अॅड. असीम सरोदे -
भारतीय संविधानात ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद ५१-अ चा समावेश करण्यात आला. यात एकूण ११ मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत. त्यातील ५१ अ (h) मधील मूलभूत कर्तव्य अत्यंत विलक्षण महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ५१ अ (h) स्पष्टपणे सुचविते की, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व मानवतावाद वाढविणे ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची जबाबदारी असेल. तसेच चौकसपणावर (based on enquiry) आधारित जिज्ञासा आणि सुधारणा यांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे हीसुद्धा प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे, असे सांगण्यात आले आहे. जसे नागरिक असतात तसेच राष्ट्र असते. देशाला एक राष्ट्र म्हणून एकत्रित ठेवण्यात नागरिकांचीच भूमिका महत्त्वाची ठरते. याचाच विचार करून साधारणत: १९७५ च्या काळात सरकारने स्वर्णसिंग कमिटी नेमली. त्या कमिटीने सगळ्या नागरिकांनी काही मूलभूत कर्तव्ये व जबाबदार्या पाळाव्यात असे स्वरूप देऊन त्याबाबतचे स्पष्टीकरण संविधानात समाविष्ट करण्यात यावे, अशी शिफारस केली होती.
४२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली तेव्हा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आला. पुढे १९७७ साली सत्तांतर झाले. नवीन सरकार आले व ४२ व्या घटना दुरुस्तीतील काही सुधारणा ४४ व्या घटनादुरुस्तीने रद्द ठरविण्यात आल्या. कारण त्या खरंच असंवैधानिक ठरतील अशा होत्या. पण संविधानातील मूलभूत कर्तव्यांबाबतच्या सुधारणा तसेच कलम ५१-अनुसार ‘सगळ्या नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, त्याचा प्रचार, प्रसार करावा’ या सुधारणेला सगळ्या राजकीय पक्षांचा तेव्हा पाठिंबा मिळाला व चर्चेअंती मिळालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, या सुधारणेला धका लावण्यात आला नाही. संपूर्ण मूलभूत कर्तव्यांबाबतची तरतूद भारतीय संविधानात कायम ठेवून आपल्या देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हकांच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम २९ (१) मधील तरतुदीशी समरूपता प्राप्त केली व इतर काही देशांप्रमाणे जगातील आधुनिक संविधान असलेल्या देशांच्या यादीत स्थान मिळविले.
घटना व वस्तुस्थिती यांच्या आधारे व विज्ञानाच्या मदतीने, नवीन पुराव्यांच्या आधारे सत्य शोधताना आपण स्वतःचे म्हणून ठरविलेले मत खोटे ठरू शकते. त्यामुळे हिंमत ठेवून आपण आपले मत बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली प्रवृत्ती प्रगल्भ होऊन अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील, अशा आशयाचे नेहरूंचे विचार मूलभूत कर्तव्यांमधील कलम ५१-अ चा आधार ठरले.
संविधानाच्या भाग ४ मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात असलेल्या कलम ५१-अ मध्ये विविध ११ कर्तव्यांची यादी देणे पुरेसे ठरलेले नसल्याने तेथे प्रत्येक कर्तव्यांचे स्पष्टीकरण असलेले परिच्छेद जोडले गेले पाहिजेत. कर्तव्यांचे वर्णनात्मक स्पष्टीकरण असावे व ५१ अ ची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकाने खालील कर्तव्यांचे दररोजच्या जीवनात पालन करावे अशी असावी ही अहवालातील सूचना सर्वांत महत्त्वाची वाटते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व मानवतावाद वाढविणे या कलम ५१ (h) सोबत ५१ (h) १ ते ५१ (h) ५ पर्यंत स्पष्टीकरणाचे ५ परिच्छेद अधिकचे जोडावेत अशी सूचना आहे जी अजूनही धूळ खात पडली आहे.
कलम ५१ (h) १ असे नाव देऊन या कलमाचा मथळा ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, सुधारणावाद यांचा विकास करणे’ असा आहे तसा ठेवावा आणि त्याच्यापुढे इतर स्पष्टीकरणे द्यावीत असे २००१ साली सुचविण्यात आले.
५१ (h) ३ माहितीच्या, ज्ञानाच्या व अनुभवाच्या संचयातून तयार झालेला दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असते. कारणमीमांसा, तार्किकता यांवर विज्ञानाकडे असणारा कल अवलंबून असतो तर नेमकी विरुद्ध स्थिती भ्रम व अंधश्रद्धा जे पाळतात त्यांच्यात दिसून येते. वैज्ञानिक दृष्टिकोनात कालबाह्य पद्धतीने शिकण्याच्या पद्धतीला टाकून दिले जाते, निरुपयोगी गोष्टींना चिकटून राहणे टाळले जाते. आपल्या आवतीभोवतीच्या वस्तुस्थितीचे शोधन व संशोधन करून त्या योग्य व बरोबर व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यासाठी बुद्धिवादी माहितीची आस असली पाहिजे.
– अॅड. असीम सरोदे
(साभार : आजचा सुधारक, ऑगस्ट २०२१)