ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
माणसाने माणसाचे अनेक प्रकारे शोषण केले आहे. शोषणाचा सर्वांत भयानक प्रकार म्हणजे अस्पृश्यता! भारतीय समाजाला लागलेला हा सर्वांत भयानक कलंक.
संन्याशाची पोरे म्हणून ज्ञानदेवादी भावंडांच्या पदरी अस्पृश्याचे जिणे जन्मापासूनच आलेले होते. अस्पृश्यांबद्दल त्यांना केवळ सहानुभूती नव्हती, तर त्या जिण्याची त्यांना अनुभूती होती.
चोखोबा आपली वेदना देवाला सांगताना म्हणतात –
हीन याती माझी देवा। कैसी घडे तुझी सेवा ॥
मज दूर दूर हो म्हणती। तुज भेटूं कवण्यारीती ॥
माझा लागतांची कर। सिंतोडा घेताती करार ॥
माझ्या गोविंदा गोपाळा। करुणा भाकी चोखामेळा ॥
चोखोबांचा मुलगा कर्ममेळा तर देवाला उघड सवाल करतो –
आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती ॥
जन्म गेला उष्टे खातां। लाज न ये तुमचे चित्ता ॥
पहिला विद्रोही कवी म्हणून कर्ममेळ्याचा गौरव कविवर्य नामदेव ढसाळ यांनी केला आहे.
ज्या वर्णाश्रम धर्मातून आणि जातिव्यवस्थेतून अस्पृश्यता जन्माला आली त्याविरुद्ध ज्ञानेश्वर माउलींनी भक्तिमार्गातून बंड पुकारले. त्यांनी भक्तिमार्गाचा हिरिरीने पुरस्कार केला. भक्तिमार्गात स्त्रीशूद्रादी सर्वांनाच प्रवेश होता. ज्ञानेश्वर माउलींनी स्पष्टपणे सांगितले –
येथ कुल जात वर्ण। हे आघवेची अकारण ॥
संतांच्या भक्तिमार्गात सर्वांनाच प्रवेश आहे –
सकलांसी येथे आहे अधिकार।
तुकोबा आवाहन करतात –
या रे या रे लहानथोर। याती भलते नारी नर ॥
वैष्णवांच्या या भतिमार्गात येण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे? तुकोबा काय सांगतात पहा –
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही ॥
सर्व जातीच्या संतांना खुद्द पांडुरंगाच्या मंदिरातच प्रवेश नव्हता. मंदिरावर सत्ता सनातनी ब्राह्मणांची होती. सनातनी ब्राह्मणांच्या धर्मसत्तेला त्या काळातील राज्यसत्तेचेही समर्थन आणि संरक्षण होते. चोखोबांना जसा मंदिरात प्रवेश नव्हता तसा जनीलाही प्रवेश नव्हता. जनी आपली वेदना प्रकट करते –
राजाई गोणाई। अखंडित तुझे पायीं ॥
मज ठेवियेलें द्वारीं। नीच म्हणोनी बाहेरी ॥
मंदिरात प्रवेशच नाही तर तेथे भजन-कीर्तन करणे तर दूरच राहिले. मग संतांनी भजन, कीर्तन वाळवंटातच सुरू केले. देवही भावाचा इतका भुकेला की तो संतांच्या कीर्तनात नाचू लागला. संत जनाबाई वर्णन करतात –
नामदेव किर्तन करी पुढे नाचे पांडुरंग।
जेथे माझ्या नामाचा घोष चालतो तिथे मी वस्ती करतो असे भगवंताने गीतेत जाहीर केलेले आहे. ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीत भगवंताचे हे ब्रीद प्रगट करतात –
तो मी वैकुंठीं नसें।
वेळु एक भानुबिंबींही न दिसें।
वरी योगियांचींही मानसें।
उमरडोनि जाय ॥
परी तयांपाशीं पांडवा।
मी हारपला गिंवसावा।
जेथ नामघोषु बरवा।
करिती माझा ॥
आता संतांना देवाला भेटायला मंदिरात जायची आवश्यकता नव्हती. देवच त्यांना भेटायला त्यांच्यापाशी येऊ लागला. चोखोबांना मंदिरात प्रवेश नव्हता. पण देव त्यांच्या घरी जेवायला जात होता. कर्ममेळा वर्णन करतो –
आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी।
म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥
तेव्हां तुज काय उपवास होते।
म्हणोनी सांगातें जेविलेती ॥
संतांनी सांगितलेल्या कथांचा भावार्थ लक्षात घेतला तर त्या कथा सांगण्याचा उद्देश आपल्या लक्षात येईल. देव चोखोबाला एकदा भेटायला आले. त्यांनी प्रेमाने आपला हार चोखोबांच्या गळ्यात घातला. चोखोबांच्या गळ्यातला तो हार बघताच बडवे भडकले. त्यांनी चोखोबांना मारहाण करायला सुरुवात केली. चोखोबा म्हणतात –
धांव घाली विठु आतां चालुं नको मंद।
मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥
विठोबाचा हार तुझ्या कंठीं कैसा आला।
शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटविला ॥
चोखोबा तर सोवळ्या ओवळ्याच्या पलीकडे केव्हाच पोहोचले होते. ते म्हणतात –
नीचाचे संगती देवो विटाळला।
पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥
मुळिंच सोंवळा कोठें तो वोंवळा।
पाहतां पाहणें डोळा जयापरी हा ॥
सोवळचाचे ठाई सोंवळा आहे।
वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा।
तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥
अस्पृश्याच्या स्पर्शाने स्वतः देवच विटाळतो, त्याला आंघोळ घालून शुद्ध करावे लागते, अशी कर्मठ सनातनी ब्राह्मणांची जी अंधश्रद्धा आहे त्याबाबत संत एकनाथ महाराज म्हणतात –
देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र।
उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥
देवापरीस जळ सबळ केलें।
ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥
नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला।
पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥
एका जनार्दनीं साच नाहीं भाव।
संशयची देव नाहीं केला ॥
अस्पृश्याच्या स्पर्शाने देव आणि देवाखालचे वस्त्र अपवित्र झाले व पाण्यात भिजवले की पवित्र झाले म्हणतात. त्यांनी देवापेक्षा पाणी बलवान केले. ज्ञानस्वरूप शुद्ध परमात्मा दुबळा केला. नीचाच्या स्पर्शाने देव विटाळला म्हणून त्याला पाण्याने शुद्ध करता काय? नाथ म्हणतात, हा शुद्ध भाव नसून संशयाने देवच नाहीसा केला.
स्वामी विवेकानंद विचारतात, “दुसर्याच्या स्पर्शाने जो अपवित्र होतो तो देव तुम्हाला पवित्र काय करणार?”
नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. पण सनातनी ब्राह्मणांचे मन परिवर्तन झाले नाही.
“पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय आहे”, असे साने गुरुजी सांगत असत. पंढरपूरचे मंदिर अस्पृश्यांसह सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी आमरण उपोषण सत्याग्रह केला. या उपोषणाचा प्रारंभ करण्यापूर्वी साने गुरुजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि आपली भूमिका लोकांना स्पष्ट करून सांगितली. साने गुरुजी आपल्या भाषणातून कळवळून सांगत,
“पंढरपूरच्या वाळवंटांत तरी भेदभाव, शिवाशिव नको असे संतांनी ठरविले. सार्या महाराष्ट्रांतून विठ्ठलनामाचा गजर करीत येथे या. परस्परांस भेटा, क्षेमालिंगने द्या. आणि नवीन प्रथा सुरू झाली, वाळवंट दणाणले, गजबजले. तुकारामांच्या अभंगात वाळवंटाचा अपार महिमा आहे.
‘एकमेकी लोटांगणीं येती रे। कठोर हृदयें मृदु नवनीतें ॥ पाषाणा पाझर फुटती रं’ असें उचंबळून तुकोबा म्हणतात. संत बंडखोर होते. संस्कृतांतील ज्ञान त्यांनी मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोपडी-झोपडीत त्यांना ज्ञान न्यायचे होते, खरा धर्म न्यायचा होता, त्यांचा छळ झाला.
ज्ञानेश्वरादिकांवर बहिष्कार, कुंभाराचे मडकेही त्यांना मिळू दिले नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत फेकण्यात आले. एकनाथी भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो. परंतु ते जिवंत असताना त्यांचे आपण छळच केले. परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटात तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला. त्यांच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही ‘अवघाचि संसार सुखाचा होई’पर्यंत पुढे गेले पाहिजे. परंतु आपण पुढे गेलो नाही. पंढरपूरच्या वाळवंटात एकमेकांना भेटू, परंतु देवाजवळ अजूनही हरिजनांना जाता येत नाही. वारी करून घरी आल्यावर गावात शिवाशिव ती आहेच. शेवटी पंढरपूर स्वत:जवळ आणायचे असते. एकनाथ म्हणतात, ‘काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल|’ शेवटी स्वत:च्या जीवनात सारे आणायचे असते. परंतु आपण संतांचा मागोवा घेत पुढे गेलो नाही. एखाद्या आईचे मूल पहिले पाऊल टाकते. ती आनंदाने म्हणते, बाळ्याने आज पहिले पाऊल टाकले. परंतु चार महिने झाले तरी बाळ्या जर दुसरे पाऊल टाकीत नसेल तर मातेला का आनंद होईल? आपण सहाशे वर्षांत दुसरे पाऊल टाकले नाही. संतांनी वाळवंटांत सर्वांना जवळ घेतले, आपण मंदिरात सर्वांना घेऊ या. आपले हे वंशज असे कसे गतिहीन करंटे, असे मनात येऊन संत तडफडत असतील, दुःखाने सुस्कारे सोडीत असतील.”
साने गुरुजींची ही सारीच व्याख्याने आपण पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत. साने गुरुजींनी समतेच्या विचाराचा संतांचा वारसा प्रभावीपणे पुढे चालवला. आपले प्राण पणाला लावले आणि विठ्ठलाचे मंदिर सर्वांसाठी खुले गेले. पण आपण संतांनी आणि गुरुजींनी दाखवून दिलेल्या या मार्गावर पुढे वाटचाल करणार काय?
लेखक संपर्क : ९४२२० ५५२२१
-ह.भ.प. देवदत्त परूळेकर