्रिटन सारख्या प्रगत भांडवली देशातसुद्धा याचा प्रत्यय येत असतो.

या जीवघेण्या रॅट रेसला कारणीभूत ठरणार्‍या मेरिटोक्रसी (गुणवत्ताशाही) विषयीचे काही लेख वाचकांच्या विचारार्थ ठेवलेले आहेत. परीक्षांच्या परिणामानंतर पानभर झळकणार्‍या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती, कोटा फॅक्टरी, लातूर पॅटर्नसारख्या स्पर्धापरीक्षेत हमखास यशाची गॅरंटी देणार्‍या खर्‍या-खोट्या (पेरलेल्या) बातम्या इत्यादींना भुलून आपापले नशीब आजमावण्यासाठी खेड्यातून येणारा नवशिक्षितांचा लोंढा जवळच्या शहराकडे धाव घेतो. अनेकजण जमेल तसे, जमेल तितके राजपत्रित-अराजपत्रित सेवा परीक्षांची तयारी करू लागतात. या परीक्षामधून खरोखरच गुणवत्तेची पारख होऊ शकते का, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. या अनुषंगाने मेरिटोक्रसीचा भूलभुलैय्याची कल्पना देणारे हे लेख आहेत. सुज्ञ वाचक लेख वाचून आपले मत बनवतील, ही अपेक्षा.

प्रभाकर नानावटी, अतिथी संपादक


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]